गंधबावरे 18

एक आगळीवेगळी प्रेमकथा


अनु सकाळी लवकरच उठली. तिचा त्या घरातील पहिलाच दिवस होता. ती उठली आणि तिचे सगळे आवरले. ती स्वयंपाक घरात गेली तिथे जाऊन तिने पाहिले तर तिच्या सासूबाई देवपूजा करत होत्या. त्यांनी तिला उठलेले पाहिले आणि देवाला नमस्कार करायला सांगितले. त्याप्रमाणे अनुने देखील देवाला नमस्कार केला आणि तिने सर्वांना चहा ठेवला. त्यानंतर एक एक सदस्य उठून बसले. अनुने सर्वांना चहा दिला. अनुच्या हातचा चहा पिऊन सर्वांनी तिचे कौतुक केले. अनु तशी लाघवी होती पण मिहिरलाच काय झाले होते काय माहित? तो साधा तिच्याशी मैत्री करण्यासाठी सुद्धा धजावत नव्हता.

अनु त्या घरामध्ये थोडीशी दबकूनच वागत होती. कोणी काही म्हणेल का? असे तिला सारखे वाटत होते. त्यात हे खोटे लग्न त्यामुळे तिला आणखीनच भीती होती पण मिहीरच्या आईने तिला व्यवस्थित सांभाळून घेतले. तिला आधार दिला त्यामुळे अनु तेथे चांगलीच रमली.

आज घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्याचे ठरले. त्याप्रमाणे सर्वांची चर्चा चालू होती तेवढ्यात मिहिर उठून बाहेर आला आणि त्याच्या कानावर ती चर्चा पडली. त्याला काही समजेना. हे खोटे नाते लग्न त्यात सत्यनारायणाच्या पूजेला बसायचे म्हणजे आम्हा दोघांना जोडीने बसावे लागणार, आता देवाची पूजा आम्ही दोघांनी करायची हे कसे शक्य होईल? असे एक ना अनेक विचार त्याच्या मनामध्ये सुरू होते. तो तसाच पुढे आला आणि सर्वांना थांबवत तो म्हणाला, "सत्यनारायणाची पूजा करणे गरजेचे आहे का? आज माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला तिथे जावेच लागणार आहे त्यामुळे आता नको पुढे पाहू." असे म्हणून तो जाऊ लागला. मिहिरचे हे बोलणे ऐकून अनुलादेखील धीर आला कारण तिच्या मनामध्ये देखील वादळ सुरू होते. तेव्हा सगळेजण आश्चर्याने मिहिरकडे पाहू लागले.

"अरे मिहिर, सत्यनारायणाची पूजा आहे. तुला काय हा खेळ वाटला का? लग्न झाल्यानंतर ही पूजा करणे गरजेचे असते. वैवाहिक आयुष्यासाठी या पूजेला खूप महत्त्व आहे तेव्हा तुझे काम आज एक दिवस बाजूला ठेव आणि तू पूजेला बस. मी आज तुझे काहीही ऐकून घेणार नाही. या पूजेला तू बसायलाच हवेस." मिहिरची आई म्हणाली.

"आई, काय जबरदस्त आहे. असे कुठे असते का? तू तर प्रत्येक वेळी मला फोर्स करत आहेस आता माझी इच्छा नाही. मला महत्त्वाचे काम आहे ते सोडून मी इथे बसू का दिवसभर? खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तू थोडी समजून घे ना. आपण पूजा नंतर करू शकतो पण मीटिंग नंतर होणार नाही." मिहिर म्हणाला.

"मिहिर बाळा, कोणती मिटींग आहे मला सांग. आज मी ऑफिसला जातो पण तू सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं. मला काही एक सांगायचं नाही. उगीच सगळ्या पाहुण्यांच्या समोर तमाशा नको. लग्न झाले म्हटल्यावर पूजाही करायला हवीच ना?" मिहिरचे बाबा म्हणाले.

"अहो बाबा, तुमची तब्येत बरी नाही. अशावेळी तुम्ही ऑफिसला जाणं योग्य नाही त्यापेक्षा मी जाऊन येतो. हवं तर मी दुपारपर्यंत येईन नंतर पूजा घाला चालेल ना?" मिहिर म्हणाला.

"मला काही होत नाही. मी आता ठणठणीत आहे. शिवाय पूजा झाल्याशिवाय तू घराबाहेर पडायचं नाही. कितीही महत्त्वाची मीटिंग असू दे. हवं तर आजची डील कॅन्सल होऊ दे, मला त्याचा काही फरक पडणार नाही पण माझ्या मुलाचा संसार मार्गी लागावा ही एकच माझी इच्छा आहे. आयुष्यात पुन्हा अनेक डील आपण करू शकतो पण सत्यनारायणाची पूजा आज एकच दिवस करू शकतो. ती पूजा झाल्याशिवाय तू घराबाहेर पडायचे नाही. आता यावर वाद घातलेला मला चालणार नाही. तू जा. आवरून ये. मी भटजींना फोन करतो." असे बाबा म्हटल्यावर मिहिर काही न बोलता रागाने आत निघून गेला. इकडे अनुलादेखील काही समजेना. तिची चलबिचलता वाढू लागली. ती सैरभैर होऊन बसली होती.

घरामध्ये नोकरचाकर असल्यामुळे कामाची कोणतीच घाई गडबड नव्हती. सर्वजण पूजेची तयारी करू लागले. घरामध्ये थोडेफार पाहुणे असल्यामुळे अनु थोडी शांत शांतच होती. अर्थातच पाहुण्यांसमोर कसे व्यक्त व्हावे हे तिला समजत नव्हते. मिहिर मात्र चिडून आत बसला होता. अनु त्याच्या रूममध्ये गेली. अनुला पाहून तर त्याचा राग आणखीनच वाढला.

"तुझ्या मनासारखं झालं. तुला अडवायला काय होतंय? तू काहीतरी बोलून हे थांबवू शकली असतीस पण तू काहीच बोलली नाहीस. याचा अर्थ तुला हे सगळं काही हवं होतं. हो ना बोल की." मिहिर म्हणाला.

"मला कसं हवं होईल? देवासमोर आपण जोडीने बसायचे? मला तर लग्नातील मंत्र म्हणताना कसेतरी होत होते पण तू तेव्हा काही बोलला नाहीस आणि आता मी काय बोलणार होते? ही पूजा कशी थांबवणार होते? ते शक्य आहे का? वर्षभर आपण एकत्र राहायचं असं ठरवलंय. आता काहीही करू शकत नाही. आत्ताच मी काही बोलले तर सर्वांना संशय येईल म्हणून मी शांत राहिले. शिवाय तुझेही काहीतरी कर्तव्य होते ना? तू आणखी काहीतरी बोलला असतास ना? आता काही नाही पूजेला जोडीने बसावे लागणारच. मला तर खूप भीती वाटत आहे. आधी खरे लग्न झाले आणि आता पूजेला बसायचे. बापरे! देवासमोर कसे नाटक करायचे? मला तर खूप भीती वाटत आहे." अनु म्हणाली.

"काय घाबरण्याची गरज नाही. एक वर्षानंतर आपण वेगळे होण्याचे ठरवले आहे म्हणजे ठरवले आहे. आता काय आलिया भोगासी असावे सादर त्याप्रमाणे आपल्याला जावे तर लागणारच. ठीक आहे एक वर्षापर्यंत जे काही होईल ते आपण करू. तिथून आपला मार्ग वेगळा होणारच आहे." असे म्हणून मिहिरने समजूत काढली.

पूजेसाठी भटजी आले होते. सर्वांनी सगळी काही तयारी केली. मिहिरने पांढराशुभ्र कुर्ता घातला होता तर अनुने पिवळी साडी नेसली होती. त्या पिवळ्या साडीमध्ये अनु खूपच खुलून दिसत होती. आधीच अंगाला लागलेली पिवळी हळद त्यात हातभर चुडा या सर्वामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. अनुला पिवळ्या साडीमध्ये पाहून मिहीर देखील एक क्षण तिच्याकडे पाहतच उभा राहिला. त्याला काही समजेना. याआधी कधीच असे झाले नव्हते. अनुला पाहिले तर त्याला राग येत होता पण आज अनु काहीशी वेगळी दिसत होती. \"आज मला काय होत आहे? मी अनुकडे असा का ओढला जात आहे? अनुचे सौंदर्य मला कधीच आवडले नाही पण आज नक्की तिच्यामध्ये काय वेगळेपणा दिसत आहे? ज्यामुळे मला सारखे तिच्याकडे पहावेसे वाटत आहे.\" असे मिहिर मनातच म्हणाला.

मिहिर अनुकडे पाहत आहे हे तिला जेव्हा समजले तेव्हा तिच्या अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखे तिचे अंग शहरून गेले. तिला कसे रिऍक्ट व्हावे ते समजेना. तिने मान खाली घातली आणि ती तशीच उभी राहिली.

"ओहो, अनु किती सुंदर दिसत आहेस! हे बघ मिहिर तुझ्याकडेच पाहतोय." असे कोणीतरी म्हणताच त्याने आपली नजर वळवली तेव्हा तिथे एकच हशा पिकला.

मिहिर आणि अनु दोघे मिळून सत्यनारायणाच्या पूजेला बसले. पूजा अगदी व्यवस्थित पार पडली. दोघेही जड अंतःकरणाने पूजा करत होते. नाईलाज असल्याने ते कोणाशीही काहीही बोलू शकत नव्हते. घरचे जे म्हणतील तसे त्यांना करावे लागत होते. आजचा दिवस तर व्यवस्थित पार पडत आहे आता उद्या काय वाढून ठेवले काय माहिती? असे अनुच्या मनात विचार येऊ लागला.

पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all