बेरीज वजाबाकी आयुष्याची.. अंतिम भाग ( सारिका कंदलगांवकर)

बेरीज वजाबाकी आयुष्याची


गेले जगायचे राहून.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की संगीता कुटुंबामध्ये एवढी व्यस्त होऊन जाते की तिची नोकरी करायची इच्छाही तशीच राहून जाते. आता बघू पुढे काय होते ते.


" प्रतिभाताई, विहंगसाठी मुलगी बघायला जायचे आहे. तुम्हाला जमेल का चार दिवस सासूबाईंसोबत रहायला?" संगीताने फोन करून विचारले.

" चार दिवस? एवढी कुठली मुलगी शोधताय?"

" अहो, माझ्या बहिणीने, मुग्धाने सुचवलेले स्थळ आहे. दोन दिवस प्रवासात जाणार. दोन दिवस तिथे राहून आले असते. आईबाबा गेल्यानंतर माहेरी जाणेच झाले नाही. या निमित्ताने मग मुग्धाने रहायचा आग्रह केला म्हणून." संगीता स्पष्टीकरण देत बोलली.

" बरं आहे बाई तुझे.. दूरदूरच्या बहिणी. त्या निमित्ताने तुझे माहेरी राहणं तरी होतं.. नाहीतर आम्ही बघ. गेलो तरी दोन तासात घरी परत."
प्रतिभाने बोलून घेतले. संगीता नेहमीप्रमाणे गप्प बसली. कारण एक शब्द जरी बोलली असती तरी विहंगच्या लग्नात भांडणे झाली असती. तिला फार बोलावेसे वाटत होते, माहेर जवळ आहे, आई आहे म्हणून हक्काने येताना दर आठवड्याला. मला कुठे जायला मिळते? आधी वर्षातून एकदातरी हे चौघे बाहेर फिरायला कुठे जायचे. विमलताईंचे आजारपण सुरू झाल्यापासून ते ही बंद झाले होते. तिचे बाहेरचे जग फक्त बाजारापर्यंतच राहिले होते.

विहंगचे लग्न झाले आणि नेमकी त्याची बदली बाहेरगावी झाली. एखाद महिना सूनबाई राहिल्या असतील. त्याचे लग्न होईतो सुजलाचेही ठरले. ती ही आपल्या सासरी गेली. सुधीर निवृत्त झाला. एवढ्या मोठ्या घरात ते तिघेच राहिले. लग्नानंतर पहिल्यांदाच सुधीर सतत घरी रहात असल्यामुळे त्याला संगीताची कुतरओढ समजत होती. अंथरूणावर पडूनही हुकूम देणारी आई आणि गुपचूप ऐकणारी बायको त्याला दिसत होती. तिचे झालेले वय, केसातून डोकावणार्‍या रूपेरी बटा दिसत होत्या. गुडघे दुखत असतानाही आईला न चुकता बेडपॅन देणारी ती दिसत होती. त्यालाही जमेल तसे तो करायचा. पण वय त्याचेही झाले होते. त्यात या सगळ्या गोष्टींची सवय नसल्याने हे सगळे करायला त्याला वेळही लागायचा. आईच्या देखरेखीसाठी बाई ठेवायचाही प्रयत्न झाला. पण विमलताईंना बाहेरचे माणूस नको असायचे. स्वयंपाकही घरचाच हवा असायचा. हे सगळे बघताना सुधीरला स्वतःचे वागणे आठवत होते. कितीतरी वेळा संगीताला त्याला काही काही सांगायचे असायचे. पण आईच्या विरुद्ध काही ऐकायचे नाही म्हणून तो तिला गप्प करायचा. आईसमोर बायकोचा विचार कधी केलाच नाही, ही भावना आता त्याला त्रास देऊ लागली होती.


" संगीता, रवा करपतो आहे.." तंद्री लागलेल्या संगीताला जागे करत सुधीर म्हणाला. ती पटकन भानावर आली. समोर सगळा रवा काळा झाला होता.

" विचारांच्या धुंदीत समजले नाही." अपराधी आवाजात संगीता बोलली.

" मला माफ कर संगीता. खरंतर मी तुझे निदान ऐकून तरी घ्यायला हवे होते. खूप अन्याय केला मी तुझ्यावर. " सुधीर म्हणाला. संगीता उदासशी हसली.

" हीच तर माझ्या आयुष्यातली बेरीज वजाबाकी आहे. तुमचे प्रेम, माझी मुले ही बेरीज.. सासूबाईंच्या सगळं माझ्याच हातात हवं या अट्टाहासामुळे वजा झालेली माझी उमेदीची वर्ष, हातातून निसटून गेलेले करिअर.. इतरांच्या मनाप्रमाणे जगताना माझे जगणे मात्र राहूनच गेले. उरले या करपलेल्या रव्यासारख्या जळालेल्या भावना.." तो रवा फेकून देत संगीता म्हणाली.



अनेकदा आजूबाजूला पन्नाशी, साठीला पोहोचलेल्या अनेक स्त्रिया दिसतात ज्या या वयातही स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकत नाहीत. मोठ्यांना उलटून न बोलण्याची शिकवण यामुळे अन्याय सहन करत राहतात. या सगळ्यात त्यांचे जगणे राहूनच जाते. ते मांडण्याचा एक छोटा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all