घरंदाज 7 (मराठी कथा:Marathi story)

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, अभिने प्रियाला निशाबद्दल सर्व काही सांगितले. मग प्रियाने अभिला निशाला घरी घेऊन येण्यासाठी समजावून सांगितले. अभि काही केल्या तयार होईना. शेवटी प्रियाने मनवल्यावर तयार झाला. त्यानंतर ती बाबांशी बोलायला गेली. बाबांशी बोलता बोलता प्रिया चक्कर येऊन पडली. आता पुढे...

प्रिया अशी चक्कर येऊन पडल्यावर बाबा थोडे घाबरले आणि त्यांनी लगेच अभिला हाक मारली. अभि लगेच तेथे येऊन प्रियाला हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेला. हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टरांनी तिला तपासले आणि ते म्हणाले, "अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहात."

डाॅक्टरांचे बोलणे ऐकून अभिचा आनंद गगनात मावेना. आपण बाबा होणार या भावनेने तो खूप खुश झाला आणि प्रियाला पाहून हॉस्पिटल मध्येच त्याने आनंदाने मिठी मारली.

"अरे हळू हळू आता असे काही करून चालणार नाही." प्रिया त्याला थांबवत म्हणाली.

"अरे हो, सॉरी सॉरी सॉरी आनंदाच्या भरात मी वेडा होतोय की काय? असे मला वाटत आहे." अभि म्हणाला

"मला पण खूप आनंद झाला आहे आणि आता घरी जाऊनच आपण आई बाबांना ही बातमी देवूयात. हे ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला पाहायचा आहे." प्रिया

"हो हो चल घरी जाऊ." असे अभि म्हणाला मग प्रिया आणि अभि दोघेही घरी गेले. त्यांनी दारातून आत प्रवेश केला. प्रियाने समोर पाहिले आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. तिच्यासमोर निशा उभी होती तसेच प्रियाचे सासू-सासरे. या सर्वांना बघून प्रियाला खूप आनंद झाला. खरंतर ते सगळे काळजीत होते. प्रियाला डॉक्टरांनी काय सांगितले? असे अभिच्या बाबांनी काळजीने अभिला विचारले.

"काही नाही सगळे काही बरे आहे, असे डॉक्टर म्हणाले." अभि सुध्दा थोडासा चेहरा पाडून त्यांची गंमत करण्यासाठी म्हणाला.

"मग तिला चक्कर का आली?" बाबा

"ते होय, तुम्ही आजोबा होणार आहात ना म्हणून." अभि नेहमीसारखा थोडीशी गंमत करत म्हणाला.

"आजोबा होय." असे म्हणून अभिचे बाबा एकदम शांत झाले आणि नंतर त्यांच्या लक्षात की अभि आता काय बोलला? "काय?? किती छान आनंदाची बातमी दिली?" अभिचे बाबा एकदम आनंदाने म्हणाले.

"आज तर या घरात दसरा आणि दिवाळी एकत्र आली आहे. एक तर या घरची लेक खूप दिवसांनी घरी परतली आणि दुसरी म्हणजे मला नातवंड येत आहे ती. खूप छान वाटतं आहे." अभिच्या बाबांच्या चेहर्यावर तो आनंद दिसत होता.

सर्वांनी मिळून गोडधोड जेवण बनवले आणि एकत्र जेवण केले. बाबांनी जावयासोबत खूप गप्पा मारल्या. तसेच ते नातीसोबत खेळलेही. खूप दिवसांनी घर भरले होते. घरात जणू गोकुळ नांदत होता. सगळेच खूप खूश होते. मालती प्रियाची खूप काळजी घेत होत्या. तिला काही खावेसे वाटले की लगेच बनवून देत होत्या. प्रिया तर या सगळ्या गोष्टींनी जणू स्वर्गसुखच अनुभवत होती. निशा सुध्दा अधूनमधून घरी येऊन जात होती. नणंद भावजय यांचे नाते मैत्रीचे बनले होते. अगदी दृष्ट लागावी असा संसार खुलत चालला होता. अभि आणि प्रियाचे प्रेमही दिवसेंदिवस वाढत होते.

प्रिया तर मनोमन म्हणतच होती, "दृष्ट लागण्याजोगे सारे...." आणि खरोखरच त्यांच्या या आनंदाला कुणाचीतरी दृष्टच लागली... दोन तीन महिने झाले असतील. एक दिवस अचानक प्रियाच्या पोटात खूप दुखू लागले. कशामुळे आणि का? हे कोणालाच काही समजेना. मालतीने अभिला फोन करून बोलावून घेतले. अभि ताबडतोब प्रियाला घेऊन दवाखान्यात गेला. तिथे डाॅक्टरांनी तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर डाॅक्टरांचा चेहरा गंभीर झाला. ते पाहून अभि आणि प्रिया थोडे घाबरले.

"डाॅक्टर, काय झालंय? प्रियाच्या पोटात का दुखत आहे? काही सिरीयस तर नाही ना.." अभिने डाॅक्टरांना विचारले.

"साॅरी, पण थोडं सिरियस आहे." डाॅक्टर असे म्हणताच अभिला घामच फुटला आणि प्रियाचे डोळे भरून आले.

"काय डाॅक्टर?" अभि थोड्याशा दबक्या आवाजात म्हणाला.

"इतकं घाबरण्याचे काही कारण नाही, पण यांच्या गर्भाशयाला एक लहान गाठ आहे आणि हे मूल जसे वाढत आहे तसेच ती गाठही वाढत आहे." डाॅक्टर.

"अरे बापरे! मग काय करायचं डाॅक्टर?" अभि.

"ऑपरेशन करावं लागणार. कारण गाठ वाढली तर यांच्या जीवाला धोका आहे. पण..." डाॅक्टर इतकेच बोलून शांत झाले.

"पण काय डाॅक्टर?" अभि थोडा काळजीनेच म्हणाला.

"हे बाळ तर वाचणार नाहीच आणि..." डाॅक्टर हे बोलताच प्रियाला रडू कोसळले. ती रडू लागली. ती रडताना अभिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिची समजूत घालू लागला. थोड्या वेळाने प्रिया थोडी शांत झाल्यावर अभि डाॅक्टरांना म्हणाला, "बोला डाॅक्टर, काय म्हणत होता?"

"खरंतर तुम्हाला खचून चालणार नाही. खूप धीटाने घ्यावे लागणार आहे. अशा केसेस खूप कमी प्रमाणात आहेत आणि हे औषधाने कमी होणार नाही. तुम्ही जर धीर धरून राहिलात तर ठिक होईल." डाॅक्टर असे त्यांना समजावून सांगत असतानाच प्रिया मध्येच म्हणाली,

"डाॅक्टर, गर्भाशयाला इजा होणार नाही ना?" प्रिया असे म्हणताच डाॅक्टर शांत झाले. डाॅक्टरांना शांत बघून प्रियाला आणखीनच रडू कोसळले. आता मात्र अभिचे देखील डोळे भरून आले. गर्भाशयाला इजा झाली म्हणजे मूल होणारच नाही.

आयुष्यात मूल नाही तर आयुष्यात अर्थ काय? आयुष्यभर एक वांझोटी म्हणून जगायला लागणार त्यापेक्षा मेलेल बरं. मी या मूलाला जन्म देणारच. कुणीही काहीही म्हणो. हे मूल जन्माला येणारच. या जगात एक मूल न झालेली स्त्री समाजात असूनही नसलेलीच असते. तिला ना कशात मान ना कशात अस्तित्व. उलट जिथे जाईल तिथे तिला अपमानास्पद वागणूकच दिली जाते. वांझोटी या नावाने तिचा अपमानच केला जातो. तिला ओटीभरणी असो की सवाष्ण जेवण कुठेही तिची जागा शून्यच असते. का? तर ती मूल जन्माला घालू शकत नाही. मूल जन्माला घालणे म्हणजेच सर्व काही आले का? कोणी समोर बोलेल तर कोणी पाठीमागे, पण सगळे बोलणारच. मुलाला जन्म दिले तरच बाई परिपूर्ण असते. तशी समाजची आणि निसर्गाचीही रितच आहे. पण दैव योगाने माझ्या नशिबी वांझोटी हे लेबल माथी लागले तर मी ते कदापि सहन करू शकणार नाही. त्यापेक्षा मी मेलेलीच बरी. माझ्या जीवाला काहीही झाले तरी चालेल पण हे मूल जन्माला येणारच. अशाप्रकारे प्रियाच्या मनाची घालमेल सुरु होती. त्यामुळे डाॅक्टरांनी जे काही सांगितले त्याकडे तिचे लक्षच नव्हते.

अभि आणि प्रिया दोघेही घरी आले. घरी आल्यावर त्यांनी आईबाबांना सगळ्या गोष्टी सांगितल्या.
"लग्नाआधी समजले असते तर आम्ही लग्नच केलं नसतं. आमच्या घरण्यात असे कधी झाले नाही हो. एकेक नविनच घडतेय की. आता मूल होणारच नाही म्हटलं तर काय उपयोग?" मालती.

"अगं, तू काय बोलतेस तुझं तुला समजतय का? त्या मुलीला समजूत घालायची की तिलाच बोल लावायचे." अभिचे बाबा

"अच्छा, म्हणजे माझंच तोंड दिसतंय आणि यांनी केलेली फसवणूक दिसत नाही." मालती.

"आई, तू जरा शांत बसतेस का? अगं परिस्थिती काय आहे आणि तू बोलतेस काय? तू अशी नाहीस ग. पण आज काय झालंय तुला." निशा म्हणाली. निशा प्रियाला दवाखान्यात नेल्याची बातमी कळताच लगेच आली होती.

सासूचे बोलणे ऐकून प्रियाला रडू कोसळले. ती तशीच रूममध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ अभिसुध्दा रूममध्ये गेला. अभि प्रियाची समजून घालू लागला. पण प्रिया काही केल्या शांत होत नव्हती.

"अभि, हे बाळ जन्माला येणार म्हणजे येणारच." प्रिया रडतच म्हणाली.

"नाही. अगं तुझ्या जीवाला धोका आहे. हे मूल जन्माला येणार नाही." अभि.

"बिन मुलाची माझा जगून तरी काय उपयोग? त्यापेक्षा मेलेलीच बरी." प्रिया.

"मग माझं काय?" अभि.

"तू दुसर लग्न कर आणि आपल्या बाळाला भरपूर प्रेम दे." प्रिया रडतच म्हणाली.

"मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय ग. मला मुलाची आस कधीच नव्हती आणि नाही. मला फक्त तू हवी आहेस आयुष्यभरासाठी." अभिचे वाक्य ऐकून प्रियाने त्याला मीठी मारली आणि त्याच्या मिठीत शिरून खूप रडली. अभि तिला कुरवाळत राहिला. तिला रडून मन मोकळे होऊ दिले. थोड्या वेळाने ती रडून मोकळी झाल्यावर अभिने तिला व्यवस्थित समजावून सांगितले. बाबा आणि निशा सुध्दा त्यांच्या निर्णयात सहभागी झाले होते. आता फायनली ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला.
क्रमशः 

🎭 Series Post

View all