गेट वेल सून

Happy world environment day.

      हॉस्पिटल मध्ये आज खूप गोंधळ उडाला होता... सगळे घाई गडबडीत होते.... स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आला आणि इतक्यात एक अँबुलन्स येते.... सगळ्यांची धावा - धाव सुरु होते... पेशंट ला पटकन स्पेशल वॉर्ड मध्ये घेऊन जाण्यात येतं! पेशंट बरोबरची बाकी मंडळी बाहेर उभी राहून काचेतून सगळं पाहत असतात.... कोण असतो हा पेशंट??? नाही नाही, तुम्ही समजताय तो नाही! हा कोरोनाचा पेशंट नसतो! हि तर फारच वेगळी केस असते! 
         पेशंट असते पृथ्वी! हो आपली भूमाता पृथ्वी! इतर सगळे ग्रह बाहेर उभं राहून पाहत असतात.... पृथ्वीचे चेकअप सुरु होते.... झाडं तोडल्यामुळे तिची त्वचा जळलेली असते, सतत इंधन उपसल्यामुळे शरीरात इंधन रुपी हिमोग्लोबिन कमी झालेले असते, शरीरातील पाण्याचा स्तर पार कमी झालेला असतो आणि यामुळे डिहायड्रेशन झालेले असते, भरपूर धुरामुळे फुस्फुसाला इनफेक्शन झालेले असते, वाढत्या कचऱ्यामुळे बाकी काही पचवण्याची ताकदच उरलेली नसते! सगळं चेकअप करून डॉ. निसर्ग बाहेर येतात... चंद्र विचारतो; "डॉ. काय झालं माझ्या बहिणीला? कधी बरी होईल ती?" डॉ. निसर्ग बोलतात; "मी स्पष्टच सांगतो! पृथ्वीची स्थिती फार गंभीर आहे! वेळीच उपचार केले नाहीत तर काहीही होऊ शकतं! 'मानव' नामक विषाणू ने पृथ्वी वर हल्लाबोल केलाय म्हणूनच तिची हि अवस्था झाली आहे." डॉक्टरांचं बोलणं ऐकून चंद्र पार खचून जातो... बहिणीची झालेली अवस्था त्याला पाहवत नव्हती! त्याला सावरत शेजारीच उभ्या असणाऱ्या मंगळाने विचारलं; "डॉक्टर यावर काही तरी उपाय असेलच ना! तुम्ही तर एवढे अनुभवी आणि स्पेशालिस्ट डॉक्टर आहात प्लिझ काहीतरी करा आणि आम्हाला आमची हसरी पृथ्वी परत द्या!" 
        सगळं ऐकून डॉ. निसर्ग म्हणाले; "हो! उपाय तर आहे! नाहीतरी आता मानवाच्या कृत्यांना आळा घातलाच पाहिजे! सध्या तात्पुरती मलम पट्टी करून मी तिला एक इंजेक्शन देतो यामुळे मानव नामक विषाणूला थोड्या अंशी जबर बसेल आणि केलेली चूक लक्षात येईल." सगळे हा उपचार सुरू करायला मान्यता देतात.... पृथ्वी अजूनही बेशुद्धच असते! डॉ. निसर्ग आधी भाजलेल्या त्वचेला मलम लावतात, ऑक्सिजन लावून पृथ्वी ला शुद्ध हवा दिली जाते, सलाईन मधून शुद्ध पाणी दिलं जात असतं आणि आता त्यात निसर्ग 'कोरोना' नामक विषाणू सोडतात.... जो पृथ्वी साठी औषध तर मानवासाठी विषाणू असतो! यामुळे अचानक मानवाचे सगळे काम बंद पडते, त्याला घरातच राहावे लागते, काही सुजाण नागरिकांना आपली चूक उमगते! पृथ्वीचा आता कधीही असा छळ नाही करणार असे ठरवले जाते. मानवाच्या 'अपुन हि भगवान है' या गैरसमजाला डॉ. निसर्ग बरोब्बर प्रतिउत्तर देतात. घाव बरोबर वर्मी लागतो.... पृथ्वी हळूहळू बरी होऊ लागते. या काळात कमी प्रदूषणामुळे श्वसनाला त्रास होत नाही, कचरा कमी पडल्यामुळे पचनसंस्था सुधारू लागते, प्राणी आणि पक्ष्यांना स्वछंदी पाहून निस्तेज झालेल्या पृथ्वीच्या चेहऱ्यावर थोडी उभारी येते. आपल्याला आता बरं व्हायचंच आहे या निश्चयाने ती उपचारांना सुद्धा चांगली प्रतिसाद देऊ लागते. 
        मात्र जेव्हा तिला मानवाची स्थिती समजते ती डॉ. निसर्गना विनवणी करते; "मी आता होईन बरी पण तुम्ही जो डोस दिला आहे तो माझ्या मुलांना घातक ठरतोय तर ते औषध बदलून द्या." या वर डॉ. निसर्ग म्हणतात; "नाही! ते शक्य नाही! ज्या मुलांना आई ची काळजी घेता येत नाही फक्त त्यांच्याच विरोधात हे औषध काम करत! मला तुझं मन कळतंय पण मानवाला धडा शिकवलाच पाहिजे! आज जर तू माघार घेतलीस तर पुन्हा असच होईल." जड अंतःकरणाने पृथ्वी तयार होते. इथे मानवासाठी सगळीकडे लोकडाऊन घोषित होतं! या काळात पृथ्वी अजून बहरते! मानवाला सुद्धा त्याच्या चुका स्पष्ट दिसू लागतात आणि शेवटी कळून चुकतं; डॉ. निसर्ग सर्वश्रेष्ठ आहेत!

(आज ५ जून! जागतिक पर्यावरण दिन..... पण, असा एकच दिवस पर्यावरणासाठी राखून ठेऊन चालतं का? म्हणजे एरवी पर्यावरणाची कशीही नासधूस करायची, प्रदूषण करायचं, झाडे तोडायची आणि या एका दिवशी मात्र सगळं जपायचं असं खरंच होऊ शकतं? हे तर असं झालं आजारी असताना फक्त एकच दिवस औषध घ्यायचं आणि इतर दिवशी मनासारखं जगायचं! अश्याने आपली पृथ्वी कशी बरी होईल?)

© प्रतिक्षा माजगावकर 
Thanks to Shreyas Kulkarni for Sketch