गौराई हसली

लघुकथा
मधुरा काय झालं? कुठपर्यंत आली तयारी?
सासुबाईचा आवाज ऐकू आला. अचानक त्या घरी आल्या. नेमकं मधुरा मुलींना बेडरूममध्ये झोपवत होती.
अचानक स्वयंपाक घरात आल्या आणि एका बाईला पाहून त्या एकदम बोलल्या.
"अगं , कोण तू? , आमच्या स्वयंपाक घरात कशी काय? सगळी कामं तू का करत आहे? काही कुलाचार वगैरे असतो की नाही.
सासुबाईंना अचानक आलेले पाहून मधुरा चलबिचल झाली.
"तुम्ही कधी आल्या आई? तुम्ही तर उद्या येणार होत्या ना ? "

"अगं अचानक ठरले माझे. म्हटलं उद्या जायचेच आहे. तर आजच जाऊ या."
आता सासुबाई नक्की गोंधळ घालणार . हे मधुरा जाणून होती. कारण, कांचनताई जुन्या पध्दतीने आणि चालीरितीने वावरणाऱ्या. त्यात मधुरा अगदी आधुनिक पध्दतीची, आधुनिक विचारांची. जिन्स पासून, शाॅटस घालणारी, आणि साडी पासून अगदी नऊवार नेसणारी. एका मोठ्या पदावर काम करणारी मधुरा. फार धावपळ व्हायची तिची.
त्यात सणवार आले की फार टेन्शन यायचं. आता भाद्रपद महिना आणि गणपती बाप्पाची चाहूल लागली. सोबत येणार गौरी. गौरी गणपती म्हटले की कसं साग्र संगीत व्हावं. हीच सासुबाईंची इच्छा. सुरवातीला नवीन नवीन चार पाच वर्षे सगळं नीट निभावलं. पण, आता दोन जुळ्या मुलींची आई फार फजिती व्हायची.

मग , \"आता या वर्षी गौराई कशी बसवायची? कशी तयारी करायची? अनेक प्रश्न डोळ्यासमोर फिरत होते.
पण, निभावणारे लोक असले की आपोआपच सगळं जुळून येते असे म्हणतात. प्रश्न होता तो सासुबाईंचा.\"

पण, मधुराने आठ दिवस आधीपासून नियोजन सुरू केले. तिच्या शेजारी दोन लाईन सोडून एक वस्ती होती. तिथे राहणारी रखमा. परिस्थिती अत्यंत गरिबीची. पण, चेहऱ्यावर सदा सर्वदा आनंद. कामही एकदम चांगले.
मधुराने तिच्याशी बोलून सर्व काही समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे ती तयारीला लागली होती.
लाडू, चिवडा, करंजी, चकली, शेव, गुळपापडी असे अनेक फराळाचे पदार्थ तिने तयार करून ठेवले होते. आता फक्त काही कोरड्या चटण्या करायच्या होत्या.
तिने दोन दिवसांपासून फार मेहनत घेतली होती.


शिवाय स्वयंपाकाची ऑर्डर सुध्दा तिलाच दिली होती. पुरण पोळी, बत्तीस भाज्या, उकडलेली फय , कढी, आंबील, अंबाडी भाजी, भाकर, खीर असे अनेक प्रकार तयार करणार होती.

"रमेश तू काहीच बोलणार नाही का? आता घरच्या लक्ष्मीने स्वतः च्या हाताने स्वयंपाक करायचा. की इतरांच्या मदतीने. " कांचन ताई बोलत होत्या.

आई, तिची फजिती मी बघतोय गं आणि या दोन आपल्या लाडक्या गौराई घरी आहेतच की तिला सतवायला.
अरे, पण....
आई, ठीक आहे ना? तू काळजी करू नकोस. तशीही तिने दोन दिवस सुट्टी घेतलेलीच आहे.
असे बोलून रमेश ऑफीसला निघून गेला.

सासुबाई मात्र सारख्या बडबडत होत्या. काही रीतभात, नियम, सोवळे ओवळं काही आहे की नाही. म्हणे जमत नाही. अशा कशा आजकालच्या तुम्ही पोरी गं. कोणीही उचलून आणता काम करायला. आता देवी प्रसाद कसा ग्रहण करेल? दरवर्षी लाडूचा नैवैद्य अर्पण केला की त्यात अर्धा लाडू खाल्लेला दिसत असे. पण, यावेळी मात्र त्यांचे मन अनेक शंका कुशंकेने भरलेले होते.

मधुराने मात्र संयम धरून सर्व कामे रखमा कडून पुर्ण करून घेतली. त्यामुळे वेळेत सर्व तयारी झाली. गौरीचे आगमन मोठ्या थाटामाटात केले. सोबतच सुंदर आरास आणि सजावट केली होती.

एवढं सगळं व्यवस्थित पार पडूनही कांचन ताई मात्र कुठेतरी भरकटल्या होत्या. रात्री त्या सारख्या गौराई जवळ बसून होत्या. माझं काही चुकलं का असं विचारत होत्या. पण, अचानक त्यांचा डोळा लागला आणि स्वप्न पडले.
दोन्ही गौराई उठून घरात पावलं उमटवत होती. सगळे प्रसाद मोठ्या आनंदाने ग्रहण करीत होती. शिवाय ज्या रखमाच्या हाताने स्वयंपाक केला होता. तो स्वयंपाक सुध्दा ग्रहण केला होता. हळदीकुकंवाच्या करंड्यात ठसे उमटले होते आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला होता.
बघता बघता सकाळ झाली. अचानक त्यांना जाग आली. तर खरोखरच हळदीकुंकवाचे ठसे उमटलेली दिसली. त्यांनी मनोमन हात जोडले. दिवस सरत आला होता. गौराईचे विसर्जन करायची वेळ जवळ आली होती. मधुराला मात्र सुट्टी नव्हती. ती चार वाजेपर्यंत आली. रखमाला पाहून मधुराला आश्चर्य वाटले.
कारण, यावेळी कांचन ताईंनी तिला स्वतः बोलावून घेतले आणि मधुराला तिची साडी चोळी देऊन ओटी भरायला लावली. सोबत काही फराळाचे पदार्थ भरून दिले. तिच्या सोबत तिच्या मुलांनाही काही पैसे हातावर ठेवले. पोटभर जेऊन घातले. सासुबाईंच्या मनातला अहंकार , जातीपातीचा भेदभाव, आज दूर झाला होता. मनातले मळभ दूर झाले होते. इतक्या वर्षांनंतर एका खऱ्या अर्थाने गौराईची पुजा आज घडली होती.

घरात आगमन झालेल्या गौराईच्या चेहऱ्याचे एक वेगळेच रूप दिसले आणि विसर्जन करतांना गौराई हसली.
खरी पुजा आज घडली होती. आगमन झालेल्या गौराई, रखमा आणि तिच्या दोन मुली यांचेही औक्षण करून पुजा पार पडली होती.
रमेश आणि मधुरा खूप आनंदी होते. कारण, आज कांचन ताई खऱ्या अर्थाने खूपच आनंदी दिसत होत्या.


©® अश्विनी सुहास मिश्रीकोटकर