बेरीज वजाबाकी आयुष्याची. भाग २ ( सारिका कंदलगांवकर)

बेरीज वजाबाकी आयुष्याची


गेले जगायचे राहून.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की संगीताला स्वतःचा भूतकाळ आठवतो आहे. तिच्या नवर्‍याने लग्नाआधीच आईला दुखवायचे नाही ही अट घातली होती. आता बघू पुढे काय होते ते.


" पटकन नाव घे. त्याशिवाय आत येऊ देणार नाही. आणि आज दिवसभरात घेतलेले उखाणे नको. नवीन घे कोणतातरी." दार अडवून उभी असलेली प्रतिभा संगीताला सांगत होती. दिवसभर दहा नवनवीन उखाणे घेतलेल्या संगीताला उखाणा सुचत नव्हता. दिवसभर झालेल्या लग्नाच्या दगदगीने ती थकली होती. तिने सुरुवात केली,

" शंकराला बेल वाहते वाकून आणि सुधीररावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून." संगीताने नाव घेतले.

" हे काय जुने? नवीन घे ना.." प्रतिभाने पुन्हा हट्ट केला. संगीताने परत उखाण्याला सुरुवात केली तोच विमलताई कडाडल्या,

" तिला एक अक्कल नाही. पण तू ही तिच्यासोबत पोर होऊन वागतेस की काय? लक्ष्मीपूजनासाठी खोळंबले आहेत सगळे." ते ऐकून संगिताचे डोळे पाणावले तर प्रतिभाचा चेहरा हिरमुसला. सगळ्या नातेवाईकांसमोर झालेला अपमान संगीताच्या मनाला लागला. सुधीर गप्पच होता. पुढचे सर्व विधी मूकपणेच झाले. कोणीच काही बोलले नाही. सगळी पांगापांग झाल्यावर विमलताईंनी संगीताला जवळ बोलावले.

" हे बघ, मी जे बोलले ते मनावर नको घेऊस. मला ना मनात ठेवता येत नाही. बोलून मोकळी होते. जा मन उदास करून नको बसूस.. उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे." डोळ्यातलं पाणी पुसत संगीता उठली. तिथेच सुधीर होता. पाणी प्यायच्या निमित्ताने तो आत आला.

" माझी आई ना, फणसासारखी आहे.. बाहेरून काटेरी.. आतून गोड. येईल तुला अनुभव. " हलकेच तिच्या गालाला स्पर्श करत सुधीर बोलला. तिने फक्त मान हलवली. पूजा झाली, देवदेव झाले. दोघे चार दिवस फिरून आले. त्या चार दिवसात संगीताला समजले की तिचा नवरा कितीही चांगला असला तरी आईशिवाय याचे पानही हलत नाही. आई म्हणेल तीच पूर्वदिशा. घरी आल्यावर खऱ्या अर्थाने संगीताचा संसार सुरू झाला.


" संगीता, उद्या आमच्याकडे सगळ्यांचे उपवास असतात. न विसरता साबुदाणा भिजत घाल हो.." सासूबाईंनी सकाळी उठल्या उठल्या सांगितले. संध्याकाळी त्या मंदिरात गेल्यावर सुधीर कामावरून आणि प्रतिभा कॉलेजवरून घरी आले. संगीता करायला आहे म्हटल्यावर विमलताई तिच्यावर कामे टाकून जाऊ लागल्या होत्या.

" खूप भूक लागली आहे. काय आहे खायला?" सुधीरने विचारले.

" आज उपवास आहे तर साबुदाण्याची खिचडी करू?"

" नेहमी काय ती खिचडी?" तोंड वाकडे करत प्रतिभा बोलली. "काहीतरी वेगळे कर ना.."

" साबुदाणावडा चालेल?" थोडं घाबरत संगीताने विचारले.

" चालेल??? पळेल.. किती वेळ लागेल करायला?" प्रतिभाने विचारले.

" दहा मिनिटे. खिचडीसाठी बटाटे वगैरे उकडून ठेवले आहेत. पटकन करायला घेते." उत्साहाने संगीता बोलली. आणि खरंच दहाव्या मिनिटाला तिने वडे करून दोघांना खायला दिले. दोघेही आवडीने खात होते. आपण केलेला पदार्थ दोघांना आवडला याचा आनंद संगीताच्या चेहर्‍यावर ओसंडून वहात होता.

" कसला वास येतो आहे?" दरवाजातूनच विमलताईंनी विचारले.

" आई, साबुदाणेवडे.. वहिनीने केले आहेत. मस्त झाले आहेत." प्रतिभा बोटं चाखत म्हणाली.

" वडे? आज काय खास? आणि केवढं ते तेल?" विमलताई नाराज झाल्या होत्या. त्या रात्री त्यांनी वडे खाल्ले पण चेहर्‍यावर नाराजी तशीच होती. त्यानंतर त्या मंदिरात किंवा कुठेही जाताना खाणंपिणं करूनच जायच्या. पण त्याची पूर्वतयारी मात्र संगीताने करून ठेवायची.

ते बघूनच संगीताला आपले पुढचे भविष्य समजले. तिच्या आवडीप्रमाणे साधा स्वयंपाक करायचीही तिला मुभा नव्हती.


अजून किती मन मारून जगावे लागेल संगीताला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all