गहरी चाल भाग ३

रहस्य कथा
कथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा

गहरी चाल (भाग -३)

कुमारी मीकलीचे प्रशिक्षण चालू होते. तिच्या स्पेशल प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी अधून- मधून स्वतः लष्करप्रमुख व डॉक्टर करमोडा येत असत.

या स्पेशल ट्रेनिंगमध्ये बोन देशातील भाषा, चालीरीती तसेच संस्कृतीची परिपूर्ण माहिती; तेथील कथीत लष्करीतळ, आतंकी कॅम्प, तेथील भौगोलिक, ऐतिहासिक अशी सगळी माहिती मीकलीला दिली जात होती.

मीकलीचे स्पेशल ट्रेनिंग आज पूर्ण होणार होते. उद्या तिला डॉ. करमोडा व लष्करप्रमुख त्या गुप्त मिशनची माहिती देणार होते.

दुसऱ्या दिवशी लष्करप्रमुख यांच्या कार्यालयात डॉ. करमोडा सकाळीच आले. त्यांच्या बरोबर एक महिला देखील होती.

"या, कुमारी मीकली बसा!" लष्कर प्रमुखांनी तिला बसायला संगितले.

"कुमारी मीकली या आहेत डॉ. गालीमी." लष्करप्रमुखांनी डॉ. करमोडा यांच्यासोबत आलेल्या महिलेची ओळख करून दिली.

मीकलीने त्यांच्याकडे पाहून स्मित केले.

"तर कुमारी मीकली आपली गुप्त योजना अशी आहे की, तू पूलोन देशाच्या आतंकी कॅम्पमध्ये सामील व्हायचे आणि तिथून त्यांच्या ज्या काही आपल्या देशविरोधी योजना किंवा कटकारस्थाने असतील त्याची माहिती आम्हाला द्यायची. मग त्या माहितीच्या आधारे आपण पूलोन देशाच्या करवाया रोखून आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकतो. आता पूलोन देशातील आतंकवादी आणि त्यांचं गुप्तहेर खाते इतकेही मंदबुद्धी नाही की, तुला सहजासहजी त्यांच्या संघटनेत सामील करून घेतील. ते तुझी सगळी माहिती काढतील तेव्हाच तुला त्यांच्या संघटनेत सामील करून घेतील. तर आता तुझी समाजमाध्यमांवर आधीच सगळी खोट्या नावाची खाती बनवली आहेत. त्यात तुझा धर्मही बदलला आहे. आता तू बोगी म्हणजेच त्यांच्या धर्माची आहेस. त्यांवर आपल्या बोन देशावरील आक्षेपार्ह पोस्ट आम्ही तुझ्या खोट्या नावाने पोस्ट केल्या आहेत. त्या पोस्टवरुन तुझा बोन देशावर किती राग आहे आणि आपल्या बोगी धर्माच्या प्रसारासाठी तू काहीही करु शकतेस अश्या स्वरूपाचे संदेश आहेत, जे तुला त्यांच्या संघटनेत सामील व्हायला मदत करतील. आता या डॉक्टर गालीमी आहेत त्या मेडिकलच्या डॉक्टर आहेत. त्या तुझ्या शरीरात शस्त्रक्रिया करून एक मायक्रोचीप बसवतील त्यामुळे तुझं करंट लोकेशन व तुझ्याशी झालेले संवाद व इतर आवश्यक माहिती आम्हाला इथे समजेल. या मिशनमध्ये तुला त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ रहायचे आहे म्हणजे आपल्याला यथायोग्य माहिती मिळत राहील. तुझ्या शरीरात चीप बसवल्यानंतर तुला बौम्बौल नावाची लस टोचली जाईल. त्यानंतर पाच दिवस तुला डॉ.गालीमी यांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. त्यानंतर सहाव्या दिवशी तुला बौम्बौल-१ नावाची लस टोचली जाईल त्यानंतर अजून पाच दिवस तुला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाईल. बौम्बौल आणि बौम्बौल-१ या लसी तुझी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी असतील कारण पूलोन देश भौगोलिक विस्ताराने फार मोठा आहे. तेथील वातावरणही फार भिन्न -भिन्न आहे. तुला कोणताही आजार अथवा इन्फेक्शन होऊ नये यासाठी ती दोन्ही इंजेक्शन्स असतील.

आता तू त्यांच्या आतंकवादी संघटनेत सामील कशी होशील? तर; त्यांची जी साईट आहे त्यात तू तुझ्या समाजमाध्यम अकाऊंटवरुन संदेश पाठवायचा की, मला बोगी धर्माचा प्रसार करण्यासाठी आपल्या संघटनेत सामील व्हायचे आहे. मी आपल्या धर्म प्रसारासाठी वेळ पडल्यास प्राणाची आहुती देऊ शकते. तरी मला आपल्या धर्माची सेवा करण्याची संधी मिळावी ही विनंती. असा संदेश पाठवल्यानंतर तुला लगेचच प्रतिसाद मिळणार नाही. ते तुझी कसून तपासणी करतील. तुझी समाजमाध्यमाची अकाउंट तपासतील. अर्थात ती सगळी खोटी माहिती असेल पण त्यांच्या दृष्टिकोनातून मात्र ती खरी असेल. त्यांची खात्री झाल्यानंतर ते तुला प्रतिसाद देतील. काय? कसं? कुठे? आणि कधी यायचे? ते त्यानंतर आपण पुढचे नियोजन करु. तुला काही शंका असल्यास विचारू शकतेस." डॉ. करमोडा यांनी सगळी गुप्तीत योजना कुमारी मीकलीला समजावत विचारले.

"सर मला त्यांच्या संघटनेत सामील करून घेतील?" कुमारी मीकलीची शंका तिने बोलून दाखवली.

"हो नक्कीच! कारण तीन महिन्यापूर्वी आपल्या देशातल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सात मुलांनी त्या संघटनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात तीन मुलींचाही समावेश होता. तसं ती सगळी त्यांच्याच बोगी धर्माची होती म्हणा!; पण चौकशीनंतर समजले की त्यांची खरी अडचण आर्थिक होती. ते सगळे अतिशय गरीब कुटुंबातील मुलं होती."

"सर, मला आपल्याकडे संदेश पाठवायचा असेल तर ती चीप कश्या प्रकारे वापरायची?" तिने विचारलं.

"त्याची काळजी नको. ती चीप तुझ्या शरीरात कायम ऍक्टिव्ह असेल. फक्त तुला संदेश पाठवायचा असेल तर तू बाजुला एकांतात जे बोलशील ते सर्वच इकडे ऐकू येईल." डॉ. करमोडा म्हणाले.

"सर माझा फोन?" तिची पुढची शंका.

"त्याचीही काळजी नको, कारण तुझा फोन तू सामील झाल्यावर जप्त करतील किंवा तुला त्यांच्याकडून नवीन फोन देतील. एक मात्र लक्षात ठेवायचे इकडे कधीही फोन लावायचा नाही. खरंतर तू लावूही शकणार नाहीस कारण इथले कोणतेही संपर्क क्रमांक तुला दिले जाणार नाहीत. तसं तुला फोन करायची काही गरजच पडणार नाही कारण त्या चीपद्वारा तू आमच्याशी पूर्णवेळ संपर्कात राहशील." डॉक्टरांनी तिला व्यवस्थित समजावलं.

"सर,माझी आयडी?" तिने विचारलं.

"हे घे तुझं ओळखपत्र. आजपासून तुझं नाव आहे; "कोकू लीन!" याच नावाने तुझी आता ओळख असेल. याच नावाची तुझी सगळी कागदपत्र आहेत. तर मग उद्या डॉ. गालीनी तुझ्यावर शस्त्रक्रिया करून ती चीप तुझ्या शरीरात बसवतील. तेव्हा उद्या सकाळी पुन्हा भेटू. अजुन काही शंका?" डॉ. करमोडा यांनी विचारले.

"नाही सर!" कुमारी मीकलीने सॅल्यूट मारुन संगितले.

क्रमशः...

©®चंद्रकांत घाटाळ
पालघर जिल्हा