गनीम आला होता पण..

इतिहासाच्या पार्श्वभूमीवर एक काल्पनिक शौर्य कथा

कथेचे नाव : गनीम आला होता पण..
विषय:काळ आला होता पण...
फेरी:राज्यस्तरीय लघुकथा फेरी


किर्र किर्र रातकिडे किरकिरत होते.अंधार सगळीकडे दाटून आला होता.अंधार मी म्हणत होता आणि ह्या रात्रीच्या अंधारात ते चार घोडेस्वार प्रचंड वेगाने अंतर कापत होते."काशी,घोडं पळिव.वाट उरकायला पायजे."


असा आवाज येताच काशी म्हणाला,"मालक आवं घोड्यांच्या तोंडाला फेस आलाय पार. जित्राब थकून गेल्यात."


तेवढ्यात तिसरा स्वार म्हणाला,"थांबून चालायच न्हाय गड्यांनो."


चौथ्या स्वाराने हाळी दिली,"काय बी झालं तरी शिवापूर गाठाय पायजे."घोड्यावर मांड परत आवळली गेली आणि घोडी उधळली.


इकडे लाल महालात हाहाकार उडाला होता,"बचाव,बचाव. शैतान आ गये."


असे ओरडत शाहिस्तेखान आणि त्याची छावणी सावध व्हायच्या आत महाराज आणि त्यांचे सवंगडी लाल महालातून बाहेर पडले.पुण्याच्या आसपासच्या बारा मावळातील हे मावळे.ठरलेल्या योजनेप्रमाणे आपापल्या मार्गाने निघाले.त्यातच काशी आणि त्याचे साथीदार होते.


गनिम सावध झाला आणि पाठलाग सुरू झाला,"पकड के लाव सबको, किसिको मत छोडना."


मुघली सैन्यातील पथकप्रमुख आगपाखड करत पाठलाग करत होते.तर काशी आणि त्याचे साथीदार होते तरी कोण?


मुळा आणि मुठेच्या खोऱ्यात किल्ले कोंढाणा होता.त्याच्याच पायथ्याशी असलेल्या छोट्याशा वाडीतील हे चार बहाद्दर. काशी, शिवा, दौलती आणि जोत्याजी. लहानपापासूनच एकमेकांचे जिवलग.


ही पोरं दहा - बारा वर्षांची असताना अवघा मावळ मुलुख वेडा झाला स्वराज्याच्या ध्यासाने.शिवबाच्या सैन्यातील शिलेदार असणे म्हणजे मानाचे पान मिळवणे. महाराजांवर जीव ओवाळून टाकायला ही मावळ खोऱ्यातील मंडळी सदैव तयार. काशी आणि त्याच्या मित्रांचे स्वप्न होते सैन्यात जायचं आणि राजांसाठी पराक्रम गाजवायचा. काशी भाला चालवण्यात पटाईत तर जोत्याजी विजेच्या वेगाने दांडपट्टा फिरवी. शिवा आणि दौलतीची तलवार चालायला लागली की समोर कोणी टिकत नसे.


अशा ह्या पोरांनी मिसरूड फुटू लागताच कृष्णाजी पाटलांकडे साकडं घातले,"पाटील, आमाला घ्या की कामगिरीव."


पाटील मिशिवर पिळ देत म्हणाले,"आवं ऐकलं का,ह्यो शिवा आन त्याचं मैतर काय म्हणत्यात?"


तसा आतून आबदार,कुलीन आवाज घुमला,"मराठ्यांची पोरं ती, तलवारिशी आदी लगीन लावणार. समद्या मावळ मुलखातल्या आयाबाया ह्या सवतीव जीव लावत्यात."


पाटील हसले,"बर,पोरांनो ह्या येळला तुमी चला राजगडाव, मंग बघू."


पोरांची काळीजं सुपाएवढी झाली.राजे,राजांचा गड आणि हरहर महादेव अशी गर्जना.सगळीकडे फक्त हेच दिसत होते त्यांना. पोरांना पाटलांनी गडावर नेले.तिथे रीतसर त्यांना सैन्यात भरती केले. सतरा अठरा वर्षांची तरुण पोरे कधीकधी उत्साह उतू जाई.


अशावेळी त्यांची रग हत्यार चालवण्यात जिरावायची पाटलांना चांगले ठाऊक होते.तर शाहिस्तेखान पुण्याला विळखा घालून बसला.जवळपास दोन वर्ष झाली तरी तो हलेना.त्यावर ही पोर अनेकदा पाटील आबांना म्हणत,"आबा,घुसतो छावणीत आन मुंडकच मारतो खानाचं.आमी मेलो तरी रयत सुखी व्हईल."


कृष्णाजी हसत म्हणाले,"राजांना काय सांगू रं पोराहो?त्यांनी इचारल की माझा जोत्याजी,शिवा,काशी आन दौलती कुठंय? काय जबाब दिऊ?"


असे म्हणाल्यावर सगळे गप्प होत.असे दिवस चालले होते आणि अचानक एक दिवस निरोप आला,"खानाला मारायची तयारी सुरु करायला हवी."


टेहाळणी,योजना सुरू झाल्या.चारही पोरं ह्या मोहिमेत सामील होती.शिवाचे नुकतेच लग्न झाले होते.पहिली सून बाळंतपणात गेली.ह्यावेळी पाटलीनबाईंनी भाची सून करून आणली होती. अशात मोहीम निघाली.ओल्या हळदीचे अंग घेऊन शिवा मोहिमेवर निघाला.



गेले महिनाभर टेहळणी करून बहिर्जी नाईकांनी राजांना सांगावा धाडला.दिवस ठरला,योजना ठरली.वाड्यात घुसायचे कसे? बाहेर पडून कोणत्या दिशेने जायचे? सगळे ठरले.त्याप्रमाणे मोहीम फत्ते झाली.मावळे वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडले.सगळे ठरल्याप्रमाणे चालले होते.


पण अचानक शिवा आणि त्याच्या मित्रांना शत्रूने पाहिले.त्या काळोख्या रात्री पाठलाग सुरु झाला. काशी ओरडला,"शिवा, गड्या घोडी दमल्यात रं.आता फूडं न्हाय जायची ती."


शिवा म्हणाला,"फूडं गाव दिसतंय. जनावर सोडा रानात आन चला."

दौलती म्हणाला,"आरं पण गावात कुठं लपणार?"


जोत्याजी हसला,"अय आरं लवकर आटपा न्हायतर हितच पुन्यांदा गनीम गाठल आपल्याला."


घोडे रानात सोडून चौघेही गावात आले.शिवाने वाडा हेरला दरवाजा ठोकला.आतून म्हाताऱ्या पहारेकऱ्याने आवाज दिला,"कोण हाय म्हणायचं?"


काशी म्हणाला,"जय भवानी,बाबा दार उघडा."

पहारेकरी म्हणाला,"न्हाय,रातीला दार उघडणार न्हाय."


दौलती म्हणाला,"चला फूडं लवकर."


तितक्यात दिंडी दरवाजा उघडला.आतून एक मंजुळ पण कणखर आवाज आला,"राजाचं शिलेदार असाल तरच आत या न्हायतं चालू लागा."


सगळेजण आत आले.दरवाजा झटकन बंद झाला.समोर एक तरुण नव विवाहित स्त्री उभी होती.शिवा अदबीने म्हणाला,"आक्का पुण्याच्या मोहिमेवर गेलतो.तिकडं कोंढाणा पायथ्याला राहतोय.गनीम हाय पाठीवर.आजची रात आसरा दे."


तशी समोरची स्त्री हसली,"दादा,आर म्या बी कोंढवे गावची हाय. माह्यारचं माणूस हायेस तू माझ्या."

इतक्यात दारावर थाप पडली,"दरवाजा खोलो."

पहारेकरी म्हणाला,"कोण हाये?"

बाहेरून आवाज आला,"तेरा बाप,दरवाजा खोल, नही तो आग लगा देंगे."


आता प्रश्न उभा राहिला.इतक्यात त्या तरुणीने वर पाहिले.वाड्याच्या बुरुजावरुन टेंभा हलला.ती म्हणाली,"दादा, पंधरा इस जन हायेत.तुमि फक्त आत जावा आन तिथं लपा."

काशी म्हणाला,"पर आक्के तुला काय केलं म्हंजे?"

तशी ती हसली,"आरं गुणवंत पाटलाची लेक आन हैबतरावांची बायको हाय म्या."

तिने दरवाजा उघडला.हात जोडत म्हणाली,"मालक यावं.काय तकलीफ हाय का?"

तसा म्होरक्या म्हणाला,"चूप कर,हम किसिको धूंड रहे है.चल दिखा.तू कोण है?"

ती परत हसत म्हणाली,"तारा म्हणत्यात मला.पर हितं कोणच न्हाई जी."

एकजण गुरकावला,"कोण नाही,तू हाय की."

ताराने राग गिळला,"हुजूर,एवढं रातीचं फिरताय दमला असाल. गंगे आगं मसाला दूध आन."

तिच्याकडे वासनेने पहात दुसरा म्हणाला,"हूजूर पेहले दूध लेते है,बादमे....."

तेवढ्यात गंगू वीस पेले घेऊन आली. दमल्याने सगळेजण दूध पिले.दूध पिऊन झाले. त्यातला एकजण जिभल्या चाटत पुढे झाला,"दूध तो बहोत स्वादिष्ट था अब जरा..."

इतक्यात डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली.तसे म्होरक्या ओरडला,"दगा,सबको काट डालो."


तशी तारा ओरडली,"गंगे,काढ तलवारी."

ती हाक ऐकून शिवा आणि त्याचे मित्रसुद्धा बाहेर धावले.तलवारी भिडल्या.नशेत असलेले मुघल कापले जाऊ लागले.वाड्यात रक्ताचा चिखल होऊ लागला.काशी बेसावध असताना त्याच्यावर मागून वार झाला.तो वार वरच झेलून गंगू म्हणाली,"मागणं वार करतोयस काय रं भाड्या."


पुढच्या क्षणी ताराचा खंजीर त्या सैनिकाच्या गळ्यावर फिरला.जवळपास तासभर झुंज चालली.शेवटी सर्वांना नरकात पोचवून सगळे शांत झाले.


तारा शांतपणे म्हाताऱ्या पहारेकऱ्याला म्हणाली,गणुजी काका,गावातून चार माणसं आणा विश्वासाची आन ही मढी रानात फेकून द्या.गंगे पाणी तापाय ठिव."


ह्या चौघांकडे वळून तारा म्हणाली,"दादा,ह्या भनीच्या हातची भाजी भाकरी खाऊन जा."

शिवा हसला,"ताराक्का आज गनीम आमचा काळ बनून आला व्हता पर तू समदं निभावलं."

काशी म्हणाला,"व्हय,अशा वाघिणी असतील तर स्वराज्य लांब न्हाई."

दौलती आणि जोत्याजी सुद्धा मान डोलवत म्हणाले,"आक्का,आता न्हाय थांबत.आमाला ठरलेल्या ठिकाणी पोचाय हावं."

तारा म्हणाली,"सुखरुप जावा माझ्या भावांनो."

चौघे बाहेर पडले.घोडे तोवर आराम करून वेगाने धावू लागले होते.


इकडे शिवाची वाट बघत पारू रात्रभर जागी होती.सासरे एकटे परत आलेले पाहून तिचा जीव रात्रभर थाऱ्यावर नव्हता.सकाळी न्हाऊन देवपूजा करून दारात सडा टाकताना तिचे कान सतत घोड्याच्या टापाचे आवाज घेत होते.

एवढ्यात गडी बुरुजावरुन ओरडला,"घोडी आली रं!"

तशी पार्वती धावत दारात गेली.शिवा घोड्यावरून उतरला.

पाटील धावत पुढे झाले.पारू आत पळाली.पाटील शिवाला म्हणाले,"शिवा कुठं अडकला व्हता रं?"

मागून जोत्याजी म्हणाला,"आव आबा गनीम काळ बनून माग दौडत व्हता पर एका वाघिणीन येळ सावरली बघा."

इकडे पार्वती देवघरात निरंजन लावताना म्हणाली,"महादेवा,असाच पाठीशी हुबा रहा.काळ कितीही येळा यीऊ दे.तारून ने."

बाहेर पाटील पोराचे पराक्रम ऐकत खुश होत होते आणि तिकडे मावळ मुलुखात शायिस्त्याची बोट छाटली ही गोष्ट नातवंडांना सांगताना म्हातारी खोडं म्हणत होती,"शिवबा हाय तवर काळ आला तरी माघारी जाईल."


ह्या सगळ्या पराक्रमी कथा ऐकून सह्याद्री त्याचा माथा आणखी उंच करून आनंदाने डौलात गात होता अनाम मावळ्यांच्या पराक्रमाची कितीतरी गाणी.

टीप:सदर कथा काल्पनिक असून कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही.

प्रशांत कुंजीर
जिल्हा:पुणे