गंधबावरे 19

एक आगळीवेगळी प्रेमकथा


सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर राहिलेले सगळे पाहुणे निघून गेले. आता घरामध्ये अनु मिहिर आणि मिहिरचे आई-बाबा असे चौघे जण होते. आता अनु थोडी रिलॅक्स झाली होती कारण कोण काही म्हणेल का? याची तिला भीती वाटत होती ती आता नाहीशी झाली होती. पूजा झाल्यानंतर मिहिर ऑफिसमध्ये गेला आणि ऑफिसमध्ये काम करू लागला. अनु मात्र घरामध्ये एकटीच होती.

कामाला नोकर असल्याने तिला काम करण्यासारखे असे काहीच नव्हते त्यामुळे ती स्वस्थ बसून होती. काही वेळाने मिहिरचे बाबा देखील तिथे आले आणि त्यांच्या छान गप्पा रंगल्या. अनुदेखील तिच्या माहेरच्या गमती जमती त्यांना सांगू लागली आणि तो दिवस कसा गेला आहे त्यांचे त्यांनाच कळले नाही. पण संध्याकाळी मात्र आनुला तिथे करमेनासे झाले. तिच्या घरी भरपूर माणसे होती त्यामुळे कोणी ना कोणी तिच्या आजूबाजूला असायचे. इकडे मिहिरच्या घरात इनमीन चौघेजण त्यात मिहिर कामाला गेलेला, मग घरात तिघेजण त्यामध्ये सुद्धा बाबांना थोडासा आराम सांगितला होता आणि आई त्यांच्या सेवेत होत्या त्यामुळे अनुला एकटीला करमेनासे झाले होते. ती स्वस्थ बसून वर्तमानपत्र वाचत होती. टीव्ही तर बराच वेळ पाहून झाला होता, सोशल मीडियावर देखील तेच तेच पाहून तिला कंटाळा आला होता. आता काय करावे? हा प्रश्न तिच्या समोर होता.

हे असे रोजचेच झाले तर वर्ष कसे निघून जाणार? एक दिवसच मला खूप मोठा वाटत आहे तर अख्खा वर्ष या घरामध्ये कसे काढायचे? हा गहण प्रश्न अनुसमोर उभा होता. ती बराच वेळ त्या विचारात होती. तेव्हा पाठीमागे टेकून डोळे बंद करून ती बसली होती. तिथे मिहिरची आई आली आणि अनुला त्या अवस्थेत पाहून तिने प्रश्न केला,

"अनु, तुला करमत नाही का?"

"आई, तसे काही नाही पण बसून बसून थोडा कंटाळा आला आहे. अशी बसून राहण्याची मला सवय नाही ना? शिवाय इथे कोणीच नाही. आमच्या घरात भरपूर जण असतात त्यामुळे वेळ कसा निघून जातो समजतच नाही." अनुने उत्तर दिले.

"मग एक काम कर. उद्यापासून तू मिहिर सोबत ऑफिसला जातेस काय?" मिहिरची आई म्हणाली.

"हो चालेल ना. माझी देखील तेवढीच ऑफिसमध्ये मदत होईल आणि माझा वेळही निघून जाईल." अनु आनंदाने म्हणाली.

"ठीक आहे. मी संध्याकाळी मिहिरशी बोलून पाहते मग तू उद्यापासून त्याच्यासोबत जायला सुरुवात कर." मिहिरची आई म्हणाली.

"ठीक आहे" असे अनु म्हणाली. मिहिरची आई तिथून गेल्यानंतर अनु मनोमन आनंदी झाली. \"आता उद्यापासून किमान सात आठ तास तरी मी बाहेर जाईन म्हणजे माझा वेळ लवकर निघून जाईल घरात बसून काय करावे हे समजतच नाही. शिवाय घर कामाला नोकर चाकर आहेत त्यामुळे मला काहीच करता येत नाही. तरी बरे झाले. आता देव करो नि मिहिर मला ऑफिसला घेऊन जावो. पाहू संध्याकाळी काय होते ते.\" अनु मनातच म्हणाली.

मिहिरला येण्यास खूप उशीर झाला होता आणि अनु त्याची वाट पाहत बसली होती. ती त्याच्यासाठी जेवायची थांबली होती. मिहिरचे आई बाबा जेवण करून बसले होते. त्यांनी देखील अनुला जेवण्यास बोलावले पण अनु जेवली नाही. ती मिहिरची वाट पाहत बसली होती. मिहिर उशिरा आला. त्याने हात पाय धुतले आणि तो जेवण्यास बसला. त्याचे आई बाबा सुद्धा टीव्ही पाहत बसले होते. अनु आणि मिहिरने जेवण केले.

"अरे मिहिर, उद्यापासून अनुलादेखील तुझ्यासोबत ऑफिसला घेऊन जातोस का? अरे, घरात बसून बसून ती कंटाळली आहे. तिच्याशी ना बोलायला कोणी आहे. आम्ही दोघे बोलून बोलून किती बोलणार? त्यापेक्षा तू ऑफिसला घेऊन जा की. ती तिथे थोडीशी रमेल." मिहिरची आई म्हणाली.

"आई, अजिबात नाही. मी तिला ऑफिसला घेऊन जाणार नाही. ती तिथे येऊन काय करणार? गेल्या वेळेस होती तेव्हा मी तिचे काम पाहिले आहे. आता तर ती ऑफिसमध्ये अजिबात नको." मिहिर म्हणाला.

"अरे, तुला तेवढीच मदत होईल. आधी ती येतच होती ना? तशी आता येईल असं समज. तसेही तिचे शिक्षण झाले आहे तर ती ऑफिसमध्ये येऊन काम करायला काय हरकत आहे? तसेही घरात तिला काहीच काम नसतं." मिहिरची आई म्हणाली .

"नाही म्हणजे नाही. तिथे उलट माझे काम आणखी वाढवून ठेवणार त्यापेक्षा घरात राहू दे." मिहिर म्हणाला.

मिहिर आई-बाबांशी थोडा वेळ बोलून तो पुन्हा खोलीत जाऊन बसला. अनुदेखील तिचे सगळे आवरून झोपण्यासाठी गेली. ती खोलीत गेली तेव्हा मिहिर लॅपटॉपवर त्याचे काम करत बसला होता. तो थोडासा अस्वस्थ वाटला म्हणून अनुने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिच्याशी बोलण्याचे टाळले. अनुला देखील ऑफिसला नको म्हटल्यावर राग आला होता त्यामुळे ती लगेच झोपी गेली. मिहिर मात्र काम करत बसला होता.

अनु सकाळी थोडीशी लवकरच उठली. तिने उठून पाहिले तर मिहिरचा लॅपटॉप तसाच चालू होता आणि तो बाजूला झोपला होता. अनु लॅपटॉप बंद करण्यासाठी तिथे गेली आणि तिने पाहिले तर मिहीरचे ऑफिसचे काम चालू होते आणि ते अर्धवट तसेच ठेवून तो रात्री झोपी गेला होता. अनुने थोडेसे रोखून पाहिले तर मिहिरचे ते काम अर्धवट झाले नसून पूर्ण झाले होते पण त्याला त्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. त्याने सगळी पडताळणी करून पाहिली होती पण जमाखर्चाचा काही ताळमेळ लागत नव्हता. हे काम आधी ऑफिसमध्ये अनु करत होती त्यामुळे तिला यातील सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्याला कशात अडचण होती ते तिला समजले आणि ती चुक तिने दुरुस्त केली. आणि तिने बाहेर जाताना त्याच्या अंगावर पांघरले. ती तिचे आवरण्यास गेली.

अनु तिचे सारे काही आवरून नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरात गेली. देवाला नमस्कार करून तिने सर्वांसाठी चहा ठेवला. सर्वजण म्हणजेच अनु आणि तिचे सासू-सासरे तिघेजण हॉलमध्ये बातम्या पाहत चहा पिऊ लागले.

रात्री उशिरापर्यंत काम करत बसल्यामुळे मिहिर बराच वेळ झोपला होता. अनुनेदेखील त्याला उठवले नाही कारण कालचा राग तिच्या मनामध्ये होता. मिहिरला उठायला खूपच उशीर झाला होता. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो हडबडून उठला आणि त्याने घड्याळात पाहिले तर साडेनऊ वाजले होते.

\"अरे बापरे! खूप उशीर झाला आहे. आज ऑफिसमध्ये जाऊन उरलेली कामे पाहायची आहेत. शिवाय कालचा जमाखर्चाचा ताळमेळ अजून बसला नाही. ही अनुदेखील ना लवकर उठवायला काय होते हिला? तशी चूक माझीच आहे. मी तिला रात्री सांगायला हवं होतं.\" असे मनातच बडबडत मिहिरने अंथरून काढले आणि तो लॅपटॉप उचलून वर ठेवणार इतक्यात त्याने पाहिले की काल रात्रभर ज्या गोष्टीसाठी तो विचार करत बसला होता तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता. \"हे तर मी केले नाही म्हणजे कोण केले असेल अनु? हे काम नक्कीच तिचे असणार पण तिने इतक्या सहजासहजी हे सोडवले कसे?\" असा विचार करतच तो तिथे बसला.

या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर मिहिर अनु सोबत कसा रिऍक्ट होईल? तो तिला ऑफिसला घेऊन जाण्यास तयार होईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all