घरंदाज 6 (मराठी कथा:Marathi story)

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, प्रिया आणि मालती शाॅपिंगसाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी बरीच खरेदी केली. सासू सुना खरेदी करून बील भरल्या आणि बाहेर पडणार इतक्यात समोर एक मुलगी आली. मालती आणि त्या मुलीचक नजरानजर झाली. मालतीचे डोळे भरून आले. पण ती मुलगी कोण? हे प्रियाला समजले नव्हते. आता पुढे.

शाॅपिंग करून आल्यापासून मालती थोडी शांतच होती. प्रियाने काही विचारले तर फक्त मानेनेच उत्तर देत होती. प्रिया पण जाणत होती त्या का अपसेट आहेत? पण तिला विचारायचे धाडसच होईना. शेवटी न राहवून तिने विचारलच, " आई, त्या माॅलमध्ये भेटल्या होत्या त्या कोण? त्या भेटल्यापासून तुम्ही खूप उदास आहात. तुमचं कशातच लक्ष नाही. त्या कोणी नातेवाईक आहेत का? पण तुम्ही त्यांच्याशी बोलला देखील नाही. असे का?"

"कुठे कोण भेटल होतं आपल्याला? कोणीच तर नाही? मी कोणाशी बोलले पण नाही." मालती

"आई, तुम्ही बोलला नाही पण ती व्यक्ती नक्कीच तुमच्या ओळखीची आहे. ते तुमच्या आणि त्या मुलीच्या डोळ्यातून दिसले. पण तुम्ही हे माझ्यापासून लपवत आहात." प्रिया

"काही नाही ग." असे म्हणून मालती तिथून उठून आत गेली.

काहीतरी नक्कीच आहे. नाहीतर आई इतक्या उदास बसल्या नसत्या. पण काय? त्या तर काहीच सांगत नाहीत. मग कुणाला विचारायचे? अभिला विचारू का? त्याला नक्कीच माहीत असेल. हो त्यालाच विचारते. म्हणून प्रिया मनाशी ठरवते. रात्री अभि जेवण करून बसला असता प्रिया त्याच्या जवळ जाऊन बसली.

"अभि, आज मी आणि आई शाॅपिंगला गेलो होतो." प्रिया

"अरे वा! मग काय मज्जा केली असेल ना?" अभि

"हो, खूप सारे शाॅपिंग केले. पण.." प्रिया

"पण काय?" अभि

"अरे, आज आम्हाला माॅलमध्ये एक मुलगी दिसली." प्रिया

"अरे वा! म्हणजे तुम्ही मुलींकडे सुध्दा पाहता. मला वाटलं तुमचा अॅटिट्युड आडवा येतो." असे म्हणून अभि हसू लागला.

"गप्प बस रे. मी काय सांगते ते ऐक?" प्रिया

"बरं सांग." अभि

"तर आज ती मुलगी दिसली आणि आईंना तिच्याकडे पाहून डोळ्यात पाणी आलं रे. कोण असेल ती?" प्रिया

"अगं, आई थोडी हळवी आहे. ती बिचारी गरीब असेल म्हणून आई हळवी झाली असेल आणि तिच्या डोळ्यातून पाणी आले असेल. तू पण ना एवढ्याशा गोष्टीचा विचार करत बसतेस." अभि

"अरे, नाही रे. ती मुलगी गरीब वगैरे नव्हती. तिचा ड्रेस चांगला होता. ती चांगल्या घरातील होती आणि माॅलमध्ये शाॅपिंगला आली होती." प्रिया

"कोण असेल? मला काही लक्षात येत नाही. सोड तो विषय. जास्त विचार करू नकोस." अभि

"बरं. पण ती कोण असेल? हे समजल्याशिवाय मला चैन पडणार नाही." प्रिया

"शोध मग तुझं तू." असे म्हणून अभि तिथून निघून गेला. प्रिया मात्र विचार करत बसली.

काही दिवसांनी प्रिया कपाट आवरत असताना तिला तिथे बरेच अल्बम दिसले. ती तिथेच बसून एक एक करत अल्बम पाहू लागली. त्या अल्बममध्ये अभिचे लहानपणापासूनचे सगळे फोटो होते. ते पाहून प्रिया गालातच हसत होती. अभि लहानपणी किती गोड होता असे ती मनातच म्हणत होती. अल्बम पाहता पाहता तिची नजर एका फोटोवर खिळली आणि ती तिथेच थांबली.

"हा फोटो तर त्या मुलीचा आहे. म्हणजे त्या मुलीचे नक्कीच या घराशी काहीतरी नाते आहे. पण काय? आज अभिला विचारतेस." असे तिने मनोमन ठरवले.

रात्री जेवण झाल्यावर प्रियाने त्या अल्बममधील फोटो अभिला दाखवला.
"ही मुलगी कोण आहे?" प्रिया

"तुला कुठे मिळाला हा अल्बम?" असे म्हणत अभि तिला रूममध्ये घेऊन गेला.

"अरेरे! हळू ना. इतकं काय झालंय? त्या कपाटात मिळाला. सांग आता ही मुलगी कोण?" प्रिया

"ही निशा. माझी बहीण." अभि

"काय? तुझी बहीण. मग ती इथे का नाही. आपल्या लग्नाला पण आली नव्हती. ती कुठे असते? आणि आपल्याशी बोलत का नाही?" प्रिया

"सांगतो. सगळं काही सांगतो. निशा माझी बहिण. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो, एकत्र जेवायचो, आम्हाला एकमेकांची खूप सवय झाली होती. आमच्यात बहिण भाऊचे नाते कमी आणि मित्रत्वाचे जास्त होते. दोघेही मनातलं एकमेकांशी शेअर करायचो. पण तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवली. मला जर सांगितले असते तर..." अभि इतकेच बोलून शांत झाला.

"कोणती गोष्ट? सांग ना मला." प्रिया

"तिचं एका मुलांवर प्रेम होत. मोहन नाव त्याचं. चार वर्ष त्यांचं अफेयर चालू होतं पण ती एकदाही मला बोलली नाही. इतका मी परका झालो होतो का? माझ्यापेक्षा तो मोहन जवळचा वाटला का? तिने असे का करावे?" अभि थोडा नाराज झाला.

"काय केलं तिने?" प्रिया

"तिने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. आम्हाला सांगितले असते तर आम्ही तिचे लग्न त्याच्याशी लावून दिले असते ना. पण नाही. तिचा आमच्यावर विश्वासच नव्हता." अभि

"हो. तू शांत हो. तिचा विश्वास नव्हता असे नाही रे. ती त्यावेळी घाबरली असणार. तुम्ही लग्नाला नकार द्याल असे वाटले असणार. म्हणूनच तिने इतक्या टोकाचा निर्णय घेतला असणार." प्रिया

"अगं, पण मला सांगायचं ना. मी तिचा भाऊ कमी आणि मित्र जास्त होतो ना. माझ्यापुढे मन मोकळं करून तरी बघायचं." अभि

"अरे, तिला त्यावेळी काही सुचलं नसेल. तिची मनःस्थिती तूच समजून घ्यायला हवी ना. चल आता तिला माफ करून घरी आणू. नात्यात जास्त दिवस राग धरू नये." प्रिया

"चूक तिने केली आहे आणि त्याचं तिला प्रायश्चित्त करावे लागणार." अभि थोडा रागातच म्हणाला.

"हे तू बोलतोयस.. प्रेमाच्या मोठमोठ्या बाता मारणारा तू. आता बहिणीची वेळ आली तर प्रायश्चित्ताच्या गोष्टी बोलतोस. तू नेमका कसा आहेस? आधी वेगळा वागायचास म्हणजे माझ्यापुढे आणि आत्ता वेगळा. मला निशा ताई या घरात हव्या आहेत. अरे आईंना किती आठवण येते त्यांची आणि तुलाही येत असेल ना." प्रिया

"पण तिला येते का आमची आठवण? कधी भेटायचा प्रयत्न सुध्दा केला नाही तिने. मग आम्ही का बरं तिची आठवण काढायची?" अभि

"त्यांना तुमची आठवण येत नाही असे वाटते का? तुमचा विचार त्या करत नसतील असे वाटते का? मला तर त्यांच्या डोळ्यात तुमच्याविषयी आईंविषयी प्रेमच दिसले, आपुलकी दिसली. तुम्ही एकदा भेटायचं तरी. त्या तुम्हाला भेटायला कदाचित घाबरत असतील." प्रियाने अभिची समजून काढली आणि निशाला घरी आणण्यासाठी पहिला त्याला तयार केले. आता फक्त बाबांची परवानगी हवी होती. पण त्याआधी प्रिया निशाची सगळी माहिती गोळा करत होती. ती आणि तिचा नवरा कोठे राहतात? काय करतात? कसे आहेत? या सगळ्याची शहानिशा करून मगच ती बाबांशी बोलणार होती.

सगळी चौकशी करून झाली, प्रियाने निशाविषयी सर्व माहिती गोळा केली होती. आता ती बाबांशी बोलायला गेली. पण बाबा काय म्हणतील याची तिला थोडी भीती वाटत होती. पण तरीही या घरच्या मुलीला घरी आणावे की ज्यामुळे आई आणि अभि दोघेही आनंदी होतील असे तिला मनापासून वाटत होते. म्हणूनच किमान प्रयत्न तरी करून बघावा म्हणून ती बाबांशी बोलायला गेली.

"बाबा, आपण निशा ताईंना घरी आणूया." प्रिया हळूच बोलली.

"काय? तिच्याविषयी तुला कोणी सांगितले?" बाबा एकदम ओरडले.

"बाबा, ऐका ना. त्या आत्ता त्यांच्या आयुष्यात सेटल आहेत. त्यांचे मिस्टर एका बँकेत मॅनेजर आहेत. त्यासुध्दा एका कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेत. घरात सुखसोयी आहेत. त्यांच्या आयुष्यात खूप सुखी आहेत पण कोठेतरी आपण चुकलो याची त्यांना खंत जाणवत आहे. सगळी सुखे पायाशी लोळण घेत आहेत पण आईबाबा आणि भावाच्या प्रेमाशिवाय सर्व व्यर्थ वाटत आहे. प्लीज बाबा माझ्यासाठी एकदा त्यांना माफ करून घरी आणूयात." प्रिया बाबांची समजूत घालत होती.

"ते आता शक्य नाही. तिला घरातून जाताना हे समजत नव्हते का? आता पश्चात्ताप करून काय उपयोग? घराची अब्रु तर गेलीच ना." बाबा

"अहो, अब्रू कुठे गेली? उलट तुमची मान ताठ रहावी यासाठी त्या समाजकार्य देखील करत आहेत. बरं त्यांच्यासाठी राहू दे निदान तुमच्या नातीसाठी परीसाठी तरी त्यांना घरात घ्या." प्रिया

"काय??" असे म्हणून बाबांनी तिच्याकडे पाहिले इतक्यात प्रिया अचानक खाली पडली.

काय झाले असेल? प्रिया खाली का पडली? टेन्शन घेतल्यामुळे बीपी लो झाला असेल की दगदग झाली असेल की आणखी काही? हे आपल्याला पुढील भागात नक्की कळेल.
क्रमशः 

🎭 Series Post

View all