गंधबावरे 29

एक आगळीवेगळी प्रेमकथा


मिहिर अनुवर खूप ओरडत होता. तिच्यावर आधीपासूनच त्याचा हा राग होता पण आता तिने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतल्यावर त्याचा राग अनावर झाला आणि तो रागाच्या भरात तिच्यावर ओरडू लागला. अनु काही क्षण त्याच्याकडे पाहतच उभा राहिली. लवकर तिच्या काही लक्षात आले नाही. नंतर तिला तिची चूक समजली.

\"अरे बापरे! इतकी मोठी चूक मी कशी काय करू शकेन? इतकी मोठी चूक माझ्या हातून घडली? मी भावनेच्या भरात हे विसरून गेले की मिहिरला सारे काही आठवायचे बंद झाले आहे. तो त्याचा भूतकाळ पूर्णपणे विसरून गेला आहे आणि त्यात मी कुठेच नाही. मला हे कसे लक्षात आले नाही की माझी जागा त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती. या घरामध्ये मी एक पेईंग गेस्ट म्हणून आहे. आत्ता या क्षणी मी असे वागायला नको होते पण हे आता असे वागले आहे याला काय करता येईल?\" अनुच्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजले होते.

"सॉरी, ते चुकून तुमच्या हातातून मोबाईल काढून घेतले. खरंतर मी असे करायला नको होते पण तुमची तब्येत आधीच बरी नाही आणि त्यात असे लगेच काम करत आहात म्हणून मला थोडासा राग आला. डॉक्टरांनी थोडे दिवस विश्रांती घेण्यास सांगितले होते म्हणून मी रागात मोबाईल काढून घेतला. सो सॉरी म्हणून." अनुने पुन्हा मोबाईल मिहिरच्या हातात दिला.

अनु मिहिरशी बोलत होती इतक्यात मिहिरची आई देखील तिथे आली. तिला सर्व गोष्टी समजल्या आणि त्या लगेच म्हणाल्या, "काय झालं? काय गोंधळ सुरू आहे? मिहिर तू अनुला का ओरडत आहेस?" मिहिरची आई म्हणाली.

"बघ ना आई, ही कुठली कोण? काल-परवा आमच्या घरात राहायला आली आहे आणि आज लगेच माझ्यावर हक्क दाखवत आहे. आत्ता माझा महत्त्वाचा कॉल सुरू असताना माझ्या हातातून मोबाईल काढून घेत आहे ही कोण आहे माझी? माझ्या घरात येऊन ही माझ्यावर दादागिरी करत आहे. हिचा काय संबंध? ही कोण लागते मला? मग असं मोबाईल काढून घेणे शोभते का हिला? माझ्यावर असा अधिकार दाखवायचा नाही असे मी तिला स्पष्ट सांगितले आहे आणि आता तू सुद्धा सांगून ठेव." मिहिरचे हे बोलणे ऐकतानाच अनुच्या मनात आणखी विचारांनी थैमान घातले होते. \"खरंच मी याची कोणी नाही का? मग मी वेड्यासारखी इथे याच्या घरात का राहिले आहे? मला असे काही स्वतंत्र अस्तित्व नाही का? एक नाटक म्हणून मी याच्या आयुष्यात आले पण जर याच्या मनामध्ये माझ्याविषयी आपुलकी देखील नसेल तर मी इथे राहण्यात, त्याची सेवा सुश्रुषा करण्यात का वेळ घालवत आहे? जेव्हा श्रेया येईल तेव्हा कळेल ना मग मी इथे थांबणे योग्य आहे की अयोग्य? मला तर काहीच समजत नाहीये. मी वेड्यासारखी त्याच्यावर प्रेम करते आहे आणि त्या प्रेमासाठी इथे राहायला तयार झाले आहे पण याला त्याच्याशी काडी मात्र ही संबंध नाही म्हणजे इथेही मीच मूर्ख. माझे प्रेम एकतर्फी आहे. याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी माझ्याबद्दल एक आपुलकी निर्माण होईल इतकीच माझी अपेक्षा आहे. मी माझी बदनामी, माझा करियर, माझं सारं काही याच्यासाठी सोडून दिले पण याला त्याच्याशी काहीच संबंध नाही. हा मात्र निवांतच आहे आणि उद्या श्रेया आल्यानंतर पुन्हा तिच्याशी लग्न करायला हा मोकळा. मग माझं काय? अशा विचारात येऊन अनुने सगळं सोडून जाण्याचा निर्णय केला पण ती जाणार तर कशी? तिचे मनापासून मिहिरवर प्रेम होते शिवाय सर्वांच्या साक्षीने त्या दोघांचे लग्नही झाले होते मग अशा कठीण काळात ती त्याला सोडून जाणार तरी कशी? पुन्हा या मोठ्या धर्म संकटात अनु सापडली होती.

"मिहिर, मीच अनुला सांगितले होते की तू कोणतेही ऑफिसचे काम करू लागलास तर तुला करू द्यायचे नाही. तुझ्या तब्येतीची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी मी तिच्यावर टाकलेली आहे त्यामुळे तू तिला काहीही म्हणू शकत नाहीस. हवं तर तुझी एक मैत्रीण म्हणून समज पण तिच्याशी चांगलं वाग. तिच्याशी असे वाईट वागलेले किंवा तिला ओरडलेले मला चालणार नाही. त्यामुळे ती जे काही सांगते ते तू गप्पगुमान ऐकून घ्यायचं. त्याच्यामध्ये काही आढेवेढे घ्यायचे नाहीस. हा माझा आदेश आहे आणि त्याच पालन तू करायचं या गोष्टीत मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही." मिहिरची आई म्हणाली.

"आई, तू पण या काल-परवा आलेल्या मुलींमध्ये इतकं काय पाहिलं आहेस? स्वतःच्या सख्ख्या मुलाला सोडून तू तिच्यावर विश्वास ठेवत आहेस. अगं, मी तुझा मुलगा आहे. माझ्या बाजूने थोडं तरी बोल. या मुलीमध्ये तू इतकं काय पाहिलं की तिला या घरामध्येच राहायला जागा दिलीस. हे मला अजिबात आवडलेलं नाही. हो आई मला अगदी व्यवस्थित बरं होऊ दे मग मी तुला काय ते सांगेन तोपर्यंत मी शांत बसतो. तसंही अजून मला फारसं चालता येत नाहीये. मी स्वतः सगळं करू लागलो ना की पहिला हिला या घरातून बाहेर काढणार." मिहिर रागातच म्हणाला.

"अजिबात नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही कुठेही जाणार नाही. हिला घराबाहेर काढलास तर हिच्या सोबत मी सुद्धा जाणार. मग तू काय करायचं ते कर." मिहिरची आई म्हणाली.

"आई, तू असं काय करतीयेस? मला तर काहीच समजत नाहीये. आधीच हा एक्सीडेंट तसेच मला फारसं काही आठवत नाही आणि तू इतकी हट्टाला पेटली आहेस. माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीस. ऑफिसमध्ये रखडलेली कामे पहा आणि आत्ता डोक्यावर बसलेली ही, या सर्वांमुळे माझं डोकं दुखायला लागलंय." मिहिर वैतागून म्हणाला.

"अरे, मग थोडी विश्रांती घे ना अजून थोडे दिवस. काही कशातही लक्ष देऊ नकोस. नंतर आहेच की तू आणि तुझं काम वगैरे." मिहिरची आई म्हणाली.

"आता मी काहीच बोलत नाही तसेही सगळं बोलून व्यर्थच आहे. जाऊ दे." असे म्हणून मिहिर पेपर वाचत बसला.

"सॉरी." असे दबकतच म्हणून अनु तिथून जायला निघाली इतक्यात तिचा पाय टेबलला लागला आणि अगदी काठावर मिहिरने ठेवलेला मोबाईल धाड्कन खाली पडला. ते पाहून अनु एकदम घाबरली. \"अरे बापरे! आता पुन्हा आणखी काय? माझ्या हातून एकापाठोपाठ एक चुका होत आहेत. आता या मोबाईलला काही होऊ नये देवा. जर का काही झालं तर माझी काही खैर नाही. हा मिहिर मला सोडणार नाही. या घरातून हाकलून काढेल. तसं केलं तर ठीकच आहे ना. सुंठी वाचून खोकला गेला. तसंही याच्या आयुष्यातून मला जायचं होतं आज नाहीतर उद्या आत्ताच गेलं तर काय वाईट? नंतर होणारे दुःख हे थोडे कमी होईल.\" असा विचार करत अनु उभी होती आणि मिहिरचा राग आणखीनच वाढला होता. त्याने झट्दिशी मोबाईल उचलला आणि पाहतो तर काय मोबाईल बंद पडला याचाच अर्थ त्याचा स्क्रीन गार्ड बाद झाला होता.

आता मिहिर फक्त ओरडेलच की अनुला घरातून बाहेर काढेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all