Login

घरंदाज 5 (मराठी कथा:Marathi story)

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, अभि त्याच्या आईला तिच्या पसंतीने मुलगी पहायला सांगतो.. मग ते सगळे एका मुलीला पहायला गेले.. तर ती मुलगी प्रिया होती.. अभि आणि प्रिया दोघांनी बोलून त्यांच्यातील गैरसमज दूर केले.. तसेच दोघांनी पसंती दर्शवली म्हणून घरच्यांनी लग्नाची तारिख ठरवली.. आता पुढे..

लग्न अगदी थाटामाटात करायचे ठरले.. अभि हा एकुलता एक मुलगा.. त्यामुळे त्याच्या आईला हे लग्न थाटामाटात करायचे होते.. म्हणून ते सगळे तयारीला लागले.. हाॅल ठरवला, सजावट झाली, देव कार्ये झाली, मेहंदी हळदीचा कार्यक्रमही पार पडला.. आता फक्त अक्षता पडायचे बाकी होते..

अभि खूप आनंदात होता.. फायनली त्याचे ज्या मुलीवर प्रेम होते तिच्याशीच त्याचे लग्न होणार होते.. जी मुलगी त्याची अर्धांगिनी म्हणून त्याच्या आयुष्यात येईल की नाही याची त्याला खात्री नव्हती पण ती खरंच त्याच्या आयुष्यात येत आहे यामुळे तो खूपच खूश होता..

अखेर लग्नाचा दिवस उजाडला.. अभि पिंक कलरची शेरवाणी घालून तयार होऊन हाॅलमध्ये आला होता.. त्याने शेरवाणीला मॅचिंग असा फेटा घातला होता.. हातात घड्याळ आणि गळ्यात एक मोत्याची माळ होतो.. अभिची नजर आता फक्त प्रियाची वाट पाहत होती..

इतक्यात प्रिया हाॅलमध्ये आली.. तिने मस्त लाल रंगाचा शालू नेसला होता.. हातभरून चुडा होता.. गळ्यात राणीहार शोभून दिसत होता.. केसांची हेअरस्टाईल आणि चेहर्यावर हलकासा मेकअप.. नवी नवरी अगदीच सुंदर दिसत होती.. प्रियाला या नवरीच्या रूपात सजलेली बघून अभि आणखीनच तिच्याकडे पाहत बसला..

प्रिया त्याच्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला, "खूप सुंदर दिसत आहेस तू.."

"तू पण छान दिसत आहेस.." प्रिया अभिला म्हणाली

लग्नमंडपात सगळे जमले आणि वधुवरांच्या डोक्यावर शुभाशिर्वादरूपी अक्षता पडल्या. सप्तवचनांनी सप्तपदी पार पडली आणि लग्नाचा विधी संपन्न झाली. सगळे पाहुणे आशिर्वाद देऊन घरी गेले आणि नवीन नवरी गृहप्रवेशासाठी सज्ज झाली.

प्रियाने घराचे माप ओलांडून अभिच्या घरात प्रवेश केला. घरात बरेच नातेवाईक होते. काही नातेवाईक राहण्यासाठी आले होते. प्रिया घरात आली आणि तिच्या सासूबाईंनी म्हणजेच मालतीने तिला देवाचे दर्शन घेण्यास सांगितले. प्रिया देवघरात जाऊन देवाचे दर्शन घेऊ लागली तर लगेच मालतीने तिला खांद्यावर पदर घेऊन देवाला नमस्कार करावा असे सांगितले. प्रियाने लगेच अभिकडे पाहिले पण अभिने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. लग्नाच्या दिवशी छोटासा कार्यक्रम ठेवला. सगळेच दमले होते म्हणून कार्यक्रम संपल्यावर लगेच झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी देवीच्या दर्शनाला जायचे होते. मालतीने परत प्रियाला सांगितले की, खांद्यावर पदर घेऊनच देवीचे दर्शन घे. प्रिया फक्त मानेनेच हो म्हणाली. देवदर्शन, कुलधर्म सगळी धार्मिक कार्ये आटोपली. आता घरातील पाहुणे मंडळी सुध्दा आपापल्या घरी गेली होती. नवीन नवरी हळूहळू घरात रूळत होती. एक दिवस प्रिया आणि मालती बसल्या असतानाच प्रियाने न राहवून मालतीला विचारले.

"आई, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?" प्रिया

"हो, विचार ना." मालती

"तुम्ही कायम खांद्यावर पदर का घेता?" प्रिया

"माझ्या सासूबाईंची शिकवण. सासूबाई म्हणायच्या घरंदाज स्त्रीया कायम खांद्यावर पदर घेतात. त्यांना खूप मर्यादा असतात. स्त्रीयांनी खांद्यावरचा पदर कधी ढळू द्यायचा नाही. म्हणून मी त्यांची ती शिकवण अमलात आणली आहे." मालती

"पण आजकालच्या जमान्यात कोण असे राहतं? आजच्या माॅडर्न युगात कोण काय कपडे घालायचे याचे त्याला स्वातंत्र्य आहे. इतक्या बंधनात कुणीच राहत नाही? आणि का रहावं? प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे मग काय कपडे घालायचे याचेही स्वातंत्र्य असायलाच हवे ना." प्रिया

"अगदी बरोबर आहे तुझं. तसे बघायला गेले तर कपडे मॅटर करत नाहीत, तर विचार करण्याची पध्दत मॅटर करते. आपण कसे कपडे घालतो त्यापेक्षा आपण कसे विचार करतो याला जास्त महत्त्व आहे. तसेही कपडे कसेही घातले तरी बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे." मालती

"हो ना आई, माझे पण तेच म्हणणे आहे. मग तुम्ही देखील आजच्या युगाप्रमाणे रहा ना. हे काकूबाई सारखं न राहता थोडं माॅडर्न रहा ना." प्रिया

"एक सांगू प्रिया, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून ती व्यक्ती कशी आहे हे ठरवू नये? खूप साधे कपडे घालणारी व्यक्ती खूप मोठी असू शकते आणि खूप चांगले ब्रॅण्डेड कपडे घालणारी व्यक्ती कदाचित तितकी मोठी नसते. म्हणून कपड्यांवरून एखाद्याची पारख कधीच करू नये. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे." मालती

"ते बरोबर आहे आई, पण परिस्थितीनुसार प्रत्येक व्यक्तीने बदलायला हवं. त्या व्यक्तीने त्याच्या स्टेटस प्रमाणे रहावं असे मला वाटते." प्रिया

"मला नाही वाटत तसे." मालती

"काय अडाणी आहे ही? किती समजावून सांगितलं तरी आपलंच खरं म्हणते." प्रिया मनातच म्हणाली.

"There is no reason to leave our culture. Many great woman used to wear simple saree like Indira Gandhi , Pratibha tai Patil..." मालती इतके बोलून खांद्यावरचा पदर व्यवस्थित करून निघून गेली आणि प्रिया फक्त त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत बसली..

"या इंग्रजी बोलतात. म्हणजे यांचं शिक्षणही झालेल असणार. मग या अशा का राहतात. मला बघायलाच हव." प्रिया मनातच म्हणाली.

त्याच रात्री तिने अभिला घडलेला प्रसंग सांगितला.
"अभि आईंचं शिक्षण काय झालंय? त्या इतकं फ्युअंट इंग्रजी कसं काय बोलू शकतात?" प्रिया

"माझी आई ग्रॅज्युएट आहे. आजीच्या प्रेरणेने तिनेच तर या व्यवसायाला सुरूवात केली होती. पुढे जाऊन मी जन्मलो आणि ती संसारात रमली. बाबाही तिच्या सोबत होते. बाबांनी सगळा डोलारा सांभाळला आणि इवल्याशा रोपट्याच आज वटवृक्ष बनले आहे. माझी आई मॅनेजमेंट गुरू आहे. सगळी कामं अगदी वेळेच्या वेळी व्यवस्थित करते. कसलीच घाई न करता एखाद्या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडते. खरंच ती खूप ग्रेट आहे." अभि आईच्या कौतुकात रमून गेला.

"पण त्या इतक्या साध्या का राहतात?" प्रिया

"तिला तसेच रहायला आवडते म्हणून." अभि

"बरं." म्हणून दोघेही आपापल्या कामाला लागले.

असेच दिवस जात होते. प्रिया संसारात रमत होती. तिने लग्नाच्या आधी जसा या घराबद्दल विचार केला होता तसे तर काहीच नाही. याचा अर्थ दिसत तसं मुळीच नसतं. प्रिया मनातच विचार करत होती. इतक्यात तिच्या सासूबाई म्हणजेच मालती तिथे आल्या.

"प्रिया, माझ्यासोबत शाॅपिंगला येशील का?" मालती

"हो, आलेच पाच मिनिटात आवरून." असे म्हणून प्रिया आवरायला गेली.

दोघीही सासू-सुन शाॅपिंगसाठी गेल्या. बरीच खरेदी केली. बील देऊन बाहेर पडणार इतक्यात समोर एक मुलगी आली. मालतीने त्या मुलीकडे पाहिले आणि ती मुलगी मालतीकडे पाहू लागली. प्रियाला काहीच कळेना सासूबाई अशा अचानक का थांबल्या? आणि ही कोण आहे? सासूबाईंकडेच पहात आहे. प्रियाने सासूबाईंकडे पाहिले तर त्यांचे डोळे भरले होते.

"आई, काय झालं?" प्रिया असे म्हटल्यावर मालती लगेच बाहेर गेली. प्रिया त्यांच्या पाठोपाठ जाणार इतक्यात ती मुलगी म्हणाली,
"तू अभिची बायको आहेस ना."

"हो." प्रिया

"गोड आहेस ग." ती मुलगी असे म्हटल्यावर प्रिया फक्त गालातच हसली. तुम्ही कोण? असे ती विचारणार इतक्यात ती मुलगी लगेच निघून गेली.

कोण असेल ती मुलगी? त्या घराशी तिचं काही नातं असेल का? आईंच्या डोळ्यात पाणी का आलं? अशा अनेक प्रश्नांनी प्रियाच्या मनात कल्लोळ माजला होता.
क्रमशः

🎭 Series Post

View all