गंधबावरे 16

एक आगळीवेगळी प्रेमकथा


मिहिर आणि अनु घरी गेले. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू होती. दोन्ही घरांमध्ये एक प्रकारचा आनंदोत्सव सुरू होता. मिहिर हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे लग्न अगदी थाटामाटात व्हावे असे त्याच्या आई-बाबांना वाटत होते. लग्नामध्ये कोणतीही कसूर होता कामा नये म्हणून ते प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक करत होते आणि अनुच्या घरातील हे तिचे पहिलेच लग्न असल्याने त्यांच्या घरचे देखील कोणतीही चूक होऊ नये म्हणून दखल घेत होते.

लग्नातील साड्या दागिणे यासहित सगळी खरेदी अजून बाकी होती. प्रत्येक गोष्ट त्यांना घेणे गरजेचे होते. सुरुवात कुठून करावी हेच कुणाला समजत नव्हते. योग्य ते मॅनेजमेंट करणे गरजेचे होते त्यानुसार एक एक दिवस कोण कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या ते त्यांनी ठरवले. दोन्ही कुटुंबांची आधीपासूनच ओळख असल्यामुळे त्यांना फार काही अवघड गेले नाही. दुसऱ्या दिवशी दागिणे खरेदी करण्यासाठी दोन्ही घरचे जाणार होते ते अनुला आणि मिहिरला घरी गेल्यानंतर समजले. मिहिरला तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मुळातच त्याला हे लग्न मान्य नव्हते तरीही तो बाबांसाठी करायला तयार होता. त्याच्या आई-बाबांनी जेव्हा त्याला दागिणे खरेदीला येण्यास सांगितले तेव्हा तो नकार देऊ लागला.

"आई, अग मला दागिण्यांबद्दल काही समजत नाही ग, तुम्ही जा काही येणार नाही. तुमचे तुम्ही घेऊन या." मिहिर म्हणाला.

"अरे बाळा, तिथे अनुदेखील येणार आहे. तुमच्या दोघांच्या पसंतीने सर्व दागिने घ्यायचे आहेत त्यामुळे तुला यावेच लागणार. तू काही करू नको. फक्त दागिणे पसंत करण्यासाठी अनुला मदत कर. शेवटी तिची सुद्धा काही इच्छा असेल ना?" मिहिरची आई म्हणाली.

"अगं आई, पण उद्या माझी ऑफिसमध्ये खूप मोठी मिटींग आहे. तिथे बरीच कामे खोळंबली आहेत. आत्ताच कामे पूर्ण करून घ्यावी लागणार नाहीतर नंतर खूपच लोड होईल." मिहिर वैतागून म्हणाला.

"अरे बाळा, मी आहे ना तुला मदत करायला. एवढा काही लोड होणार नाही. तू चल आमच्या सोबत. बाकी सगळे नंतर पाहू." मिहिरचे बाबा म्हणाले.

"अहो बाबा पण.." मिहिरचे बोलणे मधेच तोडत त्याची आई म्हणाली, "पण बिन काही नाही. तू उद्या येणार आहेस म्हणजे आहेस. मला काही सांगायचं नाही."

"काय जबरदस्ती आहे आई. मला यायचं नाही म्हणतोय ना. तुम्ही सगळे तर मला उगीच फोर्स करत आहात." मिहिर म्हणाला.

"अरे, आता लग्न तुझं आहे म्हटल्यानंतर तयारीसाठी तुला सांगणार नाही तर कोणाला सांगू? आम्हाला तर एकुलता एक मुलगा आहे त्यालाच सांगणार ना की शेजारच्या मुलाला सांगू." मिहिरचे बाबा म्हणाले.

"ठीक आहे. आई येतो मी." असे म्हणून मिहिर तयार झाला. दुसऱ्या दिवशी सगळेजण खरेदीला गेले. तिथे दागिन्यांची चॉईस करताना सगळेजण एकत्रच होते. मिहिरला तिथे राहून खूप कंटाळा आला होता. अनुला मात्र कोणते दागिणे घेऊ ते समजत नव्हते. एक तर तिला नेहमी कोणतीही खरेदी करायची असेल तर श्रेया मदत करत होती कारण श्रेयाचा चॉईस खूप छान होता. कपड्यांमध्ये असो की दागिन्यांमध्ये अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा ती श्रेयाच्या मदतीनेच घ्यायची त्यामुळे आता लग्नासाठीचे दागिने घेताना तिचा गोंधळ उडाला होता. मिहिरला विचारावे तर तो तोंड वाकडे करून उभा होता त्यामुळे त्याला विचारण्याची तिची काही हिंमत झाली नाही. शेवटी तिच्या आईच्या मदतीने तिने दागिने पसंत केले. संपूर्ण दिवस सगळा दागिने खरेदी करण्यातच गेला त्यामुळे दुसरी तिसरी कोणतीच खरेदी करता आली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी कपड्यांच्या खरेदीला मात्र मिहिर काही गेला नाही. काहीतरी कामाचे सबब सांगून तो तिथून निघून गेला. दोन-तीन दिवसात सगळी खरेदी उरकून फायनली लग्नाला सज्ज झाले. कार्यालय वगैरे ठरवून सजावट देखील करून झाली. त्यांनी लग्नात कोणाचा आहेर घ्यायचा नाही असे ठरवले असल्यामुळे जास्त काही खरेदी करावी लागली नाही.

अखेर लग्नाचा दिवस उजाडला. अनु लाल रंगाच्या शालूमध्ये खूप सुंदर दिसत होती. आज लग्नाच्या दिवशी ती खूपच खुलून दिसत होती. एरवी कितीही मेकअप केला तरी तिचा सावळा रंग उठून दिसणारी अनु आज खूप सुंदर दिसत होती. हातामध्ये भरगच्च हिरवा चुडा, केसांची केलेली ती हेअर स्टाईल त्यामध्ये माळलेला मोगऱ्याचा गजरा यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. मिहिर गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच छान दिसत होता. त्याने जेव्हा लग्नाच्या हॉलमध्ये एन्ट्री केली तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. सगळे त्याच्याकडे टकामका पाहू लागले. मुली तर आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होत्या. हा एवढा हँडसम आणि अनुशी लग्न करायला कसा काय तयार झाला याचे सर्वांना नवल वाटत होते.

मिहिर आणि अनु लग्नाच्या हॉलमध्ये आले आणि लग्नाला सुरुवात झाली. अगदी थोडक्या पाहुण्यांनी हाॅल भरला होता. खूप मोठ्याने ते लग्न करणार नव्हते. अगदी मोजकेच पाहुणे ते सुद्धा अगदी जवळचे असलेले त्यांनाच फक्त आमंत्रण दिले होते. मिहिर आणि अनु स्टेजवर जाऊन बसले. भटजींनी एक एक मंत्र म्हणण्यास सुरुवात केले आणि अनुच्या छातीमध्ये धडधड वाजू लागले. आता हे खरे खरे लग्न सुरू होते. यांनी तर लग्नासाठी नाटक करायचे ठरवले होते पण भटजींनी तर खरेखुरे मंत्र म्हणण्यास सुरुवात केले. याबद्दल काही विचारच केला नाही. आता भटजींना कोण सांगणार की खोटे खोटे मंत्र म्हणा. अनुला आता खूप भीती वाटू लागली. आपण काही चुकीचे तर करत नाही ना? असे तिच्या मनात राहून राहून वाटू लागले.

"मिहिर, अरे भटजी खरे मंत्र म्हणत आहेत म्हणजे आपले खरोखर लग्न होत आहे. तू तर म्हणत होतास की आपण लग्नाचे नाटक करणार आहोत. मग आता काय करायचे? मला तर खूप भीती वाटत आहे." अनुने मिहिरला हळूच विचारले.

"काहीही असू दे आपण एक महिन्यानंतर घटस्फोट घेणार आहे म्हटल्यावर सगळे संपले. तू आता काही काळजी करू नकोस. जे होत आहे होऊ दे." मिहिर अनुला समजावू लागला पण अनुचे मन काही मानायला तयार नव्हते.

देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमचे लग्न होत आहे आणि मी ह्याला नाटक कसे समजू? आता जे होईल ते होईल पण या वर्षभरासाठी मी मिहिरला माझा नवरा म्हणून मानले आहे आणि आता त्याची सुखदुःख ही माझी आहेत, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मी साथ देईन असे तिने स्वतः वचन घेतले. अनुने मनापासून मिहिरला पती मानले होते पण मिहिर अनुला पत्नीच्या रूपातच काय साधी मैत्रीण देखील मानायला तयार नव्हता.

दोघांचे रितसर लग्न झाले पण आता वर्ष कसे जाणार? सहा महिन्यापर्यंत बाबांची तब्येत अगदी व्यवस्थित होईल त्यानंतर सहा महिन्यात अनु आयुष्यातून निघून जाईल आणि मग श्रेया परत येईल या विचाराने मिहिर खूश झाला होता.

मिहिर आणि अनुच्या आयुष्यात काही बदल होईल का? श्रेया पुन्हा मिहिरच्या आयुष्यात येईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all