Jan 23, 2022
स्पर्धा

घरंदाज 8 अंतिम (मराठी कथा:Marathi story)

Read Later
घरंदाज 8 अंतिम (मराठी कथा:Marathi story)

आपण मागील भागात पाहिले की, आईबाबांनी निशाला घरात घेतले होते. प्रियाची गुड न्यूज होती. सगळं काही चांगलं चाललेलं असतानाच प्रियाच्या पोटात खूप दुखू लागले. डाॅक्टरांनी गाठ असून ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. आता पुढे..

अभिने प्रियाला खूप समजावून सांगितल्यावर प्रिया कशीबशी ऑपरेशनला तयार झाली. आधी प्रियाच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. टेस्टचे रिपोर्ट वगैरे येण्यात दोन तीन दिवस गेले. रिपोर्ट बघून नंतर ऑपरेशनची तारिख ठरवण्यात आली. ऑपरेशनची तारिख जसजशी जवळ येईल तसतशी प्रियाला खूप भीती वाटू लागली.

"अभि, मला काही झाले तर तू मला विसरणार नाहीस ना." प्रिया हे बोलताना तिचे डोळे भरून आले.

"अगं वेडाबाई, तुला काहीच होणार नाही. मी तुझ्यासोबत कायम आहे. ऑपरेशन यशस्वी होणारच. पाॅझिटीव्ह विचार कर ग राणी." अभि प्रियाची समजूत घालत होता.

"मला खूप भीती वाटत आहे." प्रिया

"तू घाबरू नकोस. आम्ही आहोत ना." अभि प्रियाचा हात हातात घेऊन म्हणाला.

"हं" म्हणून प्रिया शांत बसली. पण तिच्या मनात विचारांचा काहूर माजला होता. तिला एक प्रकारची भीती वाटत होती. तरीही ती अभिसाठी शांत झाली.

फायनली ऑपरेशनची वेळ आली. प्रियाचे ऑपरेशन करण्यासाठी तिला आत नेले. आत प्रिया जीवनमरणाची झुंज देत होती तर बाहेर अभिच्या मनात विचारांची झुंज सुरू होती. दोन तास ऑपरेशन सुरू होते. अभिच्या मनात एक विलक्षण भीती वाटत होती. कारण त्याचे प्रियावर खूप मनापासून प्रेम होते आणि त्याला प्रियाला गमवायचं नव्हतं. तो त्याच्या विचारचक्रात होता तोच ऑपरेशन झाले आणि डाॅक्टर बाहेर आले.

"डाॅक्टर, प्रिया कशी आहे? आणि ऑपरेशन कसे झाले?" अभिने विचारले.

"ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे. त्या अजून बेशुद्ध आहेत. थोड्या वेळाने शुध्दीवर येतील. पण थोडे दिवस त्यांची काळजी घ्यायला हवी." डाॅक्टर.

"हो डाॅक्टर. आम्ही भेटू शकतो का?" अभि.

"त्या शुध्दीवर आल्यावर मग भेटा. आत्ताच नको आणि हो सगळे एकदम जाऊ नका. एकेक जण जाऊन भेटा." डाॅक्टर

"हो डाॅक्टर" अभि.

डाॅक्टर गेल्यावर अभि प्रिया कधी शुध्दीवर येते याचीच वाट पाहत होता. थोड्या वेळाने प्रिया शुध्दीवर आली म्हणून नर्सने सांगितले. ते ऐकून पहिल्यांदा अभि आतमध्ये गेला. प्रियाला असे बघून त्याचे डोळे भरले आणि ते प्रियाच्या नजरेस पडले. प्रियाने खुणेनेच काय म्हणून विचारले तर अभि मानेनेच काही नाही म्हणाला. बराच वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत होते. दोघेही काहीच बोलले नाही. त्यानंतर घरातील एकेक जण येऊन प्रियाला भेटून गेले.

पाच दिवसांनी प्रियाला डिस्चार्ज मिळाला. प्रिया घरी आल्यावर अभि तिची खूप काळजी घेत होता. तिला काय हवे काय नको ते पाहत होता. तसे प्रियाचे आईबाबा तिला माहेरी घेऊन जातो म्हणाले होते पण अभिच्या बाबांनी साफ नकार दिला.
"प्रिया आता आमची जबाबदारी आहे. आम्ही तिची योग्य ती काळजी घेऊ. तुम्ही निश्चिंत रहा." असे अभिचे बाबा बोलल्यावर कोणी काय बोलणार? म्हणून प्रिया सासरीच आली होती. तिला भेटण्यासाठी तिची नणंद निशा पण अधूनमधून येत होती.

आता प्रिया एकदम बरी झाली होती. पण आपण आई होणार नाही ही सल तिच्या मनात कायमच लागून राहिली होती. तो विचार ती करत तासन् तास बसत होती. म्हणून अभिचे बाबा तिचे मन कामात रमावे म्हणून तिला ऑफिसची कामे देऊ लागले. प्रिया तिचे मन कामात गुंतवू लागली पण जी पोकळी होती ती कायमचीच होती ना. काही केल्या ती भरून निघणार नव्हती. तिची ती अवस्था पाहून अभिने एखादं मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ती गोष्ट तो त्याच्या आईबाबांना सांगायला गेला. निशा देखील तेथेच होती. अभिने त्याचा निर्णय आईबाबांना सांगितल्यावर त्याची आई खूप चिडली.

"मला अभिचे स्वतःचेच मूल हवे आहे. तुझा निर्णय मला मान्य नाही. मी त्या मुलाला घरात येऊ देणार नाही. काही पण करा मला अभिचे स्वतःचेच मूल हवे आहे." अभिची आई.

"अगं आई, हे कसे शक्य आहे. तुला तर माहितच आहे आणि तू अशी का बोलतेस?" निशा.

"काही पण करा. आता तर नवनवीन टेक्नाॅलाॅजी आल्या आहेत. सर्च करा माहिती मिळवा. पण अभिचेच मूल होऊ द्या." अभिची आई.

"पण का? दत्तक घेतले तर काय होईल?" अभिचे बाबा.

"काहीच होत नाही. पण मला अभिचेच मूल हवे आहे." अभिची आई.

"ठिक आहे. मी अभिला घटस्फ़ोट द्यायला तयार आहे. अभिचे दुसरे लग्न करा, म्हणजे त्याचेच मूल येईल." प्रिया हे बोलताना तिचे डोळे भरून आले.

"प्रिया, तू हे काय बोलत आहेस? मी अजिबात दुसरं लग्न करणार नाही. मला मूल नको पण तू हवी आहेस." अभि.

"अरे, पण घरच्यांच्या आनंदासाठी हे करावंच लागेल." प्रिया.

"अगं प्रिया, पण दुसरा काही उपाय नाही का?" अभिचे बाबा.

"याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही?" प्रिया

"आहे.... सरोगसीचा" निशा

"म्हणजे???" अभि प्रिया दोघेही एकदम म्हणाले.

"हो. आपण सरोगसीनेच तुमचे दोघांचे मूल जे एका स्त्रीच्या गर्भात नऊ महिने वाढेल आणि जन्माला आल्यावर ते तुमचेच मूल तुमच्याकडे येईल." निशा

"हो... पण असे कोण तयार होईल?" प्रिया.

"मी देईन तुम्हाला तुमचे मूल." निशा म्हणाली.

"काय?? तू." अभि

"हो. मीच... कारण प्रियाने मला माझे माहेर मिळवून दिले आता मी तिला तिचे मूल देणार." निशा असे म्हणत असतानाच मालती म्हणजेच अभिची आई हळूच गालात हसली आणि ती हसताना अभिच्या बाबांनी पाहिले. पण ते तेथे काहीच बोलले नाहीत. नंतर रूममध्ये गेल्यावर त्यांनी मालतीला विचारले असता नंतर सांगेन असे ती म्हणाली.

पुढे निशाने तिच्या नवर्यालाही सगळे समजावून सांगितले. तो सुध्दा तयार झाला. मग काय? तिने सगळ्या टेस्ट करून घेतल्या. सरोगसीची सगळी प्रक्रिया पार पडली आणि अभि प्रियाचे बाळ निशाच्या गर्भात वाढू लागले.

प्रिया निशाची व्यवस्थित काळजी घेऊ लागली. हळूहळू दिवस पुढे जात होते तसतसे निशाच्या गर्भातील बाळ वाढत होते. प्रियाने अगदी हौसेने तिचे डोहाळे जेवण केले. तिला जे जे खाऊ वाटते ते खाऊ घालत होती. असे करता करता नऊ महिने कसे झाले ते कळलेच नाही.

आता निशाचे दिवस भरले होते. डाॅक्टरांनी तिला एक तारीख दिली होती, पण त्या तारखेच्या आधीच अचानकच निशाच्या पोटात खूप दुखू लागले. सगळेच घाबरले. एक तर डाॅक्टरांनी दिलेली तारीख अजून लांब होती आणि हिच्या पोटात दुखायला लागले. काही होणार तर नाही ना. निशा व्यवस्थित असेल ना. असे एक ना अनेक विचार मनात येऊ लागले. ताबडतोब तिला हाॅस्पिटलमध्ये नेले. डाॅक्टरांनी तिला तपासले आणि म्हणाले, "बीपी वाढल्यामुळे असे होत आहे ताबडतोब सिझेरियन करावे लागेल." म्हणून तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.

सगळेच देवाचा धावा करत होते. थोड्या वेळात ऑपरेशन झाले आणि नर्सने बाहेर येऊन सांगितले "अभिनंदन मुलगी झाली." सगळे खूप खूश झाले. पण प्रियाला पुन्हा वाटू लागले की मुलगी झाली म्हणून आई परत वंशाचा दिवा हवा म्हणून हट्ट करतील का? परत त्यांनी दुसरे कोणते कारण मध्ये आणले तर? अशा विचारात प्रिया असतानाच नर्सने आवाज दिला आणि ती भानावर आली.

"बाळाला गुंडाळण्यासाठी कापड आणले आहे का?" नर्स असे म्हणताच आपण तर घाबरून गडबडीत तसेच आलो आहोत म्हणून सगळे एकमेकांकडे पाहू लागले... इतक्यात,
"हे घ्या कपडे आणि बाळ बाळंतीण कशा आहेत?" अभिची आई मालती म्हणाली. तिला असे समोर पाहताच सगळे अवाक् होऊन पाहत होते.

"दोघीही सुखरूप आहेत." असे म्हणून नर्स कापड घेऊन आत गेली आणि बाळाला घेऊन बाहेर आली. बाळाला लगेच मालतीने घेतले आणि "प्रिया सारखीच गोड झाली आहे ना." असे म्हणाली. ती असे बोलताच सगळ्यांना प्रश्न पडला की ही खरी मालती की ती खरी. जी अभिचेच मूल हवे म्हणून हट्ट धरली होती. सगळ्यांनाच खूप आनंद झाला.

पाच दिवसांनी निशाला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी आली. ती घरी आल्यावर एक दिवस सगळे एकत्र बसले होते तेव्हा निशा मालतीला म्हणाली, "आई, झाले का तुझे समाधान की अजून बाकी आहे. नाही म्हणजे नातू हवा असेल तर तसे सांग." निशा थोडी रागातच म्हणाली.

"तुम्ही बोला काय बोलायचं ते? पण आज मी खूप खूश आहे. तुम्ही नणंद भावजय एकमेकींना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मदत केलीत यातच खरं घरंदाज... एकमेकींच्या साथीने, मदतीने संसार करता यावा म्हणून मी हे थोडसं नाटक केलं. मला माहित होतं माझी लेक लगेच मदतीला धावून येणार जशी माझी दुसरी लेक तिच्या मदतीला धावून गेली.

घरात लेकी सुनांच्या हसण्याचा आवाज घुमघुमला तर ते घर खरे घरंदाज.... सुनांना लेक समजून दिलेली वागणूक म्हणजे घरंदाज.... घरात मुलगा मुलगी फरक न करता समानतेने दिलेली वागणूक म्हणजे घरंदाज.... घरंदाज म्हणजे घरात मर्यादेने राहून एकमेकांच्या मदतीला धावून जाणे... एकमेकांचा आदर करणे... आज मी माझ्या दोन्ही मुलींवर खूप खूश आहे.... प्रिया तुला हे घर खूप घरंदाज आणि मी जुन्या विचारांची वाटले होते ना... ते अगदी खरं आहे... पण माझी घरंदाज या शब्दाची व्याख्या खूप वेगळी आहे. घेते मी खांद्यावर पदर पण जुन्या विचारांचा पदर माझ्या डोळ्यांवर मुळीच नाही.... मूल दत्तक घेणे याला माझा मुळीच विरोध नाही.... शेवटी तोच पर्याय होता आणि ते मी मान्य केलं असतं.... पण माझ्या मुलीसाठी जिचे माहेर पूर्णपणे तुटले होते तिच्यासाठी तू लढलीस आणि तिला माहेर मिळवून दिलेस, तर ती तुझ्यासाठी काय करते? हे मला पहायचं होतं. म्हणून मी हे नाटक केलं.... आणि ते यशस्वी झाले आहे..." हे मालतीचे बोलणे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले... आणि आनंदी झाले....
समाप्त...

घरंदाज ही एक वेगळी कथा आहे... खरंतर ही काल्पनिक कथा आहे.. असे कधी कोठे घडत नाही.. पण ज्यांना मूल होत नाही त्यांना वांझोटी म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा असा एखादा प्रयोग केला तर एक नवा आदर्श निर्माण होईल.. तसेच सून आणि मुलगी यात फरक न करता दोघीही आपल्याच मुली म्हणून वागवले तर जगणे सुखकर होईल....
धन्यवाद 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..