" कवरत्ती शोधून दाखवा आणि शंभर रुपये मिळवा." रामजी ओरडत होता.
भूगोलात हुशार असलेल्या गंगाने लगेच ते ठिकाण नकाशात शोधून दाखवले. सर्वाना आश्चर्य वाटले. कारण आजपर्यंत नकाशाच्या खेळात रामजीला कुणी हरवू शकले नव्हते. रामजीने गंगाला शंभर रुपये दिले.
थोड्या वेळाने मॅडम वर्गात आल्या.
" गंगा , आता आवडत आहे ना " क " वर्ग ?" मॅडमने विचारले.
गंगा उभी राहिली. तिच्या मुखावर निर्विकार भाव होते. तिने खिश्यातून काडीपेटी काढली आणि शंभरची नोट पेटवली.
" गंगा या आगीतच जळाली. रामजी शेठने मला नवीन नाव दिले आहे. गंगू. रामजी म्हणाला की मी एकदिवस या कमाठीपुरा शाळेवर राज्य करेल. " गंगा सॉरी गंगू म्हणाली.
***
शाळेत ब्रेक होता. तेवढ्यात " अ " वर्गातला अब्दुल काबुलीवाला वर्गात घुसला आणि त्याने गंगाचा डब्बा हिसकावून घेऊन खाल्ला. असे रोजच होऊ लागले.
" तुम्ही मॉनिटर आहात ना. मग काही करत का नाही ?" एकजण रेश्माबाई ( "क" वर्गाची मॉनिटर ) यांना म्हणाली.
" तो अ वर्गाचा विद्यार्थी. आपण काहीच करू शकत नाही. " रेश्माबाई म्हणाल्या.
" त्याचा भाऊ करीम लाला काबुलीवाला खूप न्यायप्रिय माणूस आहे म्हणतात. " दुसरी म्हणाली.
मग गंगूने करीम लालाला भेटायचे निश्चित केले.
***
" काय काम आहे ?" करीमने विचारले.
" तुमचा भाऊ रोज क वर्गात येऊन माझा डब्बा खातो. जर तो माझी नावडती वांग्याची भाजी आणि फुलकोबी खात असता तर मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण शनिवारी भेटणारी मिसळपावपण ?" गंगूचे डोळे पाणावले.
" उद्याच्या ब्रेकला मिसळपाव घेऊन ये. माझा एक माणूस सॉरी मित्र " क " वर्गाच्या बाहेर उभा असेल. मी स्वतः येईल. " करीम म्हणाला.
नेहमीप्रमाणे ब्रेक झाल्यावर अब्दुल " क" वर्गात घुसला. त्याने गंगाच्या हातून डब्बा घेतला. मिसळपाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. करीम लालाच्या माणसाने सॉरी मित्राने लगेच ही खबर करिमला दिली. करीम लगेच क वर्गात आला. त्याने आपल्या भावाचे कान धरले.
" अम्मी एवढं खाऊ घालते. अब्बू एवढे खजूर खिश्यात टाकतात. माझा डब्बा खातोस. तरी या मुलीचा डब्बा खातो ?" करीमने अब्दुलच्या पाठीवर एक धपाटा दिला.
थोडा मार खाऊन अब्दुल पळून गेला.
" आजपासून गंगू माझी मानलेली बहीण आहे. जो हिला त्रास देईल तो या करीम लालाचा शत्रू असेल. " करीमने घोषणा केली.
हे ऐकून गंगू सुखावली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा