Login

गंधबावरे 43

मराठी प्रेम कथा

अनुने मिहिरच्या आई-बाबांचे औक्षण केले आणि केक कापून त्या दोघांना भरवले. मिहिरने देखील त्याच्या आई-बाबांना केक भरवले.  मिहिरच्या आई व बाबांचे डोळे भरून आले कारण इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच त्यांची एनिवर्सरी अशाप्रकारे साजरी झाली होती. मिहिरने आईला मस्तपैकी सोन्याचे नेकलेस गिफ्ट केले आणि बाबांना रिस्ट वॉच दिले आणि त्याने त्या दोघांना नमस्कार केला त्याप्रमाणे अनुने देखील आईला साडी आणि बाबांना शर्ट गिफ्ट केले. ते पाहून मिहिरच्या आईला खूप आनंद झाला. "हे सगळं करण्याची काय गरज होती? बरं केलेस तरी गिफ्ट वगैरे कशासाठी ग?" मिहिरची आई म्हणाली.

"अहो आई, आम्ही तुमची एनिवर्सरी साजरी करतोय म्हटल्यावर गिफ्ट हे घ्यावेच लागणार ना? माझ्याकडून छोटीशीच गिफ्ट मी देत आहे." अनु म्हणाली.

"अगं, तू जे काही केलेस ते प्रेमाने केलेस इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे आणि जे काही केलेस ते मनापासून केलेस ते मला दिसत आहे. कोणतेही काम मनापासून केले की ते पूर्णत्वाला जातेच आणि ते प्रेमाने कसे करायचे हे तुझ्याकडून शिकावे. खरंच तू खूप गोड आहेस." असे मिहिरची आई म्हणत होती.

"आई, माझे कौतुक पुरे आता. खरंतर आजचा कौतुक करून घेण्याचा तुमचा दिवस आहे. तुमचे कौतुक व्हायचे सोडून तुम्ही तर माझेच कौतुक करत आहात. ते राहू द्या. आता ही साडी नेसा आणि हा नेकलेस घाला. बाबा तुम्ही सुद्धा हा नवा शर्ट घालून वॉच घालून तयार रहा. मस्त बाहेर जायचा प्लॅन आहे." असे म्हणून त्या दोघांना आवरण्यासाठी अनुने पाठवून दिले. तोच तिच्या मोबाईलची ट्यून वाजली म्हणून तिने मोबाईल पाहिला आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

मिहिरला ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागली नाही. अनुने मोबाईल पाहिले आणि तिचा आनंदाने भरलेला चेहरा जणू उदास झाला. तिच्या आनंदावर जणू विरजण पडले होते. त्याने अनुच्या नकळत मोबाईल चेक करायचा प्रयत्न केला पण मोबाईल लॉक असल्यामुळे त्याला ते पाहता आले नाही? 'ती का बर इतकी उदास झाले असेल? तिला कोणते टेन्शन आले असेल का? तिला कोणी त्रास देत असेल का? कॉलेजमध्ये कोणी रॅगिंग करत असेल का? की तिचा बॉयफ्रेंड असेल?' अशा अनेक प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले होते. तो त्याच विचारात बसला होता आणि अनुदेखील शांत झाली होती इतक्यात मिहिरचे आई-बाबा आवरून आले.

"अनु, हे बघ साडी कशी दिसते?" मिहिरची आई म्हणाली.

"आई, तुम्हाला ही साडी खूप सुंदर दिसते. खरंच हा रंग खूप खुलून दिसतोय. साडी घेताना माझ्या मनात असंख्य विचार आले होते पण आता नेसल्यानंतर या साडीला खूप छान लुक आलाय. खूप गोड दिसताय तुम्ही." असे म्हणून अनुनेही डोळ्यातील काजळ त्यांच्या कानामागे लावला. मिहिरचे बाबाही अनुने दिलेला शर्ट घालून आले. त्यांनाही अनुने खूप छान कॉम्प्लिमेंट दिली आणि मगासचा नाराज झालेला तिचा चेहरा पुन्हा फुलून आला ते पाहून मिहिर संभ्रमात पडला.

मिहिरचे आई-बाबा मंदिरात गेले. देवाचे दर्शन घेऊन त्यांनी अनुने सांगितल्याप्रमाणे पिक्चर पाहून बाहेर फिरून संध्याकाळी घरी आले. इकडे मिहिर मात्र घरातच होता. अनुच्या मनात असंख्य विचार सुरू होते. तो मेसेज आल्यापासून ती स्वतःच्याच विचारात होती आणि मिहिर तर अनुच्या विचारात होता. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता की अनु कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकली नसेल ना? मिहिरला अनुची काळजी वाटत होती.  त्या काळजीपोटी तो तिचा विचार करत होता. ती काय करत होती? कुणाशी बोलत होती? हे सगळे तो या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवून होता.

बराच वेळ झाला तरी अनु रूमच्या बाहेर आली नाही म्हणून मिहिरला तिची काळजी वाटू लागली.  टेन्शनमध्ये तिने काही बरे वाईट करून तर घेतले नाही ना? अशी भीती तिला वाटू लागली होती कारण त्यावेळी घरामध्ये फक्त ते दोघेच होते. रूममध्ये पाहून यावे का? असा बऱ्याचदा त्याच्या मनात विचार आला पण त्याचे काही धाडस झालेच नाही. तरीही बराच वेळ निघून गेल्यावर तो रूमकडे जायला निघाला. रूमच्या दारातच त्याची पावले थबकली. त्याने दोनदा दारावर ठोठावले पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे मनातून घाबरून त्याने धाड्कन रूमचे दार उघडले तर आत पाहतो तर काय अनु बेडवर झोपली होती.

मिहिर हळूच तिच्याजवळ जाऊन बसला आणि तिच्याकडे निरखून पाहू लागला. 'टेन्शनमध्येही हिला कशी काय झोप येते काय माहित? सकाळी तर खूप टेन्शनमध्ये होती आणि आत्ता इतकी गाढ झोपली आहे की जणू कसलेच टेन्शन नाही. खरंतर हिला कोणतेही टेन्शन असू नये, ही अशीच आनंदी हसत खेळत राहावी, इतरांचं भले करणाऱ्या व्यक्तीवर कधीच दुःखाची झळ लागू नये, ही मनाने खूप चांगली आहे हे देवा हिला नेहमी आनंदी ठेव' असे मनात म्हणत तो अनुकडे निरखून पाहत होता. इतक्यात अनु उठली आणि तिने समोर पाहिले तर समोर मिहिर बसला होता.  त्याला पाहून ती धाडकन उठून बसली.

"तुम्ही इथे काय करताय?" अनु घाबरतच म्हणाली.

"तू मगाशी टेन्शनमध्ये दिसलीस आणि बराच वेळ झाला खाली मी एकटाच बसलोय. तू रूममध्येच आहेस म्हणून काय करत आहेस हे पाहायला आलो होतो तोपर्यंत झोपलेली दिसलीस म्हणून पुन्हा जातच होतो. तोपर्यंत तुला जाग आली." असे मिहिरने स्पष्टीकरण दिले.

"ते कॉलेजची परीक्षा आहे असा मेसेज आला होता म्हणून थोडसं टेन्शन आले होते. तर आता थोडीशी रिलॅक्स झाले त्यामुळे झोप लागली. सहसा मी दुपारी झोपत नाही पण आज कशी काय झोप लागली काय माहीत?" अनु म्हणाली.

"अच्छा तसे होते होय. मला वाटले की तू खूप टेन्शनमध्ये असशील म्हणून मला तुझी काळजी वाटली." असे मिहिर म्हणाला. 

"असे टेन्शन वगैरे काही नाही. नेहमीचेच कॉलेज अभ्यास बाकी काही नाही." नजर चोरतच अनु म्हणाली.

"बरं ठीक आहे पण जेव्हा कधी तुला माझी गरज लागेल तेव्हा एक हाक दे. मी नक्कीच तुझ्या मदतीला तुझ्यासोबत असेल." मिहिरने इतकेच म्हणताच अनुचे डोळे पाणावले आणि त्यातील एक ओघळ गालावरून ओघळू लागला. ते पाहून मिहिरला गहिवरून आले. तो अनुना समजवायला जाणार इतक्यात त्याचे आई-बाबा आल्याचे त्याला समजले तेव्हा दोघेही रूममधून बाहेर आले.

आई-बाबांनी बाहेर कोणकोणत्या गोष्टी केल्या, कशी मजा केली हे त्या दोघांना सांगत होते आणि त्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. त्या गप्पांमध्ये बराच वेळ निघून गेला. मिहिरची तब्येत आता पूर्णपणे बरी झाली होती त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो ऑफिसला जाण्यास तयार होता.

"आई उद्यापासून मिहिर ऑफिसला जाईल तेव्हा दिवसभर मी घरातच असणार आहे. तुम्ही मी घेतलेला निर्णय आणि ऑफिसमध्ये मी जे जे काही केले ते यांना प्लीज सांगाल का? म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको?" अनु मिहिरच्या नकळत आईला सांगत होती.

"हो. आज रात्रीच मी त्याला सगळं सांगते. नवीन डील झालेली देखील सांगते आणि तो निर्णय सर्वस्वी मीच घेतला आहे असेही सांगते. म्हणजे त्यातून तुला काहीच अडचण नको. अनु, मला काय वाटतं की मिहिरसोबत तू सुद्धा ऑफिसला जावेस. जेणेकरून तुझेही तिथे मन रमेल आणि दोघे एकत्र राहिला तर तुमच्या मधील संबंध चांगले होतील." मिहिरची आई म्हणाली.

"नको आई, उगीच संशय यायला नको. त्यापेक्षा मी घरातच राहीन. तसेही माझ्या परीक्षा सुरू आहेत असे मी सांगितले आहे त्यामुळे अभ्यास असल्याने घरात राहत आहे असे सांगता येईल. बाकी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासोबत असेनच." असे अनु म्हणाली.

"तू तर आहेसच ग, पण तुझे अस्तित्व निर्माण करायचे होते तुझ्या स्वप्नं सारे काही त्यामध्ये अडथळा येत आहे." मिहिरची आई म्हणाली.

'माझे अस्तित्व काय प्रत्येक गोष्टीतच आता अडथळा येणार आहे. तसेही मी ऑफिसमध्ये जाऊन काय करणार? आणि किती दिवस जाणार? एक ना एक दिवस मला इथून जायचेच आहे तर यामध्ये कुढत राहून काय उपयोग? त्यापेक्षा आपण आपल्याच कामात मग्न झालेले बरे.' असे मनात म्हणून अनुने मोबाईल पाहिला आणि तिला पुन्हा तोच मेसेज दिसला.  तिचे डोळे भरून आले तिला पुढे बोलवत नव्हते म्हणून ती तशीच बाहेर गेली. बाहेर जाऊन ती सोफ्यावर बसली.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all