Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( सारिका कंदलगांवकर)

Read Later
बेरीज वजाबाकी आयुष्याची ( सारिका कंदलगांवकर)


गेले जगायचे राहून.." आई, असं करायचं नाही.. औषधे वेळेवर घ्यायची. अजिबात कसलीही हयगय करायची नाही. मला हवी आहेस तू अजून. तुझ्याशिवाय आहे तरी कोण मला? अग आपल्या परागचे लग्न आहे पुढच्या महिन्यात. त्याची सगळी हौसमौज करायची आहे आपल्याला. " साठीची प्रतिभा आपल्या नव्वदीला पोहोचलेल्या आईला सांगत होती.

" हो ग.. प्रयत्न करते आहे. पण शरीर साथ देत नाही ग.. मलाही वाटतं नातसुनेला बघावं. तिची हौस पुरवावी." थरथरत्या आवाजात आजी बोलू लागल्या.


दोघींचं बोलणं ऐकून चहा घेऊन आलेली संगिता स्वतःशीच विषण्णपणे हसली.

" हौसमौज? काय असते हौसमौज? लग्नाला पस्तीस वर्षे होऊनसुद्धा स्वतःचे आयुष्य अजून जगता आले नाही कधी.." संगिता नेहमीप्रमाणे मनातल्यामनात बोलली. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर सुद्धा सासूबाईंसमोर एक शब्द बोलायची तिची हिंमत नव्हती. अगदी स्वतःला सून, जावई आले तरी. संगिताने दोघींना चहा दिला. मायलेकींच्या गप्पांमध्ये खंड नको म्हणून तिथून उठून स्वयंपाकघरात गेली. काहीतरी खायला करायचे म्हणून तिने रवा भाजायला घेतला. रवा भाजताना तिच्या डोळ्यासमोरून स्वतःच्या आयुष्याचा चित्रपट धावू लागला..

" आम्हाला मुलगी पसंत आहे. देण्याघेण्याचे कसे काय करायचे ते सांगा."

खणखणीत आवाजात विमलबाई बोलल्या. तो आवाज ऐकूनच संगीताच्या घरचे थोडे दबले होते. आधीच फक्त मुलगा आणि त्याची आई दोघेच मुलीला बघायला आले म्हणून यांना थोडे आश्चर्यच वाटले होते. पण हातचे स्थळ सोडायचे नव्हते. मुलगा दिसायला चांगला होता. नोकरीही चांगल्या ठिकाणी होती. म्हणजे वडिलांच्या जागी लागला होता. संगीताच्या पाठी अजून दोन बहिणी लग्नाच्या होत्या. त्यामुळे तिच्या वडिलांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते.

" रीतीप्रमाणे आम्ही सगळे करू. पण त्याआधी दोघांना काही बोलायचे असेल तर?"

" आमचा सुधीर माझ्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही तुमच्या मुलीचे बघा."

" आमची संगीतासुद्धा नाही. तरिही लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न. आता जुना जमाना कुठे राहिला आहे."

नाईलाजाने विमलबाईंनी दोघांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. इतका वेळ गप्प बसलेला सुधीर काहितरी विचारेल, या विचारानेच संगीता थोडी बावरली होती. दोघे गच्चीवर गेले. पहिले काही क्षण शांततेत गेले. संगीताची चुळबुळ सुरू होती. सुधीरने ते बघितले. दोन क्षण स्वतःशीच विचार केला आणि बोलायला सुरुवात केली.

" माझी आई माझे सर्वस्व आहे. माझे बाबा गेल्यानंतर माझे आणि माझ्या बहिणीचे तिने एकहाती सगळे केले आहे. आज माझी जी नोकरी आहे, ती करू शकली असती. पण फक्त माझ्यासाठी तिने तो क्लेम ठेवला. खूप उपकार आहेत तिचे माझ्यावर. तिला शब्दानेही दुखावणं मला चालणार नाही. लग्नाच्या बाबतीत माझी फक्त हीच एक अट आहे. बाकी मला हुंडा वगैरे काही नको. चालणार असेल तर सांगा."

बघायला आलेला मुलगा साधी चौकशीही न करता फक्त आपल्या आईबद्दलच्या अपेक्षा सांगतो हे बघून संगिताला सरळ नकार द्यावासा वाटत होता. पण आपल्या दोन बहिणींचे, शिक्षण सुरू असलेल्या भावाचे चेहरे समोर आले आणि तिने होकारार्थी मान हलवली. निराश होऊन ती खाली जायला निघाली. तोच पाठून आवाज आला.

" संगीता.." पहिल्यांदाच एवढ्या प्रेमाने कोणत्यातरी मुलाने तिला हाक मारली होती. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती थांबली. सुधीर जवळ आला.

" तू खरंच खूप छान आहेस. मी तुला सुखात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मला साथ देशील?" तो तिच्या डोळ्यात बघत होता. त्याच्याकडे बघताना तिची खात्री पटली की आपला होकार चुकीचा नाही. लाजूनच ती कशीबशी हो म्हणाली. आणि तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली.
सुधीरची फक्त एकच अट होती. ती पूर्ण करायला जमेल का संगीताला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//