Gardening Tips

Gardening Tips

#Gardening_Tips 

 © अश्विनी कपाळे गोळे

  पावसाळ्याची चाहूल लागली की गार्डनिंग हा ट्रेंड सुरू होतो. सगळ्यांनाच आपल्या घराच्या अंगणात, बाल्कनीत छान छान झाडं असावी असं वाटतं आणि खरं तर घरात छोटीशी का होईना पण बाग ही असायलाच हवी. सभोवतालची हिरवळ, फुलं बघून मन अगदी प्रसन्न होतं. 

बाल्कनीत असलेल्या बागेची विशेष अशी काळजी घ्यावी लागते. असंच आम्ही सुद्धा आमच्या बागेची काळजी घेण्यासाठी, झाडांना फुले येण्यासाठी बराच रिसर्च केला आणि बाग छान बहरली..तर त्याच अनुभवातून काही टीप्स शेअर करते आहे

१. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुंडीत झाडं लावण्याची पद्धत :-

- झाडांची वाढ उत्तम व्हावी यासाठी कुंडीची साइझ खूप महत्वाची. जास्वंद, गुलाब सारखे झाड भराभर वाढतात तेव्हा जरा मोठ्या आकाराची कुंडी घ्यावी. 

- कुंडीला तळाला छिद्र नसल्यास ते करून घ्यावे. कुंडीच्या तळाशी विटेचे तुकडे, छोटे दगड , नारळाचे कव्हर याची एक लेअर टाकून मग वरून माती भरावी. माती अगदीच चिकट नसून जरा भुसभुशीत किंवा वाळू मिक्स केलेली असल्यास उत्तम. मातीमध्ये थोडं ऑरगॅनिक खत सुद्धा मिक्स करू शकता. 

- झाड लावले की त्याला भरपूर पाणी (कुंडीच्या खालून झिरपे पर्यंत ) टाकावे. 

२. झाडांच्या प्रकारानुसार शक्य तितकं सुर्य प्रकाशात ठेवलेलं कधीही चांगलं. पण शक्यतो नविन झाडं कुंडीत लावल्यावर त्याची नीट वाढ सुरू होत पर्यंत कोवळ्या उन्हात ठेवलेलं उत्तम. ( कडक उन्ह टाळावे ) पण एकदा वाढ नीट सुरू झाली की मग सुर्य प्रकाश मात्र आवश्यक आहे. 

३. झाडांना वरचेवर पाणी न देता माती कडक झाली की पाणी द्यावे. शक्यतो उन्हाळ्यात एक दिवसा आड तर हिवाळा पावसाळ्यात दोन ते तीन दिवसा आड गरजेनुसार. 

४. झाडांची योग्य वाढ आणि फळे फुले येण्यासाठी त्याची वेळोवेळी कटिंग करायला हवी. शिवाय वाढ अचानक थांबली असल्यास कुंडीत मुळं दाटले असल्याची शक्यता असते. तेव्हा त्याचे Repotting करणे आवश्यक. यासाठी मोठ्या आकाराची कुंडी घेऊन झाड परत लावावे आणि परत लावण्याआधी त्याची मुळे जरा कापून घेतली तरी चालेल. 

फुलझाडांच्या उत्पादन क्षमतेसाठी NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याची आवश्यकता असते. त्यासाठी NPK 19.19.19 नावाचे फर्टिलाइजर मिळते पण आम्ही ते अजून तरी वापरले नाही. त्याला पर्याय म्हणून काही घरगुती उपाय आपण ट्राय करू शकतो ते खालीलप्रमाणे :- 

- अंड्याची टरफले बारीक करून झाडांच्या मातीत मिक्स करावे.

- कांद्याचे वरचे आवरण फेकून न देता पाण्यात भिजवून ठेवावे. साधारणपणे २४-४८ तास. नंतर ते पाणी फुलझाडांना द्यावे. यामुळे फुलांची क्वालिटी सुधारते, रंग सुद्धा डार्क होतो. 

- केळीचे वरचे कव्हर बारीक कापून पाण्यात ठेवावे साधारण १२ तास. नंतर ते पाणी फुलझाडांना द्यावे. हे बारीक केलेले तुकडे डायरेक्ट मातीत मिक्स केले तरी उत्तम. 

- चहाची पावडर वापरल्यानंतर वाळवून मग मातीत मिक्स करावी‌.

- शेणखत किंवा शेणाच्या गोवर्‍या असतील तर त्या बारीक करून मातीत मिक्स करावे. याने झाडांना खूप चांगला फायदा होतो 

- ओल्या कचऱ्यापासून बनवलेले ऑरगॅनिक खत मिळत असेल किंवा तयार करता येत असेल तर ते दोन ते तीन आठवड्यातून एकदा सगळ्या झाडांना नक्की द्या. 

- Vermi Compost, Cowdung Manure, Bonemeal अशा वेगवेगळ्या प्रकारचे खत नर्सरी मध्ये मिळते‌ ते सुद्धा वापरलेले उत्तम. 

५. जास्वंद गुलाब यांसारख्या झाडांवर पांढर्‍या रंगाची चिकट अशी कीड लागते ज्याला mealybug असे म्हणतात, यामुळे झाडांची उत्पादन क्षमता कमकुवत होते , पाने पिवळी पडून गळतात..कळ्या गळून पडतात. 

अशा प्रकारची कीड झाडांवर असेल तर त्या झाडाला / प्रत्येक पानाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, शक्यतोवर सगळ्या पानांवरची कीड निघायला हवी. जी पाने जास्त प्रमाणात खराब झाली असेल ती पाने कट करा. 

इतकेच नाही तर ही कीड कुंडी वर चिकटून बसते त्यामुळे कुंडी सुद्धा स्वच्छ धुवून घ्या. 

नंतर त्या झाडावर कडुनिंबाची पाने ठेचून पाण्यात मिक्स करून त्या पाण्याचा स्प्रे करा. नीम ऑइल सुद्धा वापरले तर उत्तम. 

दुसरा पर्याय म्हणजे कारली बारीक कापून पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्या पाण्याचा स्प्रे अधूनमधून सगळ्या झाडांवर करावा. 

हळदीचे पाणी , साबणाचे पाणी याचा स्प्रे केला तरी चालतो. 

जास्त प्रमाणात कीड लागली असेल तर झाडांची पाने शक्य तितकी कट करा. नंतर नीम ऑइल / हळदीच्या पाण्याचा स्प्रे करा. 

६. फुले येऊन गेल्यावर झाडांची कटींग करा. आठवड्यातून एकदा कुंडीतील माती हलक्या हाताने उकरून घ्या. 

चला तर मग तुमच्या बागेतल्या झाडांचे छान छान फोटो नक्की शेअर करा.

बागेची काळजी कशी घ्यायची याविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा. 

( मी कुणी एक्स्पर्ट नाही पण बाग फुलवताना आलेल्या अनुभवातून हा लेख लिहीला आहे ???? ) 

माझ्या गार्डन टूर चा एक व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे, तो बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ????

https://youtu.be/NxpKYMWDLPg

© अश्विनी कपाळे गोळे