सनईचा मंजुळ नाद, फुलांचा घमघमाट, रेशमी वस्त्रांची सळसळ, पोरांची धावपळ, देशी विदेशी सुगंधांची अंगावर फवारणी करून लगबगीने इकडेतिकडे वावरणारे पाहुणे, अचाऱ्यांच्या स्वयंपाक करणाऱ्या शस्त्रांच्या आवाजा बरोबर तिथून वाऱ्या संगे तरंगत येणाऱ्या अनेक खाद्य पदार्थांचा खमंग वास हे सगळं माझ्या आसपास घडत होतं.
आज सुरुचीचं लग्न आहे त्यासाठी ही सगळी सजावट, तयारी चालू होती. लग्नाचा मांडव रंगबिरंगी फुलांनी, सुंदर लाईट्सनी कलात्मक रीत्या सजला होता. सुरुचीचं लग्न म्हटलं की हे सगळं असायलाच हवं.
नावाप्रमाणेच सुरुची प्रत्येक गोष्टीत खूप चोखंदळ होती. तिचे कपडे, वेगवेगळ्या चप्पल, सेंडिल, अनेक प्रकारचे गाॅगल्स, हाताची घड्याळं, तिचे नानाविध अलंकार, तिच्या पर्सेस् . एकूण एक गोष्टीत तिची अभिजात्य अभिरुची झळकत असायची. तिचं वागणं, मंद आवाजात, मंजुळ स्वरात बोलणं, हलकेच गालात हसणं सगळं भुरळ पाडणारं. काही ही साधारण प्रकार तिला चालत नसे.
माझ्या मनात किती ही तिच्याविषयी प्रेम भावना असल्या तरी त्या एकतर्फी होत्या हे मला माहित होतं. मी तरी काय करणार? माझं राहणं, माझं वागणं सगळंच अघळपघळ. तिला ते मुळीच आवडत नसे. त्यावरून ती सारखा माझा राग राग करायची. मला ही स्वतः ला बदलणं शक्य नव्हतं. कितीही प्रयत्न केला तरी.
मी ह्या शहरात आपल्या आई बरोबर चार वर्षा पूर्वी रहायला आलो. एका नामांकित कंपनीत मला चांगली नोकरी मिळाली होती. आई आणि मी. असे आम्ही दोघंच. त्यामुळे दोघं इथे आलो. सुरुचीच्या घरा जवळ घर मिळाले होते. काही दिवसातच तिच्या आणि आमच्या कुटुंबात खूप जवळीक निर्माण झाली होती. सुरुची माझ्याकडून हक्काने कधी ही कामं करवून घ्यायची. मला ही ते आवडायचं. मी तिच्यात गुंतत चाललो आहे हे मात्र तिला कळायचं नाही.
आता सुरुचीला तिच्या आवडीचा, तिला साजेसा जोडीदार मिळाला होता आणि आज ती त्याच्या सोबत सप्तपदी चालून नेहमीसाठी त्याची होणार होती. मला ती हक्काने काहीबाही निर्देश देत होती आणि मी ही ते आज्ञाधारकपणे मानत होतो. माझं मन तिला कधीच कळलं नव्हतं आणि आता तर ते कधीच कळणं शक्य नव्हतं, हे मात्र माझ्या मनाला त्रास देत होतं पण तसं चेहऱ्यावर ते दिसू नये ह्याची खबरदारी मी घेत होतो.
आजच सकाळी वरात आली होती. नवरदेवाला काही महत्त्वाचं काम होतं म्हणून तो नंतर येणार असं कळलं. सर्वत्र एकच चर्चा.
"लग्ना शिवाय कोणतं महत्त्वाचं काम आहे आज? मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी."
मी सुरुची कडे बघितलं. तिचा चेहरा कोमेजलेला वाटला. बहुतेक तिनं दीपकला, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला, फोन केला असावा, कारण क्षण भराला कां होईना तिचा चेहरा चकाकला होता. काही वेळ फोन वाजत असावा पण त्याने उचलला नसावा कारण सुरुचीने थोड्या रागातच तो बंद केला. मी एक कोपऱ्यातून हे बघत होतो आणि तितक्याच सुरुचीने मला बघितलं आणि ती 'बघ ना रे! काय हे' असं मान वेळावून डोळ्याने बोलली. मी ही हाताने शांत रहा अशी खूण केली.
लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी दीपकचा पत्ता नव्हता. सगळेच बैचेन होते. सुरुचीचे आई बाबा इतर नातेवाईक काहीबाही कयास लावत होते. दीपकचे वडील ही परत परत फोन करत होते पण काहीच कळत नव्हतं.
अचानक दीपकच्या वडिलांना एक फोन आला आणि ते बोलता बोलता आपल्या बायकोला काहीतरी खूण करत लग्न मांडवातून बाहेर पडले. पाठोपाठ बायको आणि इतर काही नातेवाईकही गडबडीत बाहेर पडले. आम्हांला कोणालाच काही कळत नव्हतं चाललंय तरी काय? सगळे हतबुद्ध झाले होते. सगळीकडे एक विचित्र शांतता व्यापली होती. काही वेळ असाच निघून गेला. सुरुचीतर फारच विचित्र अवस्थेत होती. ती धावत माझ्याकडे आली. मला मिठी मारत म्हणाली,
"काही तरी कर ना रे. नेहमी तूच मला कठिण प्रसंगी मदत करतो ना? ह्या जगात तुझ्या पेक्षा जास्त मला कोणीच ओळखत नाही. आता तू सांग मी काय करू?"
मी हळूच तिला बाजूला करत धीर दिला तितक्यात दिलीपचे बाबा आले. त्यांच्या मागे दिलीप होता आणि त्यामागे पोलीस.
सगळे एकदमच दचकले हा काय प्रकार आहे? कोणाला काहीच कळत नव्हतं. एक पोलिस अधिकारी पुढे येत म्हणाला,
"हे साहेब एका हॉटेलात, नको त्या अवस्थेत काही मुलीं बरोबर सापडले आहेत. काल रात्री ह्यांना पोलिस स्टेशनला आणलं होतं. ह्यांचं म्हणणं असं पडलं की त्यांना कोणीतरी मुद्दाम अडकवलं आहे. आज त्यांचं इथे लग्न होतं. आम्ही तुम्हाला पोलिस ठाण्यात न बोलवता स्वतः च इथे आलो आहोत म्हणजे सगळ्यां समोर खरं काय ते कळेल. हो पण त्याचा तुम्हाला त्रास होईल त्यासाठी क्षमस्व. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही उघडपणे सांगा."
कोणाला कळत नव्हतं काय बोलावं? तसं तर सुरुची कडचं कोणीच इतक्या खोलवर दिलीपला ओळखत नव्हतं. सुरुची पुढे येत म्हणाली
" दिलीप! खरं सांग न रे? हे सगळं काय चाललं आहे? "
" अगं ! माझ्यावर विश्वास ठेव बेबी. मला कोणीतरी ह्यात अडकवतं आहे. मी असा नाही." दिलीपचे हे वाक्य पूर्ण होते न् होते तोच दोन मुली गर्दी बाजूला सारत पुढे आल्या. त्यांना पाहताच दिलीप आणि त्याच्या बाबांच्या तोंडून अभावितपणे
" तुम्ही? इथे? " हे शब्द निघाले. पोलिस लगेच सावध झाले.
त्या दोघी सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या,
" हे बाप लेक बघा. दोघं ही एक नंबरचे फ्राॅड आहेत. ह्यांनी आम्हांला फसवून आमचं जीवन बरबाद केलं. विश्वास होत नसेल तर हे फोटो पहा. हेच फोटो दाखवून ते आम्हाला ब्लॅकमेल करत होते. आम्हालाच नाही तर हे बऱ्याच मुलींना असेच वागवत होते. आम्ही नाईजाने शेवटी ह्यांना तोंडघशी पाडण्याचा प्लॅन बनविला. तो आज पूर्ण झाला. ताई आत्ता तुम्हाला वाईट वाटत असेल पण विचार करा तुम्ही अशा घरात सुखात राहिला असतात? तुम्हाला कधीतरी हे सगळं कळलंच असतं ना? ह्यावेळेस जर आम्ही आलो नसतो तर ह्या दोघांनी आपल्या खोटं बोलण्याने तुम्हाला फसवलं असतं."
सगळेच सुन्न झाले होते. दीपकची आई डोळ्यातील आसवं लपवत खाली मान घालून उभी होती. पोलिस दीपक आणि त्याच्या वडिलांना घेऊन कधी गेले आणि इतर ही सगळे हळूहळू कधी पांगले ते कळलंच नाही.
सुरुची गप्पच होती तिची अवस्था माझ्याच्याने बघवत नव्हती. मी तिच्या जवळ जात म्हटलं,
"सुरुची ! घडू नये ते घडलं पण तू धीर धर. पुढे काही तरी चांगलं होणार असेल असा विचार कर ना?"
तिने माझा हात झिडकारत विचारलं,
" ह्यातून काय चांगलं घडेल? हो पण मी एका जाळ्यात अडकण्या अगोदर सुटले हे खरं. आता माझा कोणावर विश्वास कसा बसेल सांग ना? मी इतके दिवस दीपक बरोबर फिरत होते पण मला ह्या गोष्टीचा पत्ता ही लागला नाही? आश्चर्य वाटतं स्वत:चं. मी इतकी कशी आंधळ्या सारखी वागले? आता पुढे परत लग्नाचा विचार करताना मला नकोच वाटेल."
मी समजावत बोललो "असा विचार करु नको. तुझ्यासाठी कोणीतरी जोडीदार देवाने निवडला असणारच ना? तो येईल आणि ह्या राजकुमारीला घेऊन जाईल."
आणि काय झालं कोणास ठाऊक सुरुचीने माझा हात धरत विचारलं
"तू होणार माझा जोडीदार? ह्या राजकुमारीला घेऊन जाशील प्रेमनगरीत?"
परत एकदा सगळी कडे शांतता पसरली आणि एकदम आनंदाने सगळे ओरडले " बोल रे बोल!" आणि मला वाटलं
' देवा! जे घडावं असं मनात वाटत होतं ते घडलं. खरंच लग्नाच्या गाठी तूच बांधतो रे. मी तर हा विचार मनातून काढून टाकला होता. पण ? '
सगळे ओरडत होते,सुरुची माझ्याकडे हसून बघत होती आणि आता मी लाजत होतो आणि फक्त मान हलवून होकार दिला. परत एक आनंदाचा जोरदार जल्लोष झाला आणि पुढचं काही आठवत नाही .
पण आम्ही आज मजेत आहोत. हो सुरुची अधूनमधून माझ्यावर डाफरत असते आणि बडबडत असते
"देवा! काय रे दुर्बुद्धी झाली आणि ह्या माणसा बरोबर लग्न केलं"' अशा वेळेस आई म्हणत असते
" हो कां गं? घडू नये ते घडले कां?" आणि मग सुरुची म्हणते "तुम्ही पण ना?"
राधा गर्दे