गौराई माझी लाडाची

गौराई आगमन अगदी मनापासून केलेले आणि तिला भक्तिभावाने पूजियले
गौराई माझी लाडाची



"मृण्मयी, ह्यावेळी आपल्याला वेगळी आरास करायची आहे. तुझं घरातलं आवरून मदतीला लवकर ये, तुझ्याशिवाय मला तर बाई काहीच सुचत नाही."

"हो काकू, कशाला काळजी करताय तुम्ही? मी आहे ना!"
असे म्हणत मृण्मयी लगेच तयारीला लागली.

तिच्याही घरात दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले होते आणि आता समोरच्या काकूंकडे गौराईचे आगमन असते. मृण्मयीला भलती हौस तिचं सगळं करायची. ती तिच्या मनाची सगळी इच्छा त्या काकूंकडे पूर्ण करत असे. गेल्या पाच वर्षांपासून ती काकूंच्या गौराईचा सगळा कार्यक्रम छान पार पाडायची.

गौराईला आणण्यापासून ते त्यांचे विसर्जन करण्यापर्यंत मृण्मयी अगदी नेटाने सगळं करायची. ह्यावर्षी सुद्धा तिने वेगळीच आरास करण्याचे सुचवले काकूंना. त्यांनाही ते आवडले आणि दोघीही सामान आणायला बाजारात निघाल्या.

"काकू मी काय म्हणते, आपण साड्या ह्यावर्षी खणाच्या घेऊया का? आणि त्यावर संपूर्ण कोल्हापुरी साज घ्यायचा. थोडा महागात जाईल पण आपल्या गौराई खूपच सुंदर दिसतील."
मृण्मयी पटकन मनातले बोलून गेली. काकूंनाही तिचं म्हणणं आवडलं. त्या आनंदाने म्हणाल्या,

"बरं तू म्हणतेस तसेच करूया... हल्ली खणाच्या साडीची फॅशन आलीच आहे तर मग आपल्या गौराई पण नेसू दे खणाच्या साड्या."

जवळच्याच ओळखीच्या दुकानातून लाल पिवळ्या रंगांच्या दोन साड्या घेतल्या. रंगसंगती पण मृण्मयीनेच पसंत केली. बघताक्षणी तिला त्या साड्या मनात भरल्या. लाल पिवळा रंग म्हणजे हळदीकुंकवाचा रंग.

"कित्ती सुंदर दिसतील काकू आपल्या गौराई!"
मृण्मयी भलतीच खुश झाली. साडी खरेदी झाली आणि गौराईंसाठी दागिन्यांची खरेदीही झाली. हल्ली बाजारात गौराईला सजवण्यासाठी बरंच काही मिळतं, पण मृण्मयी होईल तितकं सगळं घरातच करायची.
अगदी फराळापासून सगळंच काकूंना करू लागायची. तिची ही तयारी पंधरा दिवस आधीपासूनच चालायची.

"गणपती आले की, मग जास्त मोकळा वेळ मिळत नाही, म्हणून आधीच तयारीत राहिलेलं बरं."
मृण्मयी मनातल्या मनात सगळं ठरवत होती. असा विचार करून त्या दोघी मिळून एक एक करून सगळं करून ठेवायच्या. चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंज्या सगळं सगळं करायच्या.
सुलोचना काकू आणि मृण्मयी ह्या दोघी शेजारी होत्या, पण कायम दोघी सोबतच दिसायच्या. जणू बघणारा त्यांना माय लेकीचं म्हणतील. काकूही मृण्मयीला खूप जीव लावायच्या. तिच्या दोन्ही मुली खेळायला काकूंकडेच असायच्या.

मधुरा आणि मंजिरी, दोघी मृण्मयीच्या मुली. मोठी सातवी तर छोटी मंजिरी पाचवीत होती. पोरीं तशा मोठ्या होत्या. सांगितलेलं सगळं कळत होतं त्यांना. त्याही मधेमधे लुडबुड करायच्या.

“मला करू दे ना आई."
असं म्हणून मृण्मयीकडे हट्ट करायच्या, पण मृण्मयी त्यांना कशालाच हात लावू देत नव्हती. दोघी मुली नेहमी आईला बघायच्या.

“ती किती छान मनापासून सगळं करायची गौराईसाठी. त्यांना साड्या घ्यायच्या त्यांना सजवायचं, त्यांच्यासाठी आरास करायची. फराळाच बनवायच, रांगोळी काढायची. इतकं सगळं आपली आई करते, पण मग ती काकूंकडे जाऊन का करते हे सगळं? मोठीला आता थोडं थोडं समजायला लागलं होतं; त्यामुळे ती आईला बरेच प्रश्न विचारायची.

"आई, आपल्याकडे का नाही बसवत तू गौराई?"
मधुराच्या एकदम अशा विचारण्याने मृण्मयीला विचारात टाकलं. कारण मनातून तिलाही वाटतं होतच की गौराई आपल्याही घरात यावी, पण सासूबाईंनी कधी तिचं ऐकलच नाही. त्या सरळ म्हणायच्या,

"आपल्याला गौराई बसवता येत नाही. याआधी आपल्यापैकी कोणीही बसवले नाही. असे म्हणतात की गौराई आपल्याला धार्जिन नाही."

सासूबाईंच्या या बोलण्याचा अर्थ मृण्मयीला तर समजला होता, पण
“आता याचा अर्थ कसा समजावून सांगू मधुराला?"
तिला प्रश्न पडला. काहीतरी सांगायचं म्हणून तिने मधुराला सांगितलं, पण तिला काही ते पटलं नाही. जोपर्यंत उत्तराच समाधान होत नाही तोपर्यंत मधुरा काही पाठ सोडायची नाही.

“आई आपण गौराई आणूया ना!"
मधुराने तिच्याकडे तगादाच लावला होता. अखरे मृण्मयीने मधुरा पुढे हार मानली.

“बरं बाई, आणूयात... यावर्षी आपल्याही घरी गौराई येईल."
तिचं बोलणं ऐकून शेखरने म्हणजेच मृण्मयीच्या नवऱ्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.

“मी सांभाळून घेईन सगळं."
तिने डोळ्यांनीच त्याला खुणावलं. घरी अगदी थाटात गणपती बाप्पा विराजमान झाले.

“यावर्षी आपल्या घरी गौराई आणायचं म्हणतेय मृण्मयी. नेमकं ही काय करणार आहे आता आणि कसं करणार आहे?”
तिचं बोलणं ऐकून शेखर विचार करू लागला. गौराईचा दिवस आला. मृण्मयीने काकूंच्या घरात मस्त तयारी केली होती. मधुरा तिच्या मागे मागे करत होती.

“मधुरा, थोडा वेळ एका जागी शांत बस बरं! काय सारखं मागे मागे करतेय."
मृण्मयीने तिला दम भरला तशी मधुरा तिच्यावर चिडून म्हणाली,

"आई तू मला म्हणाली होतीस ना, की आपल्या घरीसुद्धा गौराई येणार म्हणून... मग अजून तू इथेच आहेस. चल ना आपल्या घरी, गौराई तुझ्याआधी घरी आली म्हणजे? तिला कोण ओवाळणार मग?"
मधूराचे प्रश्न खरंच होते, पण त्याचाही विचार मृण्मयीने करून ठेवला होता. काकूंच्या घरातलं सगळं आवरून मृण्मयी तिच्या घरी गेली. तिने मधुरा आणि छोट्या मंजिरीसाठी नऊवारी साडी शिवून घेतली होती. ती त्या दोघींना घालायला दिली. त्यांना सगळे दागिने आणले होते ते घातले. कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आणि नाकात मोत्याची नथ. दोघींना सुंदर सजवून तयार केले. कुंकुवाचं पाणी करून हातावर पायावर मेहेंदीसारखे ठिपके ठेवले आणि बोटे रंगवली. दोघींना आरशासमोर उभं केलं.

"ह्या काय माझ्या गौराई! कित्ती सुंदर दिसताय दोघीही."
मधुरा खरंच खुप खुश झाली. दोघी मुली मुळात होत्याच देखण्या. त्यांना असे तयार केल्यावर अजूनच सुंदर दिसायला लागल्या होत्या त्या.

"आता चला बरं काकूंकडे, त्यांची गौराई घरात घ्यायची आहे आपल्याला."
असे म्हणून मृण्मयीने दोघींना तिकडे घेऊन गेली. काकूंनी मधुरा आणि मंजिरीला दारात उभं केलं. त्यांचे पाय धुतले. त्यांना ओवाळले आणि बाहेर ठेवलेला कळस उचलून घरात उजवा पाय टाकून यायला सांगितले. दोघींनी सांगितले तसे केले आणि काकूंनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या मागे मागे उत्तर देत म्हणायला लागल्या. काकूंनी प्रश्न केला.

"गौराई आली कशाच्या पाऊली?"

मधुराने उत्तर दिलं.
"सुख समृद्धीच्या..."

काकूंनी त्यांना पुन्हा प्रश्न केला.
"गौराई आली कशाच्या पाऊली?

"धनधान्यांच्या..."

"गौराई आली कशाच्या पाऊली?"
"भरभराटीच्या..."

"गौराई आली कशाच्या पाऊली?"
"ऐश्वर्याच्या..."

"गौराई आली कशाच्या पाऊली?"
"आनंदाच्या..."

असे पाच पावलं पूढे चालत आल्यावर हातातल्या गौराई खाली ठेवून त्यांना हळदीकुंकू लावले. मग नंतर मुखवटे घेऊन व्यवस्थित उभं करून त्यांना साड्या नेसवल्या सगळे दागिने घातले. दोन्ही गौरी छान सजल्या होत्या. नटलेल्या दोघी गौराई इतक्या सुंदर, की जणू आपल्याकडे हसून बघताय असेच भासत होते.

संध्याकाळी मृण्मयीने सोसायटीमधील बायकांना हळदीकुंकूला आणि गौराईचे खेळ खेळायला बोलावले. सगळ्या बायका दिलेल्या वेळेत हजर झाल्या. फुगड्या घातल्या, फेर धरले. छान छान खेळ खेळले. कळशी डोक्यावर घेऊन नाचल्या. सुपडं, लाटणं घेऊन खेळल्या. गौराईचे वेगवेगळे गाणे म्हटल्या, अगदी सगळे खेळ खेळून झाले. खूप मजा आली.

मृण्मयीने सगळ्यांना चहा नाश्ता दिला. हळदीकुंकू लावून त्यांच्या पाया पडल्या. सगळ्या म्हणत होत्या,

“मृण्मयी पोरींना अगदी छान सजवलेस हो... खऱ्या गौराई तर ह्या आहेत तुझ्या!"

"हो काकू, अगदी लाडाच्या आहेत माझ्या ह्या गौराई."

मधुराला हे ऐकून खूप छान वाटले, ती लगेच मंजिरीला जवळ बोलवून गणपती बाप्पा पुढे उभी राहिली. एक हात खाली आणि एक हात आशीर्वादासाठी वर धरला. सगळ्या जणी ते बघून भारावून गेल्या. बाकीच्या आलेल्या बायकांनी पटापट फोन बाहेर काढून त्यांनी आपापल्या कॅमेरामध्ये त्या दोघींचे फोटो काढले.

खरंच, आज खऱ्या अर्थाने गौराई मृण्मयीच्या घरी आल्या होत्या... तिला आशीर्वाद देण्यासाठी.


समाप्त.
सौ. तृप्ती कोष्टी ©®