Jan 19, 2022
General

कोकणातील गणेशोत्सव

Read Later
कोकणातील गणेशोत्सव

#कोकणातील_गणेशोत्सव

कोकणात नागपंचमीचा सण झाला की प्रत्येकजण आपल्या ठरलेल्या गणपतीच्या शाळेत जाऊन गणपतीचा पाट नेऊन देतात व मुर्तीकारांना किंमतीनुसार गणपतीची मुर्ती सांगतात.
दहीहंडी हा सण कोकणात हल्ली थोड्याफार प्रमाणात साजरा केला जातो.दहीहंडीनंतर गावकरी गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु करतात.शेतात लावणीच्या रोपांची बर्यापैकी वाढ झालेली असते.

सगळीजणं आपापल्या घरांची साफसफाई करतात व आवडीनुसार भिंतींना रंग देतात.पुर्वी भिंतींना वरती आकाशी व खाली गेरुचा लाल रंग देत.स्त्रिया घरातील तांब्या,पितळेची व इतर भांडी घासून लखलखीत करतात.आठवड्याच्या बाजारात जाऊन गणपतीच्या बाजाराची व नवीन कपड्यांची खरेदी करतात.अगरबत्ती,धुप,कापूर,फुटाणे,काजू मोदक ,सजावटीचे साहित्य याने बाजार भरलेला असतो.लहान मुलांसाठी पेटारे(फटाके)आणतात.

घरातील लांबलचक वळयीत बाप्पाची स्थापना करण्याची प्रथा आहे.ज्याठिकाणी बाप्पा बसवतात,तिथल्या वरील मापानुसार कापडी छत खरेदी करतात.गणपतीच्या आसनावरती, माटीबांधलेली असते.माटी म्हणजे लाकडी चौकट असते.ती साग,शिवण,शिसम किंवा फणस या झाडांच्या लाकडांपासून तयार करतात.ही पुर्वापार चालत आलेली असते.सफाईच्यावेळी माटीला काढून स्वच्छ करतात.तिला छान रंग देतात व परत होती तशी बांधून ठेवतात.
माटीला हरणं,तेरडे,शेरवडा,सुपारीची चिपका(झाडावरची कच्ची सालासहित सुपारी)कांगलं(रानातील वेलींवरची फळं),आंब्याचे टाळ व श्रीफळ हे आवर्जुन सजावटीकरता वापरतात.सावंतवाडीची लाकडी फळे व इतर सजावटीचे साहित्य माटीला बांधतात.

रंगीबेरंगी पताका लावतात.त्या चिकटवण्यासाठी मैद्याची गोंद वापरतात.हल्ली वळईच्या मापाचे छत आणून लावले जाते.लायटीच्या तोरणांनी आकर्षक रोषणाई करतात.गणपतीच्या मागील भिंतीवर देवदेवतांची किंवा नैसर्गिक चित्रे काढतात.

कोकणात ज्या वास्तूत गणपती बनवतात त्या वास्तूला गणपतीची शाळा असे आदराने संबोधले जाते.पुर्वीच्या काळी प्रत्येक गावात गणपती शाळा नसल्याकारणाने लोक ज्या गावात गणेशशाळा असेल तिथे पाट नेऊन द्यायचे.मुर्ती पाच सहा किलोमीटरवरुन चालत आणावी लागे.प्रत्येक वाडीतले गणपती एकाच शाळेत सांगण्याची प्रथा होती.सगळीजणं एकत्र जाऊन आपापले बाप्पा आणत.मोठे गणपती डोलीमधून(पालखी)घेऊन येत.बाकीची लोकं नवीन टोपलीतून वरती प्लास्टीक बांधून गणपती घेऊन येत.वाजत गाजत गणपतीचे आगमन होई.

हल्ली एका टेम्पोतून वाडीतले गणपती आदल्या दिवशी घेऊन येतात.गणपतीचे स्वागत करण्यासाठी घरातली स्त्री गणपती ज्याच्या डोक्यावर असतो त्याच्या पायावर पाणी ओतते,.मग बाप्पाला घरातील एखाद्या खोलीत आणतात.

गणेशचतुर्थीदिवशी सकाळी उठून न्हाऊन घेतात व भटजीकाकांच्या सूचनेप्रमाणे प्रतिष्ठापनेची तयारी करुन ठेवतात.रांगोळी काढतात.भटजीकाका आले की बाप्पाला आसनावर बसविले जाते व घरातील कर्त्या पुरुषाच्यामार्फत मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.आरती म्हंटली जाते.आरतीच्यावेळी मुले झांज वाजवतात.एखादा तबला वाजवतो.एकजण बाप्पासमोर तळी धरतो. ओल्या नारळाचे तुकडे,फुटाणे यांची शेरवणी(प्रसाद)वाटतात.

माजघरात बायका नैवेद्याची तयार करत असतात.यादिवशी कोकणात प्रत्येक घरी सारखाच स्वैंपाक असतो.वरण भात,काळ्या वटाण्याची आमटी,पाच भाज्या(अळूच्या गाठी ,लाल माठव उकडलेले काळे वटाणे यांची एकत्र भाजी,परसवातल्या भेंडी,कारली,दोडकी यांची भाजी),उकडीचे मोदक,नेवर्या.,लोणची,पापड. गणपतीसाठी केळीच्या पानावर नैवेद्य ठेवतात.तुळसीची वाडी,उंदराची वाडी,अग्निदेवतेची वाडी,पित्रुदेवतेची वाडी वाढली जाते.

त्यानंतर सर्वजणांची पंगत बसते. संध्याकाळी परत आरती होते.जेवणं झाल्यावर स्त्रिया बाप्पासमोर झिम्मा, फुगडी घालतात.गीते गातात.भजनीमंडळ येते.ती मुले आरती करतात.भजन होते.भजनमंडळींना चहा,उसळ दिली जाते.
घरातील आबालव्रुद्ध मिळून चण्याच्या पीठाच्या करंज्या व लाडू बनवतात.दर्शनाला येणार्या मंडळींना तसेच भजनीमडळाला करंज्या,लाडू देण्याची प्रथा आहे.
दुसर्यादिवशी तांदूळाची खीर, तिसर्या दिवशी बिरडी करतात.चौथ्या दिवशी गौरी येतात.गौरीसाठी तांदळाचे वडे,सफेद वाटाण्याची उसळ,गोड वरणभात, काळ्या वाटाण्याची आमटी व गोड पदार्थ बनवितात.असे दहा दिवस बाप्पासाठी छान छान गोडाचे पदार्थ बनवितात व त्याला नैवेद्य दाखवितात.विसर्जनाच्या दिवसाला म्हामदा असे म्हणतात.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now