गौरी आणि खजिना (भाग-१०)

Marathi blog, marathi katha, gauri and treasure, treasure hunt, last part

        गौरी त्या विराण आणि अंधाऱ्या भागात पोहोचते. दोन पावलांवर काय आहे हे सुद्धा तिला दिसत नसतं. आता फक्त चाचपडत पुढे जाण्याशिवाय काही मार्ग नसतो तिच्या कडे, गौरी हळू हळू पुढे जाते. आता लवकरच सूर्य डोक्यावर येईल आणि दोन मिनिटांसाठी तिथे थोडा उजेड येईल हे गौरीला जाणवतं पण अजून तिला नीटसा रस्ता मिळालेला नसतो..... मशाल लावली तर खूप दाटीवाटीने वाढलेल्या झाडांमुळे आग लागण्याचा धोका! इतक्यात गौरीचं लक्ष हातात गुंडाळून ठेवलेल्या नकाशाकडे जातं; त्या नकाशात पारदर्शक फुल असल्यामुळे तो नकाशा चमकत होता आणि त्यातून थोडा उजेड येत होता. गौरी त्याच्या आधारे पुढे जाते आणि फुल असणाऱ्या ठिकाणी पोहोचते. आता कोणत्याही क्षणी उजेड येईल म्हणून सावध असणारी गौरी सगळीकडे बघायला सुरुवात करते! सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि उजेड पसरतो. गौरीच्या लक्षात येत मगाशी नकाशाच्या उजेडात फक्त एकच फुल दिसलं नव्हतं ते आता दिसतंय म्हणजे हेच ते काळ्या पानांचं फुल! गौरी फुल तोडते आणि नकाशावर ठेवते, आता नकाशा बदलतो आणि काटेरी पाकळ्या असलेल्या फुलाचा रस्ता दाखवतं! 

       काटेरी पाकळ्यांचं फुल एका वाळवंटी भागात असत आणि तो रस्ता तिथून तसा लांबच असतो! पण या फुलांची खासियत अशी असते की, सूर्य डोक्यावर आला की फक्त एका तासासाठीच हे उमलत! आता गौरीला तर उमलेलं फुल हवंय! ती पटापट १० मिनिटात वाळवंटी भागापर्यंत पोहोचते पण फुलापर्यंत पोहोचायला वेळ फार कमी असतो म्हणून गौरी एक शक्कल लढवते; ती बाजूलाच असणाऱ्या एका काटेरी झुडुपाचा बुंधा कापते, काटे काढते आणि त्याचा उपयोग एका बोटी सारखा करते. वाळू आणि उतार असल्यामुळे अवघ्या १० मिनिटात ती फुलापर्यंत पोहोचते! आणि फुलाच्या पाकळ्या बंद होणार इतक्यात ती फुल तोडून घेते आणि नकाशावर ठेवते. परत नकाशा बदलतो आणि पाचव्या आणि अंतिम फुल असणाऱ्या चौकोनी पानाच्या फुलाचा रस्ता त्यावर दिसू लागतो. हा रस्ता जात असतो सगळ्या कोड्यांनी भरलेल्या भागातून.... इथे गौरीला तीन टप्पे पार करायचे असतात, आणि ते जंगल जी कोडी विचारेल त्याची गौरीला विचारेल त्याची योग्य उत्तरं ही द्यायची असतात..... 

       गौरी पहिल्या टप्प्याच्या इथे येते! पाहिलंच कोडं असतं; "असा कोणता आवाज आहे ज्यामुळे स्वतःला तर त्रास होत नाही पण इतरांना होतो" गौरी लगेच उत्तर देते आपल्या घोरण्याचा आवाज! पहिला टप्पा पार..... आता दुसरा टप्पा..... "हिरवी हिरवाई हिरवागार रंग.... इटुकले, पिटुकले नक्षीदार अंग.... औषधाचा गडू.... पण चवीला कडू.... ओळखा पाहू कोण?" गौरी लगेच उत्तर देते, कारले!...... झाला दुसरा टप्पा पण पार.... आता तिसरा आणि अंतिम टप्पा.... मग गौरीला खजिन्याची चावी मिळणार..... "कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित, कधी गावातून, कधी शहरातून, कधी देशातून, कधी परदेशातून, गावोगाव चालू असतं याच मिरावण, तिकीट घेऊन ऐटीत लाल गाडीतून फिरणं, आता फोनमुळे कुणी फारसं विचारात नाही.... काळजाचा तुकडा हा फार आहे गुणी... ओळखा कोण?...." गौरी उत्तर देते पत्र.... 

        तिसरा टप्पा पण पार.... गौरीला आता समोर विविध आकाराच्या पानांची फुलं दिसतात.... ती चौकोनी पानांचं फुल शोधते आणि नकाशावर ठेवते..... नकाशा आता हवेत उडायला लागतो आणि पुढे जाऊ लागतो.... गौरी नकाशाच्या मागे मागे धावत जाते..... नकाशा एका तळ्यापाशी येऊन थांबतो! तळ्याच्या मध्यभागी एक कमळ असतं; सप्त रंगांचं ते कमळ खूप आकर्षक असतं! त्यात असते खजिन्याची चावी. पण त्या कमळापर्यंत गौरी पोहोचणार कशी?? तिथे होडी नसते आणि गौरीला तर पोहायला पण येत नाही... विचार करता करता गौरीला सुचतं हे तर जादूचं जंगल आहे इथे प्राणी, पक्षी, झाडं बोलतात... म्हणजे हे पाणी पण खास असणार म्हणून ती थोडा पाय पाण्यात घालून बघते तर काय आश्चर्य! ती पाण्यावर तरंगते! गौरी पाण्यावरून चालत जाऊन कमळ घेऊन येते आणि त्यातून खजिन्याची चावी बाहेर काढते! चावी सुद्धा अगदी कमळासारखी सप्तरंगी असते...  गौरीला आता खजिन्याची चावी तर मिळाली..... ती परीने सांगितल्या प्रमाणे परीला बोलावते..... परी प्रकट होते.... आणि गौरीला कमळ नकाशावर ठेवायला सांगते आणि मग परी जादूची कांडी फिरवून त्याचं रूपांतर एका इंद्रधनुष्यात होतं! 

        परी गौरीला सांगते; "या इंद्रधनुष्यावरून चालत जा.... पलीकडे गेल्यावर तुला खजिन्याच्या अनेक पेट्या दिसतील पण या चावी कडे बघून बरोबर पेटी ओळख आणि उघड.... तुला खजिना मिळेल आणि तू जिथून आलीस तिथे तुझ्या घरी पण पोहोचशील! .... गौरी परीचे आभार मानते आणि इंद्रधनुष्यावरून चालत जाते..... परीने सांगितल्या प्रमाणे तिथे खूप पेट्या असतात.... पण गौरीला पेटी ओळखणं खूप सोप्प जात.... कारण इतर पेट्यांवर इंद्रधनुष्याचे रंग चुकीच्या क्रमाने असतात आणि एकच पेटी असते जिच्यावर बरोबर; ता, ना, पी, हि, नि, पा, जा. या क्रमाने असतात.... गौरी खजिन्याची पेटी घेते आणि उघडते...... तिला सगळा खजिना पण मिळतो आणि आता ती घरी पोचलेली असते तिच्या अंथरुणावर..... ती डोळे उघडते आणि बघते..... स्वप्न म्हणावं तर खजिना खरच तिच्याकडे असतो.... आणि नाही म्हणावं तर आता नक्की काय घडलं हे पण तिला आठवत नसतं!....... आणि गौरीचा प्रवास इथेच संपतो...

        

            काय कसा वाटला आजचा भाग??? आणि कशी वाटली हि गौरी आणि खजिना ही संपूर्ण कथा??? Comment करून नक्की सांगा.... 

🎭 Series Post

View all