
"मिहिर, शांत बसतोस की नाही. तिला काहीही बोलायचं नाही आणि एका अर्थी तुझा मोबाईल बंद पडला ते बरं झालं. तू घरात बसलास तरी तुझे काम हे चालूच असते. मला काही माहित नाही का? आम्ही कितीही सांगितले तरी तू ऐकायला नव्हतास त्यामुळे आता मोबाईल बंद आहे तरी किमान एक दोन दिवस तरी शांत बसशील. देवाने खरंच माझे ऐकले. तू उगीच त्या मुलीला ओरडू नकोस आणि तिला ओरडलेलं मला चालणार नाही. आणि काय सारखं घरातून बाहेर काढतो घरातून बाहेर काढतो बोलत आहेस? ती कुठेही जाणार नाही. हे शेवटचं मी तुला सांगते. यापुढे तुझ्या तोंडून जर तिला बाहेर काढण्याविषयी शब्द आले तर तुझी काही खैर नाही." मिहिरची आई म्हणाली.
"आई, मी तुझा मुलगा आहे की वैरी. तू एकदाही माझ्या बाजूने बोलत नाहीस. नेहमी हिचीच बाजू घेत आहेस. ही तुझी कोण लागते ग? तुझ्या पोटचा मुलगा असूनही तू माझी बाजू घेत नाहीस असे का? बोल ना आई." मिहिर रागातच म्हणाला.
\"बाळा, तुला खरे कारण समजले तर तू सुद्धा हिचीच बाजू घेशील. पण आता मी तुला ते नाही सांगू शकत. तुला सगळे आठवत असते तर किती बरे झाले असते. तू आत्ता या क्षणी अनुचे आभार मानले असतेस. तिच्यावर खूप प्रेम केला असतास. आपल्या कुटुंबासाठी तिने खूप काही केले आहे. तुला आदर वाटला असता पण याक्षणी तिची ओळखच तुझ्यातून पुसून गेली आहे त्यामुळे तू तरी काय करणार? पण तुला नक्की लवकरच सगळे काही आठवेल तेव्हा मात्र अनुने आपल्या कुटुंबासाठी काय काय केले ते तुला मी सांगेन. तेव्हा तू तिला घरातून बाहेर काढायचं तर लांबच पण साधे ओरडणार देखील नाहीस हा माझा शब्द आहे पण आता राहू दे. जेव्हा तुला समजेल तेव्हा समजेल. डॉक्टरांनी हे तुला काही सांगायचे नाही असे सांगितले आहे त्यामुळे मी तुला काही सांगणार नाही. पण तुझ्यापासून ही गोष्ट लपवताना मलाही खूप त्रास होतोय तर त्या बिचाऱ्या मुलीला किती त्रास होत असेल? किती आशेने की आपल्या घरात आली होती पण या संसाराचे सुख तिला मिळालेच नाही. आधी बाबांची तब्येत बिघडली आणि आता तुझा एक्सीडेंट या सर्वांमुळे बिचाऱ्या तिच्या मनावर काय आघात होत असतील याची कल्पनाही करवत नाही पण तरीही ती इतकी शांत, संयमी आहे. खरंच तिला मानलं पाहिजे आणि इतकी चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आली आहे तर तुझे नशीब नक्कीच ती उजळून काढेल असा माझा विश्वास आहे.\" मिहिरची आई मनातच असा विचार करत होती.
"सांग ना आई, मी तुझा मुलगा आहे का ही तुझी मुलगी आहे? आता का बोलत नाहीस? स्वतःच्या मुलाची बाजू तू का घेत नाहीस? माझ्यावर इतकं प्रेम करणारी माझी आई माझ्यापासून दुरावली आहे का?" मिहिर आईला बोलतं करण्यासाठी म्हणाला.
"नाही रे बाळा, मी मुळीच तुझ्यापासून दुरावलेली नाही. तू तर माझाच काळजाचा तुकडा आहेस. माझाच मुलगा आहेस पण ती परक्याची पोरं तिच्या आई-वडिलांना सोडून इथे शिक्षणासाठी आली आहे म्हटल्यावर आपण माणुसकीच्या नात्याने तिला सांभाळून घ्यायला नको का? शिवाय ती तिचे कर्तव्य करत आहे तर आपण तिला सपोर्ट करायला नको का? तूच विचार कर एखाद्या ठिकाणी तू शिक्षणासाठी गेलास किंवा ऑफिसच्या कामासाठी गेलास तर तिथले लोक तुझ्याशी आढेवेढे करून वागू लागले, तुला अजिबात पटवून घेत नसतील तर तुला किती वाईट वाटेल? तुला एक क्षणही तिथे राहावे असे वाटेल का? नाही ना? तसंच या मुलीचेही होत असणार म्हणून मी तिची बाजू घेतोय. ती आल्यापासून तुझी सेवा करतेय पण तू मात्र तिच्याशी इतका रूढली वागतोस. हे तुला शोभतंय का? बिचारीच्या मनाला काय वाटत असेल? तिला किती वेदना होत असतील? हे तर तू समजून घे ना." मिहिरची आई म्हणाली.
"आई, तू किती भोळी आहेस ग. मी एखाद्या ठिकाणी गेलो तर ऑफिसच्या कामासाठी गेलो असेल तर हॉटेलवरच राहणार ना? आणि जर समज कॉलेज साठी गेलो असेन तर असल्या पेईंन गेस्टमध्ये कशाला राहीन. मी सरळ जाऊन हॉस्टोलमध्ये राहीन. तिथे कोणीच मला त्रास द्यायला नसेल. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. मला तर ही मुलगी इथे राहायला आली आहे म्हटल्यावर काहीतरी काळबेर असेल असे वाटतेय. नाही तर बघ ना तू आग्रह केलास आणि ही इथे पेईंन गेस्ट म्हणून राहण्यास तयार झाली हे कसे शक्य आहे? तिचा काहीतरी उद्देश आहे असे वाटते. तू माणसांची पारख करायला चुकतेस. तुला माझं म्हणणं पटतच नाहीये. जाऊ दे. तुला जसं वागायचं आहे तसे तू वाग पण मला तुझ्या नियमांची अट घालू नकोस. मी माझ्या मनाप्रमाणे वागेन. कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे मी स्वतः ठरविन." असे म्हणत मिहिरने तिरप्या नजरेने अनुकडे पाहिले.
\"मिहिर आता तुला काहीच आठवत नाहीये त्यामुळे तू असे बोलतोस पण यात काही गैर नाही. तसेही आधीपासूनच तुला मी आवडत नाही आणि आताही आवडत नाहीये त्यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. तुला आठवले तर आठवले नाही तर एका वर्षाच्या कालावधीत मी निघून जाणारच आहे. त्यातील आता फक्त थोडेच दिवस शिल्लक आहेत. मी माझे कर्तव्य बजावणार आणि इथून निघून जाणार कायमची. आणि मी कधी आशा सुद्धा करत नाही की तू माझ्याशी मैत्री करावीस किंवा माझ्याशी आपुलकीने बोलावे त्यामुळे आता मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करणार नाही. तुला जसे वागायचे आहे तसे तू वागू शकतोस. फक्त थोड्या दिवसांचा हा प्रश्न आहे त्यानंतर तुझे आयुष्य जगायला तू मोकळा.\" अनु मनातच म्हणाली.
\"फक्त थोडे दिवस थांब. नाही तुला या घरातून बाहेर हाकलून दिलं तर नावाचा मिहिर नाही. काहीही करून या मुलीला या घरातून बाहेर काढायला हवं. माझ्यावर दादागिरी दाखवते याचा अर्थ काय आहे? ही मुलगी माझ्या डोक्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा. त्याशिवाय आईला माझ्यावर विश्वास बसणार नाही.\" मिहिर मनातच रागात म्हणाला.
मिहिर अनुला बाहेर काढण्यासाठी प्लॅन करतोय पण असा प्लॅन करत असतानाच तो तिच्या प्रेमात तर पडणार नाही ना? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः