. . . गर तुम साथ हो! भाग -१

Inspirational lovestory



राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कॅटेगरी- प्रेमकथा ( प्रेरणादायी)
संघ - ईरा संभाजीनगर
जिल्हा - औरंगाबाद /संभाजीनगर

कथेचे शीर्षक - . . . गर तुम साथ हो!
लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी


(टीप - ही कथा माझ्या अन्य काही कथांप्रमाणेच एकोनिसशे नव्वदच्या दशकातली आहे .त्यामुळे कथेत मोबाइल किंवा सोशल मीडिया दिसणार नाही.  प्रेमात प्रेरणादायी शक्ती असते हे दाखवणारी कथा आहे. नक्की वाचून प्रतिक्रिया कळवा. )


सचिन बाहेरून आला व जाता जाता त्याने डोकावून पाहिलं.
ती त्याला दिसली नाही.
रोज त्याच्या येण्याच्या वेळी ती काही ना काही कामाचा बहाणा काढून बाहेर दिसायची.
कधी कपडे वाळत घालताना, दोरीवरचे कपडे आणताना, कधी झाडांना पाणी देताना, तर कधी भांडी घासताना !

मग अलगद फुल उमलावं तसं प्रेमाने त्याच्याकडे पाहायची आणि केसांची समोरची बट बाजूला करायची.
सचिनला तिची प्रत्येक गोष्ट आवडायची तिची प्रत्येक अदा,प्रत्येक मुद्रा, रुसणं - रागावणं, . . . सगळं काही मोहक!

तिची कमतरता आज त्याच्या नजरेला खटकली.
त्याला राहावलं गेलं नाही.
तिच्या आईला पाहून तो म्हणालाच सहजच, "काकू अाशू आली नाही का कॉलेजातून?"
" नाही रे उशीर झालाय बघ , काळजी वाटतेय मला!"
" मी पाहून येऊ का?"
" तुला त्रास कशाला? येईलच इतक्यात. मैत्रिणींकडे वगैरे केली असेल अचानक!"

"त्रास कसला काकू! काळजी तर कोणालाही वाटतेच ना .
हिला समजू नये का आता की घरी वाट पाहतील म्हणून . मी जातो आणि घेऊनच येतो तिला."
सतिश ने लुना तशीच वळवली .
आशूची आई काही त्याला थांबवू शकली नाही, तिलाही वाटलं जाऊ दे,तो लवकर तरी घेऊन येइल तिला.
तो थोडाच पुढा गेला असेल तर ती मैत्रिणींच्या घोळक्यासहित घराकडे येत होती.
तो काहीच बोलला नाही.
त्याने तशीच लूना परतवली. घराकडे आणली व तिच्या आईला निरोप देऊन घरी गेला.
तिनेदेखील बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता .
करण सगळ्या मैत्रिणीं समोर तिला प्रदर्शन नको होतं.
घरी पोहोचताच थोडावेळ मैत्रिणी बसल्या तेवढ्यात आत बोलावून आई तिला म्हणाली, " आशू काय गं ! एवढा उशीर झाला आज? कुठे गेली होतीस? आता आली नसतीस तर सचिनला चक्कर झाली असती. असा वेळ लावत जाऊ नकोस यापुढे ."
"अच्छा! सचिन मला घ्यायला येत होता का ? तरीही मला वाटलं , मला पाहून तो का परतला? अगं बघना, निशाचा वाढदिवस होता. त्यामुळे थांबावं लागल। यापुढे वेळ नाही करणार! ठीक आहे यावेळी चुकलं बस्स!" तिने आईला लाडाने मिठीच मारली.
" आशू आम्ही निघतो गं आता " सगळ्या मैत्रिणी एका सुरात बोलल्या.
" अगं निघालात काय इतक्यात? बसा ना थोडावेळ!" तिचा वरवरचा आग्रह.
" नाही गं. पुन्हा कधी तरी. अंधार पडलाय ,आमची आई पण काळजी करेलगं!" निशा म्हणाली.
तसे आशूची आई म्हणाली- "तुझ्याच मैत्रीणी आहेत ना या पण बघ तिला कशी काळजी आहे आईची! नाहीतर तू?"
" आई पुरे ना गं बोलणं. . . मी सॉरी म्हटलं ना!"
पुरे ना काय? झाला का गं वाढदिवस . आशीर्वाद बरं तुला."
निशा पाया पडून निघाली मग आता आशूला कसलीच चर्चा नको होती. सगळ्या मैत्रिणी एकत्रच गेल्या .


आशुने स्वतः ला आरशात पाहिलं. ड्रेस व केस ठिकठाक करून घेतले व ती लगेच शेजारी पळण्याच्या बेतात होती.

" आई मी शेजारी जाऊन येते काकूंकडे !" असं ओरडून सांगतच ती पळाली.

धापा टाकतच सचिनच्या खोलीत आली .
तो काहीतरी वाचत बसला होता.
"याऽ ऽ या महाराणी साहिबा !"

"असं काय रे? लगेच महाराणी! काकू कुठेत?"
"एऽ तुला काकूंची काय पडलीय , मी दिसत नाहिये का समोर? आई नाही घरात म्हणजे आई- बाबा गेलेत मंडईत! बसा ! हं तर हे सांग की इतका वेळ कुठे होतीस ? येऊन अर्धा तास झाला. किती सूड उगवायचा एखाद्यावर?
आताच असे हाल आहेत तर पुढे काय करशील ?"
"सचिनऽ , काय झालंय तुला ? बघ ना , तुला न बघता मला तरी चैन पडते का ते! मैत्रिणी गेल्या अन त्याच पाऊली मी अक्षरशः पळत इकडे आले.
त्याचं कौतुक तर नाहीच तुला, मी जाते मग!"

"ओ मॅडम ,थांबा थांबा!" त्यानं हात धरून तिला बसवलं.
" काय आहे?" तिने मोजकंच विचारलं.

"हे घे, नवीन घड्याळ आणि बेल्टचा सेट ऑफिसातून परतताना बाजूच्या दुकानात दिसला. खूप आवडला मला, म्हणून आवडत्या माणसाकरिता आणलं. पहा ना हे तुझ्या ड्रेस ला पण मॅचिंग होतील. सहा की आठ बेल्ट आहेत जे बदलता येतात.
" सतीश किती भारी आहे हे ! तू असं काही केलं की मला ठरवूनही तुझ्यावर रागावता येत नाही. पण पहा ना किती खर्च केलास! खरं सांग याची गरज होती का? आज काही माझा वाढदिवस आहे का? खर्च करू नकोस जास्त, पैसे साठवत जाव आपल्याला लागतील ना पुढे !"
" एऽ बाई किती अन रोमँटिक आहेस गं ! वाढदिवसालाच गिफ्ट द्यायला मी काय परका आहे का ? आज तुला पहिल्यांदा भेटलो होतो ती तारीख आहे! आठवलं का? माझ्यासाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. आपल्या माणसांसाठी काही आणावं वाटलं ते पण नाही. . . . जाऊ दे!"

" तसं नाही रे ! थँक्यू सो मच. नाराज नको होऊ ना तू! अॅक्चुअली मी कधी काहिच देत नाही तुला म्हणून ते. . . !
पण, ठीक आहे. मला नोकरी लागल्यावर मी तुझ्यासाठी काहीतरी आणत जाईल नाऊ थॅंक्यू अगेन!"
" पुन्हा तोच विषय! किती वेळा आपले वाद झालेत आशू! तू नोकरी करायची नाहीस. असे किती वेळा सांगितलय ना मी तुला पण तू. . . ? ओके . पुन्हा वाद नको आणखी कधीतरी बोलूयात."
" ओके. मलाही इच्छा नाही भांडायची. येते मी!"
" थांब ना आशू! थांब ना! आई येईपर्यंत तरी?"

" पण तिकडे माझी आई ?"
"काही नाही तुझी आई! जा. बस इथे.
नको. तू जा किचनमध्ये. फर्स्ट क्लास काहीतरी कर. मला जाम भूक लागलीय."
आशू आनंदाने पळाली किचनमध्ये.
किचनमधे डबे शोधू लागली इतक्यात तिचे लक्ष डायनिंग टेबल कडे गेले.
"अरे सचिन काकू स्वयंपाक करून गेल्यात. गरमच आहे. ताट वाढते, ये जेवायला ."
"ती तुझी स्पेशल डिश करना म्हणजे कुठलीही भाजी असली तरी चालते. "
"ओके!"
तिने लसुणाची फोडणी केली व त्यात दाण्याचं कूट , तिखट व मीठ टाकलं. छान मिळवलं अन वरून बारीक कोथिंबीर टाकली चिरून.
तिने ताट व्यवस्थित वाढलेलं होतं.
सचिन खूप आनंदला.
" अस्सं हे ट्रेनिंग कामाचं आहे. असं सारं शिकून घे. आता पडतो तुटून यावर . . . वाह तुझी डिश! तू जेव ना सोबत!"
"नको प्लीज निशा चा वाढदिवस होता ना माझा फराळ झालाय. पुन्हा घरी चहापण झाला . तू जेव."
"तसं नाही एक वरणभाताचा घास घे ना यातला , मग जेवतो. "

"ओके!" तिने कालवलेला एक घास घेतला.
तसं एकमेकांना दुखण्याची सवय दोघांनाही नव्हती.
त्याचं जेवण आटपत आलं आणि इतक्यात तिचे आईवडील आले.
त्या येऊन बसल्या मग थोड्यावेळात काकुंनी त्याला हात धुवून ,

तोंड पुसतच येताना पाहिलं, तर बैठकीतूनच बोलल्या, " आशु मोठं काम केलंस बेटा! याला जेवू घालायचं म्हणजे मला प्रश्नच पडतो. उगीच काहीतरी किरकिर असते जेवणाची. तसं मला माहीत होतं तू असलीस की तो उपाशी रहात नाही . एवढी भाजी आत ठेव आणि दूध तापायला ठेव गं. विसरले आज. "
ती दोघांसाठी ग्लासात पाणी घेवून आली. काकू आनंदल्या. सचिनला कोण कौतुक!

थोडावेळाने ती परतली .
आल्यावर ते घड्याळ व बेल्टचा सेट बराचवेळ घेवून बसली. खूप काही आठवत होतं.
आता ही तिची आई कधी कधी चिडायची पण पुन्हा सगळं ठीक व्हायचं.
आशू आणि सचिनचंही ४ वर्षांपासून असंच चालू होतं.
शेजारी राहायला आले होते. ओळख झाली. मग मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं, कळालंच नाही.

हे सगळं यामुळं जास्त सहज झालं होतं की तेव्हांपासून पण दोघांच्याही घरून कोणीच विरोध केला नव्हता .

सचिनची आई प्रथमपासून अश्विनी म्हणजे आशूला सून गृहीत धरून वागत होती.
त्यांना मुलगी नसल्याने त्यांना आशूचं खूप कौतुक वाटायचं .

तिच्या आईलाही हरकत घेण्याची गरज वाटली नाही.
सतीश देखणा, उंच आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचा तरूण होता शिवाय चांगल्या पदावर नोकरीलाही लागला होता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की दोघांचे स्वभाव एकमेकांना पूरक होते.
दोघे एकमेकांना समजून घ्यायचे, कधी भांडण नाही, तंटा नाही. दोघांमध्ये विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट होती.

क्रमशः 

लेखिका  ©®स्वाती  बालूरकर  सखी

दिनांक- ३ सप्टेंबर २०२२

संघ - ईरा संभाजीनगर 

जिल्हा -औरंगाबाद 


🎭 Series Post

View all