गंधबावरे 13

एक आगळीवेगळी प्रेमकथा


"अरे, लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का? असे एका झटक्यात केले आणि दुसऱ्या झटक्यात घटस्फोट दिला. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेऊन केलेले हे लग्न असते आणि वर्षभराच्या काळामध्ये तुम्ही हे लग्न मोडणार? मला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही दोघे लग्न करताय तर आयुष्य सुद्धा एकमेकांसोबत घालवा. मला काहीच अडचण नाही. आपल्या दोघांची साथ इथपर्यंतच होती असे समजून मी माझ्या करिअरमध्ये फोकस करेन. मला माझे करिअर सुद्धा घडवायचे आहे. तू तुझ्या मार्गाने जाऊ शकतोस मी माझ्या मार्गाने जाईन. तुम्ही दोघे तुमच्या वडिलांसाठी इतका मोठा निर्णय घेतला आहात आणि एक वर्षानंतर जेव्हा तुम्ही वेगळे होणार तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार तरी केलाय का? आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. आता हे सारे काही बोलून फायदा नाही त्यामुळे तू मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस." श्रेया म्हणाली.

"श्रेया, तू असे कसे बोलू शकतेस? हे सर्व काही मी तुझ्यासाठीच केले आहे आणि तू आता असे बोलत आहेस. मला कदाचित असे वाटत होते की तू माझा निर्णय ऐकून आनंदी होशील. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला दिसून येईल पण तसे काहीच घडले नाही. तू तर काही भलतच बोलत आहेस. अगं, काय होतंय? आता तसेही रिलेशनशिपमध्ये कित्येक जोडपी राहतात आणि नंतर लग्न करतात. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहे असे समज. तूच मला सांग जेव्हा मनं जुळतात तेव्हाच ते लग्न सक्सेस होतात ना? जर मनं जुळली नाहीत तर ते लग्न पूर्णत्वाला जात नाही ते अर्ध्यावरच मोडतं. त्या प्रकारे समज. तसेही अनुचे आणि माझे अजिबात एकमेकांवर प्रेम नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे अनुलादेखील माहित आहे. मग आमचे लग्न कसे पूर्णत्वाला जाईल? ते कधी ना कधी अर्ध्यावर मोडणारच ना? तेव्हा मला तुझी साथ हवी आहे. प्लीज मला साथ दे." मिहिर म्हणाला.

"तुझे म्हणणे मला अजिबात पटले नाही. कदाचित एकत्र कुटुंब असल्यामुळे म्हण किंवा आणखी काही म्हण, पण मला हे असले अजिबात पटत नाही. लग्न झाले म्हटल्यावर ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी नवरा आणि बायको दोघांचीही असते आणि त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणे गरजेचे असते. लग्न म्हणजे खेळ नसतो. अरे, भातुकलीच्या खेळात लग्न केलेले बाहुला आणि बाहुली मी अजून पर्यंत जपून ठेवले आहे. का? तर दोघेजण वेगळे होऊ नयेत म्हणून आणि आता तुमचे लग्न अर्ध्यावर सोडून मी मध्येच तुझा संसार पूर्णत्वाला नेण्यासाठी कशी येऊ? या सगळ्याचा परिणाम अनुवर होणार आहे. अनुला पुन्हा चांगला मुलगा मिळेलच असे नाही ना? शिवाय घटस्फोटीत म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. मी अनुबद्दल वाईट विचार करू शकत नाही. तुम्ही लग्न करा आणि सुखाने संसार करा एवढीच माझी इच्छा आहे आणि तू माझी इच्छा पूर्ण करणार आहेस." श्रेया म्हणाली.

"मी अनुसोबात सुखाचा संसार करू शकत नाही. मी फक्त बाबांसाठी तुझ्याशी लग्न करत आहे. माझे खरे प्रेम हे तुझ्यावर आहे आणि तुझ्याशिवाय मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. मी आयुष्यात तुझ्यावरच प्रेम केले आहे आणि आयुष्यभर करणार. तुझ्याशिवाय मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस. मी तुझे काही एक ऐकून घेणार नाही. बरोबर एक वर्षानंतर तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस." मिहिर म्हणाला.

"अरे, वेडा आहेस का तू? असा अट्टाहास का बरं? अच्छा म्हणजे तुला तुझ्या बाबांच्या इच्छेसाठी अनु हवी आहे आणि स्वतःच्या इच्छेसाठी मी. दोघींचेही आयुष्य तू टांगणीवर लावणार आहेस. ते काही नाही मुळात मला तुझी कल्पनाच आवडली नाही. तुला जे करायचं ते कर पण मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. मी एक मुलगी आहे आणि एका मुलीचा विचार मीच करणार. तू म्हणतोस तसे वागले तर एका वर्षानंतर अनुवर काय परिस्थिती ओढवेल याचा विचार केला आहेस का? ती देखील तिच्या बाबांसाठी हे सर्व करत आहे पण यामध्ये कोणाचेही भले होणार नाही त्यामुळे मी सांगते ते ऐक. तू आणि अनु व्यवस्थित संसार करा. अनुच्या जागी मीच आहे असे समज तिच्या आणि माझ्या स्वभावामध्ये बरेचसे साम्य आहे उलट अनुचा स्वभाव माझ्यापेक्षाही खूप चांगला आहे. ती तुला नक्कीच समजून घेईल आणि तुला आयुष्यभराची साथ देईल." श्रेया म्हणाली.

"तू माझे ऐकायचेच नाही असे ठरवले आहेस का? मला साथ द्यायचे सोडून तू काहीतरी बरळत बसली आहेस. तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते? मी तुला विचार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देत आहे. पुन्हा शांत डोक्याने विचार कर आणि मला सांग." मिहिर म्हणाला.

"आता काय आणि चार दिवसांनी काय माझा निर्णय हा बदलणार नाही. मी जे ठरवलंय ते ठरवलंय. बाकी मला काय माहित नाही." असे म्हणून श्रेया तिथून घरी गेली. रस्त्यातून येताना तिला खूप वाईट वाटत होते आणि त्यात ती तिच्या भावना आवरू शकली नाही. तरीही कसेबसे ती घरी आली आणि रूममध्ये जाऊन ओक्सबोक्सी रडू लागली. तिने एक जोरात हुंदका दिला आणि ती रडू लागली. आपण जी स्वप्नं पाहिली होती ती आता सत्यात उतरणार नाहीत असे वाटून ती आणखीनच रडू लागली. दार बंद असल्यामुळे तिचा आवाज बाहेर काही गेला नाही त्यामुळे तिने मनापासून रडून घेतले.

इकडे श्रेया गेल्यानंतर मिहिरच्या मनातील गुंता वाढतच गेला. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे बाबांची इच्छा ह्या दोन्हीमध्ये तो अडकून बसला होता. स्वतःच्या प्रेमाला पहावे तर बाबांची इच्छा पूर्ण होणार नाही आणि त्यांना जर काही झाले तर तो स्वतःला माफ करू शकणार नाही पण बाबांची इच्छा पाहायला गेले तर आपले प्रेम हातातून निसटून जाईल अशी द्विधा मनःस्थिती त्याची झाली होती. तो त्याच गर्तेत तिथे बसला होता. त्याचे मन खूप भरून आले होते पण ते कुठे व्यक्त व्हावे हे त्याला समजत नव्हते.

त्या दोघांची तशी अवस्था पाहून अनुलादेखील खूप वाईट वाटत होते. असे हे त्रिकोणी प्रेम या मोठ्या जाळ्यात अडकले होते. यामध्ये आता नक्की पुढे काय घडेल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all