गर तुम साथ हो! (भाग -२)

An inspiring love story

राज्यस्तरीय  करंडक कथामालिका

प्रेरणादायी प्रेमकथा


शीर्षक -  गर तुम साथ हो!

(भाग -२)


आशु घरासमोर ओट्यावर दारात बसली होती, कसलंसं मासिक चाळत.
साडेपाच वाजून गेले तरीही सचिन अजून आला नाही म्हणून ती सारखी रस्त्याकडे पाहात होती.
आता मात्र तिला कंटाळा आला.
तिला आज खूप राग आला होता .आज त्याच्यावर खूप रागवायचं, त्याच्याशी काहीच बोलायचं नाही असं तिनं ठरवलं.

इतकं मनात ठरलं तरीही सारखी तिची नजर रस्त्याकडेच.

"आशू आत ये नाहीतर दार लोटून घे!" आई थकून दिवाणवर पडली होती पडल्या पडल्या पेपर पहात होती.

"आई राहू दे ना गं !"

"आशू अगं गार वारं येतंय, दार लोटून घे."

"हो गं बाई! ओढून घेते."

पाय पटकतच ती उठली , दाराला बाहेरून कडी लावली व पुन्हा पायर्‍यांवर येऊन बसली.
रोज बरोबर सव्वापाच- साडेपाच पूर्वी सचिनची लुना चहा दारासमोर असायची.
समोर कोणी असो अथवा नसो त्याच्या लुनाचा हॉर्न मोजून तीनवेळा वाजायचा. नेमका हाच हॉर्न आशु साठी इशारा होता, तो घरी आल्याचा.
आज मात्र ती त्याच्या प्रतीक्षेत बसली होती अन् तो कुठे हरवला होता कोणास ठाऊक!
आता मात्र तिची प्रतीक्षा काळजीत बदलली.
नाही - नाही ते विचार डोक्यात येऊ लागले.
तिने ठरवलं होतं की आज हसून त्याचं स्वागत करायचं.
रोज तो एकटक घराकडे पाहत पुढे जातो ,आज आपण त्याला इथेच थांबवायचं, मनसोक्त गप्पा मारायच्या.
नाहीतरी आईला पेपर वाचता वाचता झोप लागली होती पण सगळ्या गोष्टींवर पाणी पडल्यासारखं झालं.
तिच्या मनात नाना शंका येऊ लागल्या की नाहीतरी तो लुना फास्ट चालवतो, रस्त्यात कुठे. . . ?
तिच्या काळजीचे अश्रू बनून डोळ्यात तराळण्यापूर्वी लांबूनच तो येताना दिसला.
मरून कलरच्या शर्ट व क्रीम कलरच्या पँटमध्ये तो किती मनोहर दिसत होता, तिला क्षणभर स्वतःचा अभिमान वाटला.
पण पुढचं सारं कसं स्वप्नागत घडलं.
तो आला आणि सरळ निघून गेला, तिच्याकडे एकही कटाक्ष न टाकता!
असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं.
ती बाहेर नसतानादेखील तो तिच्या घराकडे पहात जायचा. . . अपेक्षेने!
कितीतरी वेळा अश्विनीने स्वतः खिडकीतून पाहिलं होतं आणि आज ती त्याच्यासाठी बसली होती तर त्याने चक्क दुर्लक्ष केलं.
आज तिने त्याला आवडलेला नवीन ड्रेस घातला होता, काकूंनी दिलेला मोगऱ्याचा गजरा माळला होता.
त्यांने डोळ्यांच्या कडातूनही पाहिलं नाही.
" मी इतकी परकी का झाले?"
या प्रश्नाने तिला भंडावून सोडलं.
तेव्हा डोळ्यात थोपवलेले अश्रू आता मात्र गालावरून ओघळू लागले.
पुन्हा तिला आठवलं की त्याचा चेहरा देखील रोजच्यासारखं प्रसन्न वगैरे नव्हता, उतरलेलाच होता.

क्षणात तिने स्वतःला सावरले, स्वतः चा विचार बाजूला ठेवून, नक्की त्यालाच काय झालय याचा विचार करू लागली.
काहीतरी बिनसलंय, तो इतका नाराज होणार नाही.
तिने दार उघडलं. आई अजूनही झोपलेलीच होती.
सचिन साठी तिने ढोकळे बनवून ठेवले हाेते.
प्लेटमध्ये ढोकळे ठेवून त्यावर थोडी कोथिंबीर व खोबऱ्याचा किस टाकुन ती निघाली.
काकू दारातच बसलेल्या होत्या, सचिनच्या शर्टला बटन लावत होत्या.
" या सूनबाई काय म्हणता? अाणि ते लपवून काय आणलंस? मी काही मागणार नाही बरंका!"
" काही नाही काकू, ढोकळे आहे त्याला आवडतात ना!"
" अगं बाई मग एवढी केविलवाणी का झालीस? रडलीस वगैरे की काय? अाज सुनबाई म्हटल्यावर नेहमीसारखी चिडली पण नाहिस ते!" त्या थट्टेने म्हणाल्या.
आता मात्र दाबलेला उमाळा की तगमग उफाळून आली.
" काऽ कू" म्हणतच ती त्यांना बिलगली आणि लहान बाळागत रडायला लागली.

" वेडी गं सून माझी! झालय काय? काही बोललाय का तो? थांब आत्ता समाचार घेते. सोन्यासारख्या पोरीला रडवतो काय?आता पुरे आशू.
सचिन पाहिलंस का किती सुंदर दिसतेय आज अश्विनी!"
"काकू नको ना!"
" अगं जा तरी त्याच्यासमोर, तो कसा विरघळेल बघ !"

"नाही काकू, मी नाही!"
" हे काय बाई ? म्हणूनच विचारलं ना मी तो रागावलाय का म्हणून?"
" रागावला नाही पण काकू तो आज माझ्याशी बोलला नाही, अगदी पाहिलासुद्धा नाही माझ्याकडे!"
" हात्तीच्या असं बिनसलंय होय? मग आॅफिसात काही झालं असेल. नाराज असेल म्हणून नाही पाहिलं तुझ्याकडे. जा ते ढोकळे आणि एक ग्लास पाणी घेऊन जा. उठ!"

रमाताईंनी कमरेचा खोचलेला रुमाल काढला, आशूची डोळे पुसले. तिचा गजरा व्यवस्थित केला.
हातात ढोकळ्याची प्लेट दिली.
त्यांनी नजरेने इशारा केला अाशू लगेच निखळ हसली .

काकूंनी सांगितल्याप्रमाणे आज त्याला हक्कानं चांगलं झापायचं असं ठरवून ती आत गेली.
ग्लास टी पॉयवर ठेवला. तो दिवाणवर पाय पसरून डोळे मिटून पडला हाेता.
अश्विनीने मिश्किलपणे त्याच्यासमोर प्लेट धरली.
त्याने झटकन डोळे उघडले पण क्षणात त्याचा चेहरा पुन्हा चिडल्यागत झाला.
"काय आहे ?"
"ढोकळे. . . गरम आहेत !"
"ते दिसलं मला. पण तू यावेळी इथे कशी?" तो वसकलाच.
" असं काय रागाने बोलतोयस ? इथे यायला मला काय वेळ बघावा लागतो का?"
" नाही. मग उठलं सुटलं डोकं खपवायला मी एकटाच मिळतो वाटतं. . . रागावण्याचा आव आणु नकोस. मला काही फरक पडणार नाही. टाइमपास करायचा असेल तुझ्या पायऱ्यांवर बस, नाहीतर बैठकीत जा ,आई आहे तिथे!"
त्याने मसन वळवली.
आशूला सारं स्वप्न सारखं वाटत होतं.
इतका अपमान सचिनकडून ?अजूनही खरं वाटत नव्हतं.
इतका संताप आला होता की त्यावेळी काहीतरी मोठी वस्तू त्याच्या डोक्यावर पटकावी असं वाटत होतं.
पण तरीही केवळ त्याला दुखवू नये या उद्देशाने तिने उसना उत्साह आणला , "सचिन, कुठे काही खटकलंय बाहेर की माझंच काही?"

" माझं काही खटको नाहितर बिघडो, तुला त्याच्याशी काय ? तू जायचं काय घेशील तेवढं सांग?"

आता मात्र तिचा तिळपापड झाला. मनात विचारांचं वादळ!
संपलं आता , याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. ही शेवटची भेट.
इतक्या नीच व उर्मट माणसाशी ओळखही ठेवायचं नाही.
सगळं कसं अचानक पत्त्यांच्या घरासारखं कोसळलं होतं.
मनात भडभडून आलं होतं, तिनं ते दाबलं.
निर्धार केला आणि ढोकळ्यांच्या प्लेटमधलं एक ढोकळा वर काढून त्याच्यावर दुसरी प्लेट झाकली. झाकलेल्या प्लेटवर तो ढोकळा ठेवत आवंढा गिळून ती कशीबशी बोलली.

"ढोकळा वर ठेवलाय, मी स्वतः बनविला होता. खावा वाटला तर खा नाहीतर. . . असू दे! यापुढे इथे माझी सावलीही दिसणार नाही. शेवटची भेट ही! सॉरी . . . सॉरी फॉर द ट्रबल अँड गुडबाय नाऊ!"
तावातावानेच डोक्याला गच्च धरून ती बाहेर आली.
ती पुतळ्यागत सरळ चालली होती.
रमा ताईंनी तिचा हात धरला.
"ए सूनबाईऽ रागाने कुठे चाललीस?"
"सोडा काकू मला जाऊ द्या ! मी कुठेही जाईन."

" अरे अरे पुन्हा रडत्येयस .एकदाच रडून घे सारं! असं मनात ठेवू नकोस. सकाळी कोणाचं तोंड पाहिलंस गं !"
"मी आरसाच पाहिला असेल!"
ती डोळे पुसत शून्यात नजर लावून म्हणाली ,
"मला जाऊ द्या ना!"

"अगं अशी ओरडतेस काय? कुठून जाऊ देऊ तुला? मला एकच मुलगा आहे? दुसरा कुठून आणू?" त्या गमतीच्या मूडमधे पण
" काकूऽ!" ती रडवेली होऊन ओरडली.
आशू तिथेच खूप रडली असती पण तिला प्रदर्शन करायचं नव्हतं.
" ए सूनबाई माझ्या सच्चू ला एकटं टाकून कुठे चाललीस. . . ?"
" हां . . . सच्चू म्हणे सच्चू ! अारती ओवाळा, तुमची सूनबाई गेली, घरात येण्यापूर्वीच निरोप घेवून! तुमच्या त्या तिरसट लाडोबा साठी दुसरी मखमली बाहुली शोधा, सून म्हणून!"

" अगं जिभेला काही हाड? असं काय झालंय?"
" त्यालाच विचारा, येते मी!"
हात सोडून ती पटकन घरी आली.
रमाताई अवाक होऊन पाहतच राहिल्या.


क्रमशः


लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
दिनांक ०६. ०९ .२०२२

🎭 Series Post

View all