Login

घारू

Suspense Story About A Whispering Sound.
घारू -1
@राधिका कुलकर्णी.


“घारूऽ,एऽ घारू, ये ना बाळ !”

‘घारू’ असा आर्त आवाज कोणीतरी कुजबूजल्यागत राघवच्या कानात घुमला. आणि तो खडबडून जागा झाला.

“सरोज,ए सरोज!”

राघवने आपल्या बायकोला घाबरून आवाज दिला. ती कूस वळवून राघवजवळ आली.

“काय झाले? असा का ओरडत उठलास, काही हवंय का तुला? ”

“ क.. काही नाही. स्वप्न पडलं एक. अचानक जाग आली गं.”

“फार वाईट स्वप्न होतं का?”

“न..ना ही.. तसंच काही नाही. पण एक आवाज आला कानाशी. असं वाटलं कोणीतरी बोलावतेय.”

“झोप आता शांत. आजकाल तुला नको नको तो विचार करायची सवय जडलीय. त्यामुळेच शांत झोप लागत नाही.”

बायको चिडून कूस वळवून परत झोपी गेली. तोही विरूद्ध दिशेला वळून झोपला.
पुन्हा थोड्यावेळाने तोच आवाज.आता मात्र तो खडबडून जागा झाला. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. शुन्यात नजर लावून तो काय होतेय ह्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू लागला तोच त्याला अचानक काहीतरी आठवले.

अरे,हा आवाजऽऽ!

नीट विचार केला तेव्हा त्याला तो आवाज आणि ती मारलेली हाक खूप ओळखीची वाटली.

“पण आज इतक्या वर्षांनी? अचानक ही हाक!
काय बरं उद्देश असेल?
आणि मलाच का?”

घारू हे राघवचे नावच नाही मुळात.
त्याचे पुर्ण नाव राघव बाबूराव रासने.
सगळे लाडाने त्याला रघू म्हणत. मित्र रघ्या म्हणत पण हे ’घारू’ म्हणणारे कोणीच नव्हते. हां, घरात एक व्यक्ती होती जी त्याला घारू म्हणायची. त्याची आज्जी. पण ती तर त्याच्या लहानपणीच वारली. मग आता हे असं स्वप्न की भास, काय आहे हे!

मेंदूत अजूनही खूप गोंधळ माजलेला. तो आर्त क्षीण आवाज. खूप म्हणजे खूप वर्षांनी पुन्हा ऐकू आला होता.
मग ही आज्जीच तर..?

त्याच्या सर्वांगाला सरसरून काटा आला.
आणि मन:पटलावरून भूतकाळातला तो प्रसंग जसाच्या तसा अगदी काल घडल्यागत समोरून तरळून गेला.

तेव्हा राघव साधारण बारा तेरा वर्षाचा असेल.
राघव हा बाबूरावांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील गावातच कासाराचा धंदा करत. राघवची आज्जी घरात असुन नसल्यासारखी.
वाड्याच्या खालच्या दिशेने एक अरूंद चिंचोळा दगडी पायऱ्यांचा जिना उतरून गेल्यावर खाली एक खोली होती. अगोदर त्या खोलीत धान्य वगैरे साठवले जायचे पण नंतर सगळ्या बांगड्या वगैरेचा माल तिथे ठेवला जाऊ लागला.
त्याच खोलीच्या एका कोपऱ्यात एक लाकडी पलंग होता ज्यावर आज्जीचा बिछाना असे. आज्जी त्याच खोलीत कायम बसून असे.
तिला कधी वरच्या वाड्यात आलेले पाहीले नव्हते. त्या खोलीला एकच खिडकी होती जी मुख्य दरवाजातून बाहेर पडले की मोठ्या अंगणात जमिनीलगत उघडे पण लोखंडी गज लावून ती पक्की केलेली होती. त्या सळईच्या गजाआडून खिडकीत डोकावले तरच आजी झोपलेली दिसे किंवा कधीकधी बसलेली असे. अन्यथा ती नजरेसही पडत नसे.

एक दिवस राघव नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आला तर घरात मोठमोठ्याने भांडण्याचे आवाज येत होते. आज्जी आणि आई-बाबांमध्ये कडाक्याचे भा़डण चालू होते. आज्जी खालून चिरकून चिरकून ’नाही नाही’ असे काहीतरी ओरडत रडत होती आणि आई-बाबा तिला कसलीतरी जबरदस्ती करत होते. तिथे नेमके काय चालले होते काही कळत नव्हते राघवला. शेवटी
ते भांडण इतके विकोपाला गेले की आईने रागारागाने त्या भुयारी खोलीला जाणारे दार कडी लावून बंद करून टाकले.
आतून आज्जीच्या किंचाळण्याचे आवाज येतच होते.
राघव घाईघाईने आज्जीच्या दाराची कडी उघडायला धावला पण दोघांनीही त्याला तिकडे जाण्यापासून अडवले. राघवमध्ये एवढी शक्ती नव्हती की तो त्यांचा विरोध करू शकेल. आज्जीचा तो करूण चित्कार राघवला सहन होत नव्हता. शेवटी तो तसाच उठून महादेवाच्या मंदिरात जाऊन बसला.

बऱ्याच वेळाने सुजल्या डोळ्यांनी तो घरी परतला. आता सगळे आवाज शांत झाले होते. आज्जीच्या खोलीतूनही आवाज येणं बंद झालं होतं.
नंतर पुढे फक्त जेवण पाणी इत्यादी गरजांसाठीच तो भुयारी दरवाजा उघडला जाई आणि पुन्हा बंद होई.

कधीकधी खेळून घरी परतताना राघव खिडकीतून आत डोकावायचा आणि आज्जी खिडकीशी यायची. हसून राघवच्या गालाला हात लावण्यासाठी हात पुढे सरसवायची पण तिचा हात कधीच त्याच्या गालापर्यंत पोहोचायचा नाही. मग तिथुनच ती त्याच्यावरून हात ओवाळून कानशिलावर बोटं मोडी आणि दृष्ट काढी. राघव देखील तिथुनच तिला बघे आणि घरात जाई.
तिचा राघववर फार जीव. आधी सगळं ठीक असताना राघव दिवसातून एक दोनदा तरी तिच्या खोलीत जात असे. तो गेला की ती त्याला प्रेमाने जवळ घेई. कधी साखर फुटाणे तर कधी रेवडी असा खाऊ “घारूऽ ये बाळ.. खाऽ” म्हणत हातावर ठेवी.

तेव्हा राघव चिडून तिला म्हणायचा

“आज्जी, घारू काय गं म्हणतेस? मी काय लहान बाळ आहे का आता?”

“अरे घारूऽ, तुझा जेव्हा जन्म झाला नाऽ तेव्हा तुझे हे घारे घारे लुकलुकणारे डोळे बघून मी तुला ह्या नावाने हाक मारायला लागले. आहेत की नाही अगदी माझ्यासारखे !”

“पण आज्जी तेव्हा मी लहान होतो. आता मी मोठा झालोय तरीही तू मला ह्या नावाने का हाक मारतेस? मला नाही आवडत ‘घारू’ म्हणलेलं. बाहेर सगळे मित्र चिडवतात मला ‘घाऱ्या घाऱ्या’ म्हणून.”

तेव्हा आजी लगेच हसून म्हणायची,

“अरेऽ, तुझा बापूस अजून इतकं वय झालं तरी मोठा झाला नाही आणि तू मोठा झालास होय!
आमचा घारू इतका मोठा झाला का? सांग बरं आता कितवीत गेलास तू?”

“आज्जी, ह्या वर्षी मी सहावीत गेलोय. आता अजून एक वर्ष, मग मी तालुक्यातील मोठ्या शाळेत जाणाऱ शिकायला.”

ते वाक्य ऐकून आजीचा पदर नकळत डोळ्याला लागायचा. तिच्या डोळ्यात खरंच पाणी यायचे की वयामुळे डोळे वहायचे कळत नव्हतं. पण ती दर थोड्या थोड्या वेळाने डोळे पदराने टिपताना दिसायची.

राघवला आज्जी खूप आवडायची पण का कुणास ठाऊक आई-बाबा त्याला तिच्याजवळ कधीच फारसं फिरकू द्यायचे नाहीत आणि ते स्वतःही आज्जीशी फटकूनच वागायचे. आई तर म्हणायची, “ती चेटकीण आहे. तुला खाऊन टाकेल. नको जाऊस तिच्याजवळ जास्त .”
आई असं का म्हणायची त्याला कळायचं नाही.

कधी कोणी पै पाहूणा घरी आला तरच आजी वरच्या वाड्यातल्या सोप्यात येई. लोक तिला जाताना काही बाही देऊन जात. मग त्यातलाच खाऊ ती राघवला गुपचूप देत असे. तिला कदाचित त्याच्याशी खूप काही बोलायचे असे पण तो इतका समजदार नव्हता म्हणून की काय ती फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला माया करायची. फार काही बोलायची नाही.

त्यामुळेच कधी वरच्या पट्टीत आवाज न चढलेल्या आज्जीला त्या दिवशी इतक्या चिरक्या स्वरात ओरडताना बघून राघव थरकापला होता.

—--—--------------------------------------------------- क्रमश:

घारूऽ भाग -1
@राधिका कुलकर्णी.

नेमकं काय झालं असेल त्या दिवशी?
आईवडील नेमकी कसली जबरदस्ती करत होते आज्जीवर?
पुढे काय होणार?
हे जाणून घ्यायला पुढील भाग नक्की वाचा.