आपण मागील भागात पाहिले की, अभि प्रियाला प्रपोज करतो.. पण प्रिया अभिला त्याच्या आई वडीलांमुळे विचार करून सांगेन म्हणते.. पण यामुळे अभि प्रियावर चिडतो.. आणि मैत्री तोडतो.. प्रिया तिच्या घरी घडलेला प्रसंग सांगते.. घरचे देखील तिलाच समजावतात.. आता पुढे..
"अभि, ए अभि काय करत आहेस?.. दार उघड बघू जरा.." अभीची आई अभिला हाक मारते.. मग अभि एकदम भानावर आला आणि हातातला अल्बम बाजूला ठेवून त्याने दार उघडले..
"काय आई बोल ना?" अभि म्हणाला
"अरे काय, काय म्हणतोस? मी तुला सांगितलेलं काम तू केलस का?" अभिची आई
"हो केलं.." अभि
"ठीक आहे.. मग बाहेर ये जरा तुझ्याकडे काम आहे.." अभिची आई
"बरं, तू पुढे हो.. मी आलो.." असे म्हणून अभि आत जाऊन तो अल्बम कपाटात ठेवून बाहेर आला..
"बोल आई, काय काम आहे?" अभि म्हणाला
"ये इथे बस आणि हे बघ फोटो.. यातली कोणती मुलगी तुला आवडली आहे ते सांग.. गुरुजींना सांगायला हवे.. कुंडली जुळते की नाही बघून मग पुढच्या रितीनुसार बघू.." अभिची आई
"आई, काय ग, तू माझ्या मागे लागली आहेस? मला आत्ताच लग्न करायचे नाही.. मी तुला सांगितले आहे ना.. मग तू का माझ्या मागे लागली आहेस?." अभि
"अरे झाले की आता तिशीला आलास तू.. तू म्हणतोस आत्ताच लग्न करणार नाहीस तर मग कधी करणार? वय झाल्यावर.. हेच वय लग्नाचं असतं.. तुझे बाबा तुझ्यापेक्षा लहान असताना त्यांचे लग्न झाले होते आणि तू आता लग्न नको म्हणत आहेस.. मग काय करणार आहेस? लग्न न करता.. सगळच तर आहे आपल्याकडे.. पैसा आहे, बिजनेस आहे चांगला, आता पुढे तू चालवत आहेस ना.. तुझे शिक्षण झाले आहे मग आणखी काय हवे आहे तुला? की तू कोणी मुलगी बघून ठेवली आहेस.." अभिची आई
"तसे काही नाही.." अभि इतकेच म्हणाला
"मग मुली बघायला काय हरकत आहे? बस बघू.. बघ एखादी मुलगी पसंत पडली तर आपण पुढील बोलणी करू.. फक्त तुला कुठली मुलगी पसंत आहे ते सांग.. बाकी माझं मी बघून घेते.." अभीची आई
अभि थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, "आई तुला कोणती पसंत असेल तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे.. माझी तशी कोणतीच अपेक्षा नाही.. तुझी पसंत तीच माझी पसंत असेल.." असे म्हणत अभि तिथून निघून गेला.. कारण आता त्याच्या पसंत करण्याला काहीच अर्थ नव्हता.. त्याची पसंत होती ती तर तो कधीच सोडून आला होता.. त्यामुळे आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर आईच्या इच्छेप्रमाणे लग्न करावे असे त्याला वाटत होते..
मग अभिच्या आईने अभिसाठी स्थळे बघायला सुरुवात केली.. कारण अभिनेच तर तिच्या पसंतीनेच मुलगी बघायला सांगितले होते.. त्यामुळे प्रत्येक वेळी अभिला बोलावून फोटो दाखवायची तिला गरज नव्हती.. अभिच्या आईला एक मुलगी पसंत पडली आणि तिने अभिच्या वडिलांना त्या मुलीचा फोटो आणि बायोडाटा दिला.. "ही मुलगी आपल्या घराची सून म्हणून कशी वाटते?"
"दिसायला छान आहे.. शिवाय शिक्षणही अभि इतकेच झाले आहे.. बाकी वागायला, बोलायला कशी आहे? आणि संस्कार महत्त्वाचे आहेत.. मुलींचे संस्कार कळायला हवेत.. मग पुढची बोलणी करायला आपण मोकळे.." अभिचे बाबा म्हणाले
"ठीक आहे मग विवाहसंस्थेला सांगून त्या मुलीकडच्यांना बघायला येतो म्हणून निरोप द्या.. आपण तिला बघून येऊ मग पुढचा काय तो निर्णय घेऊ? अभिची पसंती देखील महत्त्वाची आहे.. त्याला मुलगी पसंत पडायला हवी.. तो म्हणाला आहे तुम्ही म्हणाल ते.. पण त्याचं मत देखील महत्त्वाचं आहे.. शेवटी त्या दोघांना संसार करायचा आहे.." अभिची आई
"ते काही का असेना पण मुलगी संस्कारी हवी.. आपल्या घरात खेळीमेळीने राहणारी हवी.." अभिचे बाबा
"हो अगदी खरं आहे जसा मी नेटाने आणि व्यवस्थित सासूबाईंनी सांगितलेल्या आदेशाचे पालन करत संसार केला.. तसा तिनेही संसार करावा इतकीच अपेक्षा.." अभिची आई
मग अभिचे बाबा विवाह संस्थेला फोन करून ही मुलगी आम्हाला पसंत आहे म्हणून तिचा फोटो आणि बायोडाटा पाठवून देतात.. तसेच मुलीकडच्यांना विचारा की, आम्ही कधी बघायला येऊ? असेही सांगितले.. मग विवाह संस्थेतील लोक हे त्या मुलीकडच्यांना विचारून एक तारीख पाठवून दिली. त्या दिवशी अभि, अभिची आई आणि बाबा त्या मुलीला फायनली बघायला गेले..
मुलीला बघायला जात असताना अभिच्या मनाची द्विधा मनःस्थिती होती.. कारण कितीही झाले तरी त्याचे प्रेम प्रियावर होते आणि प्रिया आई विषयी असे बोलताना त्याच्या मनात राग आला.. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याविषयी प्रेम हे होतेच.. त्याचे प्रेम हे मनापासून होते.. उगीच टाईमपास करणारे नव्हते.. ते प्रेम खरे होते.. त्यामुळे आपण लग्न न करण्याचा त्याने निर्णय घेतला होता.. पण आई पुढे त्याचे काही चालले नाही.. त्याच्यासाठी आई वडील हे देखील महत्वाचे होते.. त्यांनी त्याचे खूप चांगल्याप्रकारे पालन पोषण केले होते.. आईचा शब्द हा त्याला पूर्व शब्द होता.. आई म्हणेल ते तो करत होता..
ते तिघेही मुलीच्या घरामध्ये गेले.. तिथे गेल्यावर कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला आणि आता मुलगी समोर येऊन बसली.. पण मुलीने मुलाला आणि मुलाने मुलीला पाहिले नव्हते.. त्यांचे नातेवाईकांनी एकमेकांशी बोलून सगळी चर्चा करून घेतली..
मग अभिची आई अभिला म्हणाली, "अभि, तुला मुलगी पसंत आहे का?"
"आई तुझं तू बघ म्हणालो ना मी.. मग परत मला काय विचारत आहेस तू?" अभि
"अरे पण शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे.. एकदा फक्त मुलीला बघून घे.. बाकी सगळं माझं मी बघते.." अभिची आई
"आई तुझं पण ना.. तुझी पसंत काय वाईट आहे का? त्या मुलीला आणि काय बघायचं आहे.." अभि थोडासा वैतागून म्हणाला
"बघ ना माझ्यासाठी.." अभिची आई
"ठीक आहे.." म्हणून अभि समोर बघतो तर काय? समोर प्रिया बसलेली.. त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला.. "अरे हिला मी कसे काय बघायला आलोय??. हिच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या.. मग तिला माहीत नाही का? माझे स्थळ येणार आहे ते.. विचारायला हवे नाहीतर नंतर अवघड होईल.." अभि मनातच म्हणाला
"आई मला मुलीशी थोडं बोलायचं आहे एकांतात.." अभि
"हो, बोल ना काय बोलायचं आहे ते.. मी सांगते.." असे म्हणून अभिची आई मुलीच्या आई-वडिलांना सांगते की, "आपण या दोघांना एकांतात थोडं बोलायला वेळ देऊया का? म्हणजे त्या दोघांचे एकमेकांशी बोलणं झालं की, मग पसंती नापसंती करता येईल.. शेवटी त्या दोघांना लग्न करायचं आहे.."
मग "ठीक आहे.." म्हणून मुलीची आई म्हणजेच प्रियाची आई प्रियाला घेऊन टेरेसवर गेली आणि तिच्या मागोमाग अभि गेला.. प्रियाची आई त्या दोघांना टेरेसवर सोडून परत आली.. बराच वेळ दोघेही शांत होते. मग अभि म्हणाला, "मी बघायला येणार होतो हे तुला माहित होतं का??"
"हो.." प्रिया
"तुला माझ्या घरची सगळी परिस्थिती माहित असताना तू या लग्नाला कशी काय तयार झालीस??" अभि
"कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे.." प्रिया
"हे आधी माहीत नव्हतं का??" अभि
"होतं.. पण मी काही बोलायच्या आधी तू निघून गेलास.. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.." प्रिया
"माझ्या घरची परिस्थिती तुला चांगलीच माहिती आहे. तरीही तू एकदा विचार करून बघ." अभि
"ती परिस्थिती कदाचित मी बदलेन. म्हणून तर लग्नाला मी तयार आहे." प्रिया
"तू मनापासून तयार आहेस ना.. की कुणी जबरदस्तीने तुला सांगितलंय.." अभि
"नाही.. मी मनापासून तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.." प्रिया
हे ऐकून अभिला खूप आनंद झाला.. नंतर दोघेही खाली जाऊन ही बातमी सगळ्यांना सांगितली.. सगळ्यांनी खूश होऊन लग्नाची तारीख ठरवली..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा