घर हे फक्त आईचंच आहे का?

Feelings of every mother

घर हे फक्त आईचंच आहे का?

"अरे आई बाबा आज अचानक न कळवता कसे काय आलात? श्वेतानेही मला तुम्ही येणार असल्याचे काहीच सांगितले नाही." दारात उभ्या असलेल्या आपल्या सासू सासऱ्यांना सागरने विचारले.

तोच किचनमध्ये असलेल्या आईने आवाज दिला,

"आता त्यांना दारातूनचं परत पाठवणार आहेस की, घरात पण घेशील." 

"आई मी त्यांना घरात घेणारच आहे. अचानक आलेलं बघून मला आश्चर्य वाटलं. बाकी काही नाही." सागरने सासू सासऱ्यांना आत येण्यास सांगितले.

"सुधाकरराव, शालिनीताई आज अचानक आलात. सगळं काही ठीक आहे ना?" मोहन म्हणजेच सागरचे बाबा यांनी आश्चर्याने विचारले.

सुधाकर व शालिनी सोफ्यावर बसले. मालतीच्या सांगण्यावरुन शांताबाईने त्यांना पाणी आणून दिले.

"आम्ही दोघे येणार असल्याचे मालती ताईंनी तुम्हाला सांगितले नाही का? काल त्यांनीच आम्हाला फोन करुन बोलावून घेतले. तुम्हाला कोणाला काहीच माहिती नाहीये का?" सुधाकरने विचारले.

मोहन व सागरने एकमेकांकडे बघून मान हलवून नकार दिला. तोच मालती हॉलमध्ये येऊन म्हणाली,

"मला ह्या दोघांसोबत थोडं बोलायचं होतं, म्हणून मीच ह्यांना बोलावून घेतलं."

सागर आईजवळ येऊन कानात पुटपुटला,

"अग आई आज माझी फुटबॉलची मॅच आहे, तुला माहीत होतं ना, तरीही तू आज ह्यांना का बोलावलं?"

मालतीने सागरकडे रागाने बघितले. 

"श्वेता कुठे दिसत नाहीये, तिचं काही चुकलंय का?" शालिनीने विचारले.

"श्वेता अंघोळ करत आहे. मी तिचं आवरलं की नाही ते बघून येतो." सागर बोलून रुममध्ये गेला.

शांताबाई पोहे घेऊन आली. 

"शालिनीताई नाश्ता करुन घ्या. मग आपण निवांत बोलूयात." मालतीने सांगितले.

सागरने श्वेताला आई बाबा आल्याचा निरोप देताचं ती पटकन बाहेर आली. आई बाबा असे अचानक का आले? तसेच मालतीने त्यांना एवढ्या तातडीने का बोलावून घेतले? हा प्रश्न सर्वांच्याच डोक्यात होता. शांताबाई आपलं काम आटोपून निघून गेली. सगळ्यांचा चहा नाश्ता करुन झाल्यावर मालतीने घरातील सर्वांना हॉलमध्ये येऊन बसण्यास सांगितले.

"मालती तू सुधाकरराव व शालिनी ताईंना एवढ्या तातडीने का बोलावून घेतले? जास्त न ताणता पटकन सांगशील का?" मोहनने विचारले.

मालती म्हणाली,

"हो तेच तर सांगण्यासाठी मी सर्वांना इथे बसायला सांगितलं. बघायला गेलं तर हा प्रश्न आपल्या कुटुंबाचा आहे, पण श्वेताचे आईवडील ह्या नात्याने त्यांना ह्या सर्वाची कल्पना देणे मला आवश्यक वाटले. इथून पुढे आपण सगळे वेगळे राहूयात. एका घरात राहणे मला जमणार नाही. सागर श्वेता तुम्ही एखादं भाड्याचे घर शोधायला सुरुवात करा. दीप्ती तू होस्टेल शोध किंवा पेईंग गेस्ट म्हणून रहा किंवा सागर आणि श्वेताला काही अडचण नसेल तर त्यांच्यासोबत राहिलीस तरी चालेल."

सगळे मालतीकडे आश्चर्याने बघत होते. मालतीने सर्व काही अगदी सहजरीत्या सांगितले. 

"माफ करा मालतीताई पण लग्नाच्या वेळी तुम्ही मला सांगितले होते की, आम्ही सून नाहीतर मुलगी घेऊन जात आहोत. मग कोणी आपल्या मुलीला असं घराबाहेर जायला सांगतात का?" शालिनीने विचारले.

"अहो ताई मी माझ्या मुलीला दीप्तीला पण तेच सांगितलंय. मी श्वेता व दीप्तीमध्ये काहीच भेदभाव करत नाहीये." मालतीने स्पष्टीकरण दिले.

मोहन चिडून म्हणाला,

"मालती व्याह्यांसमोर असं कसं तू बोलू शकतेस. नेमकं तुला झालं तरी काय. आपल्याच मुलांना आपल्या घरातून असं कोणी जायला सांगतात का?"

मालती मिश्किल हसून म्हणाली,

"आपलं घर! ही मुले ह्या घराला आपलं मानतचं नाहीत. मी बोलले की सगळेजण म्हणतात की, आई सतत कटकट करत असते, ती शांतपणे घरात बसू सुद्धा देत नाही. 

दीप्ती तर कितीवेळा बोललीय की,"आई मला आता तुझी कटकट असह्य होत आहे. मी एक दिवस हे घर सोडून जाईल."

ही घर सोडून जाण्याआधी मीच हिला घरातून जायला सांगते ना.

मी का बोलते, हे कोणी समजून घेतलंय का? माझं बोलणं आता सगळ्यांना कटकट वाटायला लागली आहे. आई घरात असते, म्हणून घरातील सगळी काम आईनेचं करायला हवी का? काही बोलायला गेलं तर आई तुला काम तरी काय असतं? तू दिवसभर घरात तर असते. ही वाक्य ऐकायला लागतात. 

गेली अनेक वर्षे हीच वाक्ये मी ऐकत आली आहे. शांताबाई पोळ्या करते, भांडे घासते, फरशी पुसते, भाज्या निवडते. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. मग आईला काय काम असतं? हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो.

अरे पण पोळ्या करण्यासाठी जे गहू लागतात ते कोण आणतं? गहू निवडावे लागतात, ते कोण करतं? गिरणीतून गहू दळून आणावे लागतात, ते कोण आणतं? 

भाज्या बाई निवडते, पण त्या बाजारातून कोण आणतं? आपल्याकडे कोणी पाहुणे आल्यावर घरात काही कमी नको पडायला, याची काळजी कोण घेतं? 

भांडे बाई घासते, पण भांड्यातील खरकटे काढून तिला कोण देतं?

कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात, पण ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये कोण टाकतं? आई माझे कपडे का धुतले नाही? हा प्रश्न विचारला जातो, पण आपण आपले कपडे निदान वॉशिंग मशीनला लावू पण शकत नाही का? शर्ट पॅन्ट धुवायला असल्यावर त्यांचे खिसे तपासायचे काम पण मीच करायचे.

लाईटबिल भरण्याची सुद्धा कोणाला माहिती नाहीये. चहा प्यायल्यावर कप बेसिन जवळ नेऊन त्यात पाणी घालून ठेवावे, ही सवय सुद्धा कोणाला नाहीये. एखाद्या दिवशी घरी येताना भाजी घेऊन या, सांगितलं की, सर्वांचे तोंडं वाकडे होतात. 

आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, तर मग जरा घरातील पसारा आवरायला मदत करावी असं कुणालाही वाटत नाही. सागरचं प्लॅनिंग काय तर, फुटबॉल मॅच. दीप्तीचं काय तर मैत्रिणींसोबत मुव्ही बघायला जायचं. श्वेताचं काय तर पार्लरला जायचं. 

अरे घरात जळमटे होतात, ते किती दिवस मी काढायचे. फॅनवर धूळ बसली की ती मीच साफ करायची का? घर हे फक्त दिवाळीला नाहीतर वरेचवर स्वच्छ करायचे असते, मगच त्या घरात फ्रेश वातावरण राहते.

तुम्ही सगळे जेव्हा बाहेर पडाल, म्हणजे तुम्हाला घरात कोणती कामे करावी लागतात? ते कळेल. अचानक बाई कामाला आली नाहीतर किती दमछाक होते, हे कळेल. बेसिन लिक झाल्यावर घरात पाणी पाणी झाल्यावर प्लंबर येत नसेल तर किती चिडचिड होते, ते कळेल. आपण एका घरात राहत असताना आपल्या ह्या घराप्रति काही जबाबदाऱ्या असतात, त्याची जाणीव तुम्हाला होईल. आई काय घरीच असते, मग तिने ही काम केलीच पाहिजे हा अट्टाहास तुमचा राहणार नाही.

मी इतकी वर्षे केलं, पण यापुढे मला जमणार नाही."

मालतीचे बोलणे सर्वजण मन लावून ऐकत होते. 

"अतिशय योग्य निर्णय घेतलात मालतीताई. आपण किती वर्षे हे सगळं करायचं. घराच्या पेपर्सवर नाव असणार एकतर नवऱ्याचं किंवा मुलाचं, पण या घराची स्वच्छता ठेवायची आपण. तुमची कल्पना मला आवडली. मलाही घरी जाऊन ह्याची अंमलबजावणी करावी लागेल." शालिनी सुधाकर कडे बघून बोलली.

त्या दिवसापासून सागर, श्वेता, दीप्ती या तिघांनी घरातील कामे वाटून घेतली. सुट्टीच्या दिवशी सागर, श्वेता व दीप्ती तिघे मिळून घराची साफसफाई करायचे. तिघांकडे बघून मालती गालातल्या गालात हसायची. 

समाप्त….

©®Dr Supriya Dighe