गौराई माझी लाडाची ग

कथा एका सासुरवाशीण गौरीची..


गौराई माझी लाडाची ग..
गोष्ट छोटी डोंगराएवढी..


" तुझे हे सजलेले रूप ना फक्त बघत बसावेसे वाटते.. नऊवारी, केसांचा खोपा, त्यावर ती वेणी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात मोत्यांचा लफ्फा, पायात रूणझुणणारे पैंजण, हातात भरलेला हा चुडा.. हाय.. असे वाटते की अजुनही आपण पेशवाईतच आहोत."
" काहीतरी चहाटळ बोलणे तुझे. बाहेर देवीची स्थापना झाली आहे आणि तु मला हे सांगायला आत बोलावलेस..कमाल आहे बरे तुझी.." सुचेता कृतककोपाने म्हणाली.
" कमाल माझी नाही.. तुझी आहे. तुला एवढे नटायला सांगते कोण?"
" काढू का हे?"
" अजिबात नाही.."
" तू जवळ येऊ नकोस हं.."
" खरे?"
"बाहेर सगळे जेवायला बसले आहेत.."
" असू दे.."
" अरे आता लेक लग्नाला आली आपली.."
" असू दे.."
" श्रीरंग...."

" आई.. काय झाले? काही स्वप्न पाहिलेस का?" ईशा धावत आली.
" नाही ग.. असेच.." सुचेता स्वतःला सावरत म्हणाली.
" निघायचे मग खरेदीला?"
" मी तोंडावर पाणी मारून येते.. तू हो पुढे. निघण्याआधी आजी आजोबांना विचार काय हवे ते." सुचेता म्हणाली.
" आई..."
" काय ग?"
" बाबांशिवाय आपला हा पहिला गणपती ना?" सुचेता काहीच न बोलता गप्प राहिली.
" माझा तर ना विश्वासच बसत नाहिये, बाबा नाहीत यावर. मला खूप आठवण येते ग.." ईशा सुचेताच्या गळ्यात पडून रडायला लागली. सुचेताने तिला थोपटले.
" चल, आवर.. आजच जाऊन सगळी खरेदी करून येऊ.. गौरीची सुद्धा.. परत परत जायला नाही जमत.." सुचेता डोळे पुसत म्हणाली. दोघी खरेदीला निघाल्या. बाहेर श्रीरंगचे आईबाबा बसले होते. विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी फक्त हो, नाही मध्ये उत्तरे दिली. सुचेतासुद्धा मग काही जास्त न बोलता तिथून निघाली. आणलेले सामान तिने स्वयंपाकघरात ठेवले. सासूबाईंनी प्रसादाची तयारी ईशाच्या मदतीने सुरू केली. तर वरद, तिचा मुलगा बाहेर गणपतीचे साधेसेच मखर करत होता. सासरे दुर्वा, तुळस निवडत बसले होते. या सगळ्यामध्ये तिला एकटं पडल्यासारखे वाटत होते. ती आपल्या खोलीत जाऊन शांतपणे पडून राहिली. सुचेताला तिच्या सासूबाईंचे ओवळे सोवळे माहित होते. त्यामुळे तिने बाहेर न जाणेच योग्य समजले. गणपती ईशा आणि वरद घेऊन आले. लग्न झाल्यापासून तीच औक्षण करायची पण यावेळेस ना ती गेली ना तिच्या सासूबाईंनी बोलावले. ती मुलांकडे बघून काही न बोलता शांत रहात होती.
ऋषीपंचमी झाली. घराला वेध लागले होते गौरीचे. फराळाची तयारी बाप्पा यायच्या आधीपासून सुरू असली तरी काही पदार्थ आदल्या दिवशीच करायची त्यांच्या घराची पद्धत होती. स्वयंपाकघर तिला बोलावत होते. सासूबाईंची भिती पण वाटत होती.. तिने आणलेल्या साड्या, दागिने ईशाच्या हाती दिले. आणि स्वतः विचार करत बसली श्रीरंगच्या जाण्याने तिच्या आयुष्यात झालेला बदल. नशीबाने पैशाची अडचण नव्हती. पण तो गेल्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भयाण होतीच त्यात हे सण. आधी ज्या उत्सवांची ती आतुरतेने वाट बघायची आता तेच तिला नकोसे झाले होते. बाहेर जोरजोरात कोणीतरी बोलण्याचा तिला आवाज आला. आता कोण आले असेल? वृंदाला कसे विसरलो आपण? ती तर येतेच की दरवर्षी माहेरवाशीण म्हणून.. ती आणि वृंदा दोघी मिळून गौरी बसवायच्या. मिळून धमाल करायच्या. आता यावर्षी असे काहीच नाही. कितीही रडायचे नाही ठरवले तरीही आता ती तिचे रडू आवरू शकली नव्हती.
तिच्या खोलीचा दरवाजा वाजला. वृंदा आत आली..
" वहिनी, चल लवकर.. गौराई वाट बघते आहे."
" अग पण मी??" सुचेताला पुढे बोलवेना.
"काय झाले तुला? हातीपायी तर धड दिसते आहेस. चल ग बाई लवकर."
" पण आई?"
" तूच बाहेर येऊन विचार."
" माझ्यामुळे उगाच अपशकुन नको व्हायला. त्यांनी तर गणपती आणतानासुद्धा मला औक्षण करायला बोलावले नाही."
" हो नाही बोलावले.. कारण तुझा हा असा रडका चेहरा बघायची ना आम्हाला सवय आहे ना त्या बाप्पाला.. ना माझ्या श्रीरंगला." सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या.
" मग एका अक्षराने तरी बोलायचे.." सुचेता पुटपुटली..
" कसे बोलणार? बोलले असते तर तू कसे घेतले असतेस माहित नाही. आधीच कामाला जाऊन थकलेली तू. त्यात या दुःखात. म्हणाली असतीस सासुरवास करतात तर.. म्हणून सोनारालाच बोलावले कान टोचायला."
" मग आता तुझे पुरेसे कान टोचून झाले आहेत असे वाटत असेल तर वहिनी छान आवर. मी आणि ईशा तोपर्यंत बाकीची तयारी करतो." वृंदाने हुकूम सोडला.
तिघींनी मिळून गौरींना घरात आणले. सासूबाईंनी औक्षण केले. गौरीची स्थापना झाली. सुचेता आत जाणार तोच वृंदाने तिला थांबवले..
" वहिनी.." सुचेता वळली.. "हे घे."
" हे ग काय?"
"मला माहिती आहे, दरवर्षी दादा तुला गौरीसाठी नऊवारी साडी आणतो.. तू काही यावर्षी घेतली नसशील. म्हणून ही माझ्याकडून.." वृंदाचा गळा दाटून आला होता. सुचेता वृंदाच्या गळ्यात पडून रडायला लागली..
" डोळे पुस आणि उद्या नेहमीसारखीच तयार हो.. नऊवारी, केसांचा खोपा, चंद्रकोर.."
"अशाच एकमेकींच्या जीवनात आनंद फुलवत रहा.. माझ्या ज्येष्ठा कनिष्ठा.." दोघींची अलाबेला घेत सासूबाई म्हणाल्या.
" आजी आणि मी ग?" हे बघत असलेल्या ईशाने विचारले..
" तू?? तू तर माझी लाडाची गौराई.. आणि तो आमचा गणपती.." एकटाच रडत असलेल्या वरदला जवळ बोलवत आजी म्हणाली..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई