गंधबावरे 12

एक आगळीवेगळी प्रेमकथा


मिहिर काही फोन उचलेना म्हणून श्रेयाला त्याचा खूप राग येत होता पण ती त्याक्षणी काहीच करू शकत नव्हती. तिने डायरेक्ट अनुला विचारायचे ठरवले आणि ती तावातावाने अनुजवळ गेली.

"अनु, हे नक्की काय चालले आहे? तू माझ्या अगदी जीवाभावाची आहेस ना? तुला तर सगळं माहित होतं ना? मग तू गप्प का बसलीस? तू काही बोललीस की नाही?" श्रेया म्हणाली.

"अगं श्रेयू, मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण माझे कोणीच ऐकले नाही ग. मी काही सांगायला गेले तर मिहिरने मला अडवले आणि माझे बाबा तर ऐकायलाच तयार नाहीत या सर्वांमध्ये मी अडकले आहे. आता मी काय करू तू सांग. मला तर काही समजत नाही. घरात सर्वांना ही बातमी समजली आहे आणि हे जे अचानक घडत चालले आहे याचे मला तर काही समजेना." अनु म्हणाली.

"हा मिहिर सुद्धा माझा फोन उचलत नाही. मी काहीतरी जाब विचारेन म्हणून नाटक करत आहे की काय? तो आता कुठे आहे? तुला माहित आहे का? मी तिथे जाऊन विचारतेच थांब." श्रेया म्हणाली.

"हो ग. त्याच्या बाबांची तब्येत बरी नाही. ते हॉस्पिटलमध्ये आहेत तिथेच तो असेल. मला नक्की माहित नाही. आज तो ऑफिसला सुद्धा गेला नाही असे माझी मैत्रीण म्हणत होती. म्हणजे नक्कीच तो हॉस्पिटलमध्ये असेल." अनु म्हणाली.

"ठीक आहे. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? त्याचा पत्ता मला दे मी तिकडे जाईन." असे म्हणून श्रेयाने अनुकडून हॉस्पिटलचा पत्ता घेतला आणि ती लगेच हॉस्पिटलला जायला निघाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिने रिसेप्शनिस्टला विचारून मिहिरच्या बाबांच्या रूमजवळ गेली. दारातच उभी असताना तिच्या कानावर काही शब्द पडले आणि ती स्तब्ध उभी राहिली.

"मिहिर बाळा, तू माझा शब्द पाळलास मला खूप बरे वाटले. तुला तुझ्या आई बाबांची काळजी आहे हे यातुन स्पष्ट होते. तू खरंच आज माझी मान अभिमानाने वर केलीस. मला वाटत होते की माझ्या मित्रासमोर मान खाली घालायला लागते की काय? पण तू खरंच माझा मुलगा आहेस आणि माझ्या चांगल्याचा विचार करतोस हे मला आज प्रकर्षाने जाणवले. आपण तुझ्या सोयीनुसार लग्न करू. तुझे लग्न अनुशी व्हावे अशी माझी खूप इच्छा होती. आता ती पूर्ण होत आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. तुला जेव्हा लग्न करायचे आहे तेव्हा करू पण माझी इच्छा आहे की हे लग्न लवकरात लवकर व्हावे. आता आमची काही गॅरेंटी नाही. आमचे वय होत आले आहे. तुझे लग्न झाले की आम्ही रिकामे झालो." मिहिरचे बाबा म्हणाले.

"बाबा तुम्ही असे म्हणू नका ना. मला तुमच्याशिवाय कोण आहे? आता तुम्ही लवकरच बरे होणार आहात. तुम्हाला काही झालेले नाही. पुन्हा माझ्यासमोर असले वेडेवाकडे काही बोलायचे नाही; नाहीतर मी लग्नच करणार नाही." मिहिर म्हणाला.

"अरे हो हो. नाही बोलणार मी पुन्हा असे काही. पण तू लग्न करायचा निर्णय पुन्हा बदलू नकोस हा. नाहीतर मग माझे काही खरे नाही. तुझे लग्न हे लवकरात लवकर होणारच. यात कोणीही बदल करू शकणार नाही." मिहिरचे बाबा म्हणाले.

"हो बाबा, सगळे काही तुमच्या मनानुसारच होईल. तुम्हाला जे हवे आहे तेच होईल." मिहिर म्हणाला.

त्या दोघांचे बोलणे श्रेयाच्या कानावर पडले आणि तिला सत्य परिस्थिती काय ते समजले. हा त्याच्या बाबांच्या इच्छेखातर हे करत आहे. यात त्याची काहीच चूक नाही. आता योग्य वेळी मलाच यातून बाहेर पडायला हवे. आता माझा मार्ग मला निवडायला हवा. \"आता मला कुठेतरी दूर निघून जायला हवे या दोघांच्या आयुष्यातून कायमचेच.. म्हणजेच माझ्या मनाला समाधान लाभेल.\" असे म्हणून ती जाऊ लागली. इतक्यात तिला मिहिरने पाहिले. तो तिच्या मागे मागे आला.

"श्रेया, अगं तू इथे अशी अचानक कशी आलीस? बरं आली आहेस तर माझ्या बाबांना भेटून तरी जा आणि मला न भेटता जात आहेस? असे का बरे? मला भेटायची इच्छा नाही का तुझी?" मिहिर म्हणाला.

"कशी होणार इच्छा? आता जे काही चालले आहे त्यामुळे माझे मन खूप दुःखी झाले आहे. मला खूप वाईट वाटत आहे. मला काहीच नको आहे. आता तू माझ्या आयुष्यातून दूर जा नाहीतर मीच जाते. मीच जाईन तुम्हा दोघांच्या आयुष्यातून खूप खूप दूर पुन्हा कधीच न येण्यासाठी. आता तुझे आयुष्य वेगळे आणि माझे आयुष्य वेगळे. आपल्या दोघांचा प्रवास इथपर्यंतच होता. इथून पुढे आता आपल्याला वेगळा मार्ग निवडायला हवा." असे म्हणत असतानाच श्रेयाला खूप गहिवरून आले आणि तिच्या डोळ्यातून टचकन पाणी गालावरून ओघळले.

"अगं, श्रेया तू समजतेस तसे काहीच नाही. तुला जे काही समजले आहे ते पूर्ण चुकीचे आहे. सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे. तू ऐकून तरी घे. तू ऐकल्यानंतर तुलाही खूप छान वाटेल आणि तू कधीच मला सोडून जाणार नाहीस." मिहिर श्रेयाला समजावू लागला.

"मला माहित आहे तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार तुला आणि अनुला हे लग्न करावे लागत आहे. बाबांच्या इच्छेखातर तुम्ही हे सर्व करत आहात. मला सारे काही माहित आहे आणि याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. कधीही मोठ्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला वागावे लागते. नेहमीच आपण आपल्या मनासारखे जगू शकत नाही याचा अनुभव आहे मला. मी स्वतः एकत्र कुटुंबातच राहते म्हणूनच तर मी म्हणते की या सगळ्यापासून मी लांब जाते." श्रेया म्हणाली.

"अगं, अनु आणि मी फक्त लग्नाचे नाटक करणार आहोत तुला समजले का? आमचे एकमेकांवर प्रेम नाही. माझे प्रेम फक्त तुझ्यावर आहे. बाबांच्या इच्छेखातर आम्ही फक्त हे नाटक करणार आहोत. ते पूर्ण बरे झाले की मग मी त्यांना सत्य परिस्थिती काय आहे ते सांगणार आहे. त्यामुळे आता फक्त एक वर्षासाठी तू मला समजून घे." मिहिर म्हणाला.

"नाटकं करणार आहात? असे कसे शक्य आहे? लग्नाचे नाटक कोणी करेल का? आणि नंतर पुन्हा बाबांना सत्य परिस्थिती समजली आणि त्यांना तेव्हा काही झाले तर? तेव्हा ते सत्य पचवू शकतील का? आत्ता तुम्ही असे लपून सगळे करत आहात पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर येईल तेव्हा तुम्हा दोघांचीही बदनामी होणार आहे तेव्हा काय करणार?" श्रेया त्याच्यावर ओरडू लागली.

"अगं श्रेयू, तुला काही समजेना. थांब मी तुला सविस्तर सांगतो. आता आम्ही अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार, अगदी एक वर्षाच्या कालासाठी आणि वर्ष संपले की काहीतरी कारण काढून आम्ही दोघेजण घटस्फोट घेणार. मग त्यानंतर आपण दोघे लग्न करायला मोकळे. कशी वाटली आयडिया?" मिहिर म्हणाला.

"एकदम फेक. अनु या सगळ्यासाठी तयार आहे? तिचे म्हणणे तू विचारात घेतलेस का?" श्रेया म्हणाली.

"ती नाहीच म्हणत होती, पण मीच तिला सारे काही समजावून सांगितल्यानंतर शेवटी तयार झाली. तसेही तिच्या बाबांसमोर ती काही बोलत नव्हती. तिचे बाबाही तिला काही बोलू देत नव्हते. तिच्या बाबांचीही इच्छा होती की आमच्या दोघांचे लग्न व्हावे त्यामुळे ती हे सर्व काही करत आहे. ती तिच्या स्वतःच्या बाबांसाठी करत आहे त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही. तू सुद्धा आता डोके शांत ठेव आणि घरी जा. एका वर्षानंतर आपण दोघे लग्न करू. शिवाय आपण अधून मधून भेटणारच आहोत. आता जसे भेटतो तसे आपण नंतरही भेटू. सो नो टेन्शन." मिहिर एकदम बिनधास्तपणे म्हणाला.

श्रेया या सगळ्या गोष्टीसाठी तयार होईल का? पुढे नक्की काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all