स्नेहमीलन सोहळा की दिखाव्याचा सोहळा

स्नेहमिलन सोहळ्याचा खरे पणा काय आहे ते यात थोडक्यात सांगितले आहे. आणि गेट टुगेदर करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला हवे हे सांगण्याचा प्रयत्न केला

काल अहोचा (नवऱ्याचा ) दहावीच्या बॅचचा स्नेहमिलन (get together )सोहळा होता. माझी अजिबात जायची इच्छा नव्हती कारण हा कार्यक्रम फक्त मित्र -मैत्रिणीच्या भेटी-गाठी होण्यासाठी होता. आणि फॅमिली सोबत नेऊन तिला फक्त बोअर करण इतकंच फलीत होणार होत हे मला आधीच माहिती होत.पण ऐकणार कोण आपल मग जावच लागलं.

तर सांगायचं हे होत की 300km प्रवास करून रात्री आम्ही नियोजित गावी मुक्कामी (नातेवाईकांकडे ) आलो. सकाळी कार्यक्रमाची तयारी कुठवर आली म्हणून अहो बघायला नियोजित स्थळी पोहचले. तिथे उपस्थित सर्व मित्र छान बोलले विचारपूस केली.. "वहिनींना सोबत आणशील म्हणजे फॅमिली घेऊनच ये" अशी विनंती केली.

मला अहोनी कॉल केला "हे बघ जयश्री तुला यावंच लागत. तयारी कर 11ला कार्यक्रम सुरु होईल. सर्व फॅमिलीसोबत येणार आहे मी एकटाच जाऊ का?"

मी म्हंटल ok... करते मी तयारी.

वेळ थोडा मागे-पुढे झाला. दोन लेकींची तयारी आणि आपणही नवऱ्याला शोभायला हव यानुसार तयारी करायला फारसा उशीर झाला नाही फक्त 11 चे 11.30 झाले. पुढच्या पाच मिनिटात आम्ही कार्यक्रमाच्या जागी पोहचलो.

कार्यक्रमाची नुकतीच सुरुवात झाली होती.

मुलांसाठी मन्चुरियन, पाणीपुरी होती त्यामुळे बच्चापार्टी खुश होती, त्यामुळे त्यांच्या आई बाबांना छान एन्जॉय करता आलं. हळू हळू घडीचे काटे पुढे पुढे सरकू लागले आणि माझ्यासारख्या वर्गमित्रांच्या बायका म्हणजेच वहिनी मंडळ आणि मैत्रिणीचे नवरे म्हणजे भाऊजी मंडळ हळू हळू कंटाळा करू लागले.

उपस्थित शिक्षक देखील कार्यक्रम लांबत चालला म्हणून कंटाळले होते हे त्यांचे चेहरे स्पष्ट सांगत होते.

नियोजन करणाऱ्यांच वेगळं मंडळ होत. त्यात मुलींचा खूप सहभाग आहे असच वाटलं. (आता त्या चाळीशीकडे झुकल्या त्यामुळे मुली म्हणणं योग्य होईल का ?) मुलं (तेही चाळीशीकडे झुकलेले होते ) त्यांनीच खरी मेहनत घेतली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ते कुठेतरी मागेच होते. मुली मात्र पुढे पुढे करत होत्या.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन उपस्थित सर्व मुलामुलींनी केले.

प्रास्ताविक झाल्यावर कार्यक्रम सुरु झाला. मान्यवरांच्या ओळखीची काही गरजच नव्हती कारण ते गुरुवर्य होते आणि सर्वपरिचित होते. थोडक्यात त्याचा परिचय आटोपला. त्यांच्या हाताखालून अशा कितीतरी बॅच निघून गेल्या होत्या त्यामुळे खरी गरज होती की हे उपस्थित विध्यार्थी कोण आहेत. त्यामुळे या बॅच मध्ये कोण होते हे सांगण्यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थी /विद्यार्थिनी माईक हातात घेऊन आपापली ओळख सांगत होता /होती.

मुलींचं विशेष कौतुक त्यांनी सासर -माहेर दोन्हीची नावे सांगितली, नवरा काय करतो, त्या काय करतात हे देखील सांगितलं.

मुलं मात्र स्वतःच नाव आणि व्यवसाय सांगून माईक दुसऱ्याकडे पास करत होते. (मग मला सांगा फॅमिली आणायची गरज काय होती.?)

मुली नवऱ्याची ओळख त्यांच्या नावातून करून देत होत्या.. मग मुलांच्या बायकांना कोण आणि कस ओळखेल सांगा बर?

माझी छोटी मुलगी तर खूप कंटाळली होती सारखं (मम्मा घली जाऊ न " म्हणतं होती रडत होती. आता काय करावं मग त्याच कार्यक्रमाच्या बाजूला छान निसर्गरम्य वातावरण होत, शिवमंदिर, विठ्ठल मंदिर, मातामाय, संतोषीमातेचे मंदिर आणि झुळूझुळू वाहनारी वर्धा नदी होती. मग काय मुलींना घेऊन या दिखाव्याच्या गलबलाटातून निघून त्या निसर्गरम्य वातावरणात गेले. शिवमंदिरात गेल्यावर तिथे इतकं शांत, थंड वाटत होत की माझी शरयू तिथे खेळायला लागली.

थोड्या अंतरावर विठ्ठल मंदिर होत. एकेकाळी भग्नअवस्थेत असणार हे मंदिर त्याचा जीर्णोद्धार करून त्याला आता कमालीच वैभव प्राप्त झालं होत. आत मध्ये गेल्यावर त्या पुरातन विठ्ठल, रुख्मिणी च्या मूर्तिकडे पाहून मन प्रसन्न झालं. जरा वेळ तिथे विसावले.

चला मुख्य मुद्द्यावर येऊया मी विषय सोडून निसर्गवर्णन करत बसले.

तर त्या स्नेहमीलन सोहळ्यात त्रासलेले चेहरे पाहून आयोजकांनी आभारप्रदर्शन घेऊन जेवणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा विचार केला.

आभार प्रदर्शन सुरु असताना ते मला सविनय नाही वाटल. कारण कार्यक्रमाच सूत्रसंचालन असो वा आभार प्रदर्शन दोन्हीही हे सविनय व उपस्थित पाहुण्यांना खिळवून ठेवणार असावं असं माझं मत आहे आणि कदाचित तुम्ही देखील माझ्या या मताशी सहमत असाल. खरं सांगायच तर सूत्रसंचालन देखील पाहिजे तितकं व्यवस्थित आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणार नव्हतं. प्रत्येक वेळी शायरी किंवा चारोळी टाकुनच सूत्रसंचालन होऊ शकत हा फार मोठा गैरसमज आहे सर्वांच्या मनात. तरी बर हे सर्व करणारे "शिक्षक " होते.

आभार प्रदर्शनाविषयीं बोलायचं झालं तर त्या आवाजाने माझेच कान कुठे पळू नी कुठे नाही करत होते , मेंदूतर भिन्न झाला होता. आणि माझी अडीच वर्षाची शरयू रडायला लागली होती. त्यामुळे पुन्हा कार्यक्रमातून मला काढता  पाय घ्याव्या लागला. तरी दूर दूर पर्यंत आभारप्रदर्शनाचा आवाज येत होता.

आभारप्रदर्शन करणारीचा आवाज इतका भारदस्त होता आणि इतका मोठा होता की माईक नसता तरी सर्वांपर्यत सहज पोहचला असता. माईक व स्पीकर मुळे बऱ्याच जणांना कानाचा त्रास झाला असावा असा अंदाज आहे. पण ते करणारीला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. आभारप्रदर्शन हे सविनय न होता धमकीवजा आवाजात झालं हे मला विशेष सांगावस वाटत आहे.

हे वाचणाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्रमांची रूपरेषा आखतांना जरा सुमधुर, शांत हळुवार बोलणाऱ्या व्यक्ती सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शनासाठी निवडाव्या हा हेतू हे सगळं लिहिण्यामागचा. त्या मानाने प्रास्ताविक फार छान झाले.. हसत खेळत झाले. बाकी अख्खा कार्यक्रम रटाळवाना झाला असं म्हणायला हरकत नाही. आभारप्रदर्शनाआधी आयोजकांनी त्यांच्या वर्गमैत्रिणीच्या नवऱ्याना विशेष विनंती केली " आमच्या सर्व भाऊजींना विनंती की कार्यक्रमातून जेवन केल्या शिवाय जाऊ नये " असं तीनदा माईकवर बोलले.

यात वर्गमित्रांच्या बायकांना साधविचारलं देखील नाही. त्याच वाक्यात "आमचे सर्व भाऊजी आणि सर्व वहिनी" असा साधा उल्लेख केला असता  तरी तिथे उपस्थित वहिनी मंडळ किती आनंदी झालं असत. कारण त्या विनाकारण यांचा रटळवांना कार्यक्रम ऐकत, बघत बसल्या होत्या.

यांचा कार्यक्रम नीट व्हावा म्हणून मुलांना सांभाळत होत्या. माझ्यासारख्या नवऱ्याने जबरदस्ती कार्यक्रमात नेणाऱ्या, हातातली कामे (धुणे, भांडे, कपडे, स्वयंपाक, सडा, सारवण, झाडझूड हे सर्व ) टाकून तिथे उपस्थित होत्या. गृहिणी म्हणून तिला घरी पण नेहमी गृहीत धरल्या जाते. घरीदेखील तीच कोडकौतुक कुणीच करत नाही. आणि या कार्यक्रमात तर तिला बोलावून तिला साधं जेवायला देखील विचारलं नाही. भाऊजी मंडळाला नसतं विचारलं तर वहिनीमंडळाला इतकं वाईट वाटलं नसतं. पण पुन्हा एकदा सिद्ध झालं.. "स्त्री ही उपेक्षितच राहते."

स्नेहमीलन करणाऱ्यांनी वर्गमैत्रिणींना मान दिला तसाच जरा वेळ काढून वहिनीमंडळाचा देखील परिचय कार्यक्रमाच्या मधेच घेतला असता, त्यांना देखील जेवणाची विनंती केली असती तर? विचार करा.

किंवा मुलांनी जस भाऊजींना विनंती केली तशी मुलींनी हळदीकुंकू लावून वहिनींची ओळख करून घेतली असती तर?

"आमच्या सर्व वहिनींनी जेवण करून जावं" असं म्हंटल असत तर?... ?

आहे न विचार करण्यासारखी गोष्ट.. मग करा विचार आणि हो या पुढे स्नेहमीलन सोहळा आयोजन करणाऱ्यांनी या छोट्या वाटणाऱ्या पण मनाला लागणाऱ्या गोष्टीचा विचार करूनच कार्यक्रमात फॅमिली बोलवायची की नाही याचा विचार करावा. कारण तुमच्या दिखाव्यासाठी फॅमिली मेंबरला ते पाच -सहा तास खूप त्रास सहन करावा लागतो आणि मुले कंटाळतात.

सर्वात महत्वाचं तुमच्यात स्नेह असेल तरच असे कार्यक्रम आयोजित करा. कारण याच कार्यक्रमात मुली एकमेकींनविषयी वाईटसाईट बोलत होत्या, "ती जास्त आगाऊ आहे ","स्वतःला खूप शहाणी समजते ","इथे काय श्रीमंतीच प्रदर्शन करायच होत का", "जशी तेंव्हा होती तशीच घमंडी आताही आहे ", "मी तर बोललीच नाही ", "ती नोकरी करते तर आपण काय भीक मागतो का यांना", "ही बोलली तर चालते आणि मी बोलले तर मी उगाच पाल्हाळ बोलले " हे आणि असे बरेच वाक्य ऐकून हसू की स्टेजवर जाऊन चार गोष्टी या स्नेहमीलन सोहळा आयोजकांना समजावून सांगू असं मला वाटत होत. क्षणभर तर मला या शाळेतल्या स्कर्ट मधल्या मुली वाटल्या. कारण तेंव्हा शब्द वेगळे होते पण भांडण असेच असायचे ??


गेट टू गेदर मध्ये महत्वाचं असत एकमेकांशी बोलण आपण इतक्या वर्षांनी भेटलो तर जुन्याच भाषेत तसच लहान होऊन बोलाव हेच अपेक्षित असत पण त्याच्याजागी "मी, माझं" इतकंच येत असेल तर आणि एकमेकांशी बोलणच जर गेट टू गेदर मधे होत नसेल तर काय उपयोग आहे हा कार्यक्रम करण्याचा?

एक दिवसाचा कार्यक्रम असतो त्यातला जास्तीत जास्त वेळ  एकमेकांशी बोलता यावं, ओळखी व्हावी यासाठी, हितगुज करता यावं यासाठी असावा . पण इतका मोठा कार्यक्रम आयोजित केल्यावर त्या वेळेतला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ औपचारिकता पाळण्यात जातो. असं मला निरीक्षणातून दिसून आलं.

 या दिखाऊ पणाच्या गर्दीत आपण सहज विसरतो ते म्हणजे आपले वर्ग मित्र, मैत्रिणी जे मजुरी करारत, शेती करतात त्यांना. आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत आहेत त्यांच्या मनाचा विचार करूनच पेहराव करावा किंवा बोलतांना त्यांना वाईट तर वाटत नाही न याचा विचार करावा. आपली श्रीमंती दाखवण्यासाठी तर आपण स्पेशल पार्टी देऊ शकतो आपल्या घरी पण अश्या कार्यक्रमात आपल्याला पाहून आपल्याला वर्ग मित्रमैत्रिणींना uncomfortable नको वाटायला हाच हेतू असावा अस मला वाटत.

कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडल्यावर एकमेकांना क्रॉस करून देखील न बोलणारे मुलं देखील याच कार्यक्रमातील होते. ?? आणि आले मात्र स्नेहमीलन सोहळ्यात होते ??

माझा लिहिण्याचा उद्देश इतकाच की गेट टू गेदर हे भेटण्यासाठी असत दिखाव्यासाठी नाही.  बाकी ज्याची त्याची इच्छा. ज्याला जस वाटत त्याने तस वागावं कारण व्यक्ती स्वातंत्र्य सर्वाना आहे. असा कार्यक्रम आयोजित  करण्याआधी आपापसात स्नेह आहे की नाही हे ठरवा, भेटण्याची इच्छा आणि ओढ आहे का ?हे तपासा आणि नंतर असे दिखाव्याचे स्नेहमीलन सोहळे आयोजित करा इतकाच हेतू होता या लेखनप्रपंचाचा. धन्यवाद ?

असो कार्यक्रम माझा नव्हता माझ्या नवऱ्याच्या दहावीच्या बॅचचा होता. उगाच माझं लेखिकेच ज्ञान पाझरून उपयोग नव्हता. त्यामुळे मी स्टेजवर जाऊन बोलण्याच्या माझ्या मानसुब्याला आवर घातला,मनाला मारून मी शांत बसले आणि दोन घास कसेबसे खाऊन कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

आणि यातून इतकं शिकले की ज्यांच्यात स्नेह आहे त्यांनीच असे स्नेहमीलन सोहळे आयोजित करावे अन्यथा तिथे देतो त्या पैशात बायकोला छान साडी घेऊन द्यावी आणि बाहेर जेवायला घेऊन जावं ??. कस आहे कार्यक्रम एक दिवस असतो... बायकोतर लाईफपार्टनर आहे .. बरोबर की नाही.

©जयश्री कन्हेरे -सातपुते 

मी देखील इथेच समारोप घेते नाहीतर तुम्ही वाचता वाचता बोअर व्हाल आणि माझे लेख न वाचता मला अनफॉलो कराल.

कस वाटलं वाचायला? ते नक्की सांगा, मी माझ्या निरीक्षनातून हे लिहिलंय तेंव्हा त्या सोहळ्यात उपस्थित नसणाऱ्यांनी उगाच " हा तुझा बघण्याचा दूषिकोन आहे " असं म्हणून उगाच श..... करू नये. धन्यवाद ?

©जयश्री कन्हेरे -सातपुते