गंधबावरे 1

गंधबावरे एक प्रेमकथा


"ए अनु, अगं आवर ना. किती उशीर? आम्ही सगळे आवरून तयार आहोत. फक्त तुझ्यासाठीच थांबलो आहोत. बस कर यार, तू खूप सुंदर दिसत आहेस. चल आता." श्रेया अनुची चुलत बहिण अनुला म्हणजेच अनन्याला म्हणत होती.

"हो ग झालंच. आले थांब. थोडी पावडर लावायची बाकी आहे." अनु म्हणाली.

"अगं, आत्ताच तर तू पावडर लावली आहेस. आणखी किती लावणार आहेस? तुझ्यासाठी सगळे थांबले आहेत. तू खूप छान दिसत आहेस. चल आता." श्रेया म्हणाली.

"हो ग. चल झालंच." म्हणून दोघी जाऊन गाडीत बसल्या आणि सगळे निघाले.

अनन्या आणि श्रेया या दोघी चुलत बहिणी. पण सख्ख्या बहिणीं इतकेच त्या दोघींमध्ये प्रेम आणि जिव्हाळा होता. कुठेही जायचे झाले तर दोघीच जाणार, काहीही करायचे झाले तरी दोघीच करणार, अगदी प्रत्येक ठिकाणी दोघीच असायच्या. त्यांच्यात एक मैत्रीचे, बहिणीचे असे अनोखे नाते होते. श्रेया दिसायला खूप सुंदर होती. अगदी गोरीगोमटी, रेशमी केस, पाणीदार डोळे आणि चाफेकळी नाक. कोणीही पाहिल्याबरोबर तिच्या प्रेमात पडतील अशी होती ती.

पण अनु दिसायला अगदी सर्वसाधारण मुलीसारखी, चारचौघींसारखी होती. तिचा रंग सावळा होता पण नाकी डोळी ती सुंदर होती. लांबसडक रेशमी केस, चाफेकळी नाक आणि अभ्यासातही ती खूप हुशार होती. चित्र काढायला तिला खूप आवडायचे. माणसांचे, आजूबाजूच्या परिसराचे चित्र ती खूप छान काढायची, अगदी हुबेहुब. ती अगदी मनमिळावू होती, कोणालाही आपलंस करणारी, स्वयंपाक तर तिच्या आवडीचा विषय काही ना काही नवीन पदार्थ बनवून ती सगळ्यांना खायला घालायचीच. सर्वगुणसंपन्न अशी होती अनु.

ते सगळे एकत्र कुटुंबात राहत होते आणि आज एका जवळच्या नात्यातल्या लग्नासाठी सगळेजण जात होते. श्रेया दिसायला सुंदर असल्यामुळे तिला आवरायला फारसा वेळ लागला नाही. पण अनु सावळी असल्यामुळे तिला सारखे वाटे की, आपला रंग सावळा आहे, पण आपण छानच दिसायला हवे. आपल्याकडे सगळेजण पाहिले पाहिजेत. साहजिकच प्रत्येकालाच असे वाटत असते.

तर ते सगळे हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. जवळचेच लग्न असल्यामुळे त्यांना सगळ्या कार्यक्रमात उपस्थित रहावे लागणार होते. ते आवर्जून सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहत होते. हाॅलमध्ये गेल्यावर अनु आणि श्रेया दोघी वधूच्या रूममध्ये गेल्या. तिथे नवरी मुलीचा मेकअप चालू होता. त्या नवरी मुलीला म्हणजेच त्यांच्या मामाच्या मुलीला भेटून परत हाॅलमध्ये गेल्या. त्या दोघींची जोडी ठरलेलीच होती. जिथे जातील तिथे एकत्र जाणार, एकटीला कधीच सोडणार नाही

अनुच्या बाबांचे एक जुने मित्र तिथे कार्यक्रमात आले होते. ते एकमेकांशी बोलत असतानाच अनुच्या बाबांनी अनुला बोलावले. मग अनु तेथे गेली. "काय बाबा?" अनु म्हणाली.

"ही बघ, माझी मुलगी अनन्या. काकांना नमस्कार कर बेटा." अनुचे बाबा म्हणाले.

अनुने लगेच त्यांना नमस्कार केला.
"गुणी आहे मुलगी. तिच्यावर चांगले संस्कार आहेत. तुझी मुलगी आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही. माझ्या मुलालाही आवडेल बघ." कदम काका अनुच्या बाबांचे मित्र म्हणाले.

"म्हणजे?? बाबा.." असे म्हणून अनुने बाबांकडे पाहिले.

"अगं, यांचा मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, शिवाय ओळखीचा आहे. आणखी काय हवं? तुझ्या मर्जीनेच सगळं होणार आहे. काळजी करू नकोस." अनुचे बाबा म्हणाले.

"हे बघ. तो त्या स्टेजजवळ उभा आहे ना, तो आमचा मुलगा मिहिर. M.B.A. झालाय आणि आता बिझनेस बघतोय." कदम काका

अनुने मिहिरला पाहिले आणि ती एकदम त्याच्या प्रेमातच पडली. आवडण्यासारखाच तर होता तो. एकदम देखणा, राजबिंडा, रंग गोरा आणि उंच असा होता तो. कुणीही पाहिले तरी त्याच्या प्रेमात पडेल. अनुचेही असेच झाले. तिने पाहिल्याबरोबर तिला मिहिर खूप आवडला. ती त्याच्याकडे पाहत मनात विचार करू लागली, 'इतका देखणा मुलगा माझ्याशी का लग्न करेल? मी अशी सावळी. त्याच्यात तर कशाचीच कमतरता नाही. त्याला मी आवडेन का? बघू काय होतंय ते? त्याच्या बाबांना तर मी पसंत आहे.' तेवढ्यात कदम काका अनुला म्हणाले, "काय? आवडला ना मिहिर तुला." असे म्हणताच अनु लाजली आणि तिथून निघून गेली.

मग कदम काका आणि अनुचे बाबा बोलत बसले. "अरे, माझी मुलगी थोडीशी सावळी आहे. तिच्या रंगावरून मला जरा प्रश्न पडला आहे की, तुझा मुलगा इतका देखणा आहे तर ती त्याला आवडेल का?" अनुचे बाबा

"का नाही आवडणार? रंगापेक्षा गुण आणि संस्कार महत्त्वाचे आहेत. तो माझा मुलगा आहे. माझ्यासारखाच विचार करणार." कदम काका

इतक्यात तेथे मिहिर आला. "हा बघ आलाच इकडे." कदम काका अनुच्या बाबांना म्हणाले.

"बाळ जरा इकडे ये." कदम काकांनी मिहिरला बोलावले.

"हो बाबा, बोला ना." मिहिर

"हा माझा बालमित्र प्रमोद चव्हाण. आम्ही बालपण सगळं एकत्र घालवले आहे आणि आता इतक्या दिवसांनी आमची भेट झाली आहे. तर आम्हाला असे वाटते की आमच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात व्हावे. आणि हो, ती बघ त्या खांबाजवळ जी मुलगी आहे ना ती या काकांची मुलगी." कदम काका

मिहिरने चव्हाण काकांना नमस्कार केले आणि त्याच्या बाबांना "बर" असे म्हणाला.

"अरे मुलगी तुला कशी वाटते?" मिहिरचे बाबा

"बाबा असे का विचारत आहात तुम्ही?" मिहिर

"अरे ती मुलगी मी तुझ्यासाठी बघितली आहे. कशी वाटते तुला?" मिहिरचे बाबा

"बाबा तुमचे सुरू झाले काय आता? मला आत्ताच लग्न करायचे नाही." मिहिर

"अरे, फक्त बघून ठेव. तुम्ही आधी एकमेकांना समजून घ्या, मैत्री करा. मग निवांत तुमचे लग्न करू." मिहिरचे बाबा

"बाबा, मुलगी चांगली आहे. तुम्हाला आवडली असेल तर माझी काही हरकत नाही. तुम्ही ज्या मुलीला पसंत कराल तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे." मिहिरचे हे बोलणे ऐकून त्याच्या बाबांना खूप बरे वाटले. 'आपला मुलगा पण आपल्यासारखा खूप चांगल्या विचारांचा आहे. मुलगी ही रूपाने नाहीतर गुणाने सुंदर असावी, हे त्याला उमगले असावे.' असा त्यांनी अंदाज बांधला आणि त्यांनी अनुच्या बाबांना लगेच होकार कळवून टाकला.

"बघ तुला म्हणालो होतो ना, की माझा मुलगा तुझ्या मुलीला नाही म्हणणारच नाही. तो माझ्या शब्दाबाहेर नाही. तू काहीच काळजी करू नकोस. आता तुझी मुलगी माझी झाली." असे म्हणून दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.

अनु मिहिरला पाहिल्यापासून फक्त त्याचाच विचार करत होती. तिच्या डोळ्यासमोर तोच दिसत होता. तिची नजर त्यालाच शोधत होती. मिहिर मात्र त्याच्याच धुंदीत होता. अनु आता स्वतः आणखी कशी सुंदर दिसेल? यासाठी प्रयत्न करत होती. ती स्वतःला सारखी आरशात न्याहाळत होती. ती शरीराने श्रेयासोबत असली तरी मनाने मिहिरसोबत होती. तिच्या मनामध्ये फक्त मिहिरचाच विचार घोळत होता.

कार्यक्रमात आज हळदीचा कार्यक्रम होता. सर्व पाहूणे जमले होते. मुलगा मुलगी आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तोपर्यंत सर्व नातलग एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात गुंतले होते. अनु आणि श्रेया दोघी काही ओळखीच्या नातलगांशी बोलत बसल्या होत्या.

थोड्या वेळातच मुलगा मुलगी आले आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोघेही पाटावर बसले होते आणि एकेक करत सगळे त्यांना हळद लावत होते.

सगळे कार्यक्रमात गुंग असतानाच मिहिरने हातात वाटीतील थोडी हळद घेतली. त्याने सर्वांच्या नकळत घेतलेली हळद फक्त अनुनेच पाहिली होती. त्याने अशी सर्वांच्या नकळत हळद का घेतली असेल? अशा विचारात अनु असतानाच मिहिर तिच्याकडेच येत होता हे तिच्या दृष्टीस पडले. ती शहारून गेली, मोहरून गेली. मिहिर तिच्या अगदी जवळ आल्यावर ती लाजून चूर झाली. मिहिर आपल्यालाच हळद लावण्यासाठी येत आहे हे जाणून तिने हळूवार गालावरील केस पाठीमागे केले. अनु स्वप्नाच्या धुंदीत होती. जणू आपल्या आणि मिहिरच्या लग्नाची हळद सुरू आहे असे तिला वाटत होते. आता मिहिर मला हळद लावणार आणि आमच्या नात्याची गोड सुरूवात होणार अशी स्वप्न ती रंगवत होती. मिहिर अनुच्या जवळून पुढे गेला हे पाहून अनुला खूप आश्चर्य वाटले.

पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की..
क्रमशः

🎭 Series Post

View all