आपण मागील भागात पाहिले की, अभि प्रियाचा प्रोजेक्ट सबमिट करून झालेला आणि अभि प्रियाला बाहेर घेऊन जाणार होता.. कारण तो तिला प्रपोज करणार होता.. पण त्याच्या मनात एक प्रकारची भीती होती की जर प्रिया नाही म्हणाली.. तर कदाचित मैत्री सुद्धा गमावून बसेन.. आता पुढे..
नेहमीप्रमाणे अभि अर्धा तास आधी ठरलेल्या ठिकाणावर पोहोचला आणि प्रियाची वाट पाहू लागला.. अर्धा तास होऊन गेला तरी प्रिया आली नव्हती.. अभिच्या मनाची चलबिचलता चालू होती.. प्रिया येईल की नाही असे त्याला वाटत होते.. इतक्यात प्रिया आली.. प्रियाने स्काय ब्लू कलरचा टाॅप आणि व्हाईट कलरची लेगीन्स घातली होती.. खूप सुंदर दिसत होती.. अभि तर तिच्याकडेच पाहतच बसला.. प्रिया येऊन बसल्यावर दोघेही बराच वेळ दोघेही शांत बसले.. मग प्रियानेच बोलायला सुरुवात केली..
"काय अभि काय म्हणतोस? आज कसं काय बाहेर बोलवलास?" प्रिया
"काही नाही ग.. एक्झाम सुरू होतील आणि मग सुट्टी पडली तर भेटायचं होणार नाही.. शिवाय प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.. त्यामुळे ट्रीट देऊया म्हणालो.. म्हणून तुला बोलवलं.." अभि
"अच्छा ठीक आहे मग.. काहीतरी मागवूया काय खायला?" प्रिया
"हो हो मागव ना.." अभि
"बरं आपण कोल्हापूरी मिसळ खाऊया.. तू एकदा खावून तरी बघ.." प्रिया
"हो चालेल.." अभि
मग त्यांनी खायला काहीतरी मागवलं.. खाऊन वगैरे सगळं झालं आणि थोडा वेळ गप्पा मारल्या.. आता प्रिया जायला निघाली.. प्रिया जात असतानाच अभि "अजून थोडा वेळ थांब ना.." म्हणाला
"उशीर होईल जायला.. खूप वेळ झालाय येऊन.." प्रिया
"फक्त पाच मिनिट गं.. मी जास्त वेळ थांबवणार नाही तुला.." अभि
"बोल काय बोलायचं आहे? मग आज थांबवून घेतलच आहेस मला, तर बोल.." प्रिया
"हे बघ प्रिया, तू वाईट वाटून घेऊ नकोस.. फक्त हो किंवा नाही इतकंच बोल.. पण मी आज तुला माझ्या मनातलं सांगणार आहे.." अभि
"बर बोल.. काय सांगणार आहेस?" प्रिया
"हे बघ, कॉलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासून तू मला खूप आवडतेस.. तेव्हापासून मी तुझ्याकडे बघतोय.. मी तुझ्या प्रेमात पडलोय.. जेव्हा आपल्याला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा आणि त्यानंतर तर मी आणखीनच प्रेमात पडत गेलो.. आता तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही.. तू माझी होशील का? माझ्याशी लग्न करशील का? प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस.. जर तुझा नकार असेल तर तसे सांग.. पण आपली मैत्री तोडू नकोस.." अभि
"माझे ही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे.. तू ही मला खूप आवडतोस.. आपला प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा मी खरी तुझ्या प्रेमात पडले आणि मलाही तुझ्याशी लग्न करायचं आहे.. पण....." प्रिया
"पण काय? बोल ना प्रिया.." अभि
"नको रे.. तुला राग येईल किंवा वाईट वाटेल.." प्रिया
"नाही वाटणार.. तू बोल.." अभि
"हे बघ, तुझं घर हे एक घरंदाज कुटुंब आहे. असे सगळे म्हणतात. तुझ्या आईच्या खांद्यावर पदर कायम असतोच.. ती खूप जुन्या विचारांची आहे..
तुझी आई खूप खानदानी वळणाची आहे.. तुमच्या घरामध्ये पुरुषांचे राज्य स्त्रियांना कोणतीही किंमत नाही असे वाटते. तर अशा घरात मला यायला अजिबात आवडत नाही आणि स्त्रियांना स्वातंत्र्य असावं असं माझं मत आहे.. जर का स्त्रीला स्वातंत्र्य नसेल तर त्या घरात मी पाऊल देखील ठेवणार नाही.. हे माझ्या मनाविरुद्ध आहे.. नोकरी करायची की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.. कदाचित मी लग्नानंतर नोकरी करणारही नाही.. पण बाकी मर्यादा मला आवडत नाहीत.. कपडे असेच घालावे, कायम खांद्यावरच पदर घ्यावा किंवा घराबाहेरच पडू नये अशा अटी मला अजिबात आवडणार नाहीत आणि या सगळ्या तुझ्या घरातल्या पद्धती आहेत.. त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करण्यासाठी थोडा विचार करावा लागेल.." प्रिया
"अगं हो ना.. तुला हवा तितका वेळ घे आणि तू विचार कर.. मला काहीच प्रॉब्लेम नाही.. पण तुला एवढेच सांगायच आहे की माझ्या आई बद्दल वाईट मनात आणू नकोस.. तुला जर काही वाटत असेल, माझं चुकत असेल किंवा मी आवडत नसेन तर नकार दे.. पण माझ्या आईसाठी तू नकार दिलास तर मला आवडणार नाही.." अभि
"तुला कोण नकार देणार? तू दिसायला हॅन्डसम आहेस, निर्व्यसनी आहेस, शिवाय काम करण्याची धमक आहे, हुशार आहेस पण तुला जर नकार मिळाला तर तुझ्या आई आणि तुझ्या फॅमिलीकडे बघूनच मिळणार आहे.. तुझी आई थोडीशी रुढी परंपरा जपणारी आहे.. आणि तुझे कुटुंबही.." प्रिया
"अगं तूच माझ्या आईला समजून घे ना.. ती आहे थोडी रूढी-परंपरा मध्ये गुंतलेली आहे.. पण तिला थोडी समजून घेण्याची गरज आहे गं.. ती थोडी साधी आहे.. तिने माझ्या आजीच्या पावलावर पाऊल टाकलय. तिला या आधुनिक जगाची माहिती नाहीये.. ती घरातून कधी जास्त बाहेर निघालीच नाही.. आजूबाजूच्या फक्त चार स्त्रियांशी तेवढंच बोलते आणि घर हेच तिचे जग.. त्यामुळे तिला कशाची माहिती नाही.. घरामध्ये भरपूर श्रीमंती आहे मान्य आहे.. पण आई ही अशीच आहे.. तिला थोडं समजून घे.. प्लीज.." अभि
"कदाचित समजून घेईनही, पण समोरचा माणूसही तसाच असायला हवा ना.. मी कितीही सांगितलं तरी तुझ्या आईला ते पटलेच नाही.. तर उद्या घरामध्ये वाद वाढतील आणि मला ते अजिबात नको आहे.. तुझी आई थोडी जुन्या विचारांची आहे.. मी थोडं स्पष्ट बोलते पण मला अशा घरात संसार करायला अजिबात आवडणार नाही.." प्रिया
"बस्स झालं.. माझ्या आई आणि कुटुंबाविषयी अजून एक शब्दही काढायचा नाही.. खरंच माझी निवड चुकीची झाली वाटतं.. मला आणि माझ्या कुटुंबाला समजून घेणाऱ्या मुलीशी मला लग्न करायचं होतं.. तू असशील असं मला वाटलं पण माझं दुर्दैव बाकी काय? तू मैत्रीण म्हणून घेण्याच्या देखील लायकीची नाहीस.. यापुढे आपला संबंध संपला.." असे म्हणून रागाने निघून गेला अभि गेल्यावर प्रियाला देखील खुप वाईट वाटले..
"माझं खरंच चुकलं का? आपल्याला आपल्या भवितव्याविषयी, आपल्या भविष्याविषयी निर्णय घेण्याचा काहीच अधिकार नाही का? की समोरचा जे बोलतोय ते आपण होय म्हणून सगळं एक्सेप्ट करायचं.. मलाही भावना आहेत, मलाही मन आहे, माझ्याही इच्छा-आकांक्षा आहेत.. मग त्या सगळ्यांना मारून जगायचं का? स्वतःसाठी जगायचं सोडून द्यायचं का?" प्रिया मनातच बडबडू लागली..
ती तशीच घरी गेली आणि घरी जाऊन घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.. घरचे देखील म्हणाले, की इतका चांगला मुलगा, निर्व्यसनी असूनही त्याला नकार का दिलेस? घरचे थोडे जुन्या विचारांचे आहेत म्हणून.. पण त्याला काय होतं? थोडं अॅडजस्ट करायचं ना.. पुन्हा असा मुलगा मिळणार आहे का? घरचे देखील असे बोलतात हे ऐकून तिला खूप वाईट वाटले.. शेवटी ती तिच्या ग्रुपमधील मैत्रिणीला सांगू लागली.. मैत्रिणी देखील म्हणाल्या, इतका चांगला मुलगा सोडून तू परत काय करणार आहेस? सोडू नको त्याला.. तर तू लग्न त्याच्याशी कर.. सुखात संसार करशील.. आनंदी राहशील..
ऍडजेस्ट करण्यात कसलं आलंय स्वातंत्र्य.. स्वातंत्र्य तर वागण्या-बोलण्यात आयुष्य जगण्यात असलं पाहिजे.. मन मारून जगण्यात कसला आलाय आनंद.. मनासारखा निर्णय घेण्याचा इतकाही अधिकार असून नये का? सगळ्यांना फक्त अभीच वागणं बोलणं दिसतंय.. सगळं चांगलं वाटतंय.. मान्य आहे तो चांगलाच आहे आणि मला सुखातही ठेवेल.. पण लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन जसे असते तसे दोन कुटुंबांचेही एकत्र येणे असतेच ना.. तरचं सुखाचा संसार होईल..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा