गौराई माझी लाडाची गं..

गौराई माझी लाडाची गं


"विशु.. याद राख घरात पाऊल टाकलसं.. आमचं मेलेलं तोंड बघशील."

"बाबा.. असं रे का बोलतोयस?"


"खबरदार...आमच्याशी नाती जोडलीस तर,इथे कोणी तुझे आईबाबा नाही राहत समजलं तुला.जा.. आल्या पाऊली परत जा. त्याच्यासोबत जातांना तुला आईबाबांची आठवण नाही झाली आणि आता जोड्याने आशिर्वाद घ्यायला आलात. डोळ्यासमोरून निघून जा नाहीतर जोड्याने मार खाशील." दिपकरावांच्या आवाजाला आता कंप सुटला होता.


"बाबा हे बघ तुझं चिडणं रास्त आहे पण हायपर होऊ नको तुझा बीपी हाय होईल ऐक माझं!" गौरी बोलत होती.


"माझं मी बघून घेईन तू निघ आधी. चालती हो तुझ्या नवऱ्यासोबत..."


"गौरी.. बाळा हात जोडते तुझ्या पुढे जा बाय आता.. उगाच त्यांना त्रास होईल जा... "कौशल्या ताई लेकीसमोर हात जोडत म्हणाल्या.


"आई अगं हात नको जोडू, जाते मी. चल महेश निघू आपण."

महेश आणि गौरी घरातून पळून जाऊन लग्न करतात. खरतरं गौरीने घरात सांगितल होतं तिला आणि महेशला लग्न करायचं आहे पण तिच्या वडिलांनी नकार दिला होता कारण महेश अपंग तर होताच पण अनाथही होता एवढंच कारण होत म्हणून त्यांनी नकार दिला होता. बाकी महेशमध्ये काहीच वाईट नव्हतं. लग्न करून पोरगी अनाथ आश्रममध्ये जाणार या विचाराने ते नको बोलले होते.


"अहो!पुढच्या आठवड्यात गणपती आहेत आपल्या गौराईला बोलावून घेऊया ना!" कौशल्या ताई कळकळीने बोलत होत्या.


"नाही! ती पुन्हा या घरात येणार नाही आणि माझ्या विरोधात जायचं असेल तर तुही निघ."


"अहो..."

कौशल्या ताई एकट्याच बाप्पाच्या स्वागताची तयारी करत होत्या. एरव्ही आई आई करत मागे पुढे करणारी त्यांची गौरी सोबत नव्हती म्हणून त्या उदास होत्या. दिपकरावांना ही गोष्ट समजत होती पण तरी ते शांत होते. गौरी शिवाय बाप्पाची तयारी अपूर्ण वाटत होती त्यांना पण घर सुनं-सुनं वाटत होतं.


बाप्पा यायचा दिवस उजाडला. कौशल्या ताईंची एकटीची फार तारांबळ उडाली होती. इकडे गौरी पण शांत शांत होती. आश्रमात बाप्पा असुनही उदास होती. चेहऱ्यावर हसू होतं पण मन मात्र घरी धाव घेत होतं. स्वतःच्या विचारात गुंग होती.


"गौरी उठ आपल्याला बाहेर जायचं आहे."


"कुठे?"


"अगं तू उठ आणि छान तयार हो आधी!"


"अरे हो हो महेश.. पण जायचं कुठे आहे?"


"तू तयार हो गं प्रश्न नको विचारू आणि ती तुला हिरव्या रंगाची साडी घेतली होती ना मी तीच नेस आणि हा मोगऱ्याचा गजरा माळ..."


"अरे पण आज गौराई यायच्या आहेत मला तयारी करायची आहे."


"त्याची तयारी इकडे सगळे करतील मी दादाशी आणि ताईशी बोलून घेतलंय. तू तयारी करून लवकर ये."


"बरं बाबा होते तयार!"


गौरी तयार होऊन येते. दोघेही निघतात. निघायच्या आधी महेश गौरीच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो.


"आता हे काय?"


"सरप्राईज आहे नंतर खोलेन आणि तोपर्यंत नो मोअर क्वेशन्स. महेश तिच्या ओठांवर बोटं ठेवत बोलतो.

ती पण मुकाट्याने गाडीत बसते. गाडी गौरीच्या घरी येऊन थांबते. तो सावकाश गौरीला गाडीतून हात धरून उतरवतो. हे सगळं गौरीचे बाबा वरून पाहत असतात. ते घरात जातात आणि खोलीत बघतात तर कौशल्या ताई जप करत बसलेल्या असतात. लेकीच्या आठवणीत एक थेंब त्यांच्या डोळ्यांतून गालावर ओघळलेला असतो ते पाहून त्यांना फार वाईट वाटत.


"अगं कौशल्या जरा बाहेर ये पाहुणे आलेत आणि औक्षणाचं ताट घेऊन ये."

तिने ऐकलं आणि बाप्पाच्या पुढ्यातील ताट उचलून त्यात वाती करून ताट तयार केलं.


"कोण येतंय हो?"


"थांब समजेल."

महेश गौरीला घेऊन येत होता. गौरीला बघून कौशल्या ताईंना फार आनंद झाला.

"अहो!"


"शु.....तिला माहीत नाही अजून." ते हळू आवाजात बोलले. तश्या कौशल्या ताई पण तोंडावर बोटं ठेऊन काही बोलत नाही असं इशाऱ्याने बोलत गप्प बसल्या.

महेशने गौरीच्या डोळ्यांवरची पट्टी खोलली. समोर आईबाबांना बघून तिला भरून आलं. मिठी मारायला म्हणून ती पटकन पुढे सरसावली पण लागलीच ती थांबली आणि स्वतःला आवर घातला.


"गौरी... बेटा ये.." असं म्हणत दिपकरावांनी मिठी मारायला हात लांब केले तशी पटकन गौरी बाबांच्या कुशीत शिरते. दोघे बाप आणि लेक खूप रडतात गौरी आईलाही तिच्या कुशीत घेते. तिघांचा हा आनंद महेश मात्र फोन मध्ये टिपत असतो.


"गौरी बेटा बस कर आता. अगं लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि तिने अश्या अपंग आणि अनाथ मुलासोबत लग्न केलं म्हणून मी दुखवलो गेलो. जावई माफ करा मला चुकलो मी."हात जोडत दिपकराव बोलले.


"नाही बाबा.. अहो माफी नका मागू. बाप म्हणून तुम्ही तुमच्या जागी योग्य होतात हां आता मला आईवडील माहीत नाहीत म्हणून मला समजणार नाही कदाचित पण तरी मला नाही राग कसला."


"आज बोललात पुन्हा आईबाप नाही असं म्हणू नका. आता आम्ही आहोत. असं म्हणत दोघेही एकमेकांना आलिंगन देतात."

कौशल्या ताई लेकीचं आणि जावयाचं औक्षण करून त्यांना घरात घेतात.

"आता माझं घर कसं भरलेलं दिसतंय. गौरी घरी नव्हती पण माझी ही लाडाची गौराई उदास होती आणि माझी ही गौराई पण तिच्या घरी उदासच असणार याची खात्री होती म्हणून कालचं जाऊन जावयांना इथे येण्याचं निमंत्रण देऊन आलो.

आता माझ्या लाडाची दोन्ही गौराई आनंदी आहेत म्हणून माझ्या घराचं पण कसं गोकुळ झालयं. अस म्हणत दिपकराव लेकीला आणि बायकोला जवळ घेतात.

समाप्त
श्रावणी लोखंडे