घर तुझं माझं.. (मराठी कथा : marathi story )

Story of a old aged couple

"सविता अगं.. सविता.. चहा झाला कि नाही? यांना गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला.." उषाताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या.

"आई अहो चहा पावडर संपली आहे. थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. " सविताने उत्तर दिले.

"अगं.. संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं? जा आता पटकन घेऊन ये.." उषाताई म्हणाल्या.

" आई.. अहो माझ्याकडे पैसे नाहीये.. तुम्हाला तर माहितीये ना बिजनेसमध्ये लॉस झाला आहे.. कर्जाचे हफ्ते थकले आहेत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही.. जे आहे त्याच्यातचं भगवावं लागणारे.. "सविताने सांगितलं.

"अगं, घरात आजारी माणूस आहे.. यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला?? आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का? लॉस राजवीरच्या अति हव्यासामुळे झाला आहे. या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का? आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे वीस - तीस रुपये देखील नाहीत?" उषाताई आता चिडल्या होत्या.

" आई आता अडचणीच्या वेळी थोडं ऍडजस्ट करायला शिका.. एक दिवस चहा नाही प्यायला तर काही अडत नाही.. " असं म्हणत सविता रागाने तिच्या खोलीत निघून गेली.

उषाताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आवाक होऊन बघत बसल्या. " या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्यांचे मोल कधी जाणणार ही मुलं? " असं स्वगत म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून एक बटवा काढला. त्यात ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी शामरावांसाठी चहा केला, नाश्ता बनवला आणि त्या चहा, पोहे घेऊन खोलीत गेल्या.
शामरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचित पडून होते. परिस्थितीपुढे हतबल झाले होते. त्यांनी उषाताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली.
"हे घ्या.. खाऊन घ्या चला.. गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलाच्या आणि सूनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला." उषाताई चिडून बोलल्या.

" माफ कर मला.. मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं.. " शामराव म्हणाले.

"तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना.. भोगा आता.. काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा..." उषाताई चिडून मंदिरात निघून गेल्या.

शामराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले.. आणि भूतकाळातील घटनाचा चित्रपट त्यांच्यामनात सुरु झाला. साधारण चाळीस वर्षांपूर्वी शामराव जोशी खिशात अवघे दहा रुपये घेऊन साताऱ्याला आले होते.काय करायचं? कुठे जायचं? काही माहित नव्हते पण स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून, वेळी उपाशी झोपून थोडे फार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जोशी साडी सेंटर साताऱ्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले.नंतर त्यांचे लग्न झाले.. शामरावांच्या हट्टापायी ताईंच्या पोटात दोन मुली  मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजेच राजवीर झाला. सगळं कसं चांगलं सुरु होतं. राजवीर शामरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे शामरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. राजवीरला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती मुळी. उषाताईंनी शामरावांना खूप समजावले कि पोराला कष्ट करू दया, स्वतःच्या पायावर उभे राहू दया पण शामराव काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची विचारसरणी होती. राजवीरला नको त्या गोष्टींचे नाद लागले, जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी, दुकान सगळे गहाण ठेवले, कर्जाचा डोंगरच रचला. शामराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हफ्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले, ते अंथरुणाला खिळले आणि मग राजवीरवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त शामरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर... बास. भूतकाळातील गोष्टींमुळे शामरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी उषाताईचं ऐकून राजवीरवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं.
दाराच्या आवाजाने शामराव भानावर आले. बघतात तर राजवीर त्यांच्या खोलीत आला होता. शामरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, " बाबा, काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला? म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे.. "
शामरावांनी आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"हे बघा बाबा.. तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे." राजवीर बोलला.
राजवीरचे बोलणे ऐकून शामरावांना बरं वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खूण करून ती कागदपत्रे राजवीरकडून मागून घेतली.
पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही. त्यांनी थरथरता हात मायेने राजवीरच्या गालावरून मायेने फिरवला. राजवीरने त्यांच्या हातात पेन दिले. तितक्यात उषाताई मंदिरात जाऊन आल्या. त्या खोलीत आल्या आणि राजवीरला शामरावांच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता.
" राजवीर.. तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? " उषाताईंनी विचारले.
"अगं.. आई काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलो होतो.. असू दे नंतर येतो.." असं म्हणत राजवीर कावराबावरा होऊन तिथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला.
" काय काम होतं? आणि तुझ्या हातात काय आहे? " ताईंनी विचारले.
"अगं.. बघ माझा मुलगा, किती काळजी त्याला आपली.. त्याने विमा काढलाय आपला.."शामराव थरथरत्या आवाजात म्हणाले.
"होय.. बरं, बघू बरं.. मग असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद.." ताई राजवीरला बोलल्या
"अगं असू दे आई.. मी उद्या वगैरे घेईन सही.. बाबांना आराम करू दे.." अस बोलत राजवीर तिथून निघू लागला तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या.
"अगं आई.. अगं दे तो कागद.." राजवीर बोलला पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या.
वाचून झाल्यावर ताईंनी एक कटाक्ष राजवीरकडे टाकला आणि जाऊन त्याच्या श्रीमुखात लगावली.
"लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस? बापाचं मृत्युपत्र तयार करून आणलंस?? अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तर बरं झालं असतं.अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला? अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना?" उषाताई आता चांगल्याच चिडल्या होत्या.

" आई.. अगं मी इतका अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे.. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? " राजवीर आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून सविता त्याची बायको सुद्धा तिथे आली.

"तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोयस? आणि तुझं म्हाताऱ्या आई वडिलांप्रति काही कर्तव्य नाही का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय. एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय करणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना.." उषाताईंचा पारा चढला होता.

" आई अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल. आत्ता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी. यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. " उषाताईंची सून बोलली.

" आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. " ताई बोलल्या.

" मग आम्ही वेगळं राहतो.. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघे काहीही करून खाऊ. " सविता म्हणाली.

" खुशाल वेगळं रहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना... बास आता पुरे झालं.. जा इथून.. यांना आराम करू दे.. " उषाताई म्हणाल्या.
राजवीर आणि सविता पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. शामराव हतबल होऊन अंथरुणावर निपचित पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्याला तडा गेला होता शामराव तर प्रचंड धक्क्यात होते.

असेच काही दिवस गेले.राजवीर आणि सविताने ताई आणि शामरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहित होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.एका संध्याकाळी उषाताईंनी राजवीर आणि सविताला बोलवून घेतले.
"आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे. तो तुम्हाला सांगायचा आहे.." ताई बोलल्या.
राजवीर आणि सविताला वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले.
" आम्ही आमच्या पश्चात हे घर एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत. तुला आमच्या प्रॉपर्टी मधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना एक आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत.. " ताई शांतपणे बोलत होत्या.

" काय?? असं कसं तुम्ही वागू शकता?? मला रस्त्यावर काढलं तुम्ही?? मी कोर्टाची पायरी चढणार आता... बास.. मला माझा हक्क मिळाला पाहिजे.. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही.. " राजवीर संतापून म्हणाला.

"हो.. खुशाल कोर्टाची पायरी चढ.." शामराव सगळं बळ एकवटून बोलले.

" बाबा.. काय बोलत आहात तुम्ही?? माझ्या सोबत असं वागणार तुम्ही?? तुमच्या लाडक्या राजवीर सोबत?" राजवीर शामरावांना बोलला.

" हो... खूप लाडका माझा राजवीर.. तुला माहितीये तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भालिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पडायला लावले होते मी.. आणि एकदा नाही, चांगलं दोनदा.. त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे समजताच किती आनंदी झालो मी.. कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. म्हणून खूप लाड केले तुझे, सगळं कमवलं तुझ्यासाठी.. ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेस तू, पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे पण आज चार चौघात माझं नाक कापलं तू... माझी कष्टाची कमाई गमवालीस.. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास.. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास.. अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पणती बरी. पुरे झालं आता.. हे घर सोडून जा.. आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला." असं म्हणून शामराव आणि उषाताई खोलीत निघून गेले.

राजवीरला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. आठवडाभराने त्याला आणि सविताला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर उषाताई आणि शामरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्याच्यासाठी उघडले नाही.
आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं.

वाचकहो वरील कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आईवडिलांनी मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवणे कितपत योग्य आहे याबद्दल तुमचं मत मला नक्की सांगा. कथा आवडली तर like, कंमेंट नक्की करा.

धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®