गहरी चाल भाग-२

रहस्य कथा
कथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


गहरी चाल (भाग-२)

डॉ. करमोडा आपल्या लॅबमध्ये काम करत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर बराच आनंद दिसत होता. त्यांचे संशोधन पूर्ण झाले असावे असा अंदाज येत होता आणि खरोखरच त्यांचे एक महत्वाचे संशोधन; ज्याची काहीच परीक्षणे बाकी होती ते पुर्ण झाले होते. लगेचच त्यांनी ही बातमी देशाचे अध्यक्ष व संरक्षणमंत्र्यांना दिली. दोघांनीही डॉ. करमोडा यांचे अभिनंदन केले.

या आनंदाच्या क्षणीच एक अतिशय दुःखाची बातमी त्यांच्या कानावर आली. त्यांच्या देशावर आज पुन्हा आतंकी हल्ला झाला आणि हा हल्ला इतका मोठा आणि भयानक होता की, दोन हजारांच्यावर लोकं या हल्ल्यात मारली गेली. जखमींची तर गणतीच नाही. आजपर्यंत बोन देशावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता, कारण दोन हजारच्यावर लोकं मारली गेली होती. हा आतंकी भ्याड हल्ला कोंरु या देशातल्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये करण्यात आला होता. ज्यात चार चिटपत्रगृह होती तसेच शेकडो हजारो लोकं येथे खरेदीसाठी येत. आतंकवाद्यांनी संपूर्ण मॉलच बॉम्बने उडवला. अजून कितीतरी लोकं या ढिगाऱ्याखाली गाडली होती. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.


या घटनेमुळे संपूर्ण बोन देशात शोककळा पसरली. देशाच्या अध्यक्षांनी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आणि संध्याकाळी टीव्हीवरुन बोनवासीयांसाठी फार भावूक तरीही जनतेचे मनोबल कमी होणार नाही असे भाषण केले आणि सगळ्यांनी एकसंघ राहून या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केले. खास करून तरुण वर्गाने देशाच्या सुरक्षेत योगदान दिले पाहिजे असे ते म्हणत होते. अध्यक्ष पुढे आपल्या भाषणात म्हणाले; "आपला बोन देश लहान आहे त्यामुळे पुरुषांबरोबर महिलांचा देखिल आपल्या सैन्यात मोठा सहभाग आहे. आपल्या देशात वर्षातून दोन वेळा सैन्य भारती होत असते. त्यातून निवडक तरुण - तरुणींना लष्करात काम करण्याची संधी मिळते. आपले लष्कर मर्यादित आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनीही आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत जागृत राहिले पाहीजे. कुणीही एखादी संशयित व्यक्ती आढळली तर त्याची बातमी प्रशासन व्यवस्थेला द्यावी. आपला हेल्पलाईन क्रमांक सर्वांना माहिती आहेच. पुन्हा एकदा देशांतर्गत सुरक्षा सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे आणि ते आपण बजावले पाहिजे, कारण देश आपला आहे. आपण जर बेफिकीर राहिलो तर आपल्याला पारतंत्र्यात जावं लागेल." असं भावनिक आवाहन करून अध्यक्षांनी भाषण संपवले.

कालच्या दुर्दैवी घटनेमुळे आज अध्यक्षांनी डॉ. करमोडा यांच्या विनंतीवरुन एक विशेष गुप्त सभा त्यांच्या कार्यालयात लावली. या सभेसाठी अध्यक्ष, लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व डॉ. करमोडा अशी चारच लोकं उपस्थित होती. डॉ. करमोडा यांनी देशाच्या सुरक्षेसाठी नक्कीच एखादी नवीन योजना तयार केली असेल असा अंदाज होता. त्या बंद दाराआड नक्की काय चर्चा झाली? हे चार लोकांशिवाय कोणालाही माहिती नव्हते. मात्र एखाद्या गुप्त योजनेसाठी डॉ. करमोडा यांनी त्यांची परवानगी घेतली हे नक्की.

"नमस्कार सर, तुम्ही मला बोलवलत?" लष्करप्रमुखांना सॅल्यूट मारत एका सुंदर तरुण लेडी ऑफिसरने विचारले.

"हो, कुमारी मीकली महत्त्वाचे काम आहे. आधी तुझी ओळख करून देतो. हे आहेत डॉ. करमोडा! आघाडीचे वैज्ञानिक आणि आपल्या देशाचे सुरक्षा सल्लागार." लष्कर प्रमुखांनी डॉ. करमोडा यांची ओळख त्या महिला अधिकाऱ्याला करून दिली.


"हो सर, डॉ. करमोडा साहेबांना आपल्या देशात कोणी ओळखत नाही असं शक्यच नाही. मी त्यांना चांगलीच ओळखते. खरंतर मी त्यांची मोठी फॅन आहे. खूप दिवसापासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून फार फार आनंद झाला सर." मीकली म्हणाली


"कुमारी मीकली, आपल्या लष्करात अनेक साहसी आणि हुशार महिला अधिकारी आहेत, पण लष्करप्रमुखांनी तुझे नाव सुचवले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुझे वय, तुझी हुशारी आणि तुझे सौंदर्य! मी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी एक गुप्त योजना आखली आहे. या गुप्त मिशनसाठी तुझी निवड करण्यात आली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव या मिशनमध्ये तुझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे हा निर्णय तूच घ्यायचा आहेस. तुला कुठल्याही प्रकारची भीती किंवा इतर काही अडचण असेल तर सांग." डॉ. करमोडानीं विचारले.


"त्यात कसली अडचण असेल सर? खरंतर या गुप्त मिशनसाठी माझी निवड झाली ही माझ्यासाठी फार फार भाग्याची गोष्ट आहे. या मिशनमध्ये माझ्या मातृभूमीसाठी जर माझ्या प्राणांची आहुती जात असेल तर मला आनंदच आहे." मीकली आनंदाने म्हणाली.

"ठीक आहे, उद्यापासून पाच महिन्यांचे तुझे स्पेशल ट्रेनिंग असेल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरच तुला या गुप्त मिशनची माहिती देण्यात येईल, कारण पूलोन देशाचा गुप्तचर विभागाला याची कानोकान खबर होता कामा नये. नाहीतर आपले मिशन सुरु होण्याच्या आधीच संपून जाईल." डॉ. करमोडानीं काळजी व्यक्त केली आणि काही सेकंद थांबून पुन्हा बोलू लागले; "कारण पूलोन देशाकडे रोम्बो आणि कुलीक सारखे हुशार वैज्ञानिक आहेत. जे आपली योजना उधळून लावू शकतात." डॉ. करमोडा हे रोम्बो आणि कुलीक यांना चांगलच ओळखत होते कारण ते दोघेही त्यांचेच शिष्य होते. देशाच्या विभाजनापूर्वी ते दोघं डॉ. करमोडा यांच्याच हाताखाली काम करत होते.

सगळ्यांचेच चेहरे थोडे चिंताक्रांत झाले होते. तो दिवस आणि ती सभा तशीच तणावात संपली. पुढच्याच दिवसापासून कुमारी मीकलीचे स्पेशल ट्रेनिंग सुरु झाले. पहिल्याच दिवशी तिला जाणवले की, आपण लष्करभरती नंतर जे ट्रेनिंग घेतले होते त्याच्यापेक्षा हे कितीतरी वेगळे आहे. या ट्रेनिंगचे अनेक भाग होते. यात शारीरिक तसेच वेगवेगळ्या परिस्थीतीत मानसिकस्थिती कशी ठेवायची? याचाही समावेश होता.

क्रमशः.....

©®चंद्रकांत घाटाळ
पालघर जिल्हा