गंध फुलांचा ३

-------

गंध फुलांचा ३

( मागच्या भागात आपण पाहिलं की जिया लग्न करून सुयोगच्या घरी पाऊल ठेवते. जियाच्या मैत्रिणींनी त्यांच्या लग्नाचे अनुभव जियासोबत share केले होते. पण त्यातला कोणताही अनुभव जियाला येत नव्हता. सुयोग या लग्नाला मनापासून तयार होता की नाही?  यावर जियाला शंका येत होती. माहेरी जातानाही सुयोगशी मोजकं बोलणं झालं होतं. जियाला माहेरी सर्व सांगावस वाटत होतं, पण सुयोगशी सविस्तर न बोलता घरी सांगणे तिला योग्य वाटले नाही. पूजेच्या आदल्या दिवशी सुयोगला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी  दिल्लीला जायचं असत. जियाला सुयोगचा तिच्यापासून दूर राहण्याचा बहाणा वाटतो. जियाला सुयोगशी यावर बोलायचं होतं पण घरी बरेच पाहुणे असल्यामुळे तिने गप्प राहण्याचा निर्णय घेतला. सुयोग पूजेनंतर दिल्लीला निघतो. जातानाही तो जियाशी जुजबी बोलून निघतो. सुयोग दिवसातून एकदा फोन करून घरात सर्वाशी बोलत असे. जियाला मात्र त्याच असं वागणं खटकत होतं. जिया सासरी रुळते. ती घर आणि ऑफिस छान सांभाळते. काही दिवसांनी सुयोग पुढील आठवड्यात येणार असल्याचं कळवतो. जिया मात्र यावेळी काहीही करून गोष्टी फायनल करायच्या असं ठरवते. आता पुढे..... )


सुयोग येणार म्हणून घरात गडबड सुरु होती. २-३ महिन्यांनी परत येणार म्हणून घरी त्याच्या आवडीचा बेत केला होता. जिया कामात मदत करत होती. जियाच्या मनात विचारचक्र सुरु असत. सुयोगशी वेळ मिळेल तस आपण त्याच्या या वागण्यावर बोलू असं ती मनोमन ठरवते. 

सुयोग घरी येतो. त्याला पाहून सर्वांना फार आनंद होतो. सर्व हालहवाल विचारणा होते. जेवण करून सर्वजण बसतात. तेव्हा सुयोगचे बाबा देवदर्शनाचा विषय काढतात. देवदर्शनासाठी जेजुरी, कोल्हापूरची महालक्ष्मी याशिवाय गावी कुलदैवताला जायचं ठरतं. एवढ्या रगाड्यात जियाला सुयोगशी बोलायची संधी मिळत नाही. 

दुसऱ्या दिवशी सर्वजण गावी जायला निघतात. जेजुरी आणि महालक्ष्मी दर्शन करून गावी जायचं असं ठरतं. सुयोग गाडी चालवत असतो तर त्याचे वडील त्याच्या शेजारी बसले होते. त्यामुळे जियाला सुयोगच्या जवळ जाण्याची संधी मिळत नव्हती आणि बोलायचीही संधी मिळत नव्हती. किमान सुयोग आपल्याशी बोलायला येईल असं तिला वाटल पण ही आशाही फोल ठरत होती. 

जेजुरी आणि महालक्ष्मी दर्शन करून सर्वजण गावी जायला निघतात. गावी निघेपर्यंत रात्र झाली होती. त्यामुळे एका ठिकाणी थांबून, जेवण करून सर्वजण पुन्हा गावची वाट धरतात. गावी पोहचायला रात्रीचे १२.३० - १ होणार होता. मागे बसलेली जिया दिवसभर प्रवास आणि अतिविचार यामुळे थकली होती,  त्यामुळे तिला झोप लागते. गावी पोहचल्यावर जियाला सासूबाई उठवतात. 

गावी घरची मंडळी हे सर्व येणार म्हणून जागी होती. त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. गरम पाण्याने हात - पाय धुवून जियाला बरं वाटत. काहीवेळाने सर्वजण झोपायला निघून जातात. जियालाही सासूबाई बरोबर घेवून जातात. 

दुसऱ्या दिवशी जिया उठते तर सकाळच्या प्रसन्न वातावरणामुळे तिला छान वाटत. गावी राहणारी जियाची चुलत नणंद जियाला घराच्या गच्चीवर नेते. आणि तिला सूर्यनारायणा आधी आकाशात दिसणारा गुरु ग्रह दाखवते. सुंदर पहाट, पक्षांचा किलबिलाट, गोठ्यात गुरांच्या मानेत वाजणारी घुंगरू. आकाशात असणारा सुंदर केशरी रंग पाहून जिया खूप खुश होते. ती आधी आई - वडिलांबरोबर गावी गेली होती पण हे सर्व ती पहिल्यांदाच अनुभवत होती. 

जिया खाली येवून अंघोळ करून तयार होते.शहरी  ब्रेकफास्ट करणारी जिया गावची न्याहारीची गोडी चाखत होती. तिला ती आवडतही होती. तिची नजर सुयोगला शोधत होती. तेव्हा तिला कळलं की सुयोग शेतात गेला आहे. जिया घरात दुपारच्या जेवण बनवण्यात मदत करत असते. तिची नणंद तिला त्यांच्या लहानपानपणीच्या गोष्टी सांगत होती. घरातल्या प्रत्येक कोपऱ्याशी त्यांची एक आठवण जोडलेली होती. 

सुयोगच्या आई -वडिलांना ग्रामदेवतेच्या दर्शनाबरोबरच एक छोटी पूजा करायची होती म्हणून दुपारी गावच्या मंदिराचे पुजारी येतात आणि २ दिवसानंतरचा पूजेचा मुहूर्त काढून देतात. घरात पूजेची तयारी सुरु होते. एरवी जुजबी बोलणारा सुयोग आता तेवढंही जियासोबत बोलत नव्हता. जिया आता मात्र आतून तुटत होती. लग्न झाल्यापासून एका नॉर्मल लग्नात घटणारी एकही गोष्ट तिच्यासोबत घडली नव्हती. सुयोगच बोलणं पूर्ण बंद झाल्यानंतर जियाला खात्री वाटू लागली होती की सुयोगला आपल्यात काहीही रस नाहीये. त्याने कदाचित हे लग्न घरांच्या दबावाखाली केलं असावं. 

सुयोगची आजी दुपारी जियाला तिच्या खोलीमध्ये बोलावते. जिया आत जाते. आजी जियाला आपल्या बाजूला बसवते आणि तिचं कोड कौतुक करते. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते. आणि अचानक जियाला विचारते, " काय झालंय?  तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी, तुझ्या चेहऱ्यावर कुठेतरी असं दिसतंय की कसल्यातरी विचारात आहेस.  एका नववधूच्या चेहऱ्यावर जो एक आनंद असतो तो कुठेतरी कमी वाटतोय. काय चालू आहे मनात बाळा सांग मला. " आजीचं बोलणं ऐकून जिया थोडी चाचरते.  आणि ती आजीला, " असं काही नाही आजी" असं म्हणते. 

जिया काही बोलत नाही हे पाहून आजी बोलायला सुरुवात करते, " जिया, बाळा लग्न म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात असते. पूर्वी मुलींना आपल्या नवऱ्याचा चेहराही लग्नाआधी माहित नसायचा. आतातरी जग थोडंफार का होई ना बदललं आहे.तरीही लग्नाची एक प्रकारची भीती सुद्धा असते. पोटात गोळा येतो. यासर्व सामान्य बाबी आहेत. जग कितीही पुढं गेलं असलं तरी मनाच्या भावना पूर्वीही अशाच होत्या आणि आताही अशाच आहेत. बरं हा बदल फक्त मुलींसाठीच नसतो. मुलांसाठीसुद्धा असतो. एक नवीन जबाबदारी असते. आपण आपल्या मनातल्या भावना पटकन बोलू तरी शकतो मात्र पुरुषाला आपल्या भावना व्यक्त करता येतीलच असं नाही. ते बऱ्याचवेळा बायकोला समजून घ्यावं लागतं. माझ्या लग्नानंतर एकदा माझ्या मोठ्या जावेने माझी सोन्याची फुलं घेतली. त्यावेळी वयाने आणि नात्याने मोठ्या माणसांना प्रश्न विचारण्याची सोय नव्हती तर उलट बोलणं वगैरे लांबच राहील. मला त्यांच्याकडून मागताही आली नाहीत ती फुलं. त्यावेळी नवऱ्याला घरातल्या गोष्टी सांगितल्या जात नसतं आणि पुरुषशी या गोष्टींमध्ये लक्ष देत नव्हते. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते सुयोगच्या आजोबानी पाहिलं. पण त्यांनाही मोठ्या वहिनीला बोलायची सोय नव्हती. मग त्यांनी माझ्यासाठी चाफ्याची फुले आणली आणि माझ्याशी काहीही न बोलता माझ्या ओंजळीत देऊन निघून गेले. लग्नानंतर प्रेम हळू हळू फुलतं. अजून तू नवीन आहेस. त्यात सुयोग लग्नानंतर लगेच कामासाठी लगेच बाहेर गेला. तूला अजून थोडं दडपण असेल. पण चिंता करू नकोस. तू हळूहळू रुळशील. 

आजीचं बोलणं ऐकून जियाला वाटू लागतं की कदाचित जसं मला नाही जमलं बोलायला तसंच सुयोगला ही जमलं नसेल. आपण जास्त विचार करतोय का?  असं तिला वाटू लागलं. आता कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता सुयोगला मनापासून भेटायचं बोलायचं. कदाचित त्यालाही माझ्याशी खूप काही बोलायचं असेल. असा विचार ती करू लागली. 


क्रमश........  

गंध फुलांचा १ 

https://www.irablogging.com/blog/gandh-phulancha-1_3894


गंध फुलांचा २

https://www.irablogging.com/blog/gandh-phulancha-2_3911

🎭 Series Post

View all