Jan 23, 2022
वैचारिक

घराला घरपण देणारा पुरुष

Read Later
घराला घरपण देणारा पुरुष

घराला घरपण देणारा पुरुष.....

 

@ आर्या पाटील

******************************************

(सदर कथा काल्पनिक आहे)

 

सकाळचा नाश्ता पाणी आवरून १० च्या सुमारास निशी ऑफिससाठी बाहेर पडली..

पंचायत समितीच्या ऑफिसात ती छोटेखानी कारकून होती.. ऑफिस टाइम लेट असल्याने ती तिच्या वेळात निवांत आवरून बाहेर पडायची..

 

 

 

ती जाऊन पंधरा मिनिटे झाली असतील तोच तो आला.. दिपेश तिचा नवरा.. विटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळसा निर्यातीचा त्याचा छोटेखानी व्यवसाय होता.. जेव्हा गाडी कोळसा भरायला येईल तेव्हाच त्याला जावे लागे.. परिणामी बराचसा वेळ घरातच जात असे..

 

 

 

तरुणपणी काही काम मिळेल या हेतूने बोईसर सारख्या छोटेखानी शहरात तो आला होता. शिक्षण कमी होते पण मिळेल ते काम करण्याची तयारी होती.. आईवडिल लहानपणीच वारल्याने तसा आधार कोणाचाच नव्हता.. गावाकडे असलेल्या भावाने संपत्तीमधून त्याला केव्हाच बेदखल केले होते.. आता आधार होता तो स्वकष्टाचा आणि हिंमतीचा. त्याच्याच जोरावर एका छोट्याश्या कंपनीत तो कामाला लागला..भाड्याची खोली घेऊन राहणारा तोच त्या घराचा कर्ता पुरुष आणि बाई होता.. जेवढ्या कष्टाने तो बाहेरचं काम करायचा तेवढ्याच कष्टाने त्याने त्याचे छोटेसे घरकुल सजवले.. घर छोटं होतं पण त्याच मन मात्र मोठं.. त्या छोटेखानी घराचं वैशिष्टय होते ' स्वच्छता'.. एखाद्या बाईलाही लाजवेल एवढ्या सुंदरतेने त्याने घर सजवले....

 

 

कष्टाच्या आणि काटकसरीच्या जोरावर त्या छोट्याश्या खोलीतून त्याने फ्लॅटकडे कूच केली.. ते तर त्याचं हक्काच घर मग त्या घराचे लाड काय विचाराल... कितीही दमून आलेली व्यक्ती त्याच्या घरी निवांत व्हायची....

 

 

दरम्यान त्याची कंपनीतील नोकरी गेली.. पण तो शांत बसणाऱ्यातला नव्हता..त्याने आता मोर्चा वळवला छोटेखानी व्यवसायाकडे.. कोळशाची निर्यात करण्याचा व्यवसाय त्याची चांगलीच भरभराट करून गेला..

उत्कर्षाच्या शिखरावर असतांनाच त्याचे निशिता बरोबर लग्न झाले.. आणि सुरु झाला राजाराणीचा सुखाचा संसार..

 

 

 

आजही सोसायटीतल्या बागेतली जास्वंदाची फुले खुडत त्याने गुलाबावर प्रेमाने हात फिरवला.. एका हातात जास्वंदांची फुले सावरत नेहमीप्रमाणे बाजूला पडलेला वाहत्या पाण्याचा पाइप पकडत साऱ्या फुलझाडांना पाणी घातले..

तोच सोसायटीचा रखवालदार धावत आला आणि म्हणाला,

" साहब रहने दो मैं करता हूँ!"

 

 

" रहने दो बहादूर... अच्छा लगता है ऐसे पौधों को न्हहलाना!" फुलझाडांना न्हाहाळत तो म्हणाला..

 

 

"ठिक है साहब... आप थोडे ही सुनने वाले हो?" असे म्हणत तो आला त्या पावली निघून गेला..

 

 

फुलांकडून सळसळता उत्साह घेवून तो घराकडे निघाला.. बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावर राहत असलेल्या देशमुख काकुंना आठवणीत जास्वंदीची फुले दिली.. फुले घेत काकू म्हणाल्या,

" बेटा, तु दिलेल्या फुलांशिवाय देवपूजाच होत नाही रे.. पोरांनी टाकून दिलेल्या आम्हां म्हाताऱ्यांना तुझ्याच रुपात मुलगा मिळाला आहे."

 

 

" त्याच मुलाच्या हक्काने काही हवं नको ते सांगा काकू.. स्वत: ला एकटे समजू नका..." असे म्हणत त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि वर आपल्या घराकडे निघाला..

 

 

घरात प्रवेश करताच नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त पडलेल्या सामानांनी त्याचे स्वागत केले..

हातातली फुले डायनिंग टेबलवर ठेवत तो स्वत:शीच म्हणाला,

" ही निशी पण ना... नुसता पसारा असतो.. किती वेळा सांगितलं..सकाळची तयारी रात्रीच करून ठेव पण नाही मॅडमना मोबाईल पासून वेळ मिळेल तर ना.. असो, सवय नाही ना आमच्या राणीसाहेबांना.. सुधारेल हळूहळू."

 

 

बेडवर तिच्या कपड्यांचा पडलेला सडा त्याने आवरला.. ओला टॉवेल बाल्कनीत नेऊन वाळत घातला.. तोच नजर बाल्कनीतील परसबागेत गेली.. किती प्रेमाने जपली होती त्याने परसबाग... कोणती फुले नव्हती म्हणून विचारा... पिवळा, गडद लाल गुलाब, टपोर्‍या पांढऱ्या फुलांचा मोगरा, नेहमीच फुललेली सदाफुली, वेगवेगळ्या रंगांची शेवंती, मध्यभागी सजलेलं छोटेखानी तुलसी वृंदावन, त्याच्याभोवती आयताकृती कुड्यांमध्ये सजलेली ऑफिस टाइमची रोपटी, जोडीला गवतीचहा, कोरफड ही लावले होते.. घरातली त्याची आवडीची जागा.. त्याने बाथरूममधून पाण्याने भरलेली बादली आणली.. आणि आपल्या मानस लेकरांना यथैच्छ न्हाऊ घातले.. तुलसीवर नजर जाताच त्याला देवपूजेची आठवण झाली.. नजर देव्हार्‍यावर जाताच त्याचं मन हिरमुसलं.. दहा वाजून गेले होते पण बाप्पा अजून अंधारतच होते.. तो तडक बाथरूममध्ये गेला. हातपाय स्वच्छ धुतले.. देव्हार्‍यातली कालची कोमेजलेली फुले वेचत त्याने निर्माल्य रोजच्या पिशवीत भरले..केसरी वस्त्राने देव्हारा साफ केला.. काचेच्या टुमदार घरात राहणाऱ्या दिव्याला बाहेर काढत त्याची वात वळली.. तेल टाकत दिवा प्रज्वलित केला.. दिव्याचा प्रकाश बाप्पाच्या मुखकमलावर पडताच ते तेजाने ओसंडून व्हाऊ लागले.. त्या तेजाकडून त्याने परत एकदा घेतला सळसळता उत्साह.. बागेतून आणलेली जास्वंदीची फुले बाप्पाला अर्पित मनोभावे देवपूजा केली.. केरसुणी घेत पूर्ण घर स्वच्छ केले.. घरात तिच्या गळक्या केसांचा गालिचा अंथरला होता..

" काय ही निशी..? हिला कितीवेळा सांगितले.. केस विंचरल्यावर फरशी साफ करत जा.. पण." स्वत:शीच बोलत त्याने ती केसं उचलली.. त्याचा गुंडाळा करत कचरापेटीत टाकून दिला.. फरशी पुसण्यासाठी राखून ठेवलेला कपडा पाण्याने भिजवत त्याने संबंध घरातील फरशी पुसून काढली.. पॅसेजमध्येही झाडू मारून पुसून घेतले.. गणपती बाप्पा, लक्ष्मी मातेच्या साच्याने त्याने दारापुढे रांगोळीही काढली..

 

 

" सुरेख झालीये हो रांगोळी.. दादा." बाजूच्या राधाताई म्हणाल्या.

 

 

" नाही हो फार खास.. दर्शनी भाग बोलका दिसावा त्यासाठी आपला पुरुषी प्रयत्न." असे म्हणत तो घरात आला..

 

 

तोवर किचनमधली भांडी आशेने त्याला साद घालू लागली.. निशी चपात्या, भाजी करून गेली होती.. त्याची भांडी बेसिनमध्ये तशीच धिंगाणा घालत पडली होती.. लाटण्यासाठी घेतलेलं गव्हाचं पीठ रांगोळीसारखं किचनच्या कडप्यावर सांडल होतं..

 

 

त्याला काही हे नविन नव्हतं.. त्याने कपडा घेत सारं पीठ पुसून काढलं.. गॅस स्वच्छ केला.. बेसिनमध्ये ठेवलेली भांडी घासत स्वच्छ लखलखीत केली. मघापासून रुसलेलं किचन आनंदाने हसायला लागलं.. परसबागेतील गवती चहा खुडत त्याने गॅसवर चहा चढवला.. सुस्कारा टाकत सोफ्यावर बसत त्याने निवांतपणे चहाचा आस्वाद घेतला..

 

 

तोच शेजारच्या राणे काकूंनी दारावरची बेल वाजवली..

 

" बेटा दिपेश, थोडी फुलं हवी होती शेवंतीची." म्हणत सरळ बाल्कनीत शिरल्या..

 

ओंजळीत मावतील तेवढी फुले रुक्षपणे तोडत म्हणाल्या,

" छान जपलीस हो बाग दिपेश.. निशी खूप नशिबवान आहे तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे तिला.. बाई सारखी सगळी कामं करतोस.. किती हातभार लावतोस नाही तिला!.."

 

बोलता बोलता त्यांनी सोफ्याचा आधार घेतला..

" पण.. बाईची कामे बाईलाच करू द्यावी.. पुरुषाने आपलं काम सांभाळाव.. घरकाम करण्यासाठी थोडाच झालाय पुरुषाचा जन्म.. घर सांभाळाव ते बाईनं.. घरातली कामे तुच केलीस तर घरगडी बनशील.. वेळीच शहाणा हो.." खोचकपणे त्या म्हणाल्या.

 

" पण काकू, कुठे लिहिलय हो घरकामे ही फक्त बायकांची जबाबदारी.. हा बाईमुळे घराला घरपण येते.. तिच्या येण्याने घराचे नंदनवन होते.. पण घरकाम फक्त बाईनेच करावे हा कुठला दृष्टिकोन?.. आम्हां पुरुषांनाही या जबाबदारीची जाणिव हवी.. निशी माझ्यासारखीच बाहेर काम करते.. आर्थिकदृष्ट्या घराला बरोबरीने हातभार लावते मग घरकामात तिला बरोबरीने मदत केली तर कुठे चुकले?.. आणि बरं का काकू घराला घरपण देणार पुरुष ही असावा ना.. ती मक्तेदारी फक्त तुम्हां स्त्रियांचीच का?" तो हसत हसत म्हणाला..

 

" काय बाई तुम्हीं आजकालची मुलं कितीही शिकवलं तरी स्वत: च्या मनाचचं करणार.. चार गोष्टी शहाणपणाच्या सांगायला गेलो की आम्हांलाच शिकवणार.. आमच्या वेळेस नव्हतं बाई अस्स.." म्हणत राणे काकू उठल्या आणि घरचा रस्ता धरला..

 

घराला घरपण देणाऱ्या पुरुषाचं उत्तर त्यांच्या चांगलच जिव्हारी लागलं होतं.. 

 

@ आर्या पाटील

 

 

******************************************

कथा आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा

    

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्यला लेखणीत उतरवायला आवडतं