गंधबावरे 11

एक आगळीवेगळी प्रेमकथा


"माझ्या बाबांसाठी तुला हे करावेच लागणार आहे. तुला माझ्याशी लग्नाचे नाटक करावे लागणार आहे आणि तू हे करणार आहेस. माझ्यासाठी आणि श्रेयासाठी तू यासाठी नकार देऊ शकत नाहीस." मिहिर म्हणाला.

"तू श्रेयाचे नाव पुढे करून मला ब्लॅकमेल करत आहेस. श्रेयाला मधे आणू नकोस. तू आणि श्रेया दोघे लग्न करा आणि सुखाने संसार करा. मी तुमच्यामध्ये कधीच येणार नाही." अनु म्हणाली.

"पण आम्हाला आत्ताच लग्न करता येणार नाही हे तुला माहित आहे आणि मी वारंवार तेच सांगतोय तरी तुला पटत नाही का? मी काय म्हणतोय ते तुला समजत नाही का? तुला समजून घ्यावं लागेल. तुला माझी मदत करावीच लागणार आहे. तू यासाठी नकार देऊ शकत नाहीस. बाबांना डिस्चार्ज मिळाला की आपण दोघे लग्न करतोय हे मी फायनल केलं आहे. तू काहीही करू शकत नाहीस." असे म्हणून मिहिर जाऊ लागला. अनुने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवले.

"तुला मी शेवटचे सांगत आहे मला हे लग्न अजिबात मान्य करत नाही. मला तुझ्याशी खोटे लग्न करायचे नाही. अरे, यामुळे माझे आयुष्य व्यर्थ जाईल. माझ्याशी दुसरे कोणी लग्न करणार नाही. तू माझा विचार कर ना. असा स्वार्थी होऊ नकोस रे." अनु म्हणाली.

"मी स्वार्थी होत नाही तर मी माझ्या बाबांचा विचार करत आहे. माझ्या बाबांसमोर मला दुसरे तिसरे काही सुचत नाही. त्यांच्यासाठी मी हे करणारच यामध्ये तुझी इच्छा असो अगर नसो." असे म्हणून मिहिर तिथून निघून गेला.

मिहिर त्याच्या बाबांजवळ गेला. त्याचे बाबा अजूनही शुद्धीवर आले नव्हते. त्याच्या मनाची चलबिचलता वाढली होती. बाबांना काही होणार नाही असे त्याला मनातून वाटत असले तरी तो अस्वस्थ होता कारण आज पहिल्यांदा त्याच्यामुळे बाबांना त्रास झाला होता हे तो मान्य करू शकत नव्हता. त्याला त्याची चूक सुधारायची होती इतकेच त्याला दिसत होते. या गोष्टीसाठी अनु तयार नव्हती पण त्याला काहीही करून बाबांची इच्छा पूर्ण करायची होती. बाबांना बरे वाटू लागले की त्यांना सविस्तर सगळे सांगून श्रेयाशी लग्न करायचे, आता सारे काही त्याच्या मनासारखे होईल याच धुंदीत तो होता. कधी एकदा बाबा बरे होतील आणि त्यांना आनंदाची बातमी देईन असे त्याला वाटत होते.

बराच वेळ तो रूमच्या बाहेर येरझाऱ्या मारत होता, त्याची आई तशीच खुर्चीत बसून होती तर एका बाजूला अनु विचार करत बसली होती. आता पुढे काय होईल? याचा विचार ती करत होती. अनुला तर काही समजत नव्हतं तिचं डोकं बधीर झालं होतं. हा मिहिर असा डोक्यावर पडल्यासारखे का वागत आहे? याचा विचार ती करत होती. मिहिर बाबा ठिक कधी होणार याचीच वाट पाहत होता. अनुचे बाबादेखील तिथेच उभे होते. थोड्या वेळाने डाॅक्टर तिथे आले आणि मिहिरच्या बाबांची तपासणी करू लागले. ते आता शुद्धीवर आल्यामुळे तब्येत व्यवस्थित आहे की नाही, धोका टळला आहे की नाही हे ते तपासून पाहत होते. डाॅक्टर आतून आल्यावर लगेच मिहिर डाॅक्टर जवळ गेला.

"सर, बाबांची तब्येत आता कशी आहे? ते शुद्धीवर आलेत का? आता बरे आहेत का?" अशा अनेक प्रश्नांचा भडीमार त्याने सुरू केला.

"हो. आता ते बरे आहेत. पण त्यांची काळजी घ्यायला हवी. पथ्य पाळावे लागेल." डाॅक्टर म्हणाले.

"हो हो. आम्ही नक्की त्यांची काळजी घेऊ. पथ्य काय ते सांगा. सर, आम्ही त्यांना भेटू शकतो का?" मिहिर म्हणाला.

"हो. पण त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या." डाॅक्टर म्हणाले.

डाॅक्टरांनी सांगताच सगळे एक एक करत आत गेले. मिहिर अगदी मान खाली घालून उभा होता. त्याची आई तिथे बसली. अनु आणि तिचे बाबा दोघेही तिथे उभे होते. मिहिरच्या बाबांनी अनुच्या बाबांकडे पाहिले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. हात जोडतच ते म्हणाले, " मित्रा, मला माफ कर. खरंतर मला वाटलं होतं की आपली मैत्रीचे नात्यात रूपांतर होईल, पण तसे काही होईल असे वाटत नाही. मी करायला गेलो एक आणि झाले भलतेच. पण आता मी जे बोललो ते शब्द मागे घेतो. आपली ही सोयरीक होणार नाही याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे, पण मी तरी काय करू? ज्याला लग्न करायचे आहे तोच नकार देत आहे. आज पहिल्यांदा मला माझ्या मुलामुळे मान खाली घालावी लागत आहे आणि तेही माझ्या मित्रासमोर. " असे मिहिरचे बाबा बोलत असतानाच मिहिरला खूप वाईट वाटू लागले आणि त्यांने भावनेच्या भरात बोलण्यास सुरुवात केली.

"बाबा, मी त्यावेळी नकळत तुमचे मन दुखावले पण आता माझी चूक मला समजली. मी खरंतर तुमचा शब्द पाळायला हवा होता. आजपर्यंत तुम्ही माझ्या भल्याचाच विचार केला आहात त्यावेळी खरंतर पाहण्यात माझी चूक झाली होती. आता जे काही होईल ते तुमच्या मनानुसारच होईल. मी अनुशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही फक्त बरे व्हा. मग आमचे लग्न होईल माझी यात काही हरकत नाही." मिहिर म्हणाला.

"मग मगाशी असे का म्हणालास? की तू अनुशी लग्न करणार नाहीस आणि आता असे काय घडले की तू लगेच तयार झालास. माझ्यासाठी तर तयार होत नाहीस ना?" मिहिरचे बाबा म्हणाले.

"नाही बाबा. आजपर्यंत मी तुमचा शब्द कधी पाळला नाही असे झाले आहे का? आताही तुमच्या मनानुसार होणार. माझी काही हरकत नाही." मिहिर म्हणाला.

"पण मला हे मान्य नाही. मी हे लग्न करणार नाही." अनु म्हणाली.

"पण का बाळा? तुला तर मिहिर पसंत होता ना? तू आधी तयार होतीस आणि आता काय झालं?" अनुचे बाबा म्हणाले.

"ते बाबा..." अनु पुढे बोलणार इतक्यात मिहिरने तिचे बोलणे मधेच अडवले.

"अहो बाबा, ते सकाळी मी नकार दिला ना त्यामुळे तिला राग आला असावा. त्या रागाच्या भरात ती नाही म्हणत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आपण लग्नाची तयारी करायला सुरुवात करू. हळूहळू आमचे बोलणे होईल तसे ती सगळे काही विसरून जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही व्यवस्थित बरे झालात की आम्ही मोकळे." मिहिर म्हणाला.

"मोकळे म्हणजे? आता तर विवाह बंधनात तुम्ही अडकणार आहात. आता तर तुमची खरी सुरुवात होणार आहे आणि तुम्ही मोकळे कसे होणार?" मिहिरचे बाबा म्हणाले.

"तसे नाही बाबा. मोकळे म्हणजे तुमच्या तब्येतीच्या काळजीतून मोकळे झालो असं मला म्हणायचं होतं." असे म्हणून मिहिरने लगेच विषय बदलला.

सगळेजण आपापल्या घरी गेले. मिहिर अजूनही हॉस्पिटलमध्येच होता. जेव्हा घरी जाऊन अनुच्या बाबांनी ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा श्रेयाला खूप मोठा धक्का बसला. ती रागाच्या भरात अनुकडेच पाहत होती आणि मिहिरला फोन करत होती. पण मिहिर डॉक्टरांसमोर बसला होता त्यामुळे तिचा फोन उचलत नव्हता त्यामुळे श्रेयाला आणखीनच राग येत होता.

श्रेया सारे काही ऐकून शांत होईल की मिहिरशी लग्न करण्यासाठी हट्ट करेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all