घन आज बरसे अनावर हो

It's A Strory Of Rainy Memories


घन आज बरसे अनावर हो ..!!

नीता : काय मग मंगेशराव निघाला की नाही तुम्ही ? आम्ही वाट पाहतोय तुमची
मंगेश : आम्ही म्हणजे ? अजून कोण वाट पाहतय माझी ?
नीता : आहे की तो किंवा ती माझ्यासोबतच ,लवकरच बाबा, पप्पा किंवा डायरेक्ट डॅड करत तुझ्या मागे मागे हुंदडणार..
मंगेश : अच्छा तो पाहुणा व्हय ? त्याला सांगून ठेव आईचं सर्वात आधी प्रेम हे त्याच्या बाबांवर होतं आणि कायम राहील.
नीता : हो मग ते तर नक्की राहणार ..आ ,आई गं..
मंगेश : काय गं काय झालं ?
नीता : बहुतेक आजच तो दिवस आहे ,पर्वा डेट निघून गेली ना ..
मंगेश : अरे वा , आई आहे ना तिथे ,आई आणि रमेश सोबत जा लगेच हॉस्पिटल ला ,मीही निघतोय ..संपली माझी मिटिंग, 4 तासांनी पोहचेल मी ..काळजी घे

इकडे नीताच्या पोटात कळा सुरू झालेल्या त्यामुळे सासू आणि दिराने लगेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

मंगेश : ड्रायव्हर चलो जलदी ,आज मेहमान आने वाला है हमारा
ड्रायव्हर : वाह सर बढिया , मुझे तो पार्टी चाहीये
मंगेश : हा जरूर ,तुम जल्दी गाडी भगावो तुम्हे मनचाहे ब्रँड वाली व्हिस्की पिलावूगा.

मंगेश ने रमेशला फोन लावला

मंगेश : हा.. हॅलो रमेश, नीता कशी आहे ..तुम्ही पोहचला का हॉस्पिटलमध्ये ?

रमेश : हो दादा ,आत्ताच वहिनीला आत नेलंय ..पुढच्या काही मिनिटांत आपल्या दोघांचेही प्रमोशन होणार..चला आता तरी मी घरात लहान नाही राहणार

मंगेश : होका ..अरे इकडे खूप पाऊस सुरू आहे सकाळपासून ..तिकडे रे ?

रमेश : इकडे कालरात्री पासून खूप पाऊस येतोय ,बहुतेक आज सावित्रीला पूर येईल...

मंगेश : क्या हुआ ड्रायव्हर ? गाडी क्यू रुकाई ?

ड्रायव्हर : सहाब जी गाडी रुकाई नही बंद पड गयी है ,शायद मेकॅनिकल को बुलाना पडेगा

रमेश : ओह शट यार दादा ,गाडीला पण याचवेळी बंद होयचं होतं ?..म्हणजे तू इथे पोहचायला अजून वेळ लागणार..

मंगेश : होना यार ..एकमिनीट एकमिनीट ..कोणाचा आवाज आहे ?..कोण रडतय ?,आपला पाहुणा रडतोय की काय

रमेश : काय ? थांब बघतो ..आई शपथ दादा ,इतक्या लांबून तुझ्या पिल्लूचा आवाज ओळ्खलास तू ..

मंगेश : काय.. काय संगतोयस तू ? मी बाप झालो..मी आत्ता लगेच मिळेल एस टी पकडतो आणि महाड ला येतोय ,गाडी राहू दे इथेच..

रमेश : बरं ये पटकन

मंगेश : वहिनीला सांग व्हिडीओ कॉल करायला नंतर ,मला पहायचंय माझ्या बछड्याला

रमेश : हो नक्की ,आधी मी पाहून घेतो.. चल बाय

कसं असेल माझं बाळ ,नक्की कोणावर गेलं असेल ? .. मंगेशराव त्याला पहायचं असेल लवकर बस पकडावी लागेल .." थँक गॉड मागून येणारी एस टी महाडकडे जातेय" .. मी लगेच बस ला हात दाखवला .. खूप पाऊस चालू होता त्यामुळे जरी हा बस स्टॉप नसला तरीही एस टी वाल्याने माझ्यासाठी बस थांबवली होती म्हणजे नशीब जोरात आहे माझं ,माझ्या लाडक्याचा पायगुण म्हणायचा ..


मी बस मध्ये बसलो खरा पण माझं मन तर केव्हाच महाड मध्ये पोहचलं होतं, सतत मोबाईल कडे लक्ष देत होतो ..कधी एकदा नीता चा कॉल येतोय आणि मी बाळाला बघतोय असं झालेलं मला .. तेवढ्यात नीता चा कॉल आला .. मी माझ्याजवळ असलेलं मोबाईल स्टॅण्ड पुढील सीटच्या मागे लावून मोबाईल त्यावर चिकटवला म्हणजे मला बाळाला निवांत पाहता येईल ..

मी व्हीडिओ कॉल रिसिव्ह केला आणि पाहतो तर काय नीता ने त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा धरला होता त्यामुळे लगेच त्याला पाहता आलं ..

माझं बाळ.. माझ्या आणि नीताच्या हाडामासा चा गोळा.. आमच्या प्रेमाचं पहिलं प्रतीक.. खूप आनंद झालेला मला ,त्याला पाहताना आपसूकच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले..

नीता : अरे ये वेड्या रडतोयस काय ? बघ हा कसा निवांत झोपलाय आणि तू बाळाचा बाबा खुशाल रडतोय

मंगेश : अगं वेडाबाई मी रडत नाहीये, हे तर आनंदाच्या ओघात आपोआप आलेले अश्रू आहेत .. अगं ये हा माझ्यावर गेलाय ना ..

नीता : नाही नाही माझ्यावर गेलाय ..फक्त नाक तुझ्यावर गेलंय ..बघ कसं लाल लाल दिसतंय ,सतत नाकावर राग असणार म्हणजे ..

मंगेश : मी आणि रागीट ,व्हय गं .. सांगू का याला तुझ्या रागाचे किस्से ? सांगू आपली पहिली भेट

नीता : ओय बाहेर पाऊस येत आहे ना ? बघ पुन्हा पाऊस ..आपल्या सर्व आनंदाच्या क्षणी हा पाऊस नेहमी सोबत असतोच ना .. आपली पहिली भेट देखील पावसातच झालेली ..

मंगेश : मी कसकाय विसरेल ती भेट ? अजूनही गाल दुखत असतो माझा ..

कॉलेजचा पहिला दिवस होता,आम्ही सगळे मित्र सोबत जात होतो ..कधी शाळेमध्ये मला कोणत्याही मुलीमध्ये फारसा रस नव्हता त्यामुळे पहिलं प्रेम वैगरे काही झालं नव्हतं.. पण तोच तो दिवस होता जेव्हा मला माझं पहिलं वाहिलं प्रेम होणार होतं .. मी मित्रांसोबत मस्त छत्री घेऊन चालत होतो ...आमच्या पुढे दोन मैत्रिणी एका छत्रीखाली चालत होत्या.. सुंदर पांढऱ्या रंगाचा अनारकली त्यावर पूर्ण हातच्या तळव्यां पर्यत जाणाऱ्या बाह्या .. केसं मोकळे सोडलेले. पायात छुम छुम वाजणारं पैंजण.. ती जेव्हा तिच्या शेजारी चालत असलेल्या मैत्रिणीशी बोलायची तेव्हा मला तिचा अर्धा चेहरा दिसला.. मला आवडलेली, मला भावलेली पहिली वाहिली मुलगी .. मी तिला पाहतच पुढे पुढे मित्रासोबत चालत होतो .. पावसाची रिपरिप चालू होतीच .. रस्त्यामध्ये खड्डे पडलेले त्यामुळे पावसाचे पाणी सर्वत्र साचलेले होते.. मी पाहिलं मागून एक कार जात होती आणि पुढील खड्ड्यातून ती कार जर गेली तर ही सुंदर तरुणी तिच्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसवर चिखलाचे डाग पाडून घेईल ..त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता
.पटकन पुढे जाऊन तिला बाजूला केलं आणि स्वतः पाठमोरा झालो, त्या कार मुळे चिखल माझ्या पाठीवर उडाला ...पण हिला वाटलं मी कोणी टपोरी आहे त्यामुळे तिनेही क्षणाचा विलंब न करता सन्ननन् कानाखाली मारली आणि बावळट बोलून नाक मुरडत पुढे निघून गेली .. माझे सर्व मित्र माझ्यावर हसत होते ..हिरो बनण्याच्या नादात माझा पोपट झाला होता

वाटलं इथुनपुढे कधी कोणत्या मुलीची मदत करायची नाही ,कोणी रस्त्यावर पडत जरी असली तरी तशीच पडून देईल पण पोरींना हात लावणार नाही .. इतका कसला भाव खातात देवच जाणे.. पण झालं सगळं उलटंच दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच परिस्थिती होती .. मी आणि माझे मित्र पुढे आणि ती व तिच्या मैत्रिणी आमच्या पुढे... आज मस्त आकाशी रंगाचा कुडता घातला होता बईसाहेबांनी.. तिची मैत्रीण मागे वळून माझ्याकडे बघून हसली आणि तिच्या कानात काहीतरी पुटपुटली.. ही लगेच मागे वळली..
अहो एकवेळी दुष्मन परवडतील पण मित्र नको .. ती मागे फिरली हे पाहून माझे मित्र लगेच आजूबाजूच्या दिशेने चालू लागले .. आणि ही महामाया माझ्याकडे येत होती.. वाटलं एक गाल लाल करून पोट नाही भरलं वाटतं हीचं, आज दुसरा गाल लाल करेल बहुतेक... ती माझ्या समोर आली आणि मी मात्र डोळे मिटून घेतले आणि एक गाल पुढं केला ..त्यावर ती खळखळून हसली.. मी डोळे उघडे करून बघतो तर काय.. आहा हा.. काय सुंदर ती हसत होती कपाळावर एक हात ठेवून , जणू तिला तिची चूक कळली असावी...

ती : अहो काल खरंच चुकलं माझं.. मी ते रागात तुम्हाला कानाखाली मारायला नव्हतं पाहिजे.. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की, माझ्यावर चिखल न उडावा म्हणून तुम्ही मला बाजूला केलेलं.

मी : अच्छा इट्स ओके

ती : तुम्हाला राग नाही आला माझा ?

मी : आलेला, खूप आलेला पण तुम्ही सॉरी बोललात तर मग काही हरकत नाही इट्स ओके

ती : नाही नाही असं कसं .. माझी आई म्हणते चूक झाली तर शिक्षा झालीच पाहिजे..

तिने लगेच तिचा गाल पुढे केला

मी : अहो हे काय ?

ती : आता तुमची बारी, मला मारा कानाखाली...

मी काय बोलू तेच कळत नव्हतं, हिचे गाल बघून कानाखाली कोण मारेल हिला ,एक सहज ग
गालगुच्चा घेईल कोणीही... पण हिला मारलं तर बाकीचे पोरं मला तुडवतील

ती : अहो कसला विचार करताय.. मारा की

मी : अहो हे मला जमणार नाही, माझी आई म्हणते स्त्री वर हात उचलने म्हणजे आपल्या संस्कारांवर बोट दाखवणे होईल.. ते मला कधीही जमणार नाही.. तुम्हाला शिक्षा करवून घेयची असेलच तर मग .. कॉफी ??


नीता : अहो ओ बाळाचे बाबा कुठं हरवलात ? गेलात वाटतं कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये

मंगेश : अगं हो गं, पाऊस आला की सगळ्या आठवणी जाग्या होतात ..

नीता : माझंही तेच होतं.. तुझ्या माझ्या घरी जेव्हा आपण पहिल्यांदा सांगितलं तेव्हा माझ्या बाबांनी तुला भर पावसात आमच्या घराबाहेर काढलं होतं.. तुही तितकाच हट्टी.. पूर्ण दिवस तसाच घरासमोर मुसळधार पावसात, खिडकीत असलेल्या मला पाहत उभा राहिलेला..
म्हणून तर बाबांना खात्री झाली की,हा पोरगा हिला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो आणि तिची काळजी सुद्धा घेऊ शकतो..

मंगेश : किती गोड कटू आठवणी आहेत ना आपल्या या पावसाशी...पाऊस हा असाच असतो कोणाला बेभान होऊन प्रेमाने भिजवतो तर कोणाचे घायाळ होऊन भर पावसात रडणारे अश्रू लपवतो

नीता : ए ते आपलं फेवरेट गाणं म्हण ना ..

मंगेश : अच्छा ते होय

"सुख पावसापरी यावे, आयुष्य अन्‌ हे भिजावे
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो..
घन आज बरसे मनावर हो…
घन आज बरसे अनावर हो…
चाहूल कुणाची त्यावर हो…
घन आज बरसे अनावर हो…
घेऊन गिरकी पानांवरती थेंब उतरले
वार्‍याच्याही पायी वाजती पैंजण ओले
ही भूल सावळी पडे झिरपले धुके हिरव्या रानावर हो…
अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी
थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी
तो गंध भारतो पुन्हा मनास वेड्या शिडकावा पानावर हो…
मिटले आता मधले अंतर, पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल नाजुक ओले काही, मन होईल हळवे कातर
पाऊस येईल पुन्हा नीज मोडाया, मग येऊ भानावर हो…
घन आज बरसे मनावर हो…
घन आज बरसे अनावर हो…
चाहूल सुखाची त्यावर हो…
घन आज बरसे अनावर हो…"


मी आणि नीता एकमेकांना पाहत होतो व्हीडिओ कॉल वर ,बस बाहेर आजूबाजूला चिक्कार पाऊस सुरू होता ,संध्याकाळचे सहा वाजले असावे .. मी आता फक्त 15 किलोमीटर दूर होतो घरापासून.. सावित्रीला खूप पूर आलेला हे कळलं होतं.. पण त्या पुरात पुढे असलेला पूल वाहून गेला होता हे कोणाला ठाऊकच नव्हतं..

मी गाणं गात होतो आणि नीता माझ्याकडे बघत होती बाळाला घेऊन , तितक्यात माझं डोकं समोरच्या सीटवर आदळलं.. फोन तसाच अजूनही सीटच्या मागच्या साईडने चिटकून होता त्यामुळे जे काही घडलं ते निताला स्पष्ट दिसलं आणि नेटवर्क गेलं ..

"मंगेश...मंगेश ... अहो काय झालं हे अचानक ...
आई ,भाऊजी लवकर या इकडं "

भाऊजी : काय ओ वहिनी काय झालं अचानक ?

मी : ते ..ते बुडाले..

आई : म्हणजे गं

मी : अहो आता कसं सांगू .. मी आता व्हीडिओ कॉलवर बोलत होते तर बसचा अपघात झाला बहुतेक.. भाऊजी तुम्ही प्लिज चौकशी करा..

आई : अगं बाई , असं कसं झालं गं ?.. तू नको रडूस ..शांत हो ..आण बघू पिल्लूला इकडं.. शांत हो जरा ..


ती रात्र मला झोपच लागली नाही ,खूप प्रयत्न केला यांना फोन करण्याचा पण नाही लागला फोन... भाऊजी बोलले की दोन बस वाहून गेलेल्या... मला नक्की काय होतंय ते शब्दात व्यक्त करणे शक्यच नव्हतं.. मी फक्त रडत होते.. मला तर बाळाला पाजवू सुद्धा वाटत नव्हतं, पण आईनी मला बळजबरीने सांगितलं तेव्हा त्याला पाजलं..

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघत होते तर पुन्हा पाऊस सुरू झालेला ..आता मात्र मला खूप राग आलेला या पावसाचा, मी लगेच जोऱ्यात खिडकी बंद केली


"अगं हळू हळू इतका राग बरा नाही.."

मी मागे वळून बघितलं तर ..

मी : मंगेश तू ...

क्षणाचाही विलंब न करता मी त्याच्या घट्ट मिठीत बावरून गेले .

मी : किती घाबरवून टाकलं होतंस तू मला .. रात्रभर झोप नाही लागली मला

मंगेश : का घाबरायचं ? बस वाहून गेली म्हणून काय झालं ..तूला माहीत आहे ना तूझा नवरा नॅशनल स्वीमर आहे ते ... उगाच घाबरलीस

मी : अरे हो रे, हे लक्षातच नाही आलं माझ्या . म्हणजे तू इतक्या मुसळधार पावसात त्या पुरामध्ये पोहून स्वतःला वाचवलं

भाऊजी: दादाने फक्त स्वतःलाच नाही तर सोबत पाच लोकांना पण वाचवलं .. शासनाने पुरस्कार जाहीर केलाय ..

मी : अरे वाह ..भारीच की ..

आई : बरं आता या पोराकडे बघणार आहे की नाही त्याचे आई बाबा ..

मंगेश : अरे हो कुठंय माझं बछडं बघू बरं त्याला इकडं..

मी : खूप घाबरवलं होतस तू मला ,नाही नाही ते विचार आलेले मनात ..

मंगेश : नको जास्त विचार करुस आता .. पाऊस असाच आहे खूप वेगवेगळ्या आठवणी देऊन जातो ..आता ही आठवण सुद्धा नेहमीच लक्षात राहील ..


समाप्त..