गौराई

About Goddess Gauri


गौराई

" किती छान सजावट ! गौराई खूप छान, सुरेख सजवल्या आहेत . साड्या,दागिने अगदी छान! कौतुक करावं तितकं कमी हो सुजाताताई. " हळदीकुंकवासाठी आलेल्या बायका सुजाताताईंना म्हणत होत्या.

" हे सर्व आमच्या लाडक्या गौराईचे म्हणजे मेघाचे काम. ती हे सर्व आवडीने,मन लावून करते. गौराईंचे आगमन होण्याच्या दोन तीन दिवस अगोदरपासून तिची तयारी सुरु होऊन जाते. तिचा आनंद, उत्साह पाहण्यासारखा असतो. कॉलेज, क्लास,अभ्यास हे सर्व सांभाळून ती गौराईची तयारी करते.मला स्वयंपाकात मदतही करते."
सुजाताताई आपल्या मेघाचे कौतुक करत त्यांना सांगत होत्या.

"तुमची मेघा खरचं खूप गुणी आहे. अगदी गौरीचेच रूप ! बायकांनीही मेघाचे कौतुक केले.

आपल्या लाडक्या लेकीचे कौतुक ऐकताना सुजाताताईंना आनंद होत होता.

मेघा ही सुजाताताई व आनंदरावांची मुलगी व आदित्य ची बहीण. देवाने दिलेले छान रूप, त्या रूपाला साजेसा छान स्वभाव. प्रत्येक कामात हुशार. सण-समारंभ असो किंवा काही कार्यक्रम मेघा प्रत्येक कार्यक्रम छान करायची..न कंटाळता आवडीने करायची . सर्व जण तिचे मनापासून कौतुक करायचे.
मेघाचे आईबाबा नेहमी म्हणायचे ,
"ज्या घरात मुली असतात ते घर हसरं असतं ."

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेघा एका कंपनीत नोकरी करू लागली. मुलींनी स्वावलंबी असावे , त्यांनी आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे मेघाच्या आईबाबांना वाटायचे . त्यामुळे मेघाला घरात पूर्ण स्वातंत्र्य होते. ती आपले जीवन छान एन्जॉय करत होती.

मेघाचे लग्नाचे वय झाले होते ; त्यामुळे घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला. आपल्या लाडक्या लेकीला चांगला नवरा,चांगले सासर मिळावे याच अपेक्षेने आईबाबा मेघासाठी स्थळ शोधू लागले.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मेघाला शोभेल असा रूपवान, गुणवान महेश तिला जीवनसाथी म्हणून मिळाला.

लग्नसोहळा छान झाला. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले.

नव्या नवलाईचे दिवस संपले आणि मग सुरू झाले रोजचे रूटीन... रोजची घरातील कामे आणि नोकरी यात मेघा रमू लागली.

घरात सगळे काही व्यवस्थित होते. प्रेमळ नवरा, आईवडिलांसारखे सासूसासरे, बहिणीप्रमाणे नणंद. मेघाही आपले कर्तव्य, जबाबदारी व्यवस्थित सांभाळीत होती. पण तिच्या मनाला एक गोष्ट खटकत होती. घरात सासूबाई सांगतील त्याप्रमाणेच सर्व होत होते. मेघाला सुरूवातीला वाटायचे , \"आपण या घरात नवीन आहोत म्हणून त्या अशा वागत असतील .\" पण लग्नानंतर 7,8 महिने होत आले तरी , मेघाने स्वतःच्या आवडीचा एकही पदार्थ कधी केला नाही.. तिला कधी करू दिला नाही. घरातील कोणत्याही गोष्टीत तिला कधी विचारात घेतले नाही. तिचे मत विचारले नाही. तिला घरात राहूनही परक्यासारखे वाटायचे. आपलेपणा कधी जाणवतचं नव्हता.
मेघाला तर सर्वच कामांची हौस होती.त्यामुळे ती विचार करून दुःखी व्हायची. \"माहेरी आईला आपण कामांमध्ये मदत करायचो आणि आई आपले कौतुकही करायची. आपले काही चुकले तर अधिकाराने आपल्याला रागवायची,शिकवायची.
पण सासरी..सासूबाईंना आपल्या कोणत्याही कामाचे कौतुक तर नाहीच आणि सून म्हणून आपल्याला काही अधिकारही नाही.\"

सासूबाईंच्या मनात काय आहे ? त्या आपल्याशी असे का वागतात? ते मेघाला समजत नव्हते. ती महेशशी या विषयावर बोलली;पण काही फायदा झाला नाही.

सासूबाईंना आपल्या कोणत्याही कामात मेघाचा हस्तक्षेप आवडत नव्हता. त्यांच्या बोलण्यात नेहमी \"माझे घर ...माझा संसार.. माझा मुलगा ...अशीच वाक्ये असायची. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर मेघाचा अधिकार नाही हेचं त्यांना दाखवायचे होते. त्यांनी मेघाच्या मनात सासू म्हणून एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली होती.
मेघाशी कामापुरतं बोलणं, तिला जी कामे सांगितली तेवढीचं तिने करायची . मेघाच्या आवडीनिवडींना तर त्या विचारातही घेत नव्हत्या.

मेघा घरातील आपल्याला ठरवून दिलेली कामे व नोकरी करत संसार करत होती. पण मनाने आनंदी नव्हती. माहेरचे वातावरण व सासरचे वातावरण यात खूप फरक पडला होता.

आपल्या आईचे आणि वहिनीचे सासूसूनेचे नाते किती छान जमले आहे. आई वहिनीला आपल्याकडील सर्व रीतीरिवाज समजून सांगते. तिच्या गुणांचे कौतुक करते. दोघीही एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारतात. घरात अगदी खेळीमेळीचे वातावरण राहते.
आणि आपल्या इकडे सासूबाईंच्या चेहऱ्यावर कधी हसू पाहिलेच नाही. दिवसभर त्या सासूसूनांच्या मालिका पाहत असतात. आणि त्यांची मुलगी नंदा ही येऊन बसते. घराजवळच राहते त्यामुळे काम झाले की येते आईसोबत बोलायला.
तिही मेघाशी कधी मनमोकळे बोलत नव्हती.

मेघाला हेच समजत नव्हते की, आपण कुठे काही चुकत नाही तरीही या मायलेकी आपल्याशी असे का वागतात? फक्त सासूपणा,नणंदपणा दाखवायचा म्हणून अशा वागतात की अजून काही दुसरे कारण..?


मेघा माहेरी गेली की तिला बरे वाटायचे . आई बाबा, भाऊ ,वहिनी यांच्याशी बोलून तिला मनमोकळे वाटायचे.आईला सासूबाई, नणंद यांच्याबद्दल सांगितल्यावर आई म्हणायची," प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात गं.तू नको वाईट वाटून घेऊस , तू फक्त तुझे काम व्यवस्थित करत रहा. होईल हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी समस्या असतातचं गं ...आपण फक्त त्यातून आपला मार्ग शोधला पाहिजे. गौराईच्या कृपेने होईल सर्व चांगले. "


असेचं दिवस,महिने जात होते. मेघाच्या लाडक्या गौराईंच्या आगमनाचे दिवस जवळ आले. मेघाला आनंद झाला. माहेरी आपण जसे करायचो तसे आता सासरीही करू. असे तिला वाटले.

" आई,आपल्या घरी गौराई येणार म्हणून मी उद्यापासून सुट्टी घेणार आहे. गौराईंसाठी सजावट ,फराळाचे पदार्थ, नैवेद्य आपण दोघी मिळून करू ." मेघाने उत्साहाने सासूबाईंना सांगितले.

सासूबाई तिला म्हणाल्या," नको तू काही सुट्टी वगैरे घेऊ नकोस.मी व नंदा आम्ही करून घेऊ सर्व. दरवर्षी आम्ही दोघी करतोच ना..."

सासूबाईंचे बोलणे मेघाच्या मनाला लागले . तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. सासूबाईंच्या सर्व गोष्टींना मी मनावर घेत नाही. उगाच वाद ,भांडणे नको म्हणून ऍडजस्ट करते आहे..पण घरातल्या सूनेला गौराईचे काहीच करू देत नाही म्हणजे ...काय अर्थ आहे अशा वागण्याला?

मुली,सूना या पण गौराईचेच रूप ना! घरातील प्रत्येक स्त्री ही गौराईच असते. ती आनंदी,समाधानी असली तर घर प्रसन्न राहते.आणि प्रसन्न घरातच गौराई शोभून दिसतात.

घराघरात गौराईंचे मोठ्या थाटात,उत्सवात स्वागत होते. त्यांना छान छान साड्यांनी,दागिण्यांनी सजवले जाते. वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. मनोभावे सेवा केली जाते. पण घरातील स्त्री दुःखी असेल तर ...खरचं गौराई आनंदी होतील ? चांगला आशिर्वाद देतील ?
सणसमारंभ साजरा करण्यामागे काही तरी उद्देशही असतो. नात्यांमधील दुरावा संपून नात्यात प्रेम निर्माण व्हावे. सर्वांनी आनंदाने राहवे.

मेघाला सासूबाईंचा खूप राग आला होता आणि अशातच माहेरी निघून जावे . असे तिला वाटले. पण आपल्या घरी गौरीपूजन होईल , हळदीकुंकवासाठी बायका येतील. आपल्याबद्दल विचारतील. आपण नसलो तर तर्कवितर्क सुरू होतील. असा विचार करून मेघा सासरीच थांबते. सासूबाईंनी व नणंदबाईंनी तिला गौराईचे काहीच करू दिले नाही. फक्त हळदीकुंकवाच्या दिवशी बायकांसमोर तिच्याशी छान वागत होत्या. पहिल्यांदाच आपण गौराईसाठी काही करू शकलो नाही याचे मेघाला खूप वाईट वाटत होते. तिने मनापासून गौराईंची माफी मागितली.

मेघाला आपल्या सासूबाईंच्या, नंदेच्या वागण्याची सवय झाली होती. ती आता तिकडे दुर्लक्ष करून , आपल्या कामात लक्ष देवून आनंदी राहत होती.



एके दिवशी मेघाच्या सासूबाई घरात पाय घसरून पडल्या. हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी एक दोन महिने काही काम करायला नाही सांगितले.
सासूबाईंना वाईट वाटत होते आणि पुढच्या आठवड्यात गौराई येणार होत्या आणि आपण काही करू शकणार नाही याचे टेंशन आले होते.

मेघा तर आपले काम करतच होती पण सासूबाईंची सेवाही करत होती. मजबूरी म्हणून की काय त्या मेघाला कोणत्याही गोष्टीत विरोध करत नव्हत्या. तिने स्वतःच्या मर्जीने, आवडीने केलेले पदार्थ आनंदाने खात होत्या. मेघालाही बरे वाटायचे.

मेघाने कामावर सुट्टी घेऊन गौराईची तयारी केली. नणंदबाई होत्या मदतीला. त्यांच्या वागण्यात होणारा बदल मेघाच्या लक्षात आला. मेघाने केलेली सुंदर सजावट सर्वांनाच खूप आवडली होती. अगदी नणंदबाई व सासूबाईंनासुद्धा!
सर्व पदार्थही अगदी छान ,चविष्ट बनवले होते. हळदीकुंकवासाठी आलेल्या बायकांनीही यावेळेची सर्व तयारी पाहून मेघाचे भरभरून कौतुक केले. मेघाला तर खूपचं आनंद होत होता. आपल्या लाडक्या गौराईची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली.
यामुळे तिला होणारा आनंद तिच्या वागण्याबोलण्यातून ओसंडून वाहत होता.
सासूबाई व नणंदबाईंमध्ये झालेला बदल तिच्या मनाला सुखावून गेला.
तिला तिच्या आईचे बोलणे आठवत होते ,\" चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते. \"

तिने मनापासून गौराईला वंदन केले आणि सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केली.