Login

घाव झेलण्या सिद्ध ती..

संकटांवर मात करणाऱ्या स्त्रीची प्रेरणादायी कथा

शांतीचं डोकं बधीर झालं होतं विचार करून करून..

 आजसुद्धा सकाळीच प्रभाकरनं दारू पिऊन धिंगाणा घातला .

 त्याच्या घाणेरड्या शिव्या , वस्तू फेकणं , शांतीच्या अंगावर धावून जाणं यामुळे कोपऱ्यात घाबरून बसली अवंती .

 शांतीने त्या गोंधळातच कशीतरी भाजी चपाती बनवली . अवंतीला खायला देऊन तिचा डबा भरून घेतला .

" चल लवकर , शाळेला उशीर झाला तर ओरडा बसल शाळेत . ह्यांचं रोजच चाललंय ,"

 म्हणून तिने अंगावर आलेल्या प्रभाकरला आत ढकलून बाहेरून कुलूप लावलं . शेजारीपाजारी वाट बघत होते बाहेर .

" शांती याचं काहीतरी बघ . आम्ही किती दिवस हा त्रास सहन करायचा ."


" खरंच शांतीवहिनी राग नका मानू पण दुसरी जागा बघा तुम्ही . आमचीही मुलं बाळं आहेत . रोज अशा शिव्या , गोंधळ बघून त्यांच्यावरही परिणाम होतोच की . आधी रात्रीचा तमाशा असायचा आता तर सकाळीच ."

शांतीने डोळ्यातलं पाणी पुसलं. तिच्या दहा वर्षांच्या लेकीनं अवंतीनं आईचा हात पकडला घट्ट .


" बरं बघते मी काहीतरी ."

 अवंतीला घेऊन शांती झपाझप पावलं टाकत निघाली . तिला शाळेत सोडून कामांवर जायचं होतं , पाच घरच्या पोळ्यांची कामं...



अवंतीला शाळेत सोडून शांती कामाला निघणार एवढ्यात अवंतीच्या दोघी मैत्रिणी आल्या ,

"अवंती तूझा चेहरा का असा दिसतोय गं ? आजपण तूझ्या बाबांनी आईला मारलं का दारू पिऊन ? "

अवंतीचे डोळे भरुन आले .एवढीशी पोर पण खूप समंजस .

"नाही अगं ,आम्ही घाईघाईत आलो ना शाळेला उशीर होईल म्हणून त्यामूळं असा झालाय चेहरा ."

पुढे निघालेल्या शांतीने तिच्या समजूतदार लेकीकडं बघितलं . अवंतीच्या चेहर्यावर हलकंस हसू जणू आईला सांगत होतं ,आई तूच म्हणतेस ना चांगल्या गोष्टींसाठी थोडंसं खोटं बोललं तर देवबाप्पा नाही शिक्षा करत . 


अवंती आईला हसून टाटा करुन मैत्रिणींबरोबर शाळेत पळाली पण शांतीच्या डोक्यातलं विचारचक्रही धावतच होतं .



लग्न होऊन प्रभाकरबरोबर शहरात आली तेव्हा माहेरी सगळ्यांना वाटलं, पोरीचं कल्याण झालं. सासू-सासरे गावी शेती करणारे .अधून मधून यायचे.


शांतीला वाटलं, जीव लावणारा नवरा, छोटसं का होईना स्वतःचं घर अजून काय हवं ..



वर्षभरात अवंतीचा जन्म झाला . पहिली बेटी धनाची पेटी म्हणून सासरी माहेरी सगळ्यांनाच आनंद झाला.



पण हळूहळू प्रभाकरचं वागणं बदलत चाललं होतं. कधीमधी दारू पिऊन येणारा प्रभाकर रोज-रोज तर्रर होऊन यायला लागला. शांतीने खूप समजावलं . तिचं ऐकेना तेव्हा सासू-सासर्‍यांनी , तिच्या माहेरच्यांनी सांगून पाहिलं . 

तेवढ्यापुरतं ,"हो ," म्हणायचा पण परत येरे माझ्या मागल्या .

 त्याची नोकरीही सुटली . या सगळ्यामुळं सासू-सासरे खचले . कोणाला न कळवता शेतीचा तुकडा त्याने कधी विकला कोणालाच पत्ता नाही .



अवंती दोनच वर्षांची होती , तिचे सासू-सासरे सहा महिन्यांच्या अंतराने हार्ट अटॅकने गेले .

शांतीला तर समोर आता नुसता अंधारच दिसत होता . माहेरच्यांनी बोलावलं पण स्वाभिमानी शांतीच्या मनाला हे पटत नव्हतं . तिने नकार दिला आणि स्वतःच उभं रहायचं ठरवलं .

 आजूबाजूच्या कोणीतरी ," पोळ्यांची कामं करशील का ?" म्हणून विचारलं .


 तिने लगेच ," हो ," म्हणून सांगितलं . अवंतीला घेऊन कामांवर जायला लागली पण प्रभाकर तिची कमाईही दारूत उडवायला लागला..

विचारात सुनंदावहिनींचं घर केव्हा आलं कळालंच नाही शांतीला ..



सुनंदावहिनींशी दोन चार शब्द बोलून , भाजी पोळी करून शांति निघाली . एवढ्यात सुनंदावहिनींनी थांबवलं, 



"शांती अगं बस कि जरा . किती थकतेस ? प्रभाकर कसा आहे गं ?"


" कसा असणार मावशी ? दिवसेंदिवस त्रास वाढत चाललाय माझ्यापुढचा . मला तर काहीच सुचत नाही . माझ्या अवंतीचीच काळजी वाटते ."


" कशाला काळजी करतेस ? देवाला सगळ्यांची काळजी बघ आणि तू काय हरणारी आहेस होय . काही लागलं तर मला हक्कानं सांग शांती ."


तिला भरून आलं ,

" वहिनी कधी कधी धीर सुटतो हो .मी पण माणूसच आहे ना . किती स्वप्नंं बघितली होती . पार धुळीला मिळाली ."


" असं का म्हणतेस शांती ? सगळे दिवस सारखे नसतात ."

 सुनंदावहिनींनी पाठीवरून मायेनं हात फिरवला...




दोन्ही मुले परदेशात स्थायिक झालेली , नवऱ्याच्या पाठीमागं एकट्याच इथं राहणार्‍या सुनंदावहिनींचा शांतीला खूप आधार . त्यांच्याशी बोललं की तिला खूप हलकं वाटायचं .

" वहिनी येऊ का आता ? अवंतीला शाळेतून घ्यायचंय ."


" ये ये काळजी घे.."



आला दिवस ढकलत होती शांती अवंतीकडे बघून . पण नशिबाचे भोग काही संपत नव्हते . एका संध्याकाळी बाहेर गेलेला प्रभाकर आलाच नाही परत , त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली शांती आता आणखीच हताश झाली .


एक दिवस , दोन दिवस , असे किती दिवस गेले . 

शांतीने मिसिंग कंप्लेंटही केली पण प्रभाकरचा पत्ता काही लागला नाही .



काळ हे सगळ्यावर औषध असतं . प्रभाकर सुधारून कधीतरी परत येईल असा विचार करून आता शांतीने काम करून अवंतीसाठी जगायचं ठरवलं .



पण प्रभाकरने बाहेर कर्ज करून ठेवलं होतं डोंगराएवढं , ते घेणेकरी एक दिवस अचानक येऊन उभे राहिले . शांतीला काही सुचेना ,राहतं घर विकणं हा एकच पर्याय होता तिच्यापुढे . 


तिचं डोकं सुन्न झालं . आता पुढे काय ? तिला सध्या तरी एकच वाट दिसत होती नजरेसमोर . तिची पावलं आपोआप सुनंदावहिनींच्या घरी वळली . त्यांनीही तिला मायेचा आधार दिला . माय-लेकींना डोक्यावर सुरक्षित छप्पर मिळालं . दिवसभर सुनंदावहिनींच्या घरातली सगळी कामं करू लागली शांती , सकाळ संध्याकाळ सुनंदावहिनी ,शांती आणि अवंती तिघी मस्त खेळत गप्पा मारून लागल्या . तिघींचंही वेगवेगळं दु:ख एकमेकींशी वाटून हलकं करत होत्या जसं ..

 एवढ्या मोठ्या घराला जरा घरपण आल्यासारखं वाटू लागलं . 

पाच सहा महिने बरे गेले . आता जरा कुठं सगळं व्यवस्थित होतंय असं वाटतं होतं पण..



सुनंदावहिनींच्या बहिणीचा मुलगा काही कामानिमित्त थोड्या दिवसांसाठी त्यांच्याकडे राहायला आला. काही दिवसांतच शांतीने त्याची नजर ओळखली आणि आणि तिचा अंदाज खरा ठरला . त्याने एक दिवस तिचा हात धरला . कितीतरी संकटांना पुरून उरलेली शांती चवताळलीच .

 एक ठेवून दिली त्याच्या मुस्काटात .


" कोणी कसाही येऊन गैरफायदा घ्यावा एवढी वेळही आली नाही आणि कमजोरही नाही ही शांती ."


 तिच्या अंगात कुठून बळ आलं माहित नाही . तिने त्याला तसाच बाहेर ओढत आणला . सुनंदावहिनींच्या समोर उभा केला. 


" वहिनी माफ करा पण आता याला पोलिसात देण्याशिवाय पर्याय नाही . तुमच्याकडे बघून इतके दिवस काही बोलले नाही . या असल्या सुशिक्षितपणाच्या पडद्याआड लपलेल्या लांडग्यांना आपण काही केलं तरी चालतं असं वाटतं ."

 संतापाने थरथरत होती शांती .आज तिला प्रभाकर ची तीव्रतेने आठवण झाली ,तो आज व्यवस्थित वागत असता ,तर सुखी संसार असता आमचा .कोणाची वाकडी नजर पडली नसती माझ्यावर .शांतीला आतून खूप एकटं वाटलं पण पुढच्याच क्षणी सावरलं तिनं स्वतः:ला . 



त्याच्यावर गुन्हा दाखल झाला..

  पुन्हा एकदा शांतीचं आयुष्य ढवळून निघालं . 

दुसऱ्या दिवशी सकाळी कपड्यांची पिशवी घेऊन , अवंतीला हाताला धरून शांती सुनंदावहिनींच्या समोर उभी .


" वहिनी तुमचे उपकार न फिटण्याएवढे मोठे आहेत पण आता मला इथे राहता येणार नाही . गैरसमज करून घेऊ नका ."


" शांती अगं मी बोलले का तुला काही ? तू कुठं जायचं नाही . कुठे जाशील या लेकराला घेऊन ? एवढं मोठं आयुष्य आहे समोर या पोरीचं भविष्य घडवायचे तूला ,बघ पुन्हा विचार कर . 


" वहिनी , माझ्या एका मैत्रिणीला महिलाश्रमात नोकरी लागली आहे . तिनं मागेच मला सांगितलं होतं तिथे जेवणाखाण्याची , राहण्याची सोय , पगार , अवंतीच्या शाळेचीही सोय होईल .इतके दिवस तुमच्या मायेनं अडवलं होतं मला पण तुम्ही तरी किती ठिगळं लावाल माझ्या आयुष्याला .

 कधीही गरज लागली तर बोलवा येईन मी . या घरचं मीठ खाल्लंय . आता येते .सुनंदावहिनींना नमस्कार करून निघाली . आयुष्याच्या प्रत्येक घावावर मात करण्यासाठी सिद्ध असलेली ही मानिनी निघाली, नव्या दिशेला नव्या आशेच्या शोधात ..

पाठमोऱ्या शांतीला बघताना सुनंदावहिनींच्या मनात आलं ,

स्त्री जशी आभाळाची माया , जशी अफाट सहनशक्तीस्वरूप तशीच खंबीर ,प्रसंगी तनामनाचं बळ एकवटून कोणत्याही संकटाशी लढण्यास सज्ज असते पण कमकुवत ,लाचार कधीच नाही ..


©® कांचन सातपुते हिरण्या

0