गौरी आणि खजिना (भाग-३)

Marathi blog, marathi katha, gauri and treasure, treasure hunt

        गौरीचा प्रवास पूर्वेच्या दिशेने सुरु होतो. थोडं अंतर पुढे गेल्यावर तिला समोर तीन गुहा दिसतात; पण आता यात नक्की कोणत्या गुहेत म्हातारी पर्यंत जाण्याचा मार्ग असेल असा विचार करत गौरी थोडावेळ तिथेच थांबते आणि गुहांचं निरीक्षण करायला लागते. पहिल्या गुहेच्या प्रवेश द्वारावर कोळ्याने विणलेले जाळे असते म्हणजे यात कोणी नसणार कारण  जर कोणी असते तर ते जाळे तिथे टिकले नसते. दुसऱ्या गुहेच्या दारापाशी भला मोठा दगड पडलेला असतो त्यात माणूस ये जा करूच शकणार नाही एवढी लहान जागा असते, म्हणजे आता राहिली तिसरी गुहा! गौरी तिसऱ्या गुहेत जाते; गौरी म्हातारीला पाहते. अत्यंत अक्राळ - विक्राळ दिसणारी ती म्हातारी खरंच खूप भयानक दिसत असते. त्यात गुहेत लावलेल्या मशालीच्या उजेडात तिचं रूप अजूनच उग्र वाटत असतं. एक डोळा फुटलेली, केसांचं झालेलं  घरटं, एकच सुळ्यासारखा दात आणि सगळ्या नसा त्वचा फोडून बाहेर येतील कि काय अशी अवस्था. 

         आपली शूर आणि धाडसी गौरी म्हातारीच्या या रुपाला जराही घाबरत नाही हे पाहून म्हातारी म्हणते; "तू काही सामान्य दिसत नाहीस... मोठी धीट वाटतेस... इतके वर्ष कोणी इथे फिरकायची हिंमत सुद्धा केली नाही पण तू इथे येऊन न घाबरता उभी आहेस.... काय हवंय तुला.... का आलीस इथे??" गौरी म्हणते; आजीबाई मी गौरी! शौर्यपूर राज्यात ज्या राक्षसाने धुमाकूळ घातलाय त्या राक्षसाला तू पराभूत कर आणि राज्याला यातून मुक्त कर अशी विनंती तुला करायला आले आहे. म्हातारी म्हणाली; "ठीक आहे! पण मी विचारलेल्या तीन प्रश्नांची अचूक उत्तरं तुला द्यावी लागतील, जर तू अपयशी झालीस तर मात्र मी तुझा पुतळा बनवून टाकीन... आणि जीवाला मुकशील... मंजूर असेल तर सांग." गौरी ने प्रश्न विचारायला सांगितलं. म्हातारीने पहिला प्रश्न विचारला; "पंख नाहीत तरी मी उडतो, वेगवेगळ्या रंगात आणि आकारात सुद्धा मिळतो ओळखा पाहू मी कोण?" गौरी लगेच उत्तर देते; फुगा. 

          आता म्हातारी दुसरा प्रश्न विचारते; "रविवारी संध्याकाळी बकुळाच्या घरी तिच्या नवऱ्याचा हेमन चा खून झाला होता. खुनाची बातमी समजल्यावर पोलीस तिथे येतात आणि ४ संशयितांची चौकशी सुरु होते..... 

बकुळा :- मी मैत्रिणींबरोबर पार्टी साठी गेले होते.  तुम्ही त्यांना phone करून विचारू शकता, घरी आले तर यांचा खून झालेला दिसला आणि मी तुम्हाला बोलावलं.

आचारी :- मी रात्रीच्या जेवणासाठी भाजी आणायला गेलो होतो.

शेजारी :- आज दिवसभर मी घरातच होतो. वहिनींचा ओरडल्याचा आवाज आला म्हणून इथे आलो.

कामवाली बाई :- मी बँकेत गेले होते नवीन खातं काढायला तिथे मला खूप उशीर लागला म्हणून मी साहेबांच्या खोलीची सफाई न करताच निघत होते, त्यामुळे मला काही माहित नाही. 

पोलिसांना लगेच खुनी कोण ते समजत. सांग गौरी कोण आहे खुनी... आणि का?"

           गौरी लगेच सांगते कामवाली बाई. कारण रविवारी बँक बंद असते. आता म्हातारी तिसरा प्रश्न विचारते; "जेव्हा मी तरुण असते, तेव्हा उंच असते पण जस जसं माझं वय वाढत तशी मी लहान होत जाते." 

             

          काय वाटतंय गौरी याच उत्तर देऊ शकेल? राज्य राक्षसा पासून मुक्त होईल; कि गौरी चा जीव जाईल? पाहूया पुढच्या भागात...

   तुम्हाला काय वाटतं काय असेल याच उत्तर? Comment करून नक्की सांगा.

🎭 Series Post

View all