गहरी चाल - भाग ४

रहस्य कथा
कथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा

गहरी चाल (भाग - ४)

दुसऱ्या दिवशी सकाळीच मीकलीला लष्करी इस्पितळात दखल केले. तिच्या वॉर्डमध्ये अन्य कोणताही पेशंट नव्हता. ती एकटीच होती कारण, या गुप्त मिशनची पुरेपूर काळजी घेण्यात येत होती.

डॉ. गालीमी त्यांच्या केबिनमध्ये डॉ. करमोडा यांची वाट पाहत बसल्या होत्या. इतक्यात डॉक्टर करमोडा आले.

"या डॉक्टर करमोडा. मी तुमचीच वाट पाहत होते." डॉ. गालीमी काहीश्या तणावात असल्यागत म्हणाल्या.

"डॉ. गालीमी तुम्ही थोड्या टेन्शनमधे वाटताय?" डॉ. करमोडानीं विचारले.

"काही नाही डॉ. करमोडा असंच!" त्या म्हणाल्या.

"ठीक आहे, मी तुमची अडचण आणि दुविधा समजु शकतो. पण आपल्याला हे धाडस करावच लागणार डॉ. गालीमी." डॉ. करमोडा त्यांना समजावत म्हणाले.

"हो डॉ. करमोडा ते तर करावेच लागेल. बरं! ती मायक्रोचीप आणि बौम्बौलचे इंजेक्शन्स द्या." डॉ. गालीमीनीं विनंती केली.

त्याच बरोबर डॉ. करमोडा यांनी बॅगेतून एक छोटी कुपी व दोन औषधाच्या बाटल्या काढल्या. छोट्या कुपीत मायक्रोचीप तर दोन बाटल्यात बौम्बौल व बौम्बौल-१ हे औषध होते.

"डॉ. करमोडा मी एक डॉक्टर आहे. खरंतर वैदकशास्त्र यासाठी मला परवानगी देत नाही. मात्र फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी हे करतेय." डॉ. गालीमी म्हणाल्या.

"अगदी बरोबर डॉ. गालीमी पण माझा देखील नाईलाज आहे." डॉ. करमोडा मोठा श्वास टाकत म्हणाले.

डॉ. गालीमीनीं अत्यंत आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे ती मायक्रोचीप कुमारी मीकलीच्या शरीरात बसवली. शस्त्रक्रिया करण्यसाठी प्रगत साधनांचा वापर केल्यामुळे तिच्या शरीरावर याचा कोणताही व्रण नव्हता. त्याचबरोबर या शस्त्रक्रियेचा तिला कसलाच त्रास झाला नाही.

डॉ.करमोडानीं मीकलीच्या शरीरात मायक्रोचीप व्यवस्थित काम करते की नाही? याची त्यांच्याकडे असणाऱ्या संपर्क साधनांने तपासणी देखील केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चीप अगदी व्यवस्थित काम करत होती.

संध्याकाळच्या सुमारास कुमारी मीकलीला बौम्बौल लस देवून डॉ. गालीमी यांनी तिला आराम करायला संगितले. आज डॉ. करमोडा यांचा मुक्काम लष्करी इस्पितळातच होता. का कुणास ठाऊक पण डॉ. करमोडा आणि डॉ. गालीमी यांच्या चेहऱ्यावर खूपच ताण आहे हे स्पष्ट दिसत होते. केबिनमधे दोघंही चर्चा करत असतांना नर्सने निरोप आणला की, पेशंटला खूपच ताप आलाय. सगळं अंग थरथर कापत आहे. निरोप मिळताच दोघंही तडक मीकली जवळ पोहोचले. डॉ. गालीमीनीं तिला तापासले खरंच तिचं शरीर एखाद्या भट्टीप्रमाणे तापले होते.

"कुमारी मीकली काळजी करु नकोस हा बौम्बौल इंजेक्शनचा प्रभाव आहे. या औषधाचा तुझ्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीशी समन्वय साधायला वेळ लागेल." डॉ. गालीमी यांनी तिला समजावलं.

"डॉ. उलट तुम्ही काळजी करु नका मला फक्त ताप आलाय मी व्यवस्थीत आहे." मीकली शांतपणे म्हणाली. खरंतर तिची अवस्था पाहून कोणीही संगितले असते की, तिला खूपच त्रास होत होता पण मानसिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या मीकलीला त्याचे काहीच वाटत नव्हते.

\"कुमारी मीकली मला माफ कर सध्या मी तुला यावर कोणतेच औषध देऊ शकत नाही, कारण तशी डॉ. करमोडा यांची परवानगी नाही.\" डॉ. गालीमी मनातल्या मनात म्हणाल्या.

साधारणतः दोन तास डॉ.करमोडा व डॉ. गालीमी तिच्या उशाशी बसुन होते. आता बराचसा ताप कमी झाला होता. तीन चार तासांनी मीकलीची तब्येत सामान्य झाली तेव्हा कुठे डॉ. करमोडा यांच्या चेहऱ्यावर पुसट हास्य दिसले.

रात्र बरीच झाली होती. मीकलीची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली तसेच आता तिची तब्येत एकदम सामान्य आहे ही बातमी डॉ. करमोडानीं देशाचे अध्यक्ष व लष्कर प्रमुखांना दिली. खरंतर रात्री उशिरापर्यंत ते या बातमीकडे नजर लावून होते त्यामुळे बातमी ऐकताच दोघांनाही आनंद झाला आणि त्यांनी डॉ. करमोडा व डॉ. गालीमीचे अभिनंदन केले.

"सुप्रभात कुमारी मीकली. आता कसं वाटतंय?" डॉ. गालीमीनीं विचारले. त्यांच्या सोबत डॉ. करमोडाही होते.

"मी एकदम मस्त आहे डॉक्टर; हा! थोडं डोक दुखतंय बाकी काही नाही." ती म्हणाली.

"अजुन काही त्रास?" डॉ. करमोडानीं विचारले.

"नाही सर, फक्त रात्री ताप ओसरल्यावर खूपच घाम आला होता. त्या घामाचा वास फार विचित्र होता. कदचित त्या वासामुळेच डोक दुखतंय अस वाटते." ती म्हणाली.

"ठीक आहे, कुमारी मीकली अजुन काही वाटलंच तर डॉ. गालीमी आहेतच त्यांना सांग!" ते म्हणाले.

"हो सर!" ती स्मित करत म्हणाली.

मीकलीची तब्येत आता एकदम स्थिर होती. नियोजनाप्रमाणे तिला पाच दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार होते.

दररोज संध्याकाळी डॉ. करमोडा येत व मीकलीची चौकशी करत. पाचव्या रात्री तर गुप्तपणे देशाचे अध्यक्ष देखील मीकलीची चौकशी करून गेले. त्यामुळे मीकलीला मनस्वी आनंद झाला. ती स्वतःला भाग्यवान समजत होती की, या मिशनसाठी तिची निवड झाली.

"कसं वाटतंय कुमारी मीकली?" डॉ करमोडा यांनी पाचव्या दिवशी तिला विचारले.

"सर, बरं वाटतंय आता डोकदुखीही गेली. सध्या मला काही त्रास नाही." मीकली आनंदाने म्हणाली.

"ठीक आहे, आज तुला डिसचार्ज दिला जाईल. अजून तीन दिवसांनी तुला ते दुसरे इंजेक्शन दिले की, मग तू मिशनसाठी सज्ज! मग तुला आजारांचा फारसा धोका राहणार नाही." डॉ. करमोडा म्हणाले.

"हो सर!" ती म्हणाली.

त्या दिवशी मीकलीची रवानगी लष्करी इस्पितळातून पुन्हा एकदा प्रशिक्षण कॅम्पमध्ये करण्यात आली. तीन दिवसांनी पुन्हा तिला लष्करी इस्पितळात नेले जाणार होते.

"डॉ. गालीमी, बाकी मानलं पाहीजे कुमारी मीकलीला मानसिकदृष्ट्या खूपच सक्षम आहे ती. आपण अगदी योग्य निवड केलीये." डॉ. करमोडा आनंदाने म्हणाले.

"हो नक्कीच डॉ. करमोडा." डॉ. गालीमीनीं त्यांना दुजोरा दिला.

क्रमशः....

©®चंद्रकांत घाटाळ
पालघर जिल्हा