Jan 26, 2022
स्पर्धा

घरंदाज 1 (मराठी कथा:Marathi story)

Read Later
घरंदाज 1 (मराठी कथा:Marathi story)

"यू ब्लडी.. जरा बघून चालता येत नाही काय? डोळे फुटले की काय? इतकी जोरात धडक.. यु.." असे म्हणत प्रिया एकदम अंगावर धावून गेल्यासारखी जाते..

"अहो मॅडम, मी नाही तुम्हाला बघून चालता येत नाही काय?" म्हणत अभी सुद्धा एकदम पुढे सरसावला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिले.. पण ही नजर ओळखीची असून अनोळखी बनून ते दोघे "साॅरी...." म्हणून तिथून लगेच निघून गेले...

अभी अगदी तावातावात घरी आला आणि तडक रूमचे दार बंद करून आत बसला.. काही वेळ तसाच निस्तब्ध गेला. मग हळूहळू त्याची नजर रूमभर भिरभिरत फिरू लागली आणि सेल्फवर ठेवलेल्या अल्बमवर ती स्थिरावली.. तो अल्बम सेल्फवरून अलगद काढून घेतला.. काॅलेजचा तो अल्बम पाहताना तो भूतकाळात हरवून गेला..

कॉलेजचा कट्टा... सगळी मित्रमंडळी जमलेली.. त्यामध्ये अभी सुद्धा बसला होता.. सगळे मित्र रोज कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते.. कॉलेज भरायच्या आधी आणि कॉलेज सुटल्यानंतर किमान अर्धा तास तरी सगळे कट्ट्यावर बसलेले असायचे.. त्या दिवशीही सगळेच बसलेले होते..

पण गप्पांमध्ये अभीचे मुळीच लक्ष नव्हते.. तो सारखा गेटकडे नजर लावून बसला होता.. इकडे मित्रांच्या गप्पा सुरूच होत्या.. इतक्यात रोहन अभीकडे बघून म्हणाला, "मी एक चारोळी ऐकवतो.. सगळेजण ऐका बर.." "हो हो.. ऐकव.." सगळे म्हणाले... मग रोहन,
तू अशी समोर येता
मी तुला पाहिलो..
नजरानजर आपली होता
मी तुझाच जाहलो..

"वाह रोहन... काय भारी चारोळी करतोस रे? एकदम झकास.." सगळे म्हणू लागले

"पण मी ज्याच्यासाठी म्हणालो त्याचं लक्ष आहे का? बघा बघा जरा.." रोहन म्हणाला

"अभी मी तुझ्यासाठी चारोळी केली.. तुला आवडली का?" रोहन

"हो.. आवडली तर.. खूप छान होती.." अभी

"बरं.. मी काय म्हणालो ते तरी सांग बघू.." रोहन म्हणाला

पण तिकडे देखील अभीचे लक्ष नव्हते.. मग रोहन त्याच्यापाशी जाऊन बसला.. "किती दिवस असा तू तिला बघतच बसणार आहेस? निदान बोल तरी, मैत्री तरी कर, नाहीतर डायरेक्ट जाऊन प्रपोज तरी कर.. काहीतरी कर ना.." रोहन म्हणाला

"अरे पण ती नाही म्हणाली तर.." अभी

"तुला कुणाची नाही म्हणायची हिंमत होणार आहे.. तू इतका देखणा, रुबाबदार, श्रीमंत आई-वडिलांचा एकुलता एक आणि घरंदाज मुलगा.. तुझ्यामागे बघ मुलींच्या रांगा लागल्या आहेत आणि तू मात्र त्यांना सोडून हिच्या मागे लागला आहेस.. नाही तर नाही एकदा बोलून तरी बघावं रे.." रोहन

"बरं, बघू.. पण आता नको.." अभी

इतक्यात प्रियाची एन्ट्री झाली आणि अभी तिच्याकडे पाहत राहिला.. ती अगदी गेटमधून आत येऊन वर्गात जाईपर्यंत त्याची नजर फक्त तिच्याकडेच होती.. त्याला आजूबाजूच्या कुठल्या गोष्टीचे भान नव्हते.. ती वर्गात गेल्यानंतर घंटा वाजली म्हणून सगळेजण जाऊन वर्गात बसले..

पहिले दोन लेक्चर होतात आणि तिसरा लेक्चर चालू होतो.. तिसऱ्या लेक्चरला वर्गात सर आले आणि त्यांनी प्रोजेक्टविषयी सगळ्यांना माहिती समजावून सांगितली.. या वर्षी त्या सगळ्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता.. अभी आणि प्रिया हे दोघे एकाच वर्गात होते आणि ते इंजिनिअरिंगला होते.. यावर्षी त्यांना प्रोजेक्ट करायचा होता.. सरांनी प्रोजेक्ट विषयी सगळी माहिती समजावून सांगितली आणि आता ते प्रोजेक्टसाठी ग्रुप बनवू लागले.. सरांनी सगळे ग्रुप बनवलेले होते आणि आता फक्त ते कोणा कोणाचा ग्रुप आहे ते सांगणार होते..

सरांनी दोन दोन जणांचे ग्रुप बनवले होते.. आता सर प्रत्येकाला उभा करून हा तुमचा ग्रुप असे सांगत होते आणि सोबत विषयही देत होते.. ते सांगता सांगता त्यांनी अभी आणि प्रियाचे नाव घेतले.. तसे ते दोघे उभे राहिले.. सरांनी सांगितलं तुमच्या दोघांचा ग्रुप आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून प्रोजेक्ट करायचा आहे.. प्रियाने अभीकडे पाहिले आणि तिने एक छोटीशी स्माईल दिली.. झालं...... आता अभी आभाळातच गेला.. आमच्या दोघांचा प्रोजेक्ट ग्रुप त्याला विश्वासच बसत नव्हता..

"काय यार? लॉटरी लागली की तुला प्रोजेक्टमध्ये.. आता काय? प्रोजेक्टच्या दरम्यान भेटणं होईल, बोलणं होईल.. मस्त प्रपोज मारून टाक आता.." रोहन म्हणाला

अभी फक्त त्याच्याकडे बघून हसला.. त्याला काय बोलावे आणि काय नको हेच कळेना.. कॉलेज सुटले आणि सगळे घरी निघून गेले.. अभी आणि त्याचे मित्र आज नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसले नव्हते.. म्हणजे कुणीच बसले नव्हते.. कारण अभीने आज मित्रांना मस्तपैकी पार्टी दिली.. सगळे जाम खुश झाले.. सगळे दंगामस्ती करत बोलत होते.. पण अभीचे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.. तो त्याच्या विचारतच होता आणि तो खूप खूश होता..

प्रोजेक्ट ज्या दिवशी सांगितला त्या दिवसानंतर दोन दिवस अभी कॉलेजला गेला नाही.. कारण त्याची तब्येत बिघडली होती.. इकडे प्रियाला प्रोजेक्टची काळजी वाटू लागली.. "हा काही सिरीयसली प्रोजेक्ट करेल असे वाटत नाही.. मग मी एकटीनेच का करू? त्याने थोडीतरी मदत करायला हवी.." असे तिच्या मनात विचार येऊ लागले.. "आता काय करावे? हा तर दोन दिवस झाले कॉलेजला आला नाही.. असे सुरूवातीलाच जर टाईमपास केला.. तर नंतर खूप गडबड होईल.. प्रोजेक्ट सुरुवातीपासूनच करायला हवा.." असेही तिच्या मनात विचार येऊ लागले.. आता काय करावे? असा विचार करत असताना तिला समोर रोहन दिसला..

प्रिया रोहनकडे गेली आणि "अरे रोहन, अभी का आला नाही आज?" म्हणून विचारले

"त्याची तब्येत बरी नाही.." रोहन म्हणाला

"अच्छा ठीक आहे.." म्हणून प्रिया निघून गेली..

"आता तब्बेतच बरी नाही तर काय बोलणार?" प्रिया मनातच म्हणाली..

तिसऱ्या दिवशी अभी कॉलेजला आल्यावर प्रियाने त्याला विचारले, "तब्येत कशी आहे?"

"हो, आता बरा आहे मी.." अभी

"बरं, मग प्रोजेक्टचे काही बघूया का?" प्रिया

"हो, मलाही प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं.." अभी

"बरं, मग मी सांगते.. आपण दोघेही काही पाॅईंट काढून ठेवूया.. मग दोघांच्या पैकी कुठले बेस्ट पॉईंट आहेत ते आपण घेऊया आणि त्यानुसार प्रोजेक्ट करूया.. चालेल का?" प्रिया

"हो, चालेल.. तू म्हणशील तसं.." अभी

निदान दोघांच्या बोलण्याला सुरुवात तरी झाली.. फक्त अभी तिच्याकडे बघत होता.. पण आता प्रियादेखील त्याच्याकडे बघू लागली होती.. अभी होताच तसा.. कोणालाही आपलंसं करून घेणारा.. सर्वांचा लाडका..

आठ दिवस प्रिया फक्त प्रोजेक्ट बद्दल विचारायची आणि निघून जायची.. इतकच बोलणं होई.. नंतर हाय-हॅलो करून ती त्याच्याशी बोलू लागली..

आज दोघेही एकमेकांचे पॉईंट्स दाखवणार होते आणि त्यातून कोणाचे चांगले हे सिलेक्ट करणार होते.. पण प्रिया आज कॉलेजला आलीच नाही.. आता काय करावे? हा प्रश्न अभीला पडला होता.. त्याने रोहनला विचारले, "अरे रोहन, ही प्रिया का आली नाही आज?" अभी

"मला कसे माहीत असणार? ती का आली नाही ते.. ते तर तुला माहीत असायला हवे.. तुम्ही तर एकमेकांशी बोलत असता.. प्रोजेक्टही सोबत करता.." रोहन

"अरे कुठलं काय? अजून पर्यंत फक्त प्रोजेक्टच बोलत होतो.. त्याच्यापुढे गाडी गेलीच नाही.." अभी

"अरे, काय सांगतोस काय? असले कसले रे तुम्ही.. इतकी छान संधी मिळाली आहे तर छान बोलायचे, गप्पा मारायचे.. तिचा नंबर तर घेतलास की नाही.." रोहन

"कुठलं काय रे? घ्यायचं म्हणतोय पण ती काहीतरी म्हणेल म्हणून सोडून दिलं.." अभी

"अवघड आहे तुझं.. कसा काय प्रपोज करणार काय माहित?" रोहन

"हो.. पण आता करायचं काय? तूच सांग ना.." अभी

"बरं.. तिच्या मैत्रिणी कडून तिचा नंबर घे.. आणि तिला फोन कर.. म्हणजे तुला नंबरही मिळेल आणि बोलणही होईल.." रोहन

"पण ती नंबर देईल का??" अभी

"का नाही देणार? प्रोजेक्टसाठी हवं आहे म्हणून सांग.. लगेच देईल.." रोहन

"बरं.." म्हणून अभी प्रियाच्या मैत्रिणीकडे प्रियाचा नंबर मागण्यासाठी गेला.. त्याने प्रोजेक्टसाठी नंबर हवा आहे, असे म्हटल्यावर प्रियाच्या मैत्रिणीने त्याला लगेच नंबर दिला.. नंबर मिळाल्यावर अभी खूप खूश झाला.. आता तिच्याशी कधीही, कुठेही, कसेही बोलता येईल आणि आमच्या प्रेमाची लहरे आणखी फुलतील असे त्याला वाटू लागले.. तो नंबर मिळाल्याच्या आनंदात काही क्षण तसाच उभा राहिला..

थोड्यावेळाने त्याने प्रियाला फोन केला.. पण प्रिया काही त्याचा फोन उचलली नाही.. आणखी एकदा केला, तरीही तिने फोन उचलला नाही.. थोड्यावेळाने करू म्हणून तो तसाच शांत राहिला.. "माझा फोन का उचलत नसेल?" कदाचित अननोन नंबर आहे, म्हणून उचलत तर नसेल का?" असा तो मनात विचार करू लागला. आणखी अर्धा तास गेल्यावर त्याने परत फोन केला.. तरीदेखील प्रियाने फोन उचलला नाही.. त्याला आता खूप वाईट वाटले.. "उद्या तिला विचारतोच.. माझा फोन उचलत नाही काय?" तो मनात म्हणाला

प्रिया फोन उचलत नसल्याने अभी थोडा नाराज होता. तो तसाच शांत बसून होता.. "ही फोन का उचलत नसेल? काही कामात असेल का? की तब्येत बरी नसेल? काही अडचण तर नसेल ना हिला.." असा उगाच मनाची समजूत घालत अभी बसला होता.. "तिला जर उचलायचं नसेल तर मी का इतक मनाला लावून घेत आहे.. अननोन नंबर असेल म्हणून कदाचित उचलली नसेल.. जाऊ दे.. नंतर बघून केला तर केला नाही तर उद्या बघू.." परत अभी स्वतःची समजूत काढत बसला..

तरीही त्याने परत तीन चार वेळा तिला फोन केला.. पण तिने फोन उचललाच नाही.. अभीला उगीच काळजी वाटू लागली.. आणि तो नाईलाजाने वर्गात जाऊन बसला..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..