तिचा - त्याचा आणि सगळ्या चाळीचा बाप्पा...( सत्य कथा )

Ganpati


        नेहा आणि आशिष ची जोडी पूर्ण चाळीत फेमस होती. चाळीतल चं प्रेम आणि मग आठ वर्षाच्या अफेअर नंतर लग्न..

     नेहा च्या घरी ह्यांच्या लग्नाला परमिशन नव्हती म्हणून सगळ्या चाळीतल्या मित्रानी आशिष आणि नेहा ला लग्नासाठी मदत केली आणि नेहा - आई - वडिलांच्या कडक शिस्तीत हि घरातून पळून गेली आणि जवळच्याच एका मंदिरात जाऊन लग्न करून आई - वडिलांच्या च्या बाजूलाच तीन रूम सोडून असलेल्या आशिष च्या घरची सून झाली.

          आशिष म्हणजे हसरा झरा, चाळीत सर्वांना मदत करण्यासाठी सदा तत्पर असणारा असा हा आशिष. पण नेहा च्या घरच्यांना तीच प्रेम मान्य नव्हत, नेहा च्या घरी आई - वडील, नेहा आणि तिची छोटी बहीण ऋचा असं चार जणांचं कुटुंब. आई - वडील लग्नाला दोन वर्ष झाल्यावर, आणि आता नेहा प्रेग्नेंट आहे कळल्यावर बोलू लागले होते.. सगळं अगदी छान  चालू होते.नेहा ला सुद्धा आशिष सारखा तीला सतत सुखी ठेवणारा जोडीदार मिळाला ह्याचा खूप आनंद होता. आणि ह्या कोरोनाने नेहा ला सातवा महिना चालू असतानाच आशिष ला हिरावून नेले. 

      आशिष  एकुलता एक , वडील लहानपणी चं एका अपघातात वारले होते तेव्हापासून आई ने स्वयंपाक करण्याची कामं करून ह्याला मोठं केलं होत. ह्याच शिक्षण केलं होत, आशिष  ला पण परिस्थिती ची चांगलीच जाण होती, तो हि बारावी नंतर पार्ट टाइम जॉब करून आई ला घरात पैश्याची मदत  करू लागला.

        सुरवातीला छोटा - मोठा जॉब करत आशिष  ने त्याची पंधरावी पूर्ण केली. मग त्यानंतर कॉम्पुटर चा कोर्स केला, आणि मग बऱ्याच ठिकाणी इंटरव्हिव्ह दिल्यावर त्याला लग्नाआधी सहा महिन्यापूर्वी चांगला जॉब लागला होता. त्याची आई खूप खुश होती. सगळ्या चाळीत तिने आशिष  ला चांगला जॉब लागला म्हणून पेढे वाटले होते.

       अशा या आशिष च्या घरी लहानपणापासून चं बाप्पा चं आगमन होत असे, पूर्ण चाळीत त्यांच्याकडे चं बाप्पा होता, त्यामुळे सर्व चाळीतली लोक स्वतः च्या घरचा चं बाप्पा असल्यासारखं आशिष  ला डेकोरेशन, ला मदत करत असत. त्याची आई पण खूप प्रेमळ होती, त्यामुळे बाप्पा येयच्या दोन दिवस आधी तर आशिष चं घर मुलांनी भरलेलं  असे. सर्व चाळीतल्या बायका त्याच्या आई ला मदत करत असत.

      सर्व चाळ अगदी ते गणपती चे अकरा दिवस दुमदुमत असे. जोर - जोरात आरत्या म्हंटल्या जातं असत. रोज चाळीतली लोक वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद करून देवाला देत असत. सर्व बायका त्याच्या आईला जेवणात मदत करत असत. घरचाच गणपती समजून सर्व मनोभावे सेवा करत असत. नेहा सून म्हणून आल्यावर पण असचं सगळं छान  चालू असे. पण लग्नाला दोन वर्ष होऊनही नेहा ची कूस उजवत नव्हती आणि मग आशिष घरच्या बाप्पा ला नवस बोलला कि बाप्पा पुढच्या वर्षी तू येयच्या वेळी आमचं बाळ पण तुझ्या स्वागतला असूदेत हीच एक इच्छा आहे.

      आणि गपणती गेल्यानंतर तीन चं महिन्यानी नेहा गरोदर राहिली आशिष ने बाप्पा चे खूप आभार मानले. पण म्हणतात ना नियती च्या मनात काहीतरी वेगळ चं असत. आणि नेहा ला सातवा महिना चालू असताना कोरोना च्या लाटेत आशिष  त्या सर्वांना सोडून गेला.

         नेहा खूप रडली, आशिष ची आई पण बोलू लागली बाप्पा काय केलेस तू हे, तुला कोण आणणार पुढच्या वर्षी, का तू आमच्या आशिष ला हिरावून नेलेस. नेहा ने दोन महिन्यानी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा सारखी बाप्पा ला म्हणत असे, कि ज्याला मुलींची खूप आवड होती त्यालाच तू बाप बनन्याआधीच घेऊन गेलास.

      गणपती जवळ येऊ लागले होते. नेहा आणि त्याच्या आई ला आशिष ची खूप आठवत  येत होती. आठ चं दिवस उरले होते बाप्पा घरी यायला पण ह्या वर्षी दरवर्षी सारखी चाळीत धामधूम नव्हती. सगळ्यांना आशिष ची कमी भासत होती. कोणीच पुढे येऊन मदत करायला बघत नव्हते म्हणजे मदत करायची नव्हती असे नव्हते पण आशिष गेल्यामुळे प्रत्येकाचे मन कचरत होते. नेहा आणि तिच्या सासूला कसं वाटेल ह्या विचाराने...

      आणि गणपतीला दोन दिवस असताना नेहा ने चं पुढाकार घेऊन चाळीच्या नोटीस बोर्ड वर लिहिले..... सगळ्यांनी आमच्या घरी रात्री नऊ वाजता जमायचं आहे  आपल्या बाप्पा ची तयारी करायला.

        सगळ्या चाळीत पुन्हा एक उत्साह संचारला. आणि मग गणपती आणण्यात आला. आशिष च्या सर्व मित्रांनी खूप मदत केली नेहा ला, आशिष ची चिमुकली आराध्या पण होती ह्या वेळी बाप्पा च्या आगमनाला.

      बाप्पा आल्यावर नेहा ला खूप रडू आलं, आशिष का तू नाहीस आमच्यात आज बाप्पा चं सर्व करायला असं बोलून नेहा खूप जोरजोरात रडू लागली. आशिष ची मुलगी आराध्या ढोपरावर रेंगाळत नेहा जवळ आली. आणि तिच्या रूपात का कोण जाणे.... नेहा ला बाप्पा ची प्रतिमा दिसली...आणि नेहा तिच्या समोर नतमस्तक झाली.

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )