4 फेब्रुवारी - माघी गणेशोत्सव...( पूजा विधी )

Ganpati

आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती.

माघी गणेश जयंतीला तीळकुंद जयंती, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीचा जन्म झाला. पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक गणेशलहरी सक्रीय असतात.

या तिथीला गणेशलहरी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.


गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने अधिक प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटींनी कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वाचे विशेष महत्त्व आहे. दुर्वा अमृतासारखी असून त्याचा कधीही नाश होत नाही, असे मानले जाते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.

गणेश जयंतीच्या दिवशी विधी, उपवास, पूजा आणि गणपतीची जन्मकथा सांगणे किंवा श्रवण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते.

माघी गणेश पूजनाचा विधी---

     सकाळी लवकर उठून नित्यकर्म, आंघोळ आदी आटपून नंतर पूजाविधीचा संकल्प धरावा. गणपतीची एका चौरंगावर अथवा पाटावर स्थापना करावी. गणपतीचे आवाहन करावे. षोडषोपचार पूजा करावी. गणपती, महादेव (शंकर), गौरी (पार्वती), नंदी आणि कार्तिकेय यांचीही मनोभावे पूजा विधीपूर्वक करावी. गणपतीला जास्वंदाची फुले आणि दुर्वा प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला जास्वंदाची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्या. यानंतर अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे. गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणायला हरकत नाही. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवावा.

भाद्रपद चतुर्थीला गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. तर माघी गणेश जयंती निमित्त गणपतीला तिळापासून तयार केलेल्या लाडवांचा अर्थात तीळकुंद या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. तीळकुंद नसल्यास घरात तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. काही कारणामुळे पूजेच्या वेळी घरात कोणताही पदार्थ तयार नसेल तर दूध, गूळ, साखर यापैकी एखाद्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

नमस्कार... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )