गंधबावरे 5

Marathi love story

मिहीर असे एकटक पाहत उभा असताना श्रेयाने लगेच तोंड वळवले आणि ती पुढे जाऊ लागली. मिहीरचे लक्ष फक्त श्रेयाकडेच होते. तिची हालचाल, तिचे ते लाजणे, तिचे हसणे पाहून तो घायाळ झाला होता आणि श्रेयाकडे पाहून तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला होता. श्रेयाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. केस पूर्ण मोकळे सोडले होते, गळ्यामध्ये छोटीशीच चेन, हातभर बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली, हलकासा मेकअप आणि चेहऱ्याला सूट होणारा लाल रंगाची लिपस्टिक यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. मिहीर तिच्याकडे एकटक पाहत होता. श्रेया तिथून दुसरीकडे गेली कारण तिला मिहीरला दाखवून द्यायचे नव्हते की तिला सुद्धा तो आवडला आहे. थोडासा भाव खावा या उद्देशाने ती दुसरीकडे गेली पण मिहीरला तिच्या वाचून काही दिसेना. तो तिच्या मागोमाग गेला. श्रेया जिकडे जाईल तिकडे मिहीर जाऊ लागला. ते पाहून अनुचे मन मात्र दुःखी झाले. तिला खूप वाईट वाटत होते. मिहीरने एकदा तिच्याकडे वळूनसुद्धा पाहिले नाही याचे तिला जास्त वाईट वाटत होते.

'आपण आवडू अगर न आवडू पण एकदा फक्त माझ्याकडे पाहिले असते तरी मला बरे वाटले असते. त्याने साधे वळूनही पाहिले नाही' असे मनात म्हणून ती दुःखी झाली. चेहरा पाडून ती एका खूर्चीत जाऊन बसली. तिचे कशातच मन लागेना. ती फक्त श्रेया आणि मिहीर काय करतात तिकडे पाहू लागले.

'जाऊ दे. किमान श्रेया तरी सुखी राहील ह्याचेच समाधान मानून मला शांत रहावे लागेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही आणि ते आपल्या मनाप्रमाणे व्हावे हा अट्टाहासही नसावा. आता त्याला मी आवडले नाही यात त्याची काय चूक? मी दिसायला अशी सावळ्या रंगाची, अगदी साधारण. श्रेया इतकी सुंदर आहे तर त्याची नजर आपसूकच तिच्यावर खिळली असणार.. कधीही पहिली नजर जाते ती सुंदर गोष्टीकडेच; तशी त्याचीही गेली. यात चूक त्याची नाही तर माझीच आहे. मीच दिसायला अशी आहे त्याला काय करणार? जाऊ दे. ते दोघे एकमेकांसोबत सुखी राहू देत. आपल्याला वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. मला नक्कीच असा योग्य मुलगा मिळेल जो मला या रूपासहित स्वीकारेल. तो माझ्या रूपाकडे न पाहता माझ्या मनाकडे पाहिलं, मला मनापासून स्वीकारेल असा नक्कीच कोणीतरी एक या जगात बनला असेल. तेव्हा आता विचार न करता आनंदाने हे लग्न एन्जॉय करूया. शिवाय श्रेयाचा तिरस्कारही करायला नको. कितीही केले तरी ती लहानपणापासूनची मैत्रीण शिवाय जीवाला जीव देणारी बहिणही आहे. तिचेही आयुष्य आहे. ती तिच्या आयुष्यात सुखी राहू दे, मी माझ्या आयुष्यात सुखी राहीन. आता आपण तिच्यावर चिडायचे नाही तर कोणतीही परिस्थिती आली तरी नेहमी हसत राहायचे. अशा अनेक परिस्थितीला आपण लहानपणीपासून तोंड देत आलो आहोत. कोणतेही काम असो, अगदी स्नेहसंमेलनात सुद्धा आपण चांगला डान्स करत असूनही आपल्याला मागे उभे राहावे लागले होते. ही गोष्ट आयुष्यात कधीच विसरून चालणार नाही. इथे फक्त रंगाला महत्त्व आहे बाकी कलागुणांना कधीच महत्त्व नाही. जाऊ दे. आपण कशाला विचार करायचा? आपण आपल्या आयुष्यात नेहमी सुखी आणि आनंदी राहायचे. कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय सोडायचे नाही' असा विचार करत अनु बसली होती.

इकडे श्रेया आणि मिहीर यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. श्रेया त्याच्यापासून दूर दूर जात होती. कोणाशी ना कोणाशी बोलत उभा राहायची आणि मिहीर मात्र तिच्या मागे मागे जायचा. एका क्षणाला श्रेयासोबत कोणी बोलत होते ते बाजूला झाले आणि श्रेया एकटीच उभी होती. तिथे मिहीरने जाऊन तिला गाठला आणि तिच्याशी बोलू लागला.

"हाय" मिहिर म्हणाला. 

"...." श्रेयाने फक्त स्माईल दिली.

"मला पाहून न पहिल्यासारखे का करत होतीस? माझ्याशी बोलायचे नाही का?" मिहिर म्हणाला. 

"मी तुम्हाला पाहिलेच नाही. तुम्ही कोठे होता?" श्रेया म्हणाली. 

"अच्छा, म्हणजे आता मी तुला दिसेनासा झालोय तर.. ठिक आहे." असे म्हणून मिहिर जाऊ लागला. 

"साॅरी, थोडीशी गंमत केली." श्रेयाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच मिहिर लगेच वळला. 

"पण आपण एकमेकांना ओळखतही नाही. मग मी तुला पाहून मी का थांबायचं?" श्रेया म्हणाली. 

"चल मग फ्रेण्डस्" असे म्हणून मिहिरने हात समोर केला.

"मी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत नाही. शिवाय मला जास्त मैत्रीणी नाहीत. अनु एकटीच माझी बालमैत्रीण आहे. नेहमी आम्ही दोघी असतो. आता तू आमच्यात तिसरा नको. मी तुझ्याशी मैत्री करणार नाही." श्रेया म्हणाली. 

"मग प्रेम कर." मिहिर शांतपणे म्हणाला. 

"काय?? तुम्ही काय बोलताय कळतंय का?" श्रेया म्हणाली. 

"हो. आणि चांगलंच. मिहीर हसतच म्हणाला. 

"नको त्यापेक्षा मैत्री केलेली मला परवडेल. नाहीतर सगळे मला ओरडतील. आमच्या घरात असे प्रेम कोणीच केले नाही. त्यापेक्षा मैत्री ठीक आहे. एक मिनिट थांब माझ्या मैत्रिणीला देखील तुझी ओळख करून देते." असे म्हणत श्रेया अनुकडे गेली.

"अनु, तू माझ्याशी का बोलत नाहीस? कालपासून माझ्याशी अबोला धरला आहेस. शिवाय काल मला तू ओरडलीस. माझं काय चुकलं? मला सांग. तू असा माझ्याशी आजपर्यंत अबोला धरलेला नाहीस आणि आता काय झालं आहे? मी तर काही केलेलं मला आठवत देखील नाही. बोल ना अनु, प्लीज माझ्याशी बोल. माझ्या मनातील भावना मी तुझ्यासमोर व्यक्त करणार आहे. मी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुला सांगितली आहे आणि आता माझे आयुष्य एका वेगळ्या वळणावर जात आहे तर यामध्ये तू अबोला धरला आहेस. बोल ना अनु." श्रेया अनुला बोलण्यासाठी सांगत होती.

"काही नाही ग श्रेया. माझा इंटरव्ह्यू आहे ना परवा दिवशी त्याचे टेन्शन आले आहे आणि त्याच रागात मी तुझ्यावर ओरडले. तुला काही बोलण्याचा माझा उद्देश नव्हता पण मनात विचार सुरू असताना तू एकदम आलीस तेव्हा मी तुझ्यावर चिडले. सॉरी ग. बोल तुला काय सांगायचे आहे? अनु म्हणाली. अनुने ठरवले होते की श्रेयाची यामध्ये काही चूक नाही. तेव्हा तिला काही बोलायचे नाही शिवाय तिच्याशी अबोला धरायचा नाही.

"अगं अनु, माझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली आहे. खरंच खूप गोड आहे ग तो. तू त्याला भेटलीस तर तुलाही तो आवडेल. त्याने चक्क माझ्यासमोर मैत्रीचा हात केला आहे आणि मी सुद्धा त्याची मैत्री स्वीकारली आहे. तो म्हणाला की तू मला आवडतेस पण अगं आपल्या घराण्यात असं कोणी केलं आहे का? आणि मी अगदी टोकाची भूमिका का बर घेऊ? आधी मैत्री करते आणि नंतर प्रेमाची कबुली देते. लगेच प्रेमाचे कबुली कशी देऊ ना? म्हणजे अनु मलाही तो खूप आवडला आहे पण थोडं भाव खाऊन घेते ग. नंतर भाव खायला मिळणार नाही ना?" श्रेया तिची बडबड करतच होती पण अनु मनातून खूप दुखावली होती. तिचे एक एक बोल तिच्या हृदयाला बोचत होते पण आपल्या मैत्रिणीसाठी ती सहन करायला तयार होती.

"तुला जसं वाटतं तसं कर. मी तुझ्या आनंदात सहभागी असेन. श्रेया, प्लीज मला एकटीला राहू दे ना. मला इंटरव्ह्यूचे टेन्शन आले आहे." अनु म्हणाली. 

"अगं अनु, तू तर स्काॅलर आहेस. तुला कसली टेन्शन घ्यायची गरज आहे. तुला नक्की हा जाॅब मिळेल." श्रेया म्हणाली. 

"तू येणार नाहीस." अनु म्हणाली. 

"तुला तर माहितच आहे. मला फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. मग मी कशी येणार?" श्रेया म्हणाली. 

"हं." अनु म्हणाली. 

"अनु, चल ना तुझी आणि मिहीरची ओळख करून देते." श्रेया म्हणाली. 

"नको ग श्रेया, प्लीज मला एकटीला राहू दे ना." अनु म्हणाली. 

"अगं फक्त एकदाच तुझी ओळख करून देते चल ना प्लीज." असे म्हणत श्रेया अनुच्या हाताला धरून मिहीरकडे घेऊन जाते.

यापुढील भाग वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all