. . . गर तुम साथ हो ! (भाग -३)

Inspiring lovestory

राज्यस्तरीय  करंडक  स्पर्धा  कथामालिका 

विषय - प्रेमकथा (प्रेरणादायी)

संघ - ईरा संभाजीनगर 

जिल्हा -औरंगाबाद 

शीर्षक  - . . . गर तुम साथ हो ! 

(भाग -३)

(स्वाती  बालूरकर, सखी)

हात सोडून आशू पटकन घरी निघाली.
रमाताई अवाक होऊन पाहतच राहिल्या.
" वेळ मिळाला की लगेच कुठं पळतेस गं? पाहावं तेव्हा गायब असतेस ."
आई भाजी फोडणीस टाकत होती. त्या तडतडणार्‍या मोहरी कडे ती एकटक पाहत होती.
तिच्या मनात हे सगळंच तडतडत होतं पण मनातलं सांगायलाही कुणीच नव्हतं.
एरवी काकूंशी मैत्रिणीसारखी बोलायची पण आजतर काकूंनाही दुखवून आली होती.
आता मात्र तिला स्वतःचाच राग आला.
काकूंचा काहीच . . . काहीच दोष नसताना मी त्यांना बोलले असे वाटून गेले.
ती मूर्तिसारखी निश्चल उभी राहून कुठेतरी पहात होती.
आईने कुतुहलाने पाहिले.
" डोळे लाल झालेत, भरल्या घरात रडायला काय झालं ?"
"हं काही नाही गं , कुठं काय? ते येताना जरा डोळ्यात कचरा गेला, मी तरी काय करू? आग होतीय!"
"ते राहू देत. ताटं लाऊ का म्हणून विचार बाबांना, अन सांगितलंच नाहिस इतका वेळ कुठे होतीस?"
" काही नाही गं! काकूंनी बोलावलं होतं म्हणून गेले होते."


" त्या बोलावतात गं लाख! पण तुला नको का कळायला? पण सारखं सारखं त्यांच्या घरी म्हणजे काय?"
" पुरे ना गं आई . . . झालंय ना गं आताच! आधीच माझं डोकं दुखतय!"
"हो ते हल्ली रोजच दुखतं त्यात काय नवीन?"
रागाने ती हॉलमधे आली. बाबांचा निरोप आईला देऊन, ती स्वतः च्या खोलीमध्ये आली .
लाइट ऑफ करून स्वत ला पलंगावर झोकून दिलं.
घडलेल्या अनपेक्षित प्रसंगाबद्दल विचार करत होती.
डोक्यात नुसती धुमश्चक्री चालली होती.
चुकलं कुणाचं? त्याचं की माझं ? दोघे तसे बरोबरच होते. परंतु त्याने इतकं अपमानस्पद बोलावं? इतकी वाईट वागणूक द्यावी?
एरवीचा हळवा सचिन आठवला आणि हृदयाला पीळ पडला.
तिच्या एका क्षणाच्या सहवासासाठी तरसलेला, हळवं बोलणारा, तिला फुलागत जपणारा तो , मग अाजच तो कठोर का वागला?
तिचे डोकं काही शांत होत नव्हतं .
तिने तर आज त्याला रागवायचं म्हणून ठरवलं होतं.
तिच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून ती त्याला तरसावणार होती, त्याच्यावर रागवणार होती हक्काने !

खूप काही, पण सारं सारं हवेत विरून गेलं.
त्याची कडवट वाक्य अजूनही कानात तप्त लोह ओतल्यागत वाटत होते.

एवढं सारं झालं, मी पण खूप बोलून आले पण एक महत्त्वाचं विचारायचं राहून गेलं.
आता जाऊन विचारावं का? असा विचार मनात चमकून गेला पण नाही! अपमान झाला आहे !

जाऊ दे काकूंसाठी तरी जाऊया ,काका तर नाहीतच आज . तिचं दुसरं मन विचार करत होतं.

तोच आई ओरडली "आशू इथल्या दोन प्लेट कुठे गेल्या गं , दिसत नाहीयेत ."

"आई त्या बाजूच्या काकूंकडे आहेत .
संध्याकाळी मी ढोकळे दिले होते."

अगं मग तेव्हांच आणायच्या की नाही रिकाम्या करून, पाहा बरं किती खोळंबा होतो .
आज नमा पण नाही अाली भांड्याला."

"घेऊन येऊ का आता?"

" आता ? हो आण जा. तुला जेवताना लागतीलच म्हणा आणि तेवढं च कारण काकूंकडे जायला."

" जाऊ दे गं तू पण काय तिच्यावर पाळत ठेवतेस. जा आशू जा अन जास्त उशीरा ये, गरम पोळी झाली असेल तर वाढ मी जेवूनच घेतो ." बाबा हसून म्हणाले.

अाशू धूम पळाली, थेट दारात!

" काकू. . . "तो " . . . आहे ?"

"नाही बहुतेक . बाहेर जातो म्हणत होता, गेला असेल तर बघ ."

"त्याच्याकडे काम नाहिय , मला त्या प्लेटस न्यायच्या होत्या. त्याच्या खोलीतल्या?"

" जा की घेऊन जा. " ती बिचकत तसंच त्याच्या खोलीकडे गेली.

आत डोकावली तो नव्हता, प्लेट तशीच टीपॉयवर होती व तो प्लेटवर ढोकळा तसाच होता . तिला खूप वाईट वाटलं. सगळ्या खोलीत नजर फिरवल।

कितीतरी मधुर आठवणींच्या पाऊलखुणा तिथे होत्या, अजुनही भडभडत होतं.

तो नाही हे बरं झालं असं काहीसं तिला वाटलं पण जो राग जो तिला त्याला दाखवायचा होता . . . तो दाखवायचा राहूनच गेला.

प्लेट जवळ हात नेला आणि चाहूल लागली म्हणून तिने दाराकडे पाहिलं तर तो दारात उभा होता ,एका हाताने दार अडवून.

तिने मान झटकली.

" प्लेट उचलू नकोस, तो वरचा ढोकळा खायचा आहे मला." तो सरळच बोल ला आता.

" कशाला माझी टिंगल उडवायला? तो ढोकळा एका प्रेमळ व्यक्तींसाठी बनवला होता तुझ्यासारख्या क्रूर माणसाला तो मिळणार नाही."

" वा वा ! राग तर फारच नकट्या नाकाच्या शेंड्यावर!"

" मी नकटी नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही."
तिने तो एक ढोकळा उचलला आणि आत ठेवण्यासाठी वरची प्लेट उघडली आणि थक्क झाली आतली प्लेट चक्क रिकामी, कोरडी!

तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

तो हसून म्हणाला "अं हं ! काळजी करू नकोस तेथले ढोकळे गेले, इथे माझ्या पोटात, हिंमत असेल तर घे काढून ."

" हो खादाड कुठला ! हा तरी का शिल्लक ठेवलास. खायचास ना !"

"हो तुझी ऑर्डर होती ना खा म्हणून पण . . . तो एक तुला डिवचायला ठेवला होता .कसं काय वाटलं ? "

तिने रागाने प्लेट वरचाच तो ढोकळा त्याच्या हातात पटकला तरी तो रस्ता सोडेचना.

"सऽ रऽ कऽ " आवाजात जरब होती.

" आज तुझे ते हात ही काय करावे समजत नाहीय काय चव आहे तुझ्या हाताला ! सॉलिड ! सुगृहिणीचं प्रमाणपत्र घेऊन टाक माझ्याकडून. वा वा खुश कर दिया!"
तो खालच्या आवाजात बोलत होता.

"सचिन तू सरकऽ !"

" अगं राहू दे ना! सोड तो राग, अाशू थांब ना, प्लीज !"
तो कुजबुजत पण कळवळून बोलला की ती क्षणभर बावरली .

"आज तू \"माझा सचिन\" राहिला नाहीस. तू मला खूप मोठी जखम दिलीस. तुम्हाला दुखवलस. ऐक ना ! संध्याकाळी मी एक तास तुझी वाट पाहिली .तुझ्यासाठी किती तयार होऊन बसले होते. पण इथे कदर कोणाला? तुझ्यावर कुणीतरी जादू केलीय, तू बदललास सचिन. मला तुझा खूप खूप राग आलेला आहे . आल्यावर एका नजरेने पाहिले देखील नाहीस. मी इतकी गौण कधीपासून झाले ? तेही ठीक एवढी मरमर करून, आईचे टोमणे ऐकूण ढोकळे केले तर आल्यावर ते नाटक केलंस. नव्हतं बोलायचं तर सांगायचं मी तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते. इतकं टोचून कडवट बोलायची गरज होती का? तुला काहीच कसं वाटलं नाही ? जाऊ दे आता संपलं सगळं .आता स्वप्नासारखा विसर ! तुला माझी गरज . . . ?"

बोलता बोलता ती दचकून थांबली, कारण समोर उभ्या सचिनने दोन्ही हाताने तिच्या खांद्याना घट्ट पकडलं होतं.
ती पुन्हा भेदरली.


"माझी वेडाबाई! . . . इथे बस !" त्याने तिला तसंच नेत पलंगावर बसवलं.

हळुवारपणे तिचा हात हातात घेऊन तो खाली टेकला." तिच्या डोळयात डोळे भिडवत हळूच म्हणाला ," आशु खरंच इतकी दुखावली गेलीस? "

तिने नजर वळवली अर्थात भिजले पापण्या!

" आशू इकडे पहा .मी तुला कधी दुखवेल का? लगेच इतक्या टोकाला गेलीस. . . इतका का मी वाईट आहे ? "

"तुझ्या मनालाच विचार , मला घरी जायचं आहे "


तिच्या आवाजात अजूनही तशीच निस्पृह ता

आता मात्र सचिन टाळी वाजवून मोठय़ांदा हसला खदाखदा.

ती मात्र गोंधळात पडली.

" काय झालंय हसायला?"

"वाह वाह मॅडम , डोन्ट यू थिंक इट वाज अ थ्रील! अगं सगळं सरळ चालल्यावर असं वाटतच नाही की आपलं प्रेम आहे. . . असं तूच म्हणाली होतीस ना मागे एकदा? आठवतं ? शिवाय आपलंसं वाटणारं एखादा माणूस आपल्यावर किती प्रेम करतय हे पाहण्यासाठी चा उत्तम मार्ग म्हणजे आत्ताचा प्रसंग ! जस्ट अ थ्रिल!"

" बदमाश!"

" थँक्यू फॉर युवर लव्ह ! काय चेहरा पडला होता ? सॉलिड "

"ओह सॉलिड ! पण आता काही उपयोग नाही अॅक्टिंग करुन. तू वागलास ते वागलास .मी तडजोड करणार नाही. मी हे कधीच विसरले नाही, विसरणार नाही. असं नको समजू की मी तुझ्यासाठी पुन्हा आले होते. मला प्लेटस न्यायच्या होत्या रिकाम्या! येते मी."

" ओऽ . . . महाराणी ! असं काय रागावणं? आम्ही तुम्हाला सुगृहिणी चं प्रमाणपत्र देऊन टाकलं. तुम्हीपण आम्हाला बेस्ट अॅक्टरचं देऊन टाका . . . यार आशू ऐक ना! जा तुला असं वाटतं का की तुला रडताना पाहून मला बरं वाटलं असेल?"

तिने जाता जाता वळून पाहीलं.

" शपथेवर सांगतो तुला रडताना ,चिडून बोलताना पाहिलं तेव्हा मी आतून पूर्ण गलबलून गेलो होतो. वाटत होतं की वाटत होतं की पटकन तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसावे आणि तुला जवळ घ्यावं पण. . . ?"

आशू मनात सगळी परिस्थिती समजली पण तिला इतक्या लवकर नमायचंच नव्हतं.

ती निघून गेली.

मागून सचिन दारात आला "ए आशू ऐक ना!"

समोर त्याची आई होती. त्याला खूप लाजिरवाणं झालं.

स्वत शीच हसत त्याने उजवा हात मानेवर फिरवला व लाजून स्वतःच्या खोलीत गेला.

रमाताईंना खूप हसू आलं , दोघांत झालेली धुसफूस त्यांच्या लक्षात आली.


क्रमशः 

लेखिका ©® स्वाती  बालूरकर,  सखी

दिनांक  ०९. ०९ .२०२२

🎭 Series Post

View all